वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

अधमाचे चित्त अहंकारी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080580 · अभंग क्र. ३२६१

3261.
अधमाचे चित्त अहंकारी मन । उपदेश शीण तया केला ॥१॥
पापियाचे मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥धृपद॥
अधमाचे चित्त दुश्चित्त ऐकेना । वाया वीण मना करूंनी काय ॥२॥
गर्दभासी दिली चंदनाची उटी । केशर ललाटी शुकराच्या ॥३॥
पतिवंचकेसी सांगता उदंड । परि ते पाषांड तिचे मनी ॥४॥
तुका म्हणे तैसे अभावीका सांगता । वाउगाचि चित्ता सीण होय ॥५॥

अर्थ :
अधमाचे चित्त आणि मन हे अहंकाराने प्रभावित झालेले असते त्यामुळे त्याला कोणताही उपदेश केला तर उपदेश करणार्‍यालाच व्यर्थ क्षीण होतो. पापी मनुष्य कधीही सदाचार करत नाही जसा विधवेने केलेला श्रृंगार व्यर्थ ठरतो अगदी त्याप्रमाणे पापी मनुष्याला केलेला उपदेश देखील व्यर्थ ठरतो. अधमाचे चित्त हे नेहमी दु:श्चित असते त्याला कोणताही उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो त्यामुळे त्याला उपदेश करुन तरी काय करावे ? गाढवाच्या अंगाला चंदनाची उटी आणि सुकराच्या कपाळाला भगव्या गंधाचा टिळा दिला तर ते व्यर्थच ठरते. नेहमी व्याभिचार करणाऱ्या स्त्रीला कितीही पतिव्रतेचे धर्म सांगितले महिमे सांगितले तरी तिला ते पटत नाही कारण तिच्या मनात नेहमी व्याभिचार करण्याचा वाईटच विचार असतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे अभाविक मनुष्याला कितीही चांगला उपदेश सांगण्याचा प्रयत्न केला तरी सांगणारा व ऐकणारा या दोघाच्याही चित्ताला शीणच होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग