वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ६४. प्रजासुख

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088156 · अभंग क्र. ६४

64.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय चौसष्टावा ॥
रावणस्त्रियांचा विलाप

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणवधानंतर सैन्याची दाणादाण व पळापळ :

करोनिया रणकंदन । ससैन्य रणी रावण ।
स्वये पाडिला आपण । उरले सैन्य देशोधडी ॥१॥
एकी दिगंतर लंघिले । एका कंठी प्राण उरले ।
एका गात्रां कंप सुटले । एक निमाले आपधाकें ॥२॥
एके झालीं भ्रमित । एका सुटला अधोवात ।
एकां मूत्रवृष्टि होत । प्राण सांडित उभ्यांउभ्या ॥३॥
एक होवोनि कासाविसी । रडत रडत रणभूमीसी ।
बोंब घेवोनि वेगेंसीं । आली लंकेसी सांगत ॥४॥
एक सांडिती लेणीं लुगडी । एक तृण धरिती तोंडीं ।
एकांचि वळली बोबडी । पडली मुरकुंडी एकांची ॥५॥

अनेकांची दीनवाणीने श्रीरामांनी ठार करु नये म्हणून प्रार्थना :

एक येती काकुळती । मारु नको रघुपती ।
शरण आलो तुजप्रती । करिसी किती संहार ॥६॥
एक म्हणती माजी रणा । झुंजों आलो नाही जाणा ।
पहावया युद्धरचना । रामरावणरणामाजी ॥७॥
एक योवोनि काकुळती । श्रीरामाते विनविती ।
धरोनि आणिले बहुती । रणख्याती नाही आलो ॥८॥
एक विनविती रामासी । व्यर्थ न मारी आम्हासी ।
सणा आलो दिवाळीसीं । जामातें परियेसी सासुरियां ॥९॥
कोणी आला पाहुणा । कोणी आला दिवाळसणा ।
मारुं नको रघुनंदना । जीवदाना आम्हा देई ॥१०॥
ऐसे येती काकुळती । भूमी गडबडा लोळती ।
बाण गेला रामाप्रती । तरी बरळती आपधाकें ॥११॥
रामे वधिला रावण । देखोनिया राक्षसगण ।
सैरां पळती रानोरान । देहलोभेंकरुन निजभयें ॥१२॥

तंदृष्ट्वा निहता भूमौ हतशेषा निशाचराः ।
हतनाथा भयत्रस्ताः सर्वतो विप्रदुद्रुवुः ॥१॥
सर्वतश्चाभिपेतुस्तान्वानरा दुमयोधिनः ।
दशग्रीववधं दृष्ट्वा विजयं राघवस्य च ॥२॥

शत्रुसैन्याची दाणादाण पाहून वानरसैन्याचा आनंदोत्सव :

भूमीं पडता रावण । दशदिशा रक्षोगण ।
रडत रडत पळती जाण । निशाचरण अति दुःखी ॥१३॥
ते देखोनि वानर । अवघे झाले आल्हादपर ।
नाचो लागले समग्र । करिती गजर नामाचा ॥१४॥
एक झेलीत पर्वतशिखरें । एक झेलीत वृक्षाग्रें ।
हरिखें नाचती वानरे । रावण रघुवीरे निवटिला ॥१५॥
नमन करिती येरयेरें । क्षेम देती परस्परें ।
किराणे देती अति आदरे । रावण रघुवीरे निवटिला ॥१६॥
एक गर्जती भुभुःकारें । एक गर्जती नामोच्चारें ।
झालीं आनंदें निर्भरें । रावण रघुवीरे निवटिला ॥१७॥
जो नागवे त्रैलोक्यासी । यम काळ कांपती ज्यासी ।
त्या निवटिले रावणासी । निजबाणेंसी श्रीरामे ॥१८॥
जो न भिये शंकरासी । आंदोळिले कैलासासी ।
त्या निवटिले रावणासी । निजबाणेंसीं श्रीरामे ॥१९॥
दंडोनियां लोकपाळांसी । बंदीं घातले देवांसी ।
त्या निवटिले रावणासी । निजबाणेंसीं श्रीरामे ॥२०॥

हर्षातिशयाने त्या वानरांचे श्रीरामांना वंदन :

सकळ होवोनि उल्लासी । लागले श्रीरामचरणासी ।
रामे आलिंगिलें प्रीतीसी । निजमानसीं स्वानंदे ॥२१॥
निजमदें शिवापासीं । भोगू मागे पार्वतीसी ।
त्या निवटिले रावणासी । निजबाणेंसी श्रीरामे ॥२२॥
बिभीषण शरणागत । पुरले त्याचे मनोरथ ।
होवोनिया आनंदभरित । जीवे ओंवाळित श्रीरामा ॥२३॥
सुग्रीवराजा वानरनाथ । तेणे धरिले होते व्रत ।
न वधितां लंकानाथ । किष्किंधें निश्चित नाही जाणे ॥२४॥
सिद्धि पावले निजव्रत । रामे वधिला लंकानाथ ।
तेणे आनंदे उपरमत । येवोनि रघुनाथ नमियेला ॥२५॥
वने वन हिंडतां । अति श्रम शुद्धि करिता ।
झाला होता हनुमंता । जो लंकानाथा निजघाती ॥२६॥
ते निरसिली सकळ व्यथा । वध झालिया लंकानाथा ।
श्रीरामा भेटेल सती सीता । सार्थकता कष्टांची ॥२७॥
म्हणोनिया आल्हादपर । प्रेमे नाचे हनुमान वीर ।
करीत नामाचा गजर । श्रीरामचंद्र नमियेला ॥२८॥
हनुमंताचा परम आप्त । अंगद युवराजा विख्यात ।
त्याचे पुरले मनोरथ । लंकानाथ निवटिला ॥२९॥
तेणे हरिखें नाचत । श्रीरामप्रेमें डुल्लत ।
त्याचे पुरले मनोरथ । सावचित्त आनंदे ॥३०॥
नळ नीळ जांबवंत । सुषेण वैद्यराज तेथ ।
तारतरळादि समस्त । हरिखें नाचत अति प्रेमे ॥३१॥
रामनामाच्या निजगजरीं । केला भुभुःकार दीर्घस्वरी ।
श्रीरामचरण प्रीतीकरीं । वानरवीरी वंदिले ॥३२॥
अवघे आनंदें नाचती । श्रीरामप्रेमे डुल्लती ।
श्रीरामगुणकीर्ति वर्णिती । गीती गाती श्रीरामा ॥३३॥
एक झाले नृत्यकारी । एक गर्जती कैवारीं ।
वेगे होवोनि नागारी । कीर्तिगजरीं । वाखाणिती ॥३४॥
एक होवोनि वैष्णव । पदी वर्णिता राघव ।
उथळले अष्ट प्रेमभाव । देहभाव विसरले ॥३५॥
एक ती भावार्थे साबडीं । तोंडे करोनि वांकुडीं ।
धरिते झाले बागडी । निजनिर्वडी निजप्रेंएं ॥३६॥
निजप्रेमाचेनि समाजें । हरिखें नाचती निजभोजें ।
विसोनियां माझे तुझे । श्रीरघुराजें संतुष्ट ॥३७॥
ते देखोनिया स्वस्फूर्ती । विसरोनियां रघुप्ती ।
खांदीं घेवोनिया प्रीती । हरिखें नाचती श्रीरामनामें ॥३८॥

स्वर्गस्थ देवांना परमानंद व श्रीरामांवर पुष्पवृष्टी :

ते देखोनि सुरवर । स्वर्गी झाले आल्हादपर ।
विजयी झाला श्रीरामचंद्र । दशवक्त्र निवटिला ॥३९॥
दिव्यसुमनीं निजगजरीं । वर्षले श्रीरामाचे शिरी ।
अवघे कटक जयजयकारीं । पुष्पेंकरी मंडित ॥४०॥

अथांतरिक्षे व्यनदन्सौ‍म्यस्त्रिदशदुंदुभिः ।
दिव्यगंधवहास्तत्र मारुताः सुमुखं ववुः ॥३॥
निपपातांतरिक्षाच्य पुष्पवृष्टिस्तथा भुवि ॥४॥

देवांकडून स्तवन, गंधर्वांचे गायन :

मंद सुगंध सुशीतळ । वेगे पातला मलयानिळ ।
समस्ता श्रमस्वेदकल्लोळ । तेणे तत्काळ निरसिला ॥४१॥
अंतरिक्षगगनींहूनी । प्रकट झाली आकाशवाणी ।
राम विजयी रणांगणी । दसानन निवटिला ॥४२॥
चिरंजीवी रघुनाथा । निवटोनियां लंकानाथा ।
सुरा सोडविले समस्ता । बंदिमोचनता पै केली ॥४३॥
तेणे सकळ सुरगण । आनंदमय होऊनि पूर्ण ।
वर्णिती श्रीरामाचे गुण । दुष्ट दशानन निवटिला ॥४४॥
जो अजेय त्रैलोक्यासी । बंदी घातले सुरवरांसी ।
दासकाम घे आवेशी ॥४५॥
ते दुष्ट सेवेपासूनि जाण । श्रीरामे सोडविले आपण ।
मिळोनिया गधर्वगण । करिती गायन आनंदें ॥४६॥
नारद तुंबर दोघे जण । वसुधामा सुलोचन ।
चित्रांगदेंसहित जाण । सुस्वर गायन मांडिले ॥४७॥

