सीता-मंदोदरींची एकरु
3484.
सीता-मंदोदरींची एकरुपता - अभंग ३४८४
मंदोदरी पोटी । सीतेसी व्हावी भेटी तयेसी करु गोष्टी । स्वानुभवें ॥१॥
तंव दशानना मनी । वश्य व्हावी शयनी । धाडिली अशोकवनी । मंदोदरी ॥२॥
तंव दृश्या दृश्य मिळे । विरालियाही वरदळे । मिनलिया प्रीति मिळे । अहंत्यागें ॥३॥
परेसहित गोष्टी । परतोनी पडली मिठी । शब्द निमाला पोटी । नभाचिये ॥४॥
निखळ सावधाने । बोलेविण बोलणें । परिसतीं शहाणे । सर्वांग श्रोते ॥५॥
तेथींची ही मात । आहाच न चढे हाता । जीव हा जीवा आंत । घालूनि पहा ॥६॥
नवल मंदोदरी छंदु । सीतेसी अनुवादु । रामरुपीं संवादु । स्वानुभवाचा ॥७॥
राम सकळ देहोदेहीं । रावणी काय नाही । दुराग्रह तुझा ठायी । जानकीये ॥८॥
राम सकळा देही आहे । रावणे केले काये । हेंचि सांगणें माये । विशद करोनी ॥९॥
रामी ठेवुनी रती । रावणी अति प्रीती । करिता काय स्थिती । उणी होय ॥१०॥
येरी म्हणे अभेद रामराणा । उरी कैंची रावणा । साच ती मीतूंपणा । ठाव नाही ॥११॥
ऐसीये हातवटी । रावंणां कैंची भेटी । समूळ तुझिया गोष्टी । आहाच गे बाईये ॥१२॥
राम व्यापक की एकदेशी । सांगे पा मजपाशीं । सकळ देह त्यासी । रिते की पूर्ण ॥१३॥
येरी म्हणे रावणा वेगळे देख । व्याप असावे एक । तरी त्यासी व्यापक । होईल सुखें व्यापक ॥१४॥
व्याप व्यापक दोन्ही । गेली हारपोनी । रामरावण मानी । कवण तेथे ॥१५॥
दृश्याचिये भेटी । दृश्यपणेंसी उठी । तेणेंसी झालिया तुटी । तेंही नाही ॥१६॥
नाहींपणें असे । असे तेचि दिसे । तेथे रावणाचे पिसे । कायसे गे बाईये ॥१७॥
तेथे अवस्था मंदोदरी । स्वेद कंप शरीरी । चढली आनंदहरी । स्वानुभवाची ॥१८॥
कष्टी म्हणे माय । देखिले तुझे पाय । सुख झाले काय । केवी सांगो ॥१९॥
ऐसे बोलता बाष्प कंठी । मन मागुती नुठी । चित्ते घातली आठी । चैतन्यासी ॥२०॥
पाहे सावधान । निरसूनियां मन । रामरुपीं नयन निडारले ॥२१॥
न्याहाळितां आत्मबिंब । उचटत आहे नभ । तंव त्या दोघी स्वयंभ । तेचि जाहलिया ॥२२॥
एका जनार्दनी । एक जालिया दोन्ही । ऐसिये अशोकवनी । शोक कैंचा गे बाईये॥२३॥
