वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › १. बालकाण्ड - अध्याय २७ › १२. शिवधनुष्याचे वर्णन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088261 · अभंग क्र. १२

12.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय बारावा ॥
ताटिका वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हे रामायणी निजकथा । जै आदरे ऐके श्रोता ।
तै पापपुण्यांच्या करी घाता । स्वभावता नित्यमुक्त ॥१॥
कथाश्रवणे नित्यमुक्त । हाही नवलाव नव्हे येथ ।
अक्षरीं अक्षर अक्षरार्थ। श्रीरघुनाथकथार्थें ॥२॥
पढतां रघुनाथचरित्र । श्रोते वक्ते नित्य पवित्र ।
धन्य ऎकती त्यांचे श्रोत्र । धन्य वक्त्र वदत्याचें ॥३॥
धन्य धन्य वाल्मीकि मुनी । श्रीरामकथा वदली वाणी ।
कथा त्रैलोक्यपवनी । भवमोचनी चरितार्थ ॥४॥
रामनाम दो अक्षरीं । कुंटिणी वंदिजे सुरवरी ।
ऐशी कथेची अगाध थोरी । ते कोणे वॆखरीं वानावी ॥५॥
हे असो पूर्वकथासंबंधीं। श्रीरामासी लागे समाधी ।
ते स्वये वसिष्ठ उद्बोधी । ते कथाविधी अवधारा ॥६॥
श्रीराम जाला सावधान । प्रपंचपरमार्थस्थितीं समान ।
हे वसिष्ठांचे पूर्णपण । श्रीरामी संपूर्ण बिंबले ॥७॥
सर्वेंद्रियी वित्समाधान । मिथ्या समाधिव्यत्थन ।
कर्म क्रिया ब्रह्मपूर्ण । ऐसा सावधान श्रीराम॥८॥

श्रीराम सावध झाल्यामुळे सर्वांना आनंद :

देखोनि श्रीराम सावधान । विश्वमित्रा आनंद गहन ।
सुखावोनि सुगरण । केली संपूर्ण पुष्पवृष्टि ॥९॥
सुरी दुंदुभी त्राहाटिल्या भेरी । निशाण त्राहाटिले राजद्वारीं।
गगन गर्जें जयजयकारीं। पूर्ण सुरनरीं आल्हाद ॥१०॥
विश्वामित्राच्या यज्ञार्थ । स्वये जाइल रघुनाथ ।
वसिष्ठें पाहोनी सुमुहूर्त । आल्हदे दशरथ प्रयाण करवी ॥११॥
करोनिया पुण्याहवाचन । राजा सवे सैन्य दे संपूर्ण ।
ते वसिष्ठें निवरून । रामलक्ष्मण रथारूढ करावी ॥१२॥

श्रीराम रथारूढ होऊन निघाल्यावर राजाची विश्वामित्रांना विनंती :

राजा म्हणे विश्वमित्राप्रती । मी आत्मा दिधला तुझे हाती ।
यावरी तू कृपामूर्ती । जाणसी त्या रीती संरक्षी ॥१३॥
वसिष्ठ म्हणे विश्वामित्रासी । तुज गुरूत्व यावे सुर्यवंशीं ।
धनुविद्या सबीजेंसीं । श्रीरामासी उपदेशीं ॥१४॥
ऐकोनी वसिष्ठचे वचन । विश्वमित्रें केले नमन ।
तू अंतरात्मा आपण । मनोगत पूर्ण जाणसी माझे ॥१५॥
जाणोनी माझे मनोगता । शिष्य करावे म्हणसी रघुनाथा ।
तुजहीपरता ज्ञाता । आणिक सर्वथा असेना ॥१६॥
आपुलिय सच्छिष्यासी । कोणी न द्यावे उपदेशासी ।
हे वसिष्ठ साजे तुजपासी । इतर ऋषींसी अति अभिमान ॥१७॥

श्रीरामांना धनुर्विद्या शिकविण्यासंबंधी वसिष्ठ विश्वमित्रांची एकवाक्यता :

वसिष्ठ म्हणे विश्वामित्रासी । मी तू नाही आम्हा तुम्हांसी ।
यालागी तू श्रीरामासी । अवश्य होसी गुरूत्वें गुरू ॥१८॥
दोघा मुनींच्या वचनार्था । ऐकोनि आल्हद रघुनाथा ।
दोही मुनींचे निज ऐक्यता । उल्हासें रघुनाथ रथारूढ ॥१९॥
जीवासवें जैसा प्राण । तैसा रामासवें लक्ष्मण् ।
तेणेंही केले रथारोहण । धनुष्यबाणतूणीरेंसी॥२०॥

श्रीरामांच्या प्रयाणसमयी झालेले शुभ शकुन :

श्रीराम करिता प्रयाण । स्वये पाहे शकुन ।
दोघे द्विज प्रसन्नवदन । फ़ळेंसी पूर्ण भेटले ॥२१॥
पूर्णकलशीं सालंकृता । पुढे भेटल्या पंच योषितों ।
दधि क्षीर नवनीत माथा । गोपवनितों भेटल्या ॥२२॥
अपूर्व अमृत फ़ळे क्षीरघागरी । दध्योदनेंसीं वायन करी ।
हाती कुमर कडे नोवरी । पुढे एक नारी भेटली ॥२३॥
सत्य जाती वायस । अपसव्य जाती तास ।
सन्मुख भेटले राजहंस । मुक्ताफ़ळंचे घोंस मुखी धरूनी ॥२४॥
दक्षिणे जाती मृग कृष्णवर्ण । वामांगगामी मृगी पूर्ण ।
भारद्वाजाचें वाम उड्डाण । नकुळही आपण वामांगी सरके ॥२५॥

वसिष्ठांकडून शकुनांचे विवेचन :

दशरथ जाता बोळ्वून । श्रीरामशकुनांचे शुभ चिन्ह ।
ब्रह्मरूपी वसिष्ठ आपण । मार्गी व्याख्यान करून सांगे ॥२६॥
प्रथम भेटल्या ब्राह्मण । ब्रह्मसृष्टीमाजी जाण ।
जो विजयी होय संपर्ण । सुरासुरगण वंदिती ॥२७॥
पूर्णकलश जै भेटती । तै सदा पूर्णत्व मनोरथीं ।
दधी क्षीर भेटलिया नवनीतीं । तै पुर्ण प्राप्ती ऎश्वर्याची ॥२८॥
सव्य गेलिया वायस । तो सर्वत्र पावे यश ।
अपसव्य गेलिया तास। शुद्ध नि:शेष नासती ॥२९॥
मुक्तघोसीं सन्मुख । हंस भेटलिया देख ।
तो सर्वत्र पावे सुख । स्वप्नीही दु:ख देखेना ॥३०॥
सव्य गेलिया मृगगण । अलभ्य लाभ पावे पूर्ण ।
मृगीचे वामगमन । ते नवनधू आपण माळ घाली ॥३१॥
नकुळ गेलिया वामभागी । तो विजयी होय रणरंगी ।
शत्रु निर्दाळील वेगी । यश त्रिजगी न समाये ॥३२॥
डावा गेलिया भारद्वाज । तो करी सिद्ध काज ।
वैरियांसी लावोनि लाज । आनंदाचे भोज नाचवी ॥३३॥
ऐसी सांगता शकुनगती । स्वये संतोषला नृपती ।
विजयी होइल रघुपती । ह निश्चय चित्ती दृढ झाला ॥३४॥
दीड गांव शरयुतीरीं । कामाश्रमाची अति थोरी ।
विश्वामित्रें तेथवरी । रथ चमत्कारीं कुमरेसीं नेला॥३५॥

कामाश्रमात विश्रांति :

कामाश्रमी श्रीरामवस्ती । तेणे सकळ सिद्धीस जाती ।
हे विश्वामित्राची निजयुक्ती । कार्यसिद्ध्यर्थीं राहविला राम ॥३६॥
श्रीराम आणि लक्ष्मण । निजतेजे विराजमान ।
करी गोंधागुळित्राण । धनुष्यबाण सन्नद्धे ॥३७॥
काकपक्षशिखधरे । कवची खड्गी महावीर ।
बाळपणी अति दुर्धर । जेंवी वैश्वानर तेजस्वी ॥३८॥
त्याचे देखोनि स्वरूप । विश्वमित्रा सुख अमूप ।
श्रीराम लावण्याचा दीप । चिस्वरूप सुखकारी ॥३९॥
ऋषि म्हणे तयांपती । येथे बसावे आजिचे रातीं ।
राम म्हणे आज्ञा निश्चिती । सुखरूपे वस्ती करिते जाले ॥४०॥

सिद्ध मंत्राची विश्वमित्रांकडून प्राप्ती :

विश्वमित्राचे संगतीं । सुखशयनी कमिली राती ।
उदय होता गभस्ती । ऋषि प्रबोधीं श्रीरामा॥४१॥
विधियुक्त करोनि स्नान । संध्या गायत्री जपावर्तन ।
करूनि विश्वमित्रा नमन । स्वनंदे चरण वंदिल ॥४२॥
देखोनि श्रीरामविनीतता । उल्लास विश्वमित्राचे चित्ता ।
आलिंगोनि श्रीरघुनाथा । कृपेनें बोले तो कृपाळू ॥४३॥
ऎकें बापा रघुनाथा । तुम्हासी सिद्ध मंत्र देइन आता ।
दोघीं चरणी ठेविला माथा । सावधानता मंत्रार्थीं ॥४४॥
दृढ बाणल्या मन्त्रार्था । राक्षसभय नुपजे चित्ता ।
श्रम बाधेना सर्वथा । तिन्ही अवस्था सावधान ॥४५॥
या मंत्रार्थाचिया प्रौढीं । रणांगणी राक्षसकोडी ।
मारिता न उगे अर्ध घडी । तो मंत्र निरवडी सांगेन ॥४६॥
क्षुधा तृषा निद्रा आळस । बांधू न शके देहकश्य ।
ऐशिया मंत्राचे मंत्ररहस्य । तुम्हांसी मी अवश्य सांगेन ॥४७॥
परम तपाची निवरडीं । जे म्या जोदिली सिद्धार्थजोडी ।
ते तुज देइन रोकडी । म्हणोनि आलिंगी ॥४८॥
ऐसी कृपा देखोनि पूर्ण । दोघीं धरिले दृढचरण ।
सवंभावे सावधान । सद् गुरूवचनग्रहणार्थी ॥४९॥

मंत्रसिद्धीचा साक्षात्कार :

मंत्राक्षर पडता कानी । सिध्दिपरिपाक अंत:करणी ।
मंत्रशक्ती लागे चरणी । मंत्रशिरोमणि श्रीराम ॥५०॥
श्रीराम मंत्रीं मंत्राक्षर । श्रीराम क्षराक्षरातीत पर ।
श्रीराम स्वये ऒंकार । मंत्रार्थसार श्रीराम ॥५१॥
श्रीराम मंत्राची निजशक्ती । श्रीराम मंत्रची मंत्रमुर्तीं ।
त्यासी मंत्रार्थ बाणला चित्ती । हे नवल किती सांगावे ॥५२॥
मंत्रीं मंत्रार्थनिजबीज श्रीरामची स्वये सहज ।
तो वंदोनी सद्गुरूचरणरज । शिष्यत्वाची वोज सेवकत्वें दावी ॥५३॥
सद्गुरूची निजसेवा । तेंचि निजबीज सकळ देवा ।
ते कळलेंसे राघवा । गुरूआज्ञे जीवा विक्रित केले ॥५४॥
दोघा मंत्रार्थ वाणला पूर्ण । विश्वमित्रा कळली खूण ।
दोघांची पाटी थापटून । सुखसंपन्न स्वये झाला ॥५५॥

शरयूसंगमावर एक रात्र मुक्काम :

रघुनाथासी म्हणे आपण । येथोनि करावे प्रयाण ।
राम म्हणे आज्ञा प्रमाण । रथी तिधे जण बैसले ॥५६॥
कथाकौतुक मार्गानुक्रम । शरयुतीर मनोरम ।
पुढे भागीरथीसंगम । उत्तमोत्तम देखिला ॥५७॥
मानससरोवरी जन्मली । यालागी शरयू नाम पावली ।
अयोध्यानगरी रूढ झाली । संगमा आली शरयु गंगेच्या ॥५८॥
देखोनि संगमदर्शन । साष्टांग केले नमन ।
स्नान संध्या जप ध्यान । मंत्रावर्तनप्रयोगें ॥५९॥
तये संगमासंगती । राम राहविला एक रातीं ।
प्रभात जालिया परतीराप्रती । जाणे निश्चिती नेमिलें ॥६०॥

पहाटे नावेतून पैलतीराला जातात :

मग प्रात:काली उठोन । नावेसीं रामलक्ष्मण ।
विश्वमित्र बैसवोनी जाण । घेवोनि आपण परतीरां गेला ॥६१॥
परतीरीचे विधान । केले स्नान संध्या जप ध्यान ।
तीरीं वनाचें विपरीत भान । रघुनंदन स्वये देखे ॥६२॥

ताटिका राक्षसीच्या भयंकर त्रासाची कल्पना :

उग्र पक्ष्यांची चावटी । क्रूर श्वापदाची दाटी ।
दिवाभीताची घुंघाटी । शिवा भुंकत भयानक ॥६३॥
भृगीझुंगीचे झणत्कार । वनी वाजत भयंकर ।
राम पुसे हे वन कं घोर । ऋषि प्रत्युत्तर समूळ सांगे ॥६४॥
भयानक भासे वन । तेथे आहे ताटिकाभवन ।
ते राक्षसी अति दारुण । प्राणिगणभक्षक ॥६५॥
तिचेनि वन हे उद्वस । मालव केशिक कारूष ।
हे क्षणर्धे देश केले ओस । अति दुर्धर कर्कश राक्षसी ॥६६॥
दशदिशा मार्ग रोधून । तिचे भेणे वागों न शके कोणी जन ।
तेणे मार्गे आपण । सर्वथा गमन न करावे ॥६८॥
राम म्हणे ऐसी कैंची । कोठोनि आली हे कोणाची ।
येवढी शक्ति तिला कैंची । ऋषि तियेचि सांगे ॥६९॥

ताटिकावृत्तांत :

सुकेतु यक्ष अति पावन । त्यासी नव्हते संतान ।
तेणे करोनि अनुष्ठान । ब्रह्मा प्रसन्न स्वये केला ॥७०॥
तो मागे पुत्रसंतान । ब्रह्मयाने गिधले कण्यारत्न ।
अनल्प-वीर्यकन्या जाण । कार्यकारण प्रवृत्तीचे ॥७१॥
तुज नव्हे पुत्रसंतती । सहस्रबळनागशक्ती ।
कन्या होइल निश्चिती । ब्रह्मा वरदोक्ती वदोनी गेला ॥७२॥
ते हे ताटिका कन्यारत्न । सुंदोपसुंद बंधु दोघे जण ।
त्यांत ज्येष्ठ सुंदेंसीं केले लग्न । अति शोभन समारंभें ॥७३॥
सुंदापासोनि गर्भसंभवु । मारीच आणि सुबाहु ।
ताटिकेच्या पोटी दोघे भाऊ । जन्मोद् भवु पावले ॥७४॥
त्या उभय बाळकांची जाळी । लागली पित्याचे मूळीं ।
पित्याची बुद्धि ते काळी । मरणोन्मेळीं बळावली ॥७५॥
संदोपसुंद महावीर । परम योद्धे अति दुर्धर ।
तिही पराभवोनि सुरवर । त्याचे अधिकार स्वये घेतले ॥७६॥

तिलोत्तमेची कथा :

त्याचा करावया वधू । विधाता रची विचीत्र बोधू ।
तिलोत्तमा सुंदर वधू । दोघे बंधू देखती ॥७७॥
ती देखतांचि सुंदर । दोघे उठिले सत्वर ।
तिच्या वरणीं अति तत्पर । तत्कामीं दुर्धर सकामी ॥७८॥
कनिष्ठ म्हणे ज्येष्ठसी । भावजयी मानी तू इसी ।
येरू म्हणे ज्येष्ठपत्नीऐसी । निश्चयेसी तू मानी ॥७९॥
कनिष्ठाचे लहे । ज्येष्ठे पाळावे सोहळे ।
भावजयी मानी ये वेल्हाळे । कृपामेळें कृपाळुवा ॥८०॥
ज्येष्ठआज्ञेची थोरी । कनिष्ठे मानावी शिरी ।
हे ज्येष्ठपत्नी खरी । निजनिर्धारी मानावी ॥८१॥
कनिष्ठे कामिली जी कांता । ती भावजयी मानी दुहिता ।
ज्येष्ठपत्नी ते तुज माता । तुवा तत्वता मानावी ॥८२॥
ऐसिया करिता विवादा । दोघे दुर्धर चढले क्रोधा ।
परस्परें घेवोनि गदा । निर्वाणयुध्दा प्रवर्तले ॥८३॥
दोघे युद्धी अति दुर्धर । दोघे गदाविंदान अति चतुर ।
अति मंडला निकुर । येरेयेरां नाटोपती ॥८४॥
कनिष्ठे कळालाघवांत । केला ज्येष्ठाचा घात ।
पडता द्गद क्षोभे हाणित । कनिष्ठाचा घात ज्येष्ठें केला ॥८५॥

स्त्रीकामाचा प्रभाव :

बंधुबंधूच्या घाई । दोघे जण पडिले ठईं ।
हे स्त्रीकामाची नवाई दृष्टिक्षेपें पाही देहांत दोघा ॥८६॥
नाही स्त्रीशीं कामे एकांतू । नाही स्त्रियेसीं केला मातू ।
नाही स्त्रियेसी लाविला हातु । परी अपघातु स्त्रीदृष्टीं ॥८७॥
एवं स्त्रियासीं न व्हावी भेती । स्त्रियांसी न करावी गोष्टी ।
स्त्रियांसी पाहतांच दृष्टी । उठाउठी आत्मघात ॥८८॥
सखे आत्मबंधु दोनी । तिही स्त्री देखता नयनी ।
निजघातें निमाले रणी । स्त्रीदर्शनीं अपघात ॥८९॥
स्त्रीदर्शनी देहघात । स्त्रीस्पर्शनीं नरकावर्त ।
एवं स्त्रियांची संगत । अति अनर्थ पुरूषांसी ॥९०॥
कथाकथनीं सुंदोपसुंद । हा कथेसी लागला संबंध ।
म्हणोनी केला अनुवाद । श्रोती जल्पानुवाद न म्हणावा ॥९१॥
स्त्रीसंगपासी अति अनर्थ । हो बोलिलो परमार्थ ।
पुढील कथेचा भयचकित । ताटका तदर्थ या वना आली ॥९३॥

ताटका राक्षसी का झाली ? :

मग बोले रघुनंदन । तीस का आले राक्षसपण ।
तेविशयींचें निरूपण । ऋषि संपूर्ण सांगतु ॥९४॥
अगस्तीच्या आश्रमासी । ताटका वसे वनवासी ।
घेउनि दोघा पुत्रांसी । ती परदेशी विचरत॥९५॥
ते नागायुतनिजशक्ति । त्या बळाची अंगी मस्ती ।
तेणे बळे ते दुर्मती । अगस्तीप्रती ढळूं गेली ॥९६॥
पुत्रांसमवेत आपण । विक्राळ करोनिया वंदन ।
अगस्तीस छळितां जाण । तेणे दारूण शाप दिधला ॥९७॥
विक्राळ करोनि वदनासी । ते तू मज दहूं आलीसी ।
ते तू सपूत्र राक्षसी । विक्राळ देहासी विटंक होसी ॥९८॥
ते हे अगस्तीशापदग्ध । राक्षसी अति विरुद्ध ।
प्राणागणां करी बाध । मार्गनिरोध केला असे ॥९९॥
जे मार्गीं असे ते रक्षसी । मे मागीं जाता नये आम्हांसी ।
ऐसे ऐकता ऋषिवाक्यासी । हासें रामासी पै आले ॥१००॥
स्त्रीव्यक्ति ताटिकाभणें । जे करावे पलायन ।
तै तुम्च्या यागीं संरक्षण । केंवी आपण करावे ॥१॥
आज्ञा ऐसी स्वामीनाथा । राक्षसी वधीन मी आता ।
ऐसे विश्वामित्रे ऐकता । उल्लासें तत्वता आलिंगी ॥२॥
तुझा पहावया पुरूषार्थ । म्या सूचिला मार्ग भयार्थ ।
तवं तू निधडा रघुनाथ । निर्भयार्थ निजयोद्धा ॥३॥
इसीं मारावें रघुनाथा । स्त्री मारू नये शास्त्रार्था ।
दुष्टदमनी हे वाक्य वृथा । इसी सर्वथा मारावें ॥४॥
स्वामी करू नये गुरूअवज्ञा । हे सकळशास्त्रप्रतिज्ञा ।
वसिष्ठदशरथांची आज्ञा । तुझी अवज्ञा न करावी ॥५॥
सकळ शास्त्रार्थ आपण । गुरूचरणां येती शरण ।
गुरूंचे अपार महिमान । अन्यथा कोण करू शके ॥६॥
ताटिकेचा वध : ऐंसे बोलोनि रघुनंदन । नमूनियां सद्गुरूचरण ।
चाप सज्जोनिया जाण । साटोपे ठाण मांडिले ॥७॥
ते काळी श्रीरामस्वरूप । पाहातां काळासी सुटे कंप ।
वीर्यधैर्याचा साटोप । परम प्रताप युद्धाचा ॥८॥
करिता धनुष्यी टणत्कार । दुमदुमिले मेरुमांदार ।
खळबळले सप्त सगर । पाताळीं विखार खळळिले ॥९॥
धनुष्यनादें कांपे सृष्टी । न्याहा उठला वैकुंठीं ।
ध्यानीं दचकला धूर्जटी । हडबड मोठी सुरवरां॥११०॥
नांदे कोंदले अंबर । दिशा जाल्या नदाकार ।
तेणे तटिकेचे जिव्हार । कांपे थरथरा सन्नदें ॥११॥
तेणे गजबजुनी उठी । दोघे कुमार देखे दृष्टी ।
गिळावया आवळी चाटी । सक्रोध उठी साटोपे ॥१२॥
विकट देखोनिया हाक । विक्राळ पसरोनिया मुख ।
धांविन्नली श्रीरामासन्मुख । येरू तो नि:शंक तद्वधार्थीं ॥१३॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणा । पाहे भ्यासुर राक्षसी पूर्णा ।
देखता प्राणी सांडिती प्राणा । इजसमोर कोणा न राहवे ॥१४॥
आता पाहे माझे विंदान । हस्तलाघवी अनुसंधान ।
एके घाई घेईन प्राण । म्हणोनि बाण सोडिला ॥१५॥
कनाडी ओढिता आपण । आकर्षिला ताटिकेचा प्राण ।
हृदयी आदळला बाण । जिव्हारीं पूर्ण भेदला ॥१६॥
बाणाच्या सबळ मेळी । ताटिका देवोनि आरोळी ।
नेटे आदळली भूतळीं । न्याहा पाताळीं ऊठिला ॥१७॥
ताटिकेचे निजशरीरभारें । दुमदुमिलीं गिरीकंदरें ।
डळमळी मेरुशिखरें । भयें वनचरें मूर्च्छागत ॥१८॥
तळी पाषाण जाले रंगोळी । वृक्ष उपडिले समूळी ।
पक्षीं भ्रमती अंतराळी । बैसलीं टाळी दिग्गजांची ॥१९॥
ताटिकापातें भूकंप होत । समुद्रजवळ उचंबळत ।
नरनारी हाहाभूत । असुर कांपत थरथरां ॥१२०॥
तिचे छेदिले त्रिविघ ताप । छेदिले संकल्पविकल्प ।
छेदोनियां पुण्यपाप । विविकल्प मारिली ॥२१॥
छेदिला देहेंसी अभिमान । जीवपणाऐसीं जीवबंधन ।
समूळ छेदोनि मीपण । ताटिका संपूर्ण मारिली ॥२२॥

त्रैलोक्यात सर्वांनाच आनंद :

ताटिका पंडतांचि सृष्टी । देवांची कोट्यानुकोटी ।
विमाने दाटली दाटीं । पुष्पवृष्टी तिही केली ॥२३॥
निशाणे त्राहाटिलीं सुरवरी । शंख दुंदुभि निशाण भेरी ।
गगन गर्जे जयजयकारीं । कीर्ति सुरवरी वानिजे ॥२४॥
योगि छेदी निजकल्पना । तेणे सुख होय जीवा मना ।
ताटिका निर्दाळितांचि जाणा । सुख त्रिभुवना श्रीरामे ॥२५॥
भक्त निर्दाळी अशंका । तेणं तो पावोनि निजत्मसुखा ।
तेंवि वधिताचि ताटिका । सकळ लोका आल्हाद ॥२६॥
विश्वामित्राचे निजगुण । अमरेंद्र वानी आपण ।
तुझेनि धर्में जाण । दुष्टनिर्दळण श्रीरामे ॥२७॥
ताटिका वधिली तत्काळी । कौशिक नाचे आनंदमेळीं ।
श्रीरामाते जीवे ओवाळी । पिटिली टाळी ऋषिवृंदें ॥२८॥
इंद्र सांगे विश्वामित्रासी । अस्त्रविद्या द्यावी श्रीरामासी ।
हा साह्य सुरकार्यासी । तुमच्याही यागासी सिद्ध्यर्थ ॥२९॥
श्रीरामासारिखें पात्र । यासी सांगावे सच्छास्त्र ।
विद्या सांगावी सबीजमंत्र । तुवा विश्वामित्रगुरूवर्या ॥१३०॥
ऐकोनि देवांचे वचन । विश्वामित्र संतोषोन ।
श्रीराम दे आलिंगन । करी निंबलोण सर्वस्वें ॥३१॥
तो म्हणे ताटिका वधितां येथ । सुरवरा सुख जाले अपरिमित ।
मार्गस्थां मार्ग निर्मुक्त । हा प्रताप समर्थ श्रीरामाचा ॥३२॥
हे रघुनाथाचें प्रथमचरित्र । लोकत्रयी अति विख्यात ।
पुढारीं कथा परम अद् भुत । श्रोती सावचित्त परिसावी ॥३३॥
जे कथेचेनि अवधानें । जन्ममरणांचे उठे धरणे ।
विषयांचे खत लाटणें । गुढी उभवणें वैकुंठी ॥३४॥
वैकुंठींचे मुक्तवासी । तेहि येती रामकथेसी ।
कथेचि महिमा आहे ऐसी । कथा सर्वांसी प्रियकर ॥३५॥
एकजनर्दना शरण । जाले ताटकानिर्दळण ।
पुढे धनुर्विद्या अस्त्रग्रहण । यज्ञसंरक्षण ऋषींचे ॥३६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
ताटिकानिर्दलनं नाम द्वादशोऽध्याय: ॥१२॥
॥ ओंव्या १३६ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग