वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ७१. ज्ञानोपदेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088155 · अभंग क्र. ७१

71.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय एक्काहत्तरावा ॥
त्रिजटेचे दर्शन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्रतिगृह्णिष्व तत्सर्वं मदनुग्रहकांक्षया ।
मुनिवेष्ठं समुत्सृज्य राज्यार्थमनुभूयताम् ॥१॥
एवमुक्तस्तु काकुत्स्थः प्रत्युवाच बिभीषणम् ।
धर्मज्ञं धर्मविद्वाक्य ज्यायज्ञो न्यायकोविदम् ॥२॥

लोटांगणी बिभीषणे । विचित्रालंकार भूषणे ।
विचित्र रत्‍ने विचित्र वसने । आणिली आपण पूजेसी ॥१॥
विचित्र पूजेची सामग्री । घेवानि बिभीषण विनंतीकरी ।
सहित जानकी सुंदरी । पूजा अंगीकारीं मत्प्रीतीं ॥२॥
मजवरी अनुग्रह पूर्ण । त्याचे फळ हेंचि जाण ।
यथासामर्थ्यें पूजाविधान । आणिले प्रीतीने अंगीकारीं ॥३॥
सांडोनि मुनिवेषासी । अंगीकारीं राजचिन्हांसी ।
जेणे सुख होय आम्हांसी । ते प्रीतीसी आचरावे ॥४॥
निजभक्ताचे मनोगत । संरक्षावे यथातथ्य ।
हेंचि तुझे निजव्रत । ते साद्यंत सांभाळी ॥५॥
म्हणोनि घातले लोटांगण । दृढ धरिले दोन्ही चरण ।
तेणे कळवळला रघुनंदन । काय आपण अनुवादे ॥६॥
लौकिक नीति शास्त्र प्रयुक्तीं । मंजुळ वचनें रघुपती ।
स्वये बिभीषणाप्रती । काय विनंती करीतसे ॥७॥

उपपन्नामिदं राजन्मयि कल्याणचेतसि ।
सौहार्दे वर्तमानस्य ग्राह्यश्व प्रणयान्मया ॥३॥
मामजुव्रतचारी च भरतः कैकयीसुतः ।
शत्रघ्नसहितो विद्वान्मदाराधनलालस: ॥४॥
राज्यश्रियं परित्यज्य मुनिवेषधरः किल ।
तपस्तप्यति मे भ्राता नंदिग्रामकृतालय: ॥५॥

भरताची स्वे घेतल्यणिवाव राज्याभिषेकादि गोष्टीस रामांचा नकार :

ऐक लंकाधिपति वृपवरा । तू मज निजाचा सोयरा ।
तुझेनि -धर्मे दशशिरा । बाणधारा निवटिले ॥८॥
जो अजेय त्रैलोक्यासी । बंदी घातले सुरवरांसी ।
अदट कर्म जयापासीं । तो बाणे एकेंसीं निवटिला ॥९॥
एवढे कर्म दारुण । तुझेनि धर्मे साधिले पूर्ण ।
त्या तुझे निजवचन । केंवी उल्लंघन करू शके ॥१०॥
परंतु तुवांचि निजचित्तीं । विचारावे यथानिगुती ।
भरत सांडोनि अयोध्येप्रती । व्रतसमासी केंवी करणे ॥११॥
सांडानि आहारविहार । तुच्छ करोनि राज्य समग्र ।
भूमिशायी वल्कलांबर । व्रत घोर अंगीकारिलों ॥१२॥
सांडोनि आस्तरणप्रावरण । राज्यभोग पै संपूर्ण ।
अयोध्ये न वचे मजवीण । सिंहासन न पाहे ॥१३॥
कैकेयी माता अति प्रीती । शिकवितांही नाना युक्ती ।
राज्या न शिवेचि हाती । धैर्यमूर्ति पै भरत ॥१४॥
चित्रकूटाच्या ठायी । शिकविला बहुसाल मींही ।
राज्य देता लवलाही । प्राणावरी पाही उठावला ॥१५॥
प्राण त्यागितां भरतासीं । तेथे आला वाल्मीक ऋषीं ।
समजावितां आम्हा दोघांसी । वाल्मीकासी अति कष्ट ॥१६॥
मी न सांडीं वनवास । भरत अंगीकारीना राज्यभारास ।
तेणे काळे अनागत भाष्य । ऋषीनें भरतास सांगितले ॥१७॥
वनवासींचें सकळ चरित्र । भरता सांगितले समग्र ।
तेणे काळे महावीर । दुःखे तत्पर परतला ॥१८॥
करोनिया अति निर्वाण । भरतें वाहिली आण ।
श्रीरामावांचूनि आपण । राज्यभुवन न पाहे ॥१९॥
मागोनि माझ्या पादुका । मस्तकी बांधिल्या देखा ।
अयोध्ये न येता रघुकुळटिळका । सर्वथा देखा उतरींना ॥२०॥
माझी वनवासाचीं व्रतें । तितुकीं अंगीकारिली भरतें ।
शनुध्नहीं तैसींच तेथे । कठिण व्रते आचरत ॥२१॥
तिघी आगळ्या शते सात । माझ्या माता तळमळित ।
अयोध्येचे जन समस्त । आर्तभूत मजलागी ॥२२॥
राजधानी सांडूनि वहिला । भरत नंदिग्रामीं राहिला ।
त्यासी उपेक्षोनि मला । अभिषेक भला केंवी माने ॥२३॥

भरतभेटीवाचून राज्याभिषेक ही धर्मनीती नव्हे :

धर्मनीति नव्हे ऐसी । जगी होईल उपहासी ।
म्हणोनि विनवितो तुम्हांसी । दुर्निमित्तासी चुकवावें ॥२४॥
जे मज अपेक्ष जघन्य । ते तुम्हांसी नव्हे मान्य ।
याकारणें तुम्ही आपण । जघन्य सांडावें ॥२५॥
म्हणोनि घातले लोटांगण । क्षमा करावी मज संपूर्ण ।
आम्हांसी द्यावे आज्ञापन । करावे गमन लंकेसी ॥२६॥
सुख द्यावे प्रजांसी । सुख द्यावे विश्वजनासी ।
सुख देवोनि कलत्रपुत्रांसी । निजराज्यासी भोगावें ॥२७॥

अयोध्येला जाण्यासाठी श्रीरामांची उत्कंठा :

माझे मन उत्कंठित । बंधु माता सुहद समस्त ।
गुरुदर्शनालागी बहुत । उत्कंठित मन माझे ॥२८॥
मज दिधलिया आज्ञापन । सकळ पावले पूजाविधान ।
स्वये मानोनि समाधान । क्षमा आपण करावी ॥२९॥

अनुजानीहि मां सौम्य पूजितो5हं बिभीषण ।
मन्युः खलु न कर्तव्यस्तवरितं चानुमानय ॥६॥

त्रिजटेला भेटीस आणण्याची श्रीरामाची बिभीषणाला अनुज्ञा :

कोप सांडोनि तत्वता । आज्ञा पावे लंकानाथा ।
विलंब न करावा सर्वथा । उदासता न करावी ॥३०॥
आपण जावे लंकेसी । आनंदवावे सर्वांसीं ।
त्रिजटा सखी जानकीसीं । अत्यादरें तिसी पूजावें ॥३१॥
जैसी माझ्या ठायी प्रीती । त्रिजटा पूजावी त्याच स्थिती ।
तिचेनि संगे सीता सती । तरली निश्चिती दुर्गम ॥३२॥
रावणाचा कडकडाट । तीव्र कामे दुर्धराट ।
त्याचे करावया सपाट । संगती निर्दुष्ट त्रिजटेची ॥३३॥
येईल तरी आणीं भेटीसी । परी प्रीती करावी बहु तिसी ।
तेणे अति सुख आम्हांसी । मद्‌भक्तांसी पूजिलिया ॥३४॥

वैदेह्माश्च सखी तत्र त्रिजटा नाम राक्षसी ।
अस्यास्तु प्रियहेतोस्त्वमनुज्ञां दातुमर्हसि ॥७॥

जानकीच्या सुखाकारणें । अवश्य त्रिजटेसी पूजणें ।
मद्‌भक्त पूजिलें जेणे । तेणे अनंत गुणे मज पूजिलें ॥३५॥

रामासह अयोध्येत येण्याची बिभीषणाची त्यांना आग्रहाची विनंती :

ऐकोनी श्रीरामवचन । लोटांगणी बिभीषण ।
विनविता झाला आपण । रघुनंदन वंदूनी ॥३६॥
आज्ञापिले स्वामिनाथा । ते मज वंद्य निजमाथां ।
लंके न वचे सर्वथा । येईन भरताचे भेटीसी ॥ ३७ ।
त्रिजटेचीं प्रीति गहन । तरी क्षणही न लागता जाण ।
येथे घेवोनि येईन । नमनालागून स्वामीच्या ॥३८॥
श्रीराम सांडोनिया वनी । विषयविलास भोगालागूनी ।
जो प्रवेश राजभुवनी । श्यामवदनी तो पापी ॥३९॥
दासाचा धर्म पूर्ण । निजस्वामी सुखसंपन्न ।
प्रवेशल्या राजसुवन । तेंचि आज्ञापन सेवका ॥४०॥
यालागी स्वामिनाथा । लंके न वचे सर्वथा ।
सवे येईन जी तत्वता । बंधुभरता भेटीसी ॥४१॥
झणी अव्हेरू करिसी माझा । मी सवे येईन रघुराजा ।
निजभक्त कैवारी हा तुझा । निजपैजा बडिवार ॥४२॥
नुपेक्षिसी विज्ञापन । म्हणोनि केले प्रार्थन ।
मज सांडोनि जाता पूर्ण । प्राणोत्क्रमण होईल माझे । ४३ ॥

श्रीरामांनी ती विनंती मान्य केल्यामुळे बिभीषणाला परमानंद :

ऐकोनिया ते वचन । प्रीती आलिंगिला बिभीषण ।
बाप कृपाळु रघुनंदन । अंतर पूर्ण जाणता ॥४४॥
निजभक्ताचें मनोगत । संरक्षावे यथातथ्य ।
जाणता एक रघुनाथ । आणिका हे वृत्त कळेना ॥४५॥
अंतर जाणता श्रीराम । जो का भक्तकामकल्पद्रुम ।
भक्तलळे अति निःसीम । पाळावे नेम तयांचे ॥४६॥
रामे अति प्रीती आलिंगिला । तेणे बिभीषण सुखावला ।
ब्रह्मसुखा विटावूं लागला । ऐसा झाला आनंद ॥४७॥
तेणे आनंदें नाचत । निजदेह न सांभाळित ।
रामरूपें सकळा नमित । हर्षयुक्त लोटांगणी ॥४८॥

त्रिजटेला रामदर्शनार्थ आणण्याची बिभीषणाची आपल्या दासांना आज्ञा :

बोलावूनि निजगण । सांगता झाला बिभीषण ।
लंकेमाजि जावोनि आपण । घ्यावें दर्शन त्रिजटेचे ॥४९॥
जिवलग सखी जानकीची । अनिवार प्रीति राघवाची ।
तेणेंचि तियेचे भेटीची । श्रीरामांसी उत्कंठा ॥५०॥
जे अनिमेष चिंतिती रामासी । राम चिंतित तयांसी ।
स्मरणाची महिमा ऐसी । देव भक्तासी ध्यातसे ॥५१॥
देवासीं ध्यान भक्ताचें । काय वानू भाग्य त्याचे ।
दर्शन घ्यावया त्रिजटेचे । मन रामाचे उत्कंठित ॥५२॥
श्रीरामाचे प्रियकर । ते वंद्य आम्हा साचार ।
विमानी घालोनि सत्वर । आणावी रघुवीरदर्शना ॥५३॥
कुबेरापासोनि विमान । घेतलें रावणे हिरोन ।
ते घेवोनि यावे आपण । श्रीरघुनंदन आरोहणा ॥५४॥
ऐसे आज्ञापितां दूतांसी । आज्ञेप्रमाणें लंकेसी ।
जाऊन भेटले त्रिजटेसी । लोटांगणेंसी अति प्रीती ॥५५॥
माते त्रिजटे परिसे विनंती । बिभीषणे पाठविले तुजप्रती ।
तुझे भेटीची श्रीरघुपती । आस्था चित्ती लागलीसे ॥५६॥
जरी मानेल तुझिया मनार । तरी आरूढ होवोनियां विमाना ।
भेटावया रघुनंदना । शीघ्रत्वे जाण चलावें ॥५७॥

त्रिजटेने विमान नाकारून ती पायी चालत निघाली :

ऐकोनिया आज्ञापन । त्रिजटा घाली लोटांगण ।
श्रीरामे केली आठवण । भाग्य गहन पै माझे ॥५८॥
आज्ञेप्रमाणें त्वरित । तेथे येईन डोई चालत ।
विमानाचें कार्य येथ । मज सर्वथा असेना ॥५९॥
माझा गुरु सीता सती । विमाना नातळेचि ते सर्वार्थीं ।
भेटावया रघुपती । गेली चालत निजचरणी ॥६०॥
जिये वर्जिलें फळ मूळ । मांस जिरालें सकळ ।
अशुद्धव नाही अळुमाळ । अस्थिचर्म केवळ एक झाले ॥६१॥
ते भेटावया रघुपती । गेली चरणी चालती ।
तिसी न पाहेचि रघुपती । कठिणवृत्तीं दिव्य मागे ॥६२॥
तेथे इतरांची गति कायसी । जे राम भेटेल विषयविलासीं ।
ज्यासी विषयेच्छा मानसी । श्रीराम त्यासी केंवी भेटे ॥६३॥

संप्रदायाची महती :

यालागी मी आपण । सर्वथा नातळे विमान ।
गुरुसंप्रदायेंकरोन । श्रीरामचरण सेवीन ॥६४॥
जो लाजे संप्रदायासी । अथवा का विषयविलासी ।
तो केंवी पावे रामासी । जाय निजनरकासी निजकर्म ॥६५॥
विषयांचिये संगतीं । नरका गेले नेणो किती ।
अद्यापि कायसी विषयस्थिती । निजांगे रघुपती सेवावा ॥६६॥

रामदर्शनार्थ चाललेल्या त्रिजटेची भावावस्था :

म्हणोनि उठली सुंदर । रामदर्शनी आल्हादपर ।
चरणी चालत वेगवत्तर । श्रीरामचंद्रनमनासी ॥६७॥
सीता गेली ज्या रीती । आठवोनियां ते स्थिती ।
अति हळूवार लघुगती । पदगर्ती संचार ॥६८॥
अति साटोपे देह चालता । सर्वथा चळण नाही चित्ता ।
चित्त जडले श्रीरघुनाथा । श्रीरामकांतानुग्रहें ॥६९॥
अनुग्रहाचें बळ दारुण । चळण सर्वत्र जो अपरिच्छिन्न ।
रहितदेशकाळवर्तमान । चित्त निमग्र तेथे झाले ॥७०॥
तेणे अनुसंधाने चालता । धरा न दिसे पाऊल ठेवितां ।
दृश्य नये दृष्टीचे हाता ॥ शब्दीं निःशब्दता शब्दार्थे ॥७१॥
निग्रहोनि सर्वेंद्रियवृत्ती । श्रीराम धरोनिया चित्ती ।
भेटावया रघुपती । आनंदभरित चालिली ॥७२॥
अंतरींचिया निजवृत्ती । त्रिजटा चालता सहजस्थितीं ।
पुढे देखिला रघुपती । सीतासतीसमवेत ॥७३॥

सीता-रामांच्या दर्शनामुळे त्रिजटेला अपार आनंदाचे भरते :

जेंवी सागरी लहरी । क्रीडे त्याची त्यावरी ।
श्रीरामे सीता सुंदरी । तैसियापरी शोभत ॥७४॥
सूर्याचे ठायी जैसी दीप्ती । की कर्पूराचे ठायी दृती ।
कनकाच्या ठायी कांती । श्रीरामी शोभती तेंवी सीता ॥७५॥
रामरूपी जगज्जननी । देखोनिया जनकनंदिनी ।
हरिखली राक्षसभगिनी । लोटांगण घालित ॥७६॥
चुकलिया बाळका माता । भेटलिया आनंद चित्ता ।
तेंवी देखोनि जनकदुहिता । त्रिजटेच्या चित्ता अतिहरिख ७७ ॥
मूकिया जोडे वाक्यसिद्धी । की निर्दैवा लाभे महानिथी ।
पुरश्चरणें मंत्रसिद्धी । जेंवी समाधि योगिया ॥७८॥
जिज्ञासुया ब्रह्मज्ञान । तेंवी जानकरिधुनंदन ।
देखोनिया त्रिजटापूर्ण । आनंदमग्न पै झाली ॥७९॥
ते देखोनि श्रीरामासी । अति अवस्था झाली कैसी ।
देखोनिया निजवत्सासी । धांवे प्रीतीसी माउली ॥८०॥
चुकलिया बाळक माता । भेटलिया आलिंगी तत्वता ।
तैसे झाले श्रीरघुनाथा । सप्रेमता आलिंगी ८१ ॥
आलिंगितां रघुनंदन । त्रिजटा आनंदमग्न ।
सागरी मिळे जेंवी लवण । तैशी दशा पूर्ण पै झाली ॥८२॥
अलंकार हारपे सुवर्णी । तेंवी त्रिजटा रघुनंदनी ।
स्वये गेली पै बुडोनी । सर्वथा जनी अलक्ष ॥८३॥
आलिंगनाचे मिषे पूर्ण । स्वरूपीं समावेश करून ।
हळूच सोडिली आलिंगून । त्रिजटा आपण श्रीरामे ॥८४॥
नसोनियां दोनीपण । प्रतिबिंब भासे पूर्ण ।
तेंवी सुटलें आलिंगन । दोनीपण नुरवोनी ॥८५॥
चरणी ठेवोनि मस्तक । उथळले निजसुख ।
तेणे करोनि रघुकुळटिळक । त्रिजटा देख प्रार्थित ॥८६॥

श्रीरामांना त्रिजटेची विनम्र विज्ञापना :

श्रीरामस्वामी सावधान । परिसावे माझे विज्ञापन ।
तुझे संगतीहूनि जाण । संगति गहन दासांची ॥८७॥
तुझ्या आलिंगनीं देख । देसी जे निजात्मसुख ।
ते देणे अलोलिक । वचनमात्रें निजभक्तीं ॥८८॥
वेदशास्त्रां नेणवसी । साधकासी नातुडसी ।
तो केंवी येरा आतुडसी । दर्शनासी धांडोळिता ॥८९॥
तीर्थोतीर्थी फिरों जातो । सर्वथा न लभे तुझी वार्ता ।
अधोमुखें धूपम्र घेता । तू सर्वथा नातुडसी ॥९०॥

सत्संगमहिमा :

पात करिता पर्वती । देह देता कर्वतीं ।
सर्वथा नव्हे तुझी प्राप्ती । सत्संगतीवांचूनी ॥९१॥
उग्र तपीं जो नातुडसी । तो श्रवणकीर्तनापासीं ।
सत्संगतीसीं पै तिष्ठसी । अहर्निशी श्रीरामा ॥९२॥
सत्संगती कथाश्रवण । सद्धावें करिता संपूर्ण ।
साकल्यें सांपडसी पूर्ण । श्रवणें जाण अनायासे ॥९३॥
अथवा का हरिकर्तिन । विलज्ज करिता जाण ।
नामे ओसरला येसी । आपण वत्सालागून धेनु जेसी ॥९४॥
सत्संगें नामकीर्तन । निःशंक करिता संपूर्ण ।
न पाचारिता येसी धांवोन । समाधान कीर्तनी ॥९५॥
भक्त विरक्त जरी चित्ती । तरी ओळंगती चारी मुक्ती ।
जरी भक्त न धरी हाती । दाटोनि निघती घर त्याचे ॥९६॥
मुक्ती होवोनि अंकिता । नित्य ओळंगती तुझिया भक्ता ।
कृपेनेंहात ठेविता माथा । स्वये रघुनाथा भेटसी ॥६७॥
विषमबुद्धी तुजपासी । सर्वस्वें भजती अहर्निशी ।
त्यांसीच तू प्रसन्न होसी । बुद्धि ऐसी लाचुगी ॥९८॥
परी अभक्ताच्या घरासी । विसरोनियांही न वचसी ।
तैसे नाही तुझ्या भक्तासी । नाही मानसी अरिमित्र ॥९६॥
निजहितीं चाड ज्यांसी । तिही सांडोनि इतर संगासी ।
दृढ धरिता सत्संगासी । निजसुखासीपाविजे ॥१००॥

त्रिजटेने वर्णिलेला अनुभव:

नव्हती आणिकांच्या कथा । माझा अनुभव प्रत्यक्ष आता ।
भेटलिया जनकदुहिता । श्रीराम तत्वता भेटलो ॥१०१॥
कर्म विचारिता राक्षसी । मनुष्याचा आहार आम्हांसी ।
भेटी होता जानकीसी । निजकर्मासी विसरले ॥१०२॥
सत्संगें स्मरता नाम । नामे झाले नित्य निष्काम ।
प्रत्यक्ष भेटला श्रीराम । विश्रामधाम जगाचें ॥१०३॥
दुष्टकर्मी हाडखायेर । त्यासी भेटला रघुवीर ।
हा सांगाचा बडिवार । वदावया वक्त्र सरेना ॥१०४॥

संताची लक्षणे व गुरुदास्याचे महत्त्व :

कोण तो संत म्हणसी । जेणे भेट होय श्रीरामासी ।
ऐक त्याच्या चिन्हांसी । यथामतीसीं सांगेन १०५ ॥
स्वस्वरूपीं अवधान । करी तो मुख्य साधु पूर्ण ।त्या
सद्‌गुरू परता जाण । साधु आन असेन ॥१०६॥
मुख्य साधुत्व सद्‌गुरुसी । स्वये सेविता तयासी ।
लात देवोनि संसारासी । ब्रह्मत्व अंगासी स्वये घडो ॥१०७॥
सकळ साधनां श्रेष्ठ पूर्ण । मुख्यत्वें गुरुसेवन ।
गुरुदास्या परतें जाण ।साधन आन असेना ॥१०८॥
निष्काम पुण्याचिये जोडी । केल्या होती जन्मकोडी ।
तै लाहि जे रोकडी । निजावडी गुरुचरणी ॥१०९॥
नाना साधनी बहुत । कदा काळे नव्हे प्राप्त ।
तो गुरुदास्यास्तव येथ । होयप्राप्त निजात्मा ॥११०॥
तीर्थातीर्थाचिया प्रदक्षिणा । क्षम नुपजे ज्ञानध्याना ।
तेणे गुरुवचनासाठीं जाणा । आत्मदर्शन लाहिजें ॥१११॥
योगयागादि नाना व्रतें । स्वतां सामर्थ्य नाही त्याते ।
देखिलिया सद्‌गुरुतें । मुरडती समस्ते लाजोनी ॥११२॥
याकारणें भलतेणें । उठावया संसारधरणें ।
दृढ गुरुदास्य करणे । येर साधणें काज नाही ॥११३॥
मुखी सद्‌गुरुनामस्मरण । मनी गुरुमूर्तीचें ध्यान ।
श्रवणी गुरुचरित्रश्रवण । करी पूजन पादसेवा ॥११४॥
पायी नित्य-दक्षिण अथवा को दर्शनागमन ।
बुद्धीचा निश्चयी पूर्ण । अज्ञा प्रमाण संप्रदायें ॥११५॥

प्रेमातिशयाने त्रिजटा मूर्च्छित :

ऐसे सांगतांसांगता । पूर्ण भरतें दाटले ।
न सांभाळे प्रेमावस्था । पडली तत्वता मूर्च्छित ॥११६॥
ते देखोनिया समग्र । अवघी केला जयजयकार ।
गुरुमाहात्म्यचरित्र । अति पवित्र महामहिमा ॥११७॥
साचार श्रीरामाची प्रासी । गुरुवचनी असे तिष्ठती ।
येवढी गुरुदास्थाची स्थिती । त्रिजटा ख्याती अनुवादली ॥११८॥
सौमित्रादि बिभीषण । सुग्रीव आणि हनुमान जाण ।
मूर्च्छित सकळ वानरगण । चरित्र पावन ऐकोनी ॥११९॥
ते देखतांचि राबवा । आकळिले अति कणवा ।
विसरला निजस्वभाव॥ उठाउठी खेंवा मिठी घाली ॥१२०॥
प्रयासीं सुटलें आलिंगन । परी दोघांही नाही दोनी पण ।
बाप कृपाळु रघुनंदन । आनंदला पूर्ण भक्तकीर्ती ॥१२१॥
आपुले प्रतिबिंब पूर्ण । ते हे साधु सजन ।
ऐसे जाणोनि आपण । त्रिजटा देखोन सुखाचे ॥१२२॥
लोटांगण घालोनि सकळांसी । त्रिजटा बोले अति प्रीतीसी ।
भावे भजता सजनांसी । भेट अनायासीं श्रीरामाची ॥१२३॥

संतनिंदेचे दुष्परिणाम :

हेळणा का द्वेषण । सजनांचें करिता संपूर्ण ।
उभयलोकीं निंद्य जाण । नरक दारुण तयासी ॥१२४॥
इहलोकी जननिंद्य । पुढे दारुण नरकबाध ।
वार्ता नव्हे अर्थवाद । प्रत्यक्ष संबंध घडलासे ॥१२५॥
माझी भगिनी शूर्पणखा । विरोधता रामनायिका ।
स्वये मुकली काना नाका । निंद्य लौकिका पै झाली ॥१२६॥
म्या सेविली सीता सती । तेणे मज श्रीरामप्राप्ती ।
विरोधता जानकीपती । नरकप्राप्ती शूर्पणखे ॥१२७॥
इहलोक ना परलोक । स्वये निंदिती नीच लोक ।
ऐसी दशा अलौकिक । विरोधितां देख सजन ॥१२८॥
त्रिजटा निजप्रतीती । अनुवादतां अति प्रीती ।
आनंदली त्रिजगती । सुर वर्षती सुमनभार ॥१२९॥

सीता, बिभीषण आणि प्रमुख वानरांना त्रिजटेचे लोटांगण :

जानकीसी लोटांगण । घालूनि दिधले आलिंगन ।
तैसाचि सौमित्र जाण । प्रेमेंकरोन आलिंगिला ॥१३०॥
देखोनिया बिभीषण । हरिखे घाली लोटांगण ।
तुझेनि धर्मेकरोनि जाण । वंशोद्धरण श्रीरामे ॥१३१॥
शरण जाऊनि श्रीरामासी । उद्धारिलें सकळ कुळासी ।
कीर्ति पावन सकळ जगासी । हाडखाइरासीं रामभजन ॥१३२॥
सुग्रीव अंगद जांबवंत । जुत्पती मिनले समस्त ।
येरी अत्यादरें तेथ । नमन करीत सर्वांसी ॥१३३॥

मारूतीला वंदन व त्याची प्रशंसा :

पुढे देखोनि मारुती । आनंद उथळला चित्ती ।
लोटांगण अति प्रीती । मिठी घालिती हनुमंता ॥१३४॥
तुझे नाम मारुती । तू प्राण सकळांचा निश्चिती ।
तुझेनि सकळा स्थितिगती । चाळक श्रीरधुपतीचा होसी ॥१३५॥
प्राणें प्राण्या निजगती । प्राणे प्राण्या नित्यविश्रांतीं ।
प्राणें प्राण्या जीवनस्थिती । प्राणी वर्तती निजप्राणे ॥१३६॥
असो आणिकांची स्थिती । जानकीचा प्राण तू निश्चिती ।
घेवोनि येऊनि श्रीरघुपती । लंकापती निवटिला ॥१३७॥
सोडविल्या सुरपंक्ती । बिभीषणा राज्यप्राप्ती ।
भेटवोनि सीते रघुपती । राक्षसपंक्ती उद्धरिली ॥१३८॥
नमन करिता सीता सती । न पाहेचि रघुपती ।
सुग्रीवादि सकळ जुत्पती । करिता विनंती पाहेना ॥१३९॥
बिभीषण आणि सौमित्र । सकळ सुरवरांचा भार ।
विनविता अति तत्पर । चरित्र पावन त्रिलोकी ॥१४०॥
ते काळी तुवा आपण । प्रबोधोनि रघुनंदन ।
ख्याती केली दारुण । पावन चरित्र त्रिलोकीं ॥१४१॥
दिव्या उतरोनि सीतेसी । प्रसन्न केले स्वामीसीं ।
अति प्रीती ऐक्यतेसी । प्रकृति पुरुषासी भेटविली ॥१४२॥
तुझिया उपकाराचे स्वामी । अवघे जाण ऋणी आम्ही ।
ते प्रकृति सरती श्रीरामी । तुझ्या धर्मी पै झाली ॥१४३॥
प्रकृति पुरुषा एकात्मता । तुझ्या हाती गा हनुमंता ।
देहो श्रीरामी सरता । होय तत्वता तुझेनि ॥१४४॥

मारुतीकडून त्रिजदेला वंदन व परस्परांचे रामगुणसंकीर्तन :

ऐसे करिता विनवण । हनुमान घाली लोटांगण ।
प्राणांचा चाळक रघुनंदन । सकळ पावन त्याचेनि ॥१४५॥
बहुत बोलोनि कार्य कोण । सकळीं स्मरावा रघुनंदन ।
तेणे त्रैलोक्य पावन । सकळोद्धारण श्रीरामे ॥१४६॥
ऐसे श्रीराममहिमान । परस्परें भक्तजन ।
करिते झाले वर्णन । श्रीरामध्यानसंनिष्ठ ॥१४७॥
ऐकता निजभक्तकथा । परमानंद श्रीरघुनाथा ।
विस्मित होवोनि तत्वता । भक्तचरित्रा पहातसे ॥१४८॥

पुष्पक विमानातून अयोध्येस जाण्याची रामांना बिभीषणाची विनंती :

तंव शरणागत बिभीषण । घेवोनि कामग विमान ।
लोटांगणी रघुनंदन । प्रीतीकरून विनविला ॥१४९॥
कुबेरापासोनि विमान । रावणे हरितलें आपण ।
ते निवेदोनि बिभीषण । करी विनवण श्रीरामा ॥१५०॥
जानकीसहित आपण । सवे सुमित्रानंदन ।
येथे करावे आरोहण । करावया गमन अयोध्ये ॥१५१॥
अति रमणीय कामग । संकल्पमात्रें सवेग ।
अपेक्षित स्थळ अव्यंग । न लागता निमेष पाविजे ॥१५२॥
ज्वाळमाळाकिंकिणीं । सुवर्णमयरत्‍नाभरणी ।
पाचपेरोजांची मांडणी । तेजे दिनमणी आच्छादी ॥१५३॥
पताका झळकती अंबरी । मुक्तघोषांचिया हारी ।
हिरे माणिके विचित्रपरी । अतिकुसरीं७ खेवणिलीं ॥१५४॥
ऐसे अति मंडित विमान । पुढे देवोनि बिभीषण ।
करोनि चरणांसी नमन । कर जोडून राहिला ॥१५५॥
ते देखोनिया रघुपती । संतोषला निजचित्तीं ।
अति मंजुळ मधुरवृत्तीं । बिभीषणाप्रती अनुवादे ॥१५६॥

परवस्तूच्या उपभोगास रामांचा नकार :

जितुके रावणाचे वैभव । तुज दिधले म्या सर्व ।
तुवा बैसोनियां स्वयमेव । सुखगौरव भोगावें ॥१५७॥
जेव्हा निवटिला दशाननी । तेव्हांचि तुझी राजधानीं ।
ऐसे सर्वथा जन मानी । परमभोग पतनी घालिती । १५८ ॥
परममुक्त जो विषये । सर्वथा नातळती योगिये ।
कदाचित इच्छा जाये । तै व्यभिचार पाहे पै केला ॥१५९॥
बिभीषण झणें भाविसी चित्ती । ज्यासी नातळे रघुपति ।
ते आपणासी भोग्य न होती । ऐसे सर्वाथी न म्हणावें ॥१६०॥
लंकेचें राज्य समस्त । तुम्हा भोग्य परंपरागत ।
म्हणोनि अधिकार येथ । भोगी साद्यंत असे तुम्हा ॥१६१॥
ऐसे बोलता रघुनंदन । तटस्थ झाला बिभीषण ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥१६२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
त्रिजटादर्शनं नाम एकसप्ततितमोऽध्यायः ॥७१॥
॥ ओव्या १६२ ॥ श्लोक ७ ॥ एवं १६९ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग