भोंदावया मीस घेऊनि स
3259.
भोंदावया मीस घेऊनि संतांचे । करी कुटुंबाचे दास्य सदा ॥१॥
मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्ये ॥धृपद॥
तिमयाचे बैल करी शिकविले । चित्रींचे बाहुले गोष्टी सांगे ॥२॥
तुका म्हणे देवा जळो हे महंती । लाज नाही चित्ती निसुंगाते ॥३॥
अर्थ :
कुटूंबाची सेवा करण्यासाठी जो संतांचे सोंग घेऊन धन कमवतो, पोपट जसा मनुष्याप्रमाणे बोलतो आणि कर्म करतो अगदी त्याप्रमाणे हा मनुष्य जगामध्ये हरीकथा किर्तन विनोदी शैलीमध्ये करुन जगातील नर आणि नारींची करमणूक करतो. ज्याप्रमाणे नंदी बैलाला आपण जेवढे शिकवू तसेच तो नंदीबैल वागतो आणि भिंतीवर काढलेल्या बाहुलीच्या चित्राला जसे विविध रंग टाकून रंगवले जाते त्याप्रमाणे हा संतांचे सोंग घेतलेला मनुष्य हरीकथा किर्तन जगामधे तर करतो परंतू विविध प्रकारचे रंग त्या हरीकथेत टाकतो म्हणजेच विनोद वगैरे असे रंग टाकून हरीकथा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा प्रकारे हरीकथा किर्तन करुन ज्याला महंती मिळते अशा महंतीला आग लागो आणि अशा निसंग मनुष्याला हरीकथा किर्तन करताना आपण दांभिकपणा दाखवतो याची थोडी देखील लाज चित्तात वाटत नाही.