एते गंधर्वरजानो ह्यंतरिक्षस्थिता जगुः ।
उर्वशी मेनका रंभा घृताची च तिलोत्तमा ॥५॥
अंतरिक्षे सुसंहृष्टा ननृतुश्चाप्सरोगणाः ॥६॥

अप्सरांचे नृत्य :

गंधर्वराजे पांचही जाण । वीणा घेवोनि आपण ।
रागोद्धार करिती पूर्ण । सुस्वर गायन मांडिलें ॥४८॥
तंव पावल्या स्वर्गनायिका । रंभा ऊर्वशी मेनका ।
घृताची तिलोत्तमा देखा । हर्षात्मका नाचीत ॥४९॥
निजानंदें स्वर्गसुंदरीं । नृत्य करिता चांचरी ।
देहभाव सांडिला दूरी । राम अंतरी धरोनिया ॥५०॥
देव गंधर्व सकळिक । देवांगना मिळोनि देख ।
अवघी नाचती समसुख । रामे दशमुख निवटिला ॥५१॥

रावणवधामुळे सगळीकडे आनंदोत्सव :

रावणतेजें दुर्धर । झांकोनियां दिवाकर ।
पडिला होता अंधकार । तो रामे समग्र निवटिला ॥५२॥
श्रीरामतेजे भास्कर । उजळोनियां अति शीघ्र ।
झाला सकळप्रकाशकर । दिशा समग्र उजळल्या ॥५३॥
चंद्र झाला होता प्रभाहीन । तो श्रीरामतेजेंकरुन ।
उजळला न लागता क्षण । विज्वर पूर्ण तो झाला ॥५४॥
इंद्र वरुण आणि कुबेर । नैर्ऋत्य ईशान आणि महारुद्र ।
अग्नियमादि समग्र । हरिखें थोर दाटले ॥५५॥
नष्ट दुरात्मा रावण । करोनि सकळांचें रोधन ।
सेवा घेतसे दारुण । रामे निर्दळण केले त्याचे ॥५६॥
म्हणोनिया आल्हादपर । नृत्य करिती समग्र ।
मांडिलासे अति गजर । जयजयकार आनंदें ॥५७॥
दिवि भुवि अंतरिक्ष । नभोमंडळी सावकाश ।
अवघे झाले स्वप्रकाश । दुष्ट राक्षस निर्दळिला ॥५८॥
तेणे उजळलें जगतीतळ । सुर आनंदले सकळ ।
करिती नामाचा कल्लोळ । सुखसुकाळ माजविला ॥५९॥
फिटला द्वंद्वदुःखदुकाळ । पाहिला स्वसुखसकाळ ।
श्रीराम ओळला प्रबळ । स्वपदीं सकळ स्थापिले ॥६०॥

वानरसैन्याकडून श्रीरामांची पूजा :

ऐसा आनंद सुरवरी । येरीकडें श्रीरामभारीं ।
सौमित्रादिक महावीरी । पूजा प्रीतिकरी मांडली ॥६१॥
सौ‍मित्र आणि हनुमंत । बिभीषण शरणागत ।
सुग्रीव अंगद जांबवंत । जुत्पति समग्र आनंदले ॥६२॥

ततस्तु सुग्रीवबिभीषणादयः सुहद्विशिष्टाः स च लक्ष्मणस्तदा ।
समीक्ष्य ह्वष्टा विजयेन राघवम् रणेऽभ्यनंदन्विधिवच्च पूजयन् ॥७॥
स तु निहतरिपुः स्थिरप्रतिज्ञः स्वजनबलाभिवृतो रणे रराज ।
रघुकुलनृपनंदनो महात्मा त्रिदशगणैरिव संवृतो महेंद्रः ॥८॥

श्रीरामांची त्यांच्या भक्तांनी केलेली रुपकात्मक पूजाः

मिळोनिया सकळ वीरी । पूजोपचारसामग्री ।
तिही मांडिली अति गजरीं । संक्षेपकरीं सांगेन ॥६३॥
हनुमान होवोनि सिंहासन । वरी बैसला रघुनंदन ।
अति अंतरंग सुमित्रानंदन । पूजाविधान तो करी ॥६४॥
आनंदाश्रु जे स्रवत । तेंचि उदक जाण तेथ ।
आपाद क्षाळण पुरवित । शरणागत बिभीषण ॥६५॥
सुग्रीव भावार्थाचें वास । पीतांबर राघवास ।
अर्पिता झाला सावकाश । अति उल्लास पूजेचा ॥६६॥
निजप्रेम शुद्ध चंदन । घेवोनि आला सुषेण ।
सौ‍मित्रे घेवोन आपण । केले समर्पण रामभाळीं ॥६७॥
उरले जे प्रेमचंदन । तेणे सर्वांगी रघुनंदन ।
चर्चियेला संपूर्ण । अति विचक्षण सौ‍मित्र ॥६८॥
अष्टही भाव सात्विक । तेंचि देखा जडित पदक ।
घेवोनिया एकाएक । जांबवंत देख पै आला ॥६९॥
देता सौ‍मित्राचे हाती । येरें घेवोनि अति प्रीती ।
कंठी बांधलें रघुपती । सकळदीप्तिद्योतक ॥७०॥
विविध प्रीतीचे अलंकार । जडित भावार्थे नागर ।
भक्तिमेखळा अति परिकर । जेथे रघुवीर सांपडला ॥७१॥
हनुमंताचा शिष्य अंगद । श्रीरामी प्रेमा अगाध ।
त्या प्रेमभावाचा मुकुट शुद्ध । बाणला विशद रामासीं ॥७२॥
सकळ मिळोनि वानरगणें । राम पूजितीं जीवे प्राणें ।
चैतन्यदीपें ओंवाळणें । निंबलोण सर्वस्वें ॥७३॥
एकी धरिले तन्मयछत्र । एक झाले चामरधर ।
एक झाले विंझणेकर । भद्रीं रघुवीर शोभत ॥७४॥
करोनिया प्रदक्षिणा । सकळही श्रीरामचरणा ।
लागता तया बिभीषणा । रावण मना आठवला ॥७५॥

रावणवधाने बिभीषणाचा भयंकर शोकावेग :

वधिले देखता रावणासी । मोह उपजला बंधूसीं ।
अश्रु आले जी नेत्रासीं । करी रुद्रनासी अति दुःखे ॥७६॥

भ्रातरं निहतं दृष्ट्वा शयानं निर्जिवं रणे ।
शोकवेगपरीतांगो विललाप बिभीषणः ॥९॥

बंधु धरोनि पोटेंसी । विलाप करी दुःखावेशीं ।
बहु शिकविले नायकसी । व्यर्थ रामासी विरोधिले ॥७७॥
दैवानुसार बुद्धि होये । तेथे तुज बोल काये ।
जैसे प्राक्तन ओढिताहे । प्राणी वर्तताहे तेणे कर्मे ॥७८॥

अथ खलु विषमः पुराकृतानां फलति हि जंतुषु कर्मणां विपाकः ।
हरशिरसि शिरांसि यानि रेजुर्हरहर तानि लुंठति गृध्रपादे ॥१०॥

देवादिकांना अजिंक्य असलेला रावण बुद्धिभ्रष्ट
झाल्यामुळे रणांगणांत पशुपक्ष्यांचे खाद्य झाला :

निजहस्तेकरोनि जाण । निजशिरे छेदोनि पूर्ण ।
शिवासी अर्पी रावण । तिही शिरी रण वसविले ॥७९॥
जी शोभती शिवमस्तकीं । कुकुटमंडित जडित माणिकीं ।
त्यांसी झडपिती पांखी । निजकौतुकीं गीधघारी ॥८०॥
जी न खालावती ब्रह्मादिका । जी अजेय तिही लोका ।
ती रणी लोळती देखा । गोमायुकापायांतळीं॥८१॥
निजप्रीतीच्या कल्लोळी । शिवे धरियेली मौळीं ।
ती लोळती पायांतळी । गीधमंडळीमाझारी ॥८२॥
प्रारब्धभोग बलवत्तर । त्यासी कांही न चले सुत्र ।
रसी लोळतो दशवक्त्र । कर्मतंत्र सोडीना ॥८३॥
शंकरवरदेंकरुन । लंकेचा राजा रावण ।
त्यांची शिरें धुळीमाजी जाण । रणांगणी पूर्ण लोळती ॥८४॥
निजहस्ते छेदोनि वाहिलीं । जी शिवमस्तकीं अर्पिलीं ।
ती दुष्टकर्में व्यापिली । गिधी विदारिलीं घडे केंवीं ॥८५॥

दैवगती ज्ञानी लोकांनाही अतर्क्य, शिवभक्त असूनही विष्णूचा रावणाने आजन्म द्वेष केला :

तेचिविषयीं उत्तर । श्रोते परिसोत सादर ।
अति सूक्ष्म कर्मसूत्र । नव्हे गोचर सज्ञाना ॥८६॥
शिव सर्वस्वे सेविला । विष्णु सर्वस्वें द्वेषिला ।
तेणे भेदें नागवला । डोल पडिला भजनासीं ॥८७॥
विष्णु शिवाचे निजध्येय । शंकर विष्णुचें हृदय ।
उभयांसी जो भेद पाहे । दुर्दशा लाहे नवल कोण ॥८८॥

शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः ।
यथा शिवमयो विष्णुस्तथा विष्णुमयःशिवः ॥११॥
यथांतरं न पश्यामि तथा मे स्वति चायुषि ॥१२॥

ब्रह्मा धरोनि मुगीवरी । शिव व्यापक चराचरी ।
विष्णुशंकरां बाह्यांतरीं । दोघांमाझारीं भेद नाही ॥८९॥
विष्णु शिवाचें हृदय । शिव विष्णूचे अंतर्बाह्य ।
निजदेहासीं निश्चय पाहे । भेदाची सोय सांडूनी ॥९०॥
अनवच्छिन्न ऐसे पाहता । त्यासी भय नाही सर्वथा ।
निरसोनिया भयाची वार्ता । अक्षयता सुखरुप ॥९१॥
तैसे न करीच रावणू । भेद वाढविला शिवविष्णू ।
वाढविला भजनाभिमानू । द्वेषिला विष्णु भेदबुद्धीं ॥९२॥
विष्णूची निजशक्ति तत्वता । पतिव्रता माउली सीता ।
ते अभिलाषिली लंकानाथा । दुष्कर्मता आन कोण ॥९३॥

गुरुपत्‍नी सीतेची अभिलाषा सर्व नाशाला कारण :

श्रीराम जगद्‌गुरु तत्वता । त्याची निजशक्ति सीता ।
अभिलाषिता लंकानाथा । गुरुतल्पगता सहजचि ॥९४॥
गुरुतल्पगतेपुढें आन । पाप कोण आहे दारुण ।
तेणे घोरकर्मे रावण । गीधचरणीं पूर्ण लोळत ॥९५॥
भल्याचें शिकविले नायके । तो सुखाचे मुख केंवि देखे ।
अभिलाषिता रामनायिके । हारविलीं सुखे महाभोग ॥९६॥
मंचक कनकाचा संपूर्ण । जडितरत्‍नीं सुलक्षण ।
नवग्रहांची पाउटी जाण । तेथे दशानन शयनस्थ ॥९७॥
ते शरीर आजि येथ । सैरां रणभूमीसी लोळत ।
स्रक्चंदने जे मंडित । ते विदारिती घारी गीध ॥९८॥
जडित अंगदीं प्रचंड । जे मडित बाहुदंड ।
त्याचे झाले खंडविखंड । रणी वितंड विखुरले ॥९९॥
जिही भुजीं त्रिभुवन । बळे आकळिले संपूर्ण ।
ते हे रणांगणी आपण । इतस्ततां जाण विखुरले ॥१००॥
सूर्यप्रभेसमान मुकुट । मस्तकी घाली दशकंठ ।
त्याचे होवोनियां पीठ । रत्‍ने उद्‌भट विखुरलीं ॥१॥
महाराजे मंडलवर्ती । ज्या चरणा नित्य नमिती ।
ते तोडरेंसहित लोळती । रणाप्रती बंधुराया ॥२॥

कोणाचाही सल्ला रावणाने मानला नाही :

तुज सांगती शुकसारण । त्यांवरी कोपसी दारुण ।
तेंचि सांगे प्रहस्त प्रधान । कोप दारुण तयावरी ॥३॥
तुझा पुत्र इंद्रजित । सांगता त्यासी मारुं धावत ।
तैसेंच कुंभकर्ण विनवित । त्यासी निर्भर्त्सित अति रागे ॥४॥
मंदोदरी निजकांता । न मानिसी तिच्या वचनार्था ।
तेथे माझी कायसी कथा । हाणितल्या लाता अति रागे ॥५॥
तितुकाही मानिला विषाद । परी न कळे तुझा बोध ।
रावण अद्वैतभक्त शुद्ध । निजानंद पावला ॥६॥

सर्व कुळाचा संहार व रामांचा द्वेष करुन मुक्ती मिळविण्याची अजब युक्ती :

सकळ कुळा देवोनि मुक्ती । तुवा विरोधला रघुपती ।
बंधो तुझी अतर्क्य युक्ती । कळली निश्चिती आजि मज ॥७॥
तत्काळ साधावया निजमुक्ती । सायुज्य साधिला रघुपती ।
ते साधिले अति निगुती । सकळ संपत्ती अर्पूनी ॥८॥
होऊनि सर्वस्वा विरक्त । समरांगणीं लंकानाथ ।
देखोनिया रघुनाथ । आनंदभरित झालासी ॥९॥
त्या आनंदाचे अति प्रीती । राम जाणसी सर्वांभूतीं ।
देह अर्पिला रघुपती । भूतसंतृप्तीलागूनी ॥११०॥
समो नागेन समो मशकेन । रावणा बाणले संपूर्ण ।
देह केला रामार्पण । विश्वमुखें पूर्ण तृप्तीसी ॥११॥
करोनि देहाचे हविर्द्रव्य । विश्वमुखीं दशग्रीव ।
अर्पितांचि रघुराव । तृप्ति स्वयमेव पै झाला ॥१२॥
म्हणोनिया रावण । घारगीधमुखीं जाण ।
आपणा विदारवी आपण । श्रीरघुनंदनसुखार्थ ॥१३॥
कुळ उद्धरिले सकळिक । तेणे बिभीषणा हरिख ।
हर्षयुक्त करिता शोक । बोलों आणिक आदरिलें ॥१४॥
पुष्पवाटिकेचें उद्यान । क्षणे विध्वंसी पवन ।
तेंवी क्षणमात्रें रामे जाण । ससैन्य रावण निवटिला ॥१५॥
महामत्तमातंग जैसा । कोणाही नागवे सहसा ।
रावण मत्त महागज तैसा । राघवेशा आतुडला ॥१६॥
महामत्त वडवानळू । कोणी न शके आकळू ।
त्यासी वर्षोनि घन सबळू । अग्निकल्लोळ करी शांत ॥१७॥
तेंवी श्रीराममेघेंकरुन । रावणाग्नि विझविला पूर्ण ।
अष्टांगाचे कोळसे जाण । शोभती संपूर्ण रणांगणी ॥१८॥
ऐसे नानापरी बहुत । बंधु पुढे घेवोनि तेथ ।
बिभीषण विलाप करित । हृदय पिटित निजकरें ॥१९॥

श्रीरामांकडून बिभीषणाचे सांत्वन :

ते देखोनि रघुनंदन । संबोखीतसे आपण ।
शास्त्ररीतीं लौकिकवचन । शांतवन अति प्रीती ॥१२०॥
व्यर्थ न करी शोकतें । न व्हावे झाले निरुते ।
सावध होवोनि निजचित्तें । सांडी परतें मोहासी ॥२१॥
घटामाजी भरले जळ । त्यांत बिंबलें चंद्रमंडळ ।
काळे वेंचल्या घटजळ । बिंब तत्काळ हरपले ॥२२॥
त्या बिंबालागीं आपण । शोक करिता दारुण ।
तेथे श्रमचि उरे जाण । बिंब पूर्ण न ये हाता ॥२३॥
घटामाजी बिंब असते । शोक करिता ते भेटतें ।
तेंवी धरिलिया प्रेतातें । रावण तेथे भेटेना ॥२४॥
बिभीषणा ऐक विनंती । शोक करिता तुजप्रती ।
न भेटे गा लंकापती । सांडीं निश्चिती भ्रमातें ॥२५॥
तू विवेकसंपन्न राजा । इतरां उपदेश व्हावा तुझा ।
तो तू तेथे मोहसमाजा । निमग्र काजा पै कवण ॥२६॥
ज्यासी होय अवगती । अवश्य त्याची करावी क्षती ।
उसण्याघायीं जे निमती । ते वंद्य होती सुरनरां ॥२७॥
रावणे करोनि ख्याती । समरांगणीं सर्वशक्ती ।
तुच्छ करोनि देहस्थिती । ब्रह्मस्थिती साधिली ॥२८॥
महायोगी कामक्रोध । जिणोनि साधी परमानंद ।
तेंवी रावणे निजपद । करोनि युद्ध साधिले ॥२९॥
वाणीचा होता दशमुख । तो झाला विश्वमुख ।
त्याचा करु नये शोक । निजविवेक विचारीं ॥१३०॥
म्हणोनि शोका योग्य रावण । सर्वथा नव्हे जाण ।
तू बिभीषण सर्वज्ञ । व्यर्थ रुदन सांडी परतें ॥३१॥
गेलियाचा शोक करिता । लागों पाहे मूर्खता ।
ते सांडोनिया सर्वथा । बंधुस्वधर्मता साधावी ॥३२॥

बिभीषणाला रावणांची उत्तरक्रिया करण्यास श्रीराम सांगतात :

रावणाचे और्ध्वदेहिक । तुवा करावे आवश्यक ।
गोत्रज पुत्र निमाले देख । कर्ता आणिक दिसेना ॥३३॥
जो देवद्रोही वेदद्रोही । मुख्य ब्रह्मयाचा ब्रह्मद्रोही ।
त्याचा शोक सर्वथा पाही । शास्त्रें नाही बोलिला ॥३४॥
तू बिभीषण सविवेक । सांडोनिया दुःखशोक ।
करी बंधूचें और्ध्वदेहिक । व्यर्थ दुःख करोनि काय ॥३५॥

स तस्य वाक्यैः करुणैर्महात्मा संबोधितः साधुबिभीषणश्च ।
आज्ञापयामास नरेंद्रसूनुः स्वर्गार्थमाधानमदीनसत्वम् ॥१३॥

रामांच्या उपदेशाने बिभीषण मोहापासून परावृत्त :

ऐसे सांवळोनि सुंदरे । बुद्धिबोधप्रबोधचंद्रे ।
सूयवंशप्रभाकरें । दशरथकुमरे बोलिलें ॥३६॥
जो ईश्वरा ईश्वर । जो योगियांचा योगेश्वर ।
जो नरेंद्राचा नरेंद्र । तो रघुवीर बोलिला ॥३७॥
ज्याचे ऐकता वचन । उपनिषदां पडे मौन ।
सद्य चित्त चमत्कारे पूर्ण । समाधान जीवशिवां ॥३८॥
तेणे श्रीरामे आज्ञापितां । मोह गेला न दिसे केउता ।
सावध होऊनि तत्वता । झाला करिता उत्तरविधी ॥३९॥
सत्वाथिला अति सात्विक । बिभीषण परम धार्मिक ।
श्रीरामवचने देख । मोह निःशेख सांडिला ॥१४०॥
जेंवी उगवता दिनमणी । सचंद्र तारा हरपती रजनीं ।
तेंवी श्रीरामवचनेंकरुनी । मोह तत्क्षणीं पळाला ॥४१॥
सावध हो‍उनि मानसी । अनुसरोनि रामवचनासी ।
आनंदमय रणभूमीसी । प्रेतदहनासी होय करिता ॥४२॥
स्वर्गादि क्रियेची संस्था । बिभीषण झाला करिता ।
तंव अंतःपुरीं कळतां वार्ता । आल्या वनिता रावणाच्या ॥४३॥

अंतःपुरद्विनिष्पेतू राक्षस्यः शोककर्षिताः ।
बहुशश्चेष्टमानास्ताः प्रदिग्धः क्षितिपांसुभिः ॥१४॥

रावणस्त्रियांचा आक्रोश :

एकी आरडती ओरडती । एकी वक्षःस्थळें पिटिती ।
एकी गडबडा लोळती । एकी करिती महाशब्द ॥४४॥
एकी केश तोडिती । एकी कान ओरबडती ।
आंग भूमीवरी टाकिती । मस्तक हाणिती भूमीसीं ॥४५॥
बहुसाल करिती दुःख । हंबरडे हाणिती देख ।
जेंवी गाय वधितां श्वपाक । अलौकिक आक्रंदे ॥४६॥

स्त्रीजीवनांत पतीचे महत्व :

पति स्त्रियांचे जीवन । पति स्त्रियांचें सौभाग्य जाण ।
जीवे जाता पतीवीण । प्रेतरुप जाण सर्वथा ॥४७॥
पति कांतेचे निजवित्त । पति कांतेचे भोग समस्त ।
पतीवीण ते उपहत । वृथा जीवित तियेचें ॥४८॥
पतीवीण वृथा आचार । पतीवीण वृथा विचार ।
पतीवीण वृथा शरीर । भोगोपचार ते वृथा ॥४९॥
पतीवीण वृथा योग । पतीवीण वृथा भोग ।
पतीवीण कैंचा संग । पतिदाघ अनिवार ॥१५०॥
पतीवीण कैंचे सुख । पतीवीण कैंचा हरिख ।
अल्पविषय स्फुरतां देख । आकल्प नरक भोगावे ॥५१॥
पतीवीण कवणेंसीं रती । पतीवीण कवणेंसीं प्रीती ।
पतीवीण नरकप्राप्ती । विषय चित्ती आठवत ॥५२॥
ऐशापरी दुःखे दुःखिता । मृतप्राय समस्ता ।
मिळालिया रावणवनिता । तळमळित विलापे ॥५३॥
पुच्छ तुटलिया सापसुरळी । काटा रुतल्या सर्पकपाळीं ।
जळावेगली मासोळी । तेंवी सकळी तळमळती ॥५४॥

बहुमानं परिष्वज्य काचिदेनं रुरोद ह ।
चरणौ काचिदालिंग्य काचित्कंठेऽवलंब्य च ॥१५॥
उद्‍धृत्य च भुजं काचिद्‍भूमौ संपरिवर्तते ।
हतस्य वदनं दृष्ट्‍वा काचिन्मोहमुपागता ॥१६॥

रावणाचा मृतदेह पाहून स्त्रियांचा विलाप :

पुष्पवाटिकेमाजी मातंग । रिघोनि वन विध्वंसी सांग ।
तेंवी श्रीरामबाणें चांग । रावण‍अंग विध्वंसिले ॥५५॥
रणी धुळीमाजी लंकापती । पडिला देखोनि निश्चिती ।
रावणांगना आक्रंदती । शोक करिती महादुःखें ॥५६॥
जे चुंबिती नित्य वदन । त्याते देखोनि प्रेतवर्ण ।
निढळीं निढळ मेळवून । करीन चुंबन मुखाचें ॥५७॥
एकी देती आलिंगन । एकी कर उचलिती जाण ।
हृदयी धरिती आलिंगून । करिती मर्दन निजकुचा ॥५८॥
एकी शेजारी निजती । उशीं बाहु घालिती ।
मागुतेनि लंकापती । शयनस्थिती केंवी भेटे ॥५९॥
चरण चुरावया धांवती एक । पादसंवाहन करिती एक ।
युद्ध करिता दशमुख । रणरंगी देख कष्टला ॥१६०॥
रणी भिडतां श्रीरामासी । बहुत श्रम रावणासीं ।
म्हणोनि रडती कांतासीं । नाही शोकासी मर्यादा ॥६१॥
पडिला देखोनि दशवदन । म्हणती चुड्यांसी पडिले खान ।
ओढवले मस्तकवपन । मोकळे कान दुर्दशा ॥६२॥
देहलोभें आक्रंदती । कानकेशांलागीं रडती ।
जेणे श्लाघ्य त्रिजगती । देह न वेंचिती त्यासवे ॥६३॥
दीर्घस्वरे आक्रंदोन । अट्टहास्यें करिती रुदन ।
कानकेशां पडिले खान । वैधव्य पूर्ण ओढवले ॥६४॥
रणी करोनि रणख्याती । सायुज्य लाधला रघुपती ।
आम्हा सांडोनि लंकापती । साधिली मुक्ती निजांगें ॥६५॥
मोकलोनियां सकळांसी । गमन केले निजपदासी ।
आम्हा निरविलें वैधव्यासी । नापितापासीं बैसविले ॥६६॥
पति निघोनि गेला पुढे । मागे कान केशां रडे ।
देहलोभाचें बळ गाढे । नाही धडपुढें वैराग्य ॥६७॥
जेणे सकळ भोग भोगिती । त्यासी देह देता रडती ।
देहलोभाची ऐसी जाती । रांडवा होती देशभरी ॥६८॥
आपण स्वये अमंगळ । प्रेतरुपी पै केवळ ।
त्या मानिती ब्राह्मणविटाळ । दोष अमंगळ करिती पै ॥६९॥
त्यांचेनि हातें पाचन । ते केवळ अमेध्य जाण ।
करिती जे सेवन । पवित्रपण ते व्यर्थ ॥१७०॥
ब्राह्मणहस्तीं जे झाले । ते तंव जनी निद्य केले ।
प्रेतरुपें जे झाले । पवित्र मानिलें सर्वत्री ॥७१॥
ऐसी जनाची विपरीत गती । निद्य तेंचि वंद्य करिती ।
सुवासिनीतें उपेक्षिती । शुचिर्भूती विधवांची ॥७२॥
आधींच अमंगळवृत्ती । आणि काशी द्वारका करिती ।
दुणा अभिमान वाढला चित्ती । ते वंद्य होती कैसेनि ॥७३॥
हे मी बोलिलो प्रसंगता । क्षोभ न मानावा श्रोतां ।
धर्मशास्त्रीं हे कथा । सत्य सर्वथा ऐसी आहे ॥७४॥
ऐसीया रावणवनिता । पतिदुःखें अति दुःखिता ।
देहलोभें तळमळितां । नव्हे विरक्ततां देहासी ॥७५॥
तंव पातली मंदोदरी । आक्रंदती दीर्घ स्वरी ।
पति धरोनि अंतरी । आली सुंदरी जवळिके ॥७६॥
एका जनार्दना शरण । श्रोती व्हावे सावाधान ।
मंदोदरीचे सहगमन । कृपा करोनि परिसावे ॥७७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणवनिताविलपनं नाम चतुःषष्टितमोऽध्यायः ॥६४॥
ओंव्या ॥१७७॥ श्लोक ॥१६॥ एवं ॥१९३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग