वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 5. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ › 1. रुक्मिणी स्वयंवर संपूर्ण प्रसंग › 12. प्रसंग बारावा शिशुपाल व रुक्मीची दैन्य अवस्था

रुक्मिणी स्वयंवर-प्र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088051 · अभंग क्र. १२

12.

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग बारावा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग बारावा
श्रीगणेशाय नम: ॥ निजमंडपी शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊनि गेला गोपाळ । ऎकोन विकळ पडियेला ॥१॥
पांडुरवर्ण झाले डोळे । मुखींहूनि लाळ गळे । सेवक धरिती आंगबळे । गात्रे विकळे पडियेली ॥२॥
भीमकी अप्राप्तीचे बण । ह्रदयी लागले दारुण । घायेंवीण घेतला प्राण । अकालमरण वोढवले ॥३॥
वोखेटवाणे दिसे मुख । नाडी तुटल्या नि:शेष । कृष्णधाकाची धुकधुक । ह्रदयामाजी उरली असे ॥४॥
महाशब्द मंडपद्वारी । मिळालिया नगर-नारी । माता येऊनि रुदन करी । कपाळ करी पिटीत ॥५॥
सिद्धीं नपवेचि गे शोभन । वाया गेले वरमायपण । अंबिका क्षोभली गे जाण । वराचे प्राण वांचोत का ॥६॥
थोर वोडवले दु:ख । न देखेंचि सुनमुख । बुडाले सोहळ्याचे सुख । हरिखी विख कालविले ॥७॥
अगे हा रुक्मिया दुर्बुद्धी । न पाहेचि लग्नशुद्धी । मृत्युपंचकाचे संधी । लग्नसिद्धि मांडिली ॥८॥
कृष्ण ज्योतिषी गे निका । वश नोहे पांचा पंचका । काळ साधिला नेटका । सम्यो देखा तो जाणे ॥९॥
तेणेचि साधिली गे वेळ । साधोनि नेली भीमकबाळ । आमुचे करंटे कपाळ । आता शिशुपाळ वांचवा ॥१०॥
विलाप करूनि अनेक । शिंपिले शिशुपाळचे मुख । वारा घालिती एक । झाला नावेक सावध ॥११॥
उठूनि बैसला एकसरे । श्वास घालता पै थोरे । दु:ख ह्रदयींचे नावरे । नेत्रद्वारे जळ चाले ॥१२॥
शिशुपाळा आले रुदन । न धरत चालिले स्फुंदन । धीरे आवरूनिया जाण । शहाणपणा मांडिले ॥१३॥
नोवरी नेली रे सुंदर । पडिले समर्थासी वैर । कृष्ण नेटका झूंजार । आणी बळिभद्र महाबळी ॥१४॥
हेच दोघे नावरती । येर यादव ते किती । ऎसे विचारूनि चित्ती । काय वीराप्रती बोलिला ॥१५॥
सौन्य पालाणा पालाणा । घाव घाला रे निशाणा । रथ संजोगोनि आणा । रणांगणा जाऊ वेगी ॥१६॥
सन्नद्ध अक्रूनिया दळ । रथी चढला शिशुपाळ । नगरद्वारा आले सकळ । पुढे घायाळ भेटले ॥१७॥
घायी तुटले सबळ । अशुद्धे झाले बंबाळ । बणी भेदले कपाळ । वीर विकळ पडताती ॥१८॥
वीरी घेतले घायवारे । म्हणती पळा रे पळा रे । मारिले जाल रे बळीभद्रे । साह्य दुसरे कोणी न ये ॥१९॥
एकी घेतला भेदरा । एक कापती थरथरा । करू नको गा बलिभद्रा । दास डिंगर आम्ही तुझे ॥२०॥
एकचे तुटले पै हात । एकी विचकले दात । एक कण्हत कुंथत । तवा देत पै आले ॥२१॥
एक घायी जर्जर बहुत । एक हंबत हुंबत । एकांची लोंबती आते । घायी कोते अडकली ॥२२॥
एक रडत रडत । एक अत्यंत चरफडित । एक पाणी जी मागत । खुणा हात दाउनी ॥२३॥
मस्तक फुटोनि वाहे रुधिर । एकाचे अर्ध तुटले शिर । ऎसाचे घायी बुडाले तीर । तेणे वीर तळमळती ॥२४॥
भले गौरविले वर्‍हाडी । थिती गेली लेणी लुगडी । एक नागवी उघडी । मेली मढी वोढिती ॥२५॥
घायाळा घालोनि वोडणी । धनुष्यदंडाच्या अडणी । उचलोनि दोघीं चौघीं जणी । वीरश्रेणी आणिल्या ॥२६॥
एक मार्गी झाले पुरे । एकाचे आणिले खटारे । वीर आपटिले जी वीरे । बळिभद्रे मारिले ॥२७॥
राये खोचले मुगुटाचे । अत्यंत प्राण विकळ त्यांचे । सेवक उचलिती पायांचे । डोळे मोरकुंचे वारिती ॥२८॥
देखोनि दचकला शिशुपाळ । धांकिन्नले त्याचे दळ । राजे मारिले सबळ । प्रबळ बळ यादवाचे ॥२९॥
युद्धी झाले पराङ्‌मुख । राजे भंगले अनेक । आले जरासंधादिक । मोडले कटक घेउनी ॥३०॥
भेटला शिशुपाळ सन्मुख । अत्यंत कोमाइले त्याचे मुख । बुडले सोहळ्याचे सुख । ह्रदयी दु:ख भीमकीचे ॥३१॥
दु:खे मुख काळवंडले । दोन्ही ओंठ वाळले । लाजा न बोलवे बोले । ते देखिले जरासंधे ॥३२॥
मग म्हणे पुरुषपंचानना । व्यर्थ खेद का करिसी मना । प्राप्ताप्राप्ताची गणना । आधीन कोणा पै नाही ॥३३॥
संसार म्हणजे खांबसूत्र । चौर्‍यायंशी लक्ष पुतळ्या विचित्र । त्यांचा सूत्रधारी ईश्‍वर । त्याचिया इच्छे वर्तिजे ॥३४॥
आपण राहोनिया दूरी । हालवी प्राचीनाची दोरी । भूते तदनुसार सारी । निजव्यापारी वर्तती ॥३५॥
तेथे सुखदु:ख निजतंत्र । मांडूनि ठेविले स्वतंत्र । ते ते तिये गती पात्र । अहोरात्र होताती ॥३६॥
येथे यश आलियाचे सुख । अथवा अपेशचे दु:ख । अहंपणे मानिती मूर्ख । कर्ता देख तो नव्हे ॥३७॥
येथे कर्ता जो मी म्हणे । तो पडे सुखदु:खांचे नागवणे । जन्ममरणांसी अवतणे । दिधले तेणे सर्वथा ॥३८॥
अहंकर्तेपणाचा भावो । तोचि सुखदु:खांसी ठावो । जन्ममरणाच निर्वाहो । तेणेचि पाहाहो होतसे ॥३९॥
यालागी अहंकर्तव्यता । मनी न धरावी सर्वथा । भीमकीप्राप्तीची व्यथा । दुर्गमता येवो नेदी ॥४०॥
म्यांचि पाहे पा केवळ । तेवीस अक्षौहिणी दळ । युद्ध केले सत्रा वेळ । एक वेळ जयो आला ॥४१॥
भंग झालियाचे दु:ख । अथवा यश आलियाचे सुख । हे न मानूनिया देख । यथासुखे वर्तावे ॥४२॥
एवं सुखदु:ख जेम आहे । ते तव काळाधीन पाहे । तो काळ ज्यासी साह्य होये । तोची लाहे यशाते ॥४३॥
आजि तुज युद्धासी जाता । यश न ये गा सर्वथा । काळ साह्य श्रीकृष्णनाथा । झाला तत्त्वता निजबळे ॥४४॥
काळ साह्य झालेपणी । प्राप्त झाली बा रुक्मिणी । मजसकट राजे राणी । तृणप्राय जिंकिले ॥४५॥
तो जव काळ साह्य नाही । तंववरी युद्ध करिशील कायी । वीर झोडिजेतील घायी । योद्धे ठायी पडतील ॥४६॥
जव अनुकूळ नाही काळ । तोवरी काय करिशील बळ । सिद्धी न पवे गा सकळ । श्रम केवळ पावशील ॥४७॥
यालागी धीर धरी शहाणपणी । जव होय काळसाह्याची मांडणी । मग यादव जिंकोन अर्धक्षणी । केवी रणी राहातील ॥४८॥
यापरी राजमित्र जरासंध । करीत शिशुपाळासी बोध । मग सोडोनि युद्धक्रोध । निजनगरासी निघाला ॥४९॥
शिशुपाळासी युद्धाआंत । जीवेचि घेता कृष्णनाथ । आजिचा चुकविला जी अनर्थ । हित मानित मदघोष ॥५०॥
तो म्हणे जरासंधासी । उत्तीर्ण नव्हे उपकारासी । तुवा वाचविले शिशुपाळासी । पुत्रदानासी तू दाता ॥५१॥
ऎसे मानुमिया सुख । परतला जी दमघोष । घेऊनि सोयरे सेवक । एकेंएक परतले ॥५२॥
युद्धी यादवी मारिता । राजे उरले जे झुंजता । तिही मानूनिया हिता । मग सर्वथा निघाले ॥५३॥
घयी जर्जर नेंओं किती । नागविली सैन्यसंपत्ती । आपुलालिया नगराप्रती । वेगे भूपती निघाले ॥५४॥
मग परतला शिशुपाळ । राजे चालिले सकळ । रुक्मिया कोपला प्रबळ । सन्नद्ध दळ तेणे केले ॥५५॥
धुर रणी होय विन्मुख । तेव्हाचि त्याचे काळे मुख । कवण वांचल्याचे सुख । घेऊनि विख मरावे ॥५६॥
जरासम्ध शिशुपाळ देखता । सकल राजेही ऎकता । उभा करोनि भीमकपिता । थोर गर्जता तो झाला ॥५७॥
तुम्ही सांडिले पुरुषार्था । मी तव नेऊ नेदी राजदुहिता । रणी जिणोनि कृष्णनाथा । भीमकी आता आणीन ॥५८॥
कृष्ण विभांडोनि बाणी । हिरोनि नाणींच रुक्मिणी । तरी स्वधर्म सांडिजे ब्राह्मणी । मजलागोनी तो दोष ॥५९॥
जे करिती सांधुनिंदा । त्या पापाची मज आपदा । र्णी न जिंकिता गोविंदा । जरी मी नुसधा परतेन ॥६०॥
विद्या होऊन गर्वा येती । विकल्पूनि गुरुसी निंदिती । ती ती पापे मज होती । जरी मी श्रीपती न जिंके ॥६१॥
केवळ पूज्य मातापिता । त्याते पुत्र हाणे लाता । ती ती पापे मजचि आता । जरी श्रीकृष्णनाथा न जिंके ॥६२॥
देखोनि सधुजन्नंसी । दोष आरोपिती त्यासी । ती ती पापे सजसी । जरी मी कृष्णासी न जिंके ॥६३॥
कृष्ण न जिंकिता रणी । घेऊनि न येता रुक्मिणि । पुरी न प्रवेशे कौंडणी । मुख परतोनी न दाखवी ॥६४॥
ऎसी वाहूनिया आण । कवचेम लेइला । वेगे घेऊनि धनुष्यबाण । म्हणे आंगवण पहा माझी ॥६५॥
क्रुष्ण अज्ञानाची आदी । त्यासी ह्रदयी नाही बुद्धी । पर्ण पाहे राक्षसविधीं । ते मी सिद्धी जाऊ नेदी ॥६६॥
कृष्ण गर्वित एकलेपणी । दुजियाते दृष्टी नाणी । हिरोनि नेली माझी बहिणी । तो मी बणी दंडीन ॥६७॥
रागे कांपत थरथरा । दात खातसे करकरा । धूम्र निघत नेत्रद्वारा । रहंवरा चढिन्नला ॥६८॥
रथी बैसला मदगर्वित । वेगे सारथ्याते म्हणत । चपळ चौताळो दे रथ । कृष्णनाथ जेथे असे ॥६९॥
आजि कृष्णासी सन्नद्ध । करणे असे द्वंद्वयुद्ध । अगर्वी धरितो गर्वम्द । बुद्धिमंद श्रीकृष्ण ॥७०॥
अजि माझ्या तिखट बाणी । कृष्ण खिळीन रणांगणी । चोरूनि नेतो माझी बहिणी । कैसेनि रुक्मिणी जिरेल ॥७१॥
सैन्य अवलोकिले दृष्टी । वीर चालिले जगजेठी । अश्वगजरथांचिया थाती । शस्त्रे मुष्टी झळकती ॥७२॥
चतुरंग सैन्य सकळ । एक अक्षौहिणी दळ । सन्नद्ध करूनिया सबळ । संख्या केवळ परियेसा ॥७३॥
दोन लक्ष अठरा सहस्र । सातशे अधिक वीर । संख्या अक्षौहिणीप्रकार । केला निर्धार श्रीव्यासे ॥७४॥
किती गज किती रथ । अश्व पदाती समस्त । विभाग संख्या सुनिश्चित । पुराणोक्त सांगेन ॥७५॥
एकवीस सहस्र आठ शत । सत्तरी संख्या जी रथ । तितुकेचि गजभार उन्नत । सैन्य आत चालती ॥७६॥
एक लक्ष सहस्र नव । तीन शते पन्नास अश्व । पायांचे वीर अभिनव । सांगेन सर्व परियेसा ॥७७॥
पासष्ट सहस्र सा शते । एक दशक अधिक तेथे । वीर पायांचे भिडते । युद्धी पुरते निजगडे ॥७८॥
इतुकी सैन्याची मिळणी । तया नांव एक अक्षौहिणी । संख्या बोलिली पुराणी । महामुनी श्रीव्यासे ॥७९॥
ऎसे निजसैन्य अद्‌भुत । त्यामाजी रुक्मिया विराजीत । साह्य आले राजे दक्षिणाद्वत । वीर गर्जत महाबळी ॥८०॥
रणी जिणोनि जरासंध । मीनले गद हलायुध । अवघे करिती विनोद । थोर आल्हाद जेत्यांचा ॥८१॥
यादव मिळोनि थोर थोर । करिती परतावयाचा विचार । येता देखोनि पारखे भार । मग सामोरे लोटले ॥८२॥
दोन्ही सैन्या झाला मेळू । घायी उठला हलकल्लोळू । वाजंत्र्यांचा ध्वनी प्रबळू । रणवेताळू खवळला ॥८३॥
कोपे चालिला रुक्मिया वीरू । ठाकोनि आला यादवभारू । तेथे न देखे शारंगधरू । रथ सत्वरू पेलिला ॥८४॥
एकाएकी एकला चक्रपाणी । दुरोनि देखिला नयनी । एके रथी कृष्णरुक्मिणी । देखोनि मनी प्रज्वळला ॥८५॥
सांडोनि गोत्रकुटुंबासी । जेवी वैरागी निघे योगासी । तेवी सैन्य सांडोनि यादवांपाशी । एके रथेंसी धाविन्नला ॥८६॥
धनुष्य मांडूनि मांडणी । गुण वाइला तत्क्षणी । बाण लावूनिया गुणी । वोढी काढोनि चालिला ॥८७॥
श्रीकृष्ण देवांचा आदिदेवो । ईश्वर नियंता नेणे प्रभावो । कुमती धरोनिया मदगर्वो । काय पाहा वो बोलत ॥८८॥
कृष्णासी म्हणे राहे साहे । माझा यावा आला पाहे । चोरी करुन पळसी काये । कोण माय राखेल ॥८९॥
जगामाजी तू चोर होसी । चोरूनि दिसो नेदिसी मागासी । आजि मी पावलो लागासी । केउता जासी निजचोरा ॥९०॥
उद्देशे देवा इंद्रादिकी । होम कीजे अग्निमुखी । ते अवघे तू खाशी शेखी । अग्निमुखी काही नुरे ॥९१॥
देव म्हणती आम्हासी पावले । त्यासी ठकवूनि हव्य त्वां नेले । ते काउळे मत येथे च चाले । सांडी वहिले भीमकीसी ॥९२॥
जन्मोनिया यादववंशी । कुळगोत्रा नाश करिसी । बुडविले नांवरूपासी । जाती तुजपाशी तव नाही ॥९३॥
भोग अवघेचि भोगासी । आणि योगिया म्हणविसी । मूळमाया ते तुजपाशी । वेष धरिसी कपटाचा ॥९४॥
तुझिया कपटाची झाडणी । करावया आलो मी गुणी । झाडणी करीन रणांगणी । झणी पळोन जाशील ॥९५॥
सांडी सांडी माझी बहिणी । नाही तरी खोंचीन तिखट बाणी । तीन बाण लावूनि गुणी । चक्रपाणी विंधिला ॥९६॥
शार्ङ्ग टणत्कारूनि हरी । सा बाण घेतले करी । तीन सोडूनि माझारी । धनुष्य करी छेदिले ॥९७॥
सवेचि सोडिले आठ बाणांसी । चारी चहू वारूंसी । सारथी पाडूनि धरणीसी । ध्वजस्तंभ छेदिला ॥९८॥
रुक्मिया कोपा चढिन्नला भारी । पंच बाण घेतले करी । रागे सोडिले कृष्णावरी । बळे निर्धारी विंधित ॥९९॥
कृष्ण धनुर्वाडा निजगडी । अचुक संधानपरवडी । पांचही बाण वाणे तोडी । धनुष्य पाडी छेदुनी ॥१००॥
आणीक धनुष्य घेतले वेगे । सन्मुख विंधों आला रागे । तेही तोडिले श्रीरंगे । आणीक वेगे घेतले ॥१॥
बाण लावोनिया वोढी । तेही कृष्ण सवेचि तोडी । जे जे धनुष्य रुक्मिया काढी । ते ते तोडी श्रीकृष्ण ॥२॥
धनुष्य घेतले घाव टाळुनी । अग्निअस्त्र लाविले गुणी । धूम्र कोंदला दिशा व्यापुनी । ज्वाळा गगनी न समाती ॥३॥
पर्जन्यास्त्र सोडिले हरी । मेघ वर्षती मुसळधारी । अग्नि शांत क्षणामाझारी । वेगे श्रीहरी पै केला व ४॥
येरे वायव्यास्त्र लाविले गुणी । झझामारुत सुटला रणी । वार्‍याने जाऊ पाहे अवनी । टाळी कानी बैसली ॥५॥
पर्वतास्त्र सोडी श्रीकृष्ण । वारा सांडिला बुझोन । येरे वज्रस्त्र सोडून । गिरी ताडून सांडिले ॥६॥
रुक्मिया कोपला महाथोर । कृष्णासी म्हणे स्थिर स्थिर । गुणी लाविले उद्रास्त्र । महारुद्र प्रगटला ॥७॥
दाढा विक्राळा तिखटा । माथा मोकळीया जटा । काळिमा चालिलीसे कंठा । मिशा पिंगटा आरक्त ॥८॥
कृष्ण अस्त्रविद्याचतुर । बाणी योजिया भस्मासुर । बाण देखोनि पळे रुद्र । धाके थोर कांपत ॥९॥
रुक्मिया आणिक शस्त्र विचारी । तव कृष्णे धनुष्य छेदिले करी । सरली कोदंडसमग्री । रथावरी काही नाही ॥११०॥
सरली धनुष्याची वोढी । परिघ घेऊन घातली उडी । कृष्ण विंधोनि परिघ तोडी । अपरवदी घायांची ॥११॥
परिघ तुटलियापाठी । रागे पट्टिश घेऊनि उठी । न धरत पातला उठाउठी । कृष्णदृष्टी सूदली ॥१२॥
कृष्णे विंधिले कठीण बाणा । पट्टिश उडविला गगना । सवेचि शूळ घेऊनि ताणी । हाणी कृष्णा पै आला ॥१३॥
दात खातसे कराकरा । शूळ भोवंडी गरगरा । साहे म्हणे शार्ङ्गधरा । घाये पुरा करीन ॥१४॥
कृष्णे बाण सोडिला पाही । शूळ तोडिला ती ठायी । सवेचि पाडिला भोई । ती ठायी त्रिखंड ॥१५॥
शूळ वाया गेलां थोरा । रुक्मिया चुरी दोनी कर । सवेचि घेवोनि तोमर । कृष्णासमोर धाविन्नला ॥१६॥
साहे म्हणे कृष्णनाथा । तोमर हाणो आलो माथा । माझारी विंधिला येतायेता । घाये मागुता सारिला ॥१७॥
बाण आदळला थोर । छेदून पाडिला तोमर । रुक्मिया म्हणे मर मर । शक्ति थोर काढिली ॥१८॥
शक्ति घेऊनिया हाती । म्हणे कृष्ण तुझा पाड किती । रणी लावीन रे ख्याती । भद्रजाती लोटला ॥१९॥
कृष्ण जे जे बाण सोडी । शक्तिहस्ते रुक्मिया तोड । रथ धरी मकरतोंडी । शक्ति भोवंडां हाणावया ॥१२०॥
कृष्णे बाण सोडिला तिधारा । रुक्मियासी लागला पिसारा । मागे सारिला अउड बाण । शक्ति अंबरा उडविली ॥२१॥
रुक्मियाची क्षीण शक्ति । साह्य आले दक्षिणापती । तिही हाकिला श्रीपती । सैन्यसंपत्ति अनिवार ॥२२॥
कृष्ण नेटका झुंजार । बाणी त्रासिले महावीर । आठ बाणी खोंचली धुर । हाहाकार ऊठीला ॥२३॥
बाण सोडिले निर्व्यंग । घायी निवटिले चातुरंग । त्याच्या सैन्या झाला भंग । रणी श्रीरंग खवळला ॥२४॥
बाण वरुषे शार्ङ्गधर । सैन्या झाला थोर मार । कोपे खवळला रुक्मिया वीर । साटोप दुर्धर मांडिला ॥२५॥
कृष्ण मारीन हे निर्धारी । वोडण खांडे घेतले करी । पतंग जैसा दीपावरी । तैशापरी धाविन्नला ॥२६॥
रुक्मिया महावीर नेटक । वोडण स्वर्गाचा साधक । थरक सरक दावी चवक । अति नि:शंक निजगडा ॥२७॥
वोडण धडकोनि आदळीत । खर्ग तोलोनि तळपत । उल्लाळ देऊनि उसळत । हात मिरवत खर्गाचा ॥२८॥
कृष्ण जे जे बाण सोडी । खर्गधारी तितुके तोडी । चारी मारावया घोडी । रथाबुडी रिघो आला ॥२९॥
दारुक सारथी निजगडा । रथे करू पाहा रगडा । कृष्णे विंधिला कुर्‍हाडा । रथाबुडी येऊ नेदी ॥१३०॥
बाण आदळला सत्राणे । आडवे वोडण धरिले तेणे । वाडण भेदूनिया बाणे । शिरींच मुगुट पाडिला ॥३१॥
कोण आला रुक्मियासी । वेगे धाविन्नला मोकळे कैशी । हात घांसूनि भूमीसी । हातवशी खर्गाते ॥३२॥
कृष्णासी म्हणे देख देख । घायी छेदीन रे मस्तक । विकट देऊनिया हाक । वेगी सन्मुख लोटला ॥३३॥
कृष्णे विंधिला तिखट बाण । तिळप्राय केले वोडण । खर्ग छेदूनिया जाण । अणुप्रमाण ते केले ॥३४॥
बाण वर्षला घनदाट । रुक्मिया भुलविला आली वाट । रथ लोटूनिया घडघडाट । मौर्व्या कंठ बांधिला ॥३५॥
धनुष्य घालूनिया गळा । वोढोनि आणिला घायातळा । कांपिन्नला भीमकबाळा । घनसावळा देखतसे ॥३६॥
दाटोनि आणिले जी क्रोधआ । झळफळित काढिली गदा । म्हणे याच्या करीन शिरच्छेदा । येरी गदागदा कांपतसे ॥३७॥
काही न बोलवे सर्वथा । म्हणोनि चरणी ठेविला माथा । कृपाळुवा जगन्नाथा । यासी सर्वथा न मारावे ॥३८॥
कृष्ण म्हणे परती सर । येणे निंदा केली थोर । याचेम छेदीन मी शिर । म्हणोनि शस्त्र उचलिले ॥३९॥
तिखट देखोनि शस्त्रधारा । चरण न सोडीच सुंदरा । बोलोनि मृदु मंजुळ उत्तरा । गदाधरा विनविले ॥१४०॥
सुरा असुरा तू दुर्धर । योगिमाजी योगेश्वर । विश्वनियंता इश्वर । वेदा पार न कळेचि ॥४१॥
ऎशियासी तुज युद्धी । आवळू पाहे हा अहंबुद्धी । पिता अवगणूनि तूते निंदी । होय अपराधी सर्वथा ॥४२॥
हा अभिमानिया मारिशी रणी । माय प्राण सोडील तत्क्षणी । होईल लौकिक टेहणी । माहेर येथूनि तुटेल पूर्ण ॥४३॥
जेथूनि उठे निंदा क्रोधू । त्या लिंगादेहाचा करी छेदू । मारू नको ज्येष्ठ बंधू । लोकाविरुद्ध न करावे पूर्ण । ४४॥
धरिलिया कृष्णाकास । द्यावा दो पक्षी उल्हास । नादवावे सावकाश । येथे तेथे समत्वे ॥४५॥
न धरत चालले स्फुंदन । नेत्री लोटले जीवन । झाले कृष्णचरणक्षालन । जगज्जीवन हांसिन्नला ॥४६॥
देखोनि बोलाची चातुरी । मग उचलली दोही करी । आलिंगिली प्रीती थोरी । बंधू न मारी सर्वथा स्तकवपना आणा पाणी । नाही आड ना विहीरवणी । घाला वाटेचे वाटावणी । विनोद मेहुणी मांडिला ॥४८॥
अर्धखांड अर्धमिशी । पांच पाट काढिले शिसी । विरूप केले रुक्मियासी । गळा रथेसी बांधिला ॥४९॥
रुक्मिणीसी म्हणे श्रीकृष्ण । पाहे बंधूचे वदन । वेगे करी लिंबलोण । सकळ जन हासती ॥१५०॥
रुक्मियाचे विरूपकरण । यापरी करी श्रीकृष्ण । बळिराम येऊनि आपण । बंधमोचन करील त्यासी ॥५१॥
परिहारमिषे प्रबोध । भीमकीसी करील हलायुध । एका जनार्दनी विनोद । परमानंद प्रगटेल ॥१५२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे रुक्मिपराभवो नाम द्वादश: प्रसंग ॥१२॥
॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग