॥ श्रीएकनाथमहाराजकृत
5.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय पाचवा ॥
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
कौसल्येचे डोहाळे :
पूर्वकथेचे अनुसंधान । कौसल्यें उघडिले नयन ।
डोहाळे पुसावसा जाण । राजा सावधान स्वये जाला ॥१॥
कौसल्या रामगर्भें स्वरूपस्थिती । राजा प्रवृत्तिधर्में पुत्रार्थी ।
दोहींच्या संवादाची प्रीती । डोहळे निश्चिती अवधारा ॥२॥
राजा म्हणे स्वमुखें कांते । काय आवडी आहे तूतें ।
वेगी सांग डोहळ्यांतें । सांडी परते भ्रमासी ॥३॥
येरी म्हणे मी अवघा राम । मजमाजी तंव कैंचा भ्रम ।
अवतरलों पुरुषोत्तम । देवांचे श्रम फेडावया ॥४॥
ऐकोनि शंकिजे राये । म्हणे इसी जाहलें तरी काये ।
आप आपणियातें पाहे । सावधान होय प्रिये तू ॥५॥
येरी म्हणे मी नव्हे स्त्री ना पुरुष । नर वानर ना राक्षस ।
ईशाचा ज्ओ निज ईश । परम पुरुष श्रीराम ॥६॥
राजा म्हण तन्वंगी । काय झाले तुजलागीं ।
कैंचा भ्रम भरला अंगी । पाहे वेगी मी कोण ॥७॥
येरी म्हणे माझ्या ठायी । मी तू ऐसे उरले नाही ।
अधिष्ठान जे विदेही । आत्मा पाही श्रीराम ॥८॥
दशरथ म्हणे कौसल्ये । माझे तुझे जै लग्न झाले ।
तै रावणे अति विघ्न केले । ते विसरलीस कैसेनी ॥९॥
रावणाचे नाव ऐकतांच :
नांव ऐकोनि रावण । येरी म्हणे दे दे धनुष्यबाण ।
करू लंकेचें निर्वाण । मारू दारुण राक्षस ॥१०॥
पाचारा वनींचे वनचर । मुकुट कुंडले द्या अलंकार ।
राज्या देवोनि धरा छत्र । वानभार चालवा ॥११॥
केउता गेला रे हनमंत । अंगद सुग्रीव जांबवंत ।
अखूनि रावणाची मात । जगाआंत उरलीसे ॥१२॥
अहो वज्रदेही निजगडा । पुच्छे घालोनिया वेढा ।
लंका जाळा ते भडभडा । पाडा तुडतुडा राक्षस ॥१३॥
अमित पाचारा वानर । शिळीं बुजा रे सागर ।
पाडा पाडा रे नगर । निशाचरवस्ती जे ॥१४॥
केउते गेले रे जुत्पती । लंका उलथा रे हाताहातीं ।
पाडा पाडा चारी भिंती । दुर्ग किती आम्हांसी ॥१५॥
आगड भेदा रे चोहटा । पांडू लंकेच्या त्रिकूटा ।
मारू रावणा अति दुष्टा । स्वधर्मवाटा रुंधित ॥१६॥
बाण घेवोनि स्वांगे । छेदूं कुंभकर्णाचे टांगे ।
भेदू रावणाची सर्वांगे । भिडता मागे मी न सरे ॥१७॥
राक्षसांच्या शिरकमळी । खेळू लंकेपुढें चेंडूफळी ।
साजुक रुधिरांच्या कल्लोळी । तृप्त कंकांईं करू आजी ॥१८॥
तोडा नवग्रहांची बेडी । सोडा देवांची बांधवडी ।
उभवा रामराज्याची गुढी । आज्ञा धडफुडी तिही लोकी ॥१९॥
पाचारा बिभीषण पवित्र । करा राज्याभिषेक धरा छत्र ।
लंका दिधली स्वतंत्र । यावचंद्रस्र्यपर्यंत ॥२०॥
नासा रे जगाचीं दुःखे । त्रैलोक्य भरारे हरिखें ।
दुमदुमित विश्व सुखें । परम परुरुषें श्रीरामे ॥२१॥
नामे कळिकाळासी शिक । यम पराङ्मुख कांपती ॥२२॥
जो वाचे उच्चारी रामनाम । त्याचे पुरवावे सकळ काम ।
हरावे जन्ममरणश्रम । सहज सम करावे ॥२३॥
नित्य जपे जो रामनाम । तो जाणावा मजचि सम ।
पुरुषांमाजी पुरुषोत्तम । सकळ नेम तेणे केले ॥२४॥
रायासी पडली आशंका । पोटी विवसा आली देखा ।
की गर्भींच उठली ताटका । सिस्थिया सुखा अंतरलों ॥२५॥
येरी म्हणे रे सुमित्र नेटका । अझूनि कैंची री ताटका ।
छेदूनिया बाणे एका । जनाच्या सुखा अवरोधी ॥२६॥
राजा म्हणे न चले मंत्र । गुणिया पाचारा विश्वामित्र ।
येरी म्हणे केउता गेला सुमित्र । आला विप्र यागासी ॥२७॥
वेगे बाणे दे का बहुवस । विंधूनि मारू मारीचबाहूंस ।
आणि राक्षसा करू नाश । हाहाहूहू करिताती ॥२८॥
राजा करिताहे स्मरण । परशुराम अवतार जाण ।
त्याचेनि नांवे हतो दारुण । महद्भूत जाण संचार ॥२९॥
येरी म्हणे ऐके गा जमदग्न्या । धनुष्य भंगिले म्या प्राज्ञा ।
विचारीं ब्राह्मणा सर्वज्ञा । जाई तू अज्ञा तपासी ॥३०॥
हिचिये देही संचाराचा ताठा । मुखी सुटलासे फांटा ।
कायसे डोहळे कटकटां । नेणो पोटा काय आले ॥३१॥
वेगी पाचारा वसिष्ठा । पंचाक्षरी तो अदटा ।
परीक्षा करील तो श्रेष्ठा । सकळ वरिष्ठा तो गुरू ॥३२॥
येवोनि वसिष्ठ जंव पाहे । तंव ते राममय जाली आहे ।
म्हणे धन्य धन्य वो माये । वंदावे पाय इयेचे ॥३३॥
आदरे पाहू गेला दृष्टी । चित्तचैतन्या पडली मिठी ।
हर्षे बाष्प दाटे कंठी । पडिला सृष्टी मूर्छित ॥३४॥
नेत्री अश्रूंचिया धारा । रोमा फरकती स्वेदांकुरा ।
अंग कांपतसे थरथरा । अवस्था मुनीवरा अनिवार ॥३५॥
राजा म्हणे कांही न चाले येथे । गुणिया ग्रासिला भूते ।
कोण सोडवील यातें । म्हणोनि चित्ते व्याकुळ ॥३६॥
दशरथाची कौसल्येविषयी चिंता :
म्हणे कौसल्ये आवरूं । की वसिष्ठां सावध करू ।
ऐसा जाजावे नृपवरूं । धांवा थोर पोकारी ॥३७॥
श्रावणावधाचे क्लेश । सोसिले म्या असोस ।
पुढा तेचि बहुवस । वसिष्ठदोहत्येचे ॥३८॥
अगा विधातिया श्रेष्ठा । काय लिहिले अदृष्टा ।
भूते ग्रासिले वसिष्ठा । दोष मोठा मज घडला ॥३९॥
यज्ञ केला म्या पवित्र । कुळीं पावेन सुपुत्र ।
तंव माझारी हे चरित्र । कैंचें विचित्र वोढवले ॥४०॥
कुलगुरूंचे आश्वासन :
ती अवस्था जिरवोनि पोटी । वसिष्ठे उघडिली दृष्टी ।
राव झोंबला कंठी । सृष्टी उफराटी पै जाली ॥४१॥
स्वामी वसिष्ठा तुजही बाधा । हे तो गोष्टी न घडे कदा ।
पुत्रसुखाआड आपदा । भाग्यमंदा आम्हांसी ॥४२॥
वसिष्ठ म्हणे भाग्य श्रेष्ठ । पोटी आले वैकुंठपीठ ।
पुरुषोत्तम जाला रे प्रकट । दैवे उत्कट कौसल्या ॥४३॥
जे जे कांही हे वदली । ते जाण पा ब्रह्मबोली ।
ते ते ख्याती करील भली । सुदशा आली सूर्यवंशा ॥४४॥
मुनिजनांचे ध्येय ध्यान । की देवांचे देवतार्चन ।
जगाचा जगज्जीवन । राम निधान प्रत्यक्ष ॥४५॥
राया तुज नकळे सर्वथा वर्म । उदरा आले परब्रह्म ।
धन्य धन्य आमचे कर्म । पुरोहितधर्म ये वंशी ॥४६॥
चरणी उद्धरील शिळा । परणील जनकाची बाळा ।
आनंदवील लोका सकळा । राम जिव्हाळा जीवाचा ॥४७॥
वाचेनि नामे मुक्ति फुकटा । नगरी नेईल वैकुंठा ।
राम म्हणता पापिष्ठा । गरि उत्कृष्टा देईल ॥४८॥
धन्य धन्य सूर्यवंश । धन्य धन्य अयोध्येचा देश ।
धन्य धन्य कौसल्यागर्भवास । जगन्निवास पै आला ॥४९॥
धन्य धन्य एथींचे जन । धन्य धन्य दशरथा तुझे मन ।
धन्य धन्य आमचे नयन । राम निधान देखती ॥५०॥
दशरथाचा आनंद :
ऐसे वसिष्ठ सांगता । टक पडिले दशरथा ।
आठवू नाठवे चित्ता । पुत्रकथा ऐकोनि ॥५१॥
ऐकता ज्याचेनि श्रवणें । पडले तनमना भुलवणें ।
काय होईल त्याचेनि दर्शने । ते सुख जाणे तो एक ॥५२॥
रामनामेंवीण कथा । ज्याल्या होत्या अनाथा ।
त्या केलिया सनाथा । कौसल्यासुताचेनि नामे ॥५३॥
ऐकता कौसल्येचे डोहळे । दसह्रथासी सुखसोहळे ।
तेणे परमानंद उचंबळे । वंदी तत्काळे वसिष्ठासी ॥५४॥
एका जनार्दन विनंती संता । ऐसी डोहळियांची वार्ता ।
ऐकता उल्लास होय चित्ता । त्याची जन्मकथा अवधारा ॥५५॥
एका जनार्दनी परम । डोहळियांचा अति संभ्रम ।
अजन्मा जन्मेल श्रीराम । तो जन्मसंभ्रम अवधारा ॥५६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
कौसल्यादोहदनिरूपणं नाम पंचमोध्यायः ॥५॥
॥ ओंव्या ५६ ॥
