आता आपणया आपण विचारी
836.
आता आपणया आपण विचारी ।
सेखी प्रकृती ना पुरूष निर्धारी रया ॥१॥
आता प्रेतांचे अळंकार सोहोळले ।
की शब्दज्ञाने जे डौरले ।
दीप न देखती काही केले ।
ऐसे जाणोनिया सिण न मानिती ।
प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥२॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतांचि जे बोधले ।
तेणे सुखे होउनी सर्वात्मक जे असतांची देही विस्तारले ।
येणे निवृत्तिराये खुणा दाउनी सकळ ।
बोलता सिण झणे होईल रया ॥३॥
अर्थ :
आता आपण आपल्या स्वरूपाचा विचार केला तर असे दिसून येईल की आपण शेवटी पुरूषही नाही की प्रकृतिही नाही. शब्दज्ञानी लोकांचे बोलणे प्रेतावरील अलंकारांनी शृंगारल्याप्रमाणे आहे. ते उगीच आपल्या शब्दज्ञानाची प्रौढी मिरवितात. काही केल्याने परमात्मस्वरूप दीप पाहात नाहीत. उलट शब्दज्ञानांचाही ते शीण मानीत नाहीत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यास पाहातांच ज्यांना बोध होतो. त्यांनाच सर्वात्मकाची प्राप्ती होऊन परमात्मा देहांत भरून राहिला आहे अशी खात्री होऊन इतर संभाषणाचा खरोखर वीट येतो. अशी खूण मला निवृत्तीरायांनी दाखविली. असे माऊली सांगतात.
