अंगी घेऊनिया वारे दय
3260.
अंगी घेऊनिया वारे दया देती । तया भक्ता हाती चोट आहे ॥१॥
देव्हारा बैसोनि हालविती सुपे । ऐसी पापी पापे लिंपताती ॥धृपद॥
एकी बेकी न्याये होतसे प्रचित । तेणे लोक समस्त भुलताती ॥२॥
तयाचे स्वाधीन दैवते असती । तरी का मरती त्यांची पोरे ॥३॥
तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तो ही नव्हे ॥४॥
अर्थ :
जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे क्षुद्र देवतांचे अंगामध्ये वारे घेतात आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊन त्यांना उपाय सांगून त्यांच्यावर दया करतात परंतू अशा भक्तांचा धिक्कार असो. काही मनुष्य तर देव्हार्यामध्ये बसून सुप हलवतात व शकुन सांगतात परंतू पापी मनुष्याच्या आपल्या अंगी आणखीपाप लिंपून घेतात. लहान मुले जसे एकबेकीचा खेळ खेळत असताना सहजच ते उत्तर देतात व सहज ते खरे ठरते त्याप्रमाणेच ह्या मनुष्याने चुकून एखादा उपाय सांगितला व तो खरा ठरला की त्यालाच सर्व लोक भुलतात आणि त्याच्या नादी लागतात. खरोखरच त्यांच्या स्वाधीन जर दैवत असते तर मग त्यांची पोरे मरतात ते का म्हणून ? तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्याजवळ तीर्थ आणि अंगारा आहे व जे लोकांना तीर्थ व अंगारा देतात ते कृष्णाचे भक्तच नाहीत.
