वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › २६. ब्रह्मास्त्रबंधन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088260 · अभंग क्र. २६

26.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय सव्विसावा ॥
हनुमंतप्रतापवर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ब्रह्मदेवलिखित हनुमंताचा लंकेतील पराक्रम

स्वमुखें निजकीर्ती । सर्वथा न सांगे मारूती ।
हे जाणोनि श्रीरघुपती । स्वये प्रश्नोक्तीं चालवित ॥१॥
आदरे पुसें श्रीरामचंद्र । हनुमंता तू वनचर ।
कैसेनि तरलासी सागर । सत्य साचार मज सांगे ॥२॥
ऐकोनि श्रीरामांचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।
श्रीरामप्रतापमहिमान । सनुद्रतरण वानरा ॥३॥
श्रीरामनामाच्या उच्चारें । जड मूढ तरती भवसागर ।
राममुद्रांकित वानर । तेणे परपार पावलों ॥४॥
रामनामाचा कडकडाट । भवसमुद्रीं पायवाट ।
पायरी करोनि वैकुंठ । होती प्रविष्ठ परब्रह्मीं ॥५॥
जे रामनामांकित नर । त्यांते बुडवूं न शके सागर ।
श्रीराममुद्रांकित वानर । परपार पावलों ॥६॥
श्रीरामे मुद्रा दिधली हाती । तेव्हांचि मजला विजयवृत्ती ।
श्रीराममुद्रेची ख्याती । श्रुति बोलती पुराणे ॥७॥
श्रीराममुद्रा समुद्रतरण । श्रीराममुद्रा सीतादर्शन ।
श्रीराममुद्रा रणकंदन । लंकादहन श्रीराममुद्रा ॥८॥
श्रीराममुद्रा विजयप्राप्ती । लंकाभुवनीं केली ख्याती ।
आडनांव मी मारूती । अगाध करणी मुद्रेची ॥९॥
नित्य श्रीरामनाम स्मरण । तेथे वीर्य धैर्य कीर्ति कल्याण ।
ब्रह्म पावती सनातन । ते महिमान स्मरणाचें ॥१०॥
जेथे नाही श्रीरामस्मरण । अकीर्ति अपयश अकल्याण ।
नित्य निंद्ध्यत्व पापी पूर्ण । अधःपतन महानरकीं ॥११॥
यालागी साक्षेपे आपण । समूळ सांडावें विस्मरण ।
नित्य करिता श्रीरामस्मरण । कीर्ति कल्याण निजविजयी ॥१२॥
श्रीराममुद्रानिजप्राप्ती । म्हणती हनुमंताची ख्याती ।
जे जे केले लंकेप्रती । ते ते कीर्ति मुद्रेची ॥१३॥
हनुमंताची निजस्थिती । स्वमुखें न सांगे निजकीर्ति ।
करोनि मुद्रिकेची स्तुती । सांगितली ख्याती श्रीरामा ॥१४॥
हनुमंताचे मनोगत । अंतर्यामी जाणे रघुनाथ ।
ह्रदयीं धरिला आनंदयुक्त । स्वामी सद्‌भक्त आल्हादी ॥१५॥
हनुमंताची युद्धख्याती । ऐकावया वानरे तळमळती ।
हे जाणोनि श्रीरघुपती । पुसे पुढती हनुमंता ॥१६॥
श्रीराम म्हणे गा मारूती । समुद्रलंघन लंकाख्याती ।
तुवा सांगितली कथा निगुती । संकळिती अति गौण ॥१७॥
सीता ऐकोनि अक्षता । संतोष जाला श्रीरघुनाथा ।
राक्षसांसी युद्धकंदनार्था । घडला किमर्थ ते सांगे ॥१८॥
तेचि आता विशदस्थिती । तुवा सांगावी लंकाख्याती ।
ऐसे बोलता श्रीरघुपती । वंदी मारूती श्रीचरण ॥१९॥
स्वमुखें सांगो नयें स्वकीर्ती । वचूं नये स्वामीप्रती ।
हनुमंते येचि अर्थी । प्रजापति प्रार्थिला ॥२०॥
माझे समुद्रलंघन । लंकेमाजी सीताशोधन ।
स्वामीनें कृपा करोन । पत्र लिहून मज द्यावे ॥२१॥
तुझे हातींचें ब्रह्मलिखित । देखोनि सीता शुद्ध्यर्थ ।
सत्य मानील श्रीरघुनाथ । शीघ्र कार्यार्थ साधेल ॥२२॥
ऐकोनि कपीचें वचन । संतोषला चतुरानन ।
हनुमंताचे कीर्तिकथन । दिधले लिहून साद्यंत ॥२३॥
संतोषोनी प्रजापती । पत्र देवोनि हनुमंताहातीं ।
आलिंगिला अति प्रीती । विजयो सर्वार्थीं पावसी ॥२४॥
ते पत्र घेवोनि हनुमंत । स्वये श्रीरामा विनवित ।
हे ब्रह्मयाचें लिखित । वाचूनि कार्यार्थ जाणावा ॥२५॥
पत्र घेवोनि श्रीरघुपती । वंदोनियां अति प्रती ।
दिधले लक्ष्मणाचे हाती । वाचावया श्रीरामे ॥२६॥
पत्र लिहिता प्रजापति । श्रोता सादर श्रीरघुपती ।
वाचिता सौमित्र शेषमूर्ती । पत्रप्रयुक्ती अवधारा ॥२७॥
ऐकावया हनुमंताची ख्याती । सुग्रीवादि जुत्पती ।
सादरें बैसल्या वानरपंक्ती । हनुमत्कीर्तिचातक ॥२८॥
ॐ नमो जी श्रीरामचंद्रा । क्षराक्षरातीत परा ।
त्रिगुणातीत चिदचिन्मात्रा । परात्परा परब्रह्मा ॥२९॥
जेथे नाही मीतूंपण । ब्रह्मी नाठवे ब्रह्मस्फुरण ।
तो तू श्रीराम सगुण । पूर्णत्व पूर्ण परब्रह्मा ॥३०॥
ब्रह्मया तुझेनि ब्रह्मत्व । धर्मा तुझेनि धर्मत्व ।
कर्मा तुझेनि कर्मत्व । तू स्वयमेव चिन्मात्र ॥३१॥
तुज निर्विकार श्रुति म्हणती । तो तू भाससी विश्वमूर्ती ।
विश्व तू मानितां निश्चिती । तंव ते श्रीपति तुझी माया ॥३२॥
तू साकार ना निराकार । तू विश्वनाथ विश्वंभर ।
तुझ्या स्वरूपाचा निर्धार । न कळे साचार श्रुतिशास्त्रां ॥३३॥
श्रुति म्हणती नेति नेति । शास्त्रें थोटावली चित्ती ।
चारी वाचा मौनावती । तो तू रघुपति परमात्मा ॥३४॥
आता जैसा आहेसी तैसिया । नमो तुज श्रीरामराया ।
तुझिया कृपें श्रीरघुवर्या । स्तुति वदावया सामर्थ्य ॥३५॥
तो तू अपरंपार अनंत । अवतारा अवतारी तू रघुनाथ ।
तुझा सेवक हनुमंत । त्याच अद्‌भुत पवाडा ॥३६॥
लंघोनियां अपांपती । येवोनियां लंकेप्रती ।
हनुमंते केली जे जे ख्याती । ते तू रघुपति अवधारी ॥३७॥
तू अवतार श्रीरामचंद्र । तुझे अगम्यचरित्र ।
तुझा रंक पालेखाईर । हनुमान वानर अगम्य ॥३८॥
अगम्य हनुमंताची गती । अगम्य हनुमंताची ख्याती ।
अगम्य हनुमंताची कीर्ती । ऐके रघुपती पुरूषार्थ ॥३९॥
समुद्र लंघोनि हनुमान बळी । महेंद्रगिरि चेपिला तळी ।
सर्प दडपले पाताळीं । तोंडे तेकाळीं वासिलीं ॥४०॥
अंगवाताचेनि झडाडें । समुद्री खचले पर्वतकडे ।
शिखरें उडालीं पै पुढे । जेंवी घुंगुरडे आकाशी ॥४१॥
उड्डानवाताचेनि घर्घरें । बैसली मेघांची दांतारे ।
दिग्गज कांपती थरारें । आले शहारे कळीकाळा ॥४२॥
उड्डान काळींचा कल्लोळ । उंचबळलें समुद्रजळ ।
सत्यलोकी पर्जन्यकाळ । ध्रुवमंडळ तिमिन्नलें ॥४३॥
उड्डाणकाळ दुर्धर मोठा । उमा झोंबली नीळकंठा ।
रमा थापटी वैकुंठा । भयें संकटी संरक्षी ॥४४॥
उड्डाणकाळीं कपि दुर्धर । सुर धाकती खेचर ।
सिद्ध गंधर्व विद्याधर । नर किन्नर कांपती ॥४५॥
जैसा श्रीरामाचा बाण । तैसे सवेग उड्डाण ।
कपीस आले पै स्फुरण । दुर्धर कोण आंवरी ॥४६॥

सुरसा - हनुमंत संघर्ष व हनुमंताच्या हुशारीने त्याची मुक्तता

पहावया हनुमंताची शक्ती । मिळोनिया देव समस्ती ।
सुरसा धाडिली छळणोक्ती । मार्गरोधार्थी हनुमंता ॥४७॥
दनु जे का दानवजननी । सुरसा नामे कश्यपपत्‍नी ।
विक्राळ मुख योजनमानीं । कपीलागोनी गिळावया ॥४८॥
हनुमान जाला वीस योजन । सुरसा तीस योजन ।
हनुमान वाढला शत योजन । तत्समान मुख पसरी ॥४९॥
हनुमान अणुमात्र होउनी । प्रवेशला तिचे वदनी ।
न मारोनियां कश्यपपत्‍नी । गेला निघोनि कर्णद्वारे ॥५०॥
सुरसा आवळी चाटित । देव दानव शिव विस्मित ।
हनुमान गेला हातोहात । बळान्वित श्रीरामे ॥५१॥
सुरसा कश्यपाची पत्‍नी । पित्या वायूची सापत्‍नजननी ।
कपि न मारीच विवेकसज्ञानी । गेला निघोनी रामनामे ॥५२॥
हनुमान गेला न मारून । सुरसा तेणे संतोषोन ।
कपीस दिधले आशीर्वचन । विजयी पूर्ण तिही लोकी ॥५३॥

मैनाक पर्वताला अंगुलीने स्पर्श केला

विसांवा घ्यावया मारूती । जल स्थळ पाहे संभोवतीं ।
तो मैनाक वाढला ऊर्ध्वगती । द्यावया विश्रांती हनुमंता ॥५४॥
कपि गिरिवरा नातळत । ऊर्ध्वगती निघे हनुमंत ।
मार्गरोधें वाढे पर्वत । योजनशत अति दीर्घ ॥५५॥
पर्वत देखोनि योजने शत । हनुमान वाढला पंचशत ।
गिरी थोरावला सप्तशत । सहस्त्रशत कपि जाला ॥५६॥
हनुमान जाता उल्लंघून । पर्वतासी आले रूदन ।
हरिभक्ताचे पादस्पर्शन । अभाग्य पूर्ण मी न पवेंचि ॥५७॥
पर्वताची सप्रेम बोली । तंव हनुमंतासीं कृपा आली ।
मस्तकी ठेवितां आंगोळीं । गिरि पाताळीं बैसला ॥५८॥
आंगोळीसाठीं गेला पाताळीं । कपि बैसता रांगोळी ।
सुरासुरी पिटिली टाळी । आतुर्बळी हनुमंत ॥५९॥

सिंहिका -विदारण व पडलंकेचा पाडाव व विध्वंस

सिंहिका राक्षसी रूदण । छायाग्रहणें ग्रासी पूर्ण ।
तिचे करोनि विदारण । केले उड्डाण हनुमंते ॥६०॥
जीवे मारोनि सिंहिका । उड्डाण करिता अति तवका ।
मागे सांडोनिया लंका । पडलंका पावला ॥६१॥
तेथे क्रौंचा निशाचरी । हनुमान तीस जीवे मारी ।
चौदा सहस्त्र निशाचरी । घातल्या सागरी पुच्छाग्रें ॥६२॥

लंकेतील दिवे विझवून, सर्वत्र हाहाकार

तेथोनि आला लंकेआंत । सीताशुद्धीच्या कार्यार्थ ।
घरे शोधिलीं समस्त । साक्षेपयुक्त वानरे ॥६३॥
साधावया सीताशुद्ध्यर्थ । कलहो लाविला नगरांत ।
सभा नागविली समस्त । हळहळिती नागवे ॥६४॥
अनेक दीपिका लक्षांतरी । वानरे विझविल्या पुच्छेंकरीं ।
रावणा टोले दिधले शिरी । सभा अंधारी नागविलीं ॥६५॥

इंद्रजित, कुंभकर्ण, बिभीषणादिंची घरे शोधिली

प्रधानवर्ग थोरथोरी । घेतली घरोघर धांडोळी वानरी ।
इंद्रजिताचे निजमंदिरीं । जाली परी ते ऐका ॥६६॥
देखोनि सुलोचना नारी । हेचि होय म्हणे सीता सुंदरी ।
अनुसरली रावणपुत्रीं । दोघांते मारीन मी आंता ॥६७॥
तंव सुलोचना वदे कथा । रावणे चोरोनि आणिली सीता ।
तीस सोडवावे इंद्रजितां । येरी कुळघाता करील ॥६८॥
इंद्रजित म्हणे ऐक आता । सोडी म्हणो जाता सीता ।
रावण करू धांवे घाता । सुह्रदता सांडोनी ॥६९॥
रावणा सीतासन्निपात । बुद्धि सांगता करील घात ।
आपण न वदावी हे मात । कुळक्षयार्थ ते सीता ॥७०॥
ऐसे इंद्रजित सांगता । सुलोचना हे नव्हे सीता ।
खूण पावली हनुमंता । होय निघता तेथूनी ॥७१॥
वेगी उडोनि मारूती । गेला कुंभकर्णगृहाप्रती ।
घोर गर्जें त्रिजगती । श्वासावर्तीं गज म्हैसें ॥७२॥
नासिकेच्या केशांतरीं । ओरडती गुंतलीं कर्हीं ।
मातले हस्ती घेती झुंजारी । घशामाझारी जाती सिंह ॥७३॥
प्रबळ देखोनि कुंभकर्णार्थ । हनुमान म्हणे जीवाआंत ।
याचा पहावया पुरूषार्थ । प्रथम युद्धार्थ मी करीन ॥७४॥
नाही दांतवण पाणी । वेखंडल्या दंतश्रेणी ।
मुखी उठिली पोहाणी घाणी । कंटाळोनी कपि गेला ॥७५॥
बिभीषणाचे मंदिरी । शोधूं जाता सीता सुंदरीं ।
कीर्तनाचे निजगजरीं । सुख वानरी उलथले ॥७६॥
ताल छंद गीत नृत्य । ऐकता श्रीरामचरित्र ।
हनुमान स्वानंदे डुल्लत । रंगी नाचत गुप्तत्वे ॥७७॥
लंका घेतलिया रघुपति । बिभीषणा लंकाधिपती ।
करणे निश्चयो हा हनुमंती । निश्चितार्थीं निश्चयो ॥७८॥
परम पावोनि विश्रांती । रावणगृही सीताशुद्ध्यर्थी ।
शोधावयालागीं मारूती । शीघ्रगती निघाला ॥७९॥

रावणशयनभवनातील वृत्तांत, रावण व मंदोदरी यांच्यात झालेला संवाद

रावणाचे भवनोभवनीं । कपीनें पाहिले शोधोनी ।
लंकेशाचे निद्रास्थानीं । सीताशोधनीं करू आला ॥८०॥
रावणासहित सेजेवरी । हनुमान देखे मंदोदरी ।
हेचि मानोनि सीता सुंदरी । अभ्यंतरी क्षोभला ॥८१॥
मी काय करू नाट आता । रडत सांगों श्रीरघुनाथा ।
रावणा अनुसरली सीता । दोघांच्या घाता मी करीन ॥८२॥
करकरा दांत खात दाढा । वळिला पुच्छाचा आंकोडा ।
दोहींचा करावया नितोडा । हनुमान गाढा क्षोभला ॥८३॥
दाही शिरें रावणाते । सीतेंचे अकरावें तेथे ।
हे खुडूनियां वामहस्ते । नेईन भेटीतें श्रीरामा ॥८४॥
नातरी बांधोनि पुच्छासी । दोन्ही नेईन श्रीरामापासीं ।
श्रीराम दंडील दोघांसी । अधर्मासी देखोनी ॥८५॥
ऐसे चिंतितां हनुमंता । मंदोदरी लंकानाथा ।
स्वये सांगे स्वप्नावस्था । दुःखावार्ता अति दुःख ॥८६॥
आतांचि देखिले म्या स्वप्नीं । सीता ठेविली अशोकवनी ।
तिचे कैवारालागोनी । आला क्षोभोनि महारूद्र ॥८७॥
क्रौंचा प्रियभगिनी तुम्हांसीं । ते मारोनि पडलंकेसी ।
सवेंचि आला तो लंकेसी । सीताशुद्धीसी साधावया ॥८८॥
माझे तुम्हांसी विज्ञापन । समूळ ऐका माझे स्वप्न ।
सीतारक्षणीं अशोकवन । दूर धांवोन तेथे गेला ॥८९॥
घेवोनि सीतेसी तेणे भेटी । अशोकवनाची उत्पाटी ।
स्वप्न देखिले म्या दृष्टी । राक्षस कोटी मारिले ॥९०॥
चवदा सहस्त्र वनकर । ऐशीं सहस्त्र किंकर ।
जंबुमाळी प्रधानपुत्र । अखयाकुमर मारिला ॥९१॥
अखया आपटिला शिळीं । त्याचा कैवारी सवंदळी ।
इंद्रजित गांजोनि महाबळी । लंकाहोळी तेणे केली ॥९२॥
ऐसे देखोनि कंदन । जागी जाले गजबजोन ।
शिवस्मरणें शुद्धाचमन । केले शयन वामभागी ॥९३॥
तंव देखिले दुर्धर स्वप्न । शिळीं सागर बुजोन ।
लंके आले वानरसैन्य । राक्षसदळण करीतचि ॥९४॥
रामे मारिला कुंभकर्ण । लक्ष्मणे वधिला इंद्रजित आपण ।
तुम्हांवरी ओखटें स्वप्न । म्या संपूर्ण देखिले ॥९५॥
दाही शिरें भूमीवरी । लोळती श्रीरामबाणधारीं ।
सांगता भुलली मंदोदरी । शंख करी पतिशोकें ॥९६॥
रावणासंमुख बैसोन । म्हणे चुडियांसी पडिले खान ।
पुढती करिता शंखस्फुरण । धरी रावण धावोनी ॥९७॥
रावण म्हणे मज जिता । तू का खेद करसि वृथा ।
शिर न देखे तुमचे माथा । मिथ्या वार्ता जिण्याची ॥९८॥
रावणे पोटासीं धरोन । प्रियेसी करी समाधान ।
येरी म्हणे मिथ्या नव्हे स्वप्न । आले विघ्न अनिवार ॥९९॥
चरणी ठेवोनिया माथा । मंदोदरी म्हणे लंकानाथा ।
अशोकवनी ठेवितां सीता । कुळाचे घाता ते करी ॥१००॥
स्वये अर्पोनियां सीता । शरण रिघावे श्रीरघुनाथा ।
निवारे जन्ममरणकथा । अक्षयता सुखरूप ॥१०१॥
श्रीरामा जालिया अनन्यशरण । कदा बाधेन जन्ममरण ।
रावणा पावसी कृतकल्याण । सत्य भाषण हे माझे ॥१०२॥
माझे न करसील वचन । तै इंद्रजित कुंभकर्ण ।
पाचारोनि दोघे जण । रामार्पण करीन सीता ॥१०३॥
रावणा हितकुळार्था । रामार्पण करी सीता ।
ऐसे रावणे ऐकता । उद्वेगता पावला ॥१०४॥
मंदोदरीचे वचन । सर्वस्वें मानी कुंभकर्ण ।
इंद्रजित वचनाधीन । रामार्पण करितील सीता ॥१०५॥
रावण सांगे मंदोदरीसी । निवारावया स्वप्नविघ्नासीं ।
आधी पूजू सदाशिवासी । उपचारांसी तू आणीं ॥१०६॥
कार्यी गोवोनि निजांगना । विश्वासी राक्षसी दुर्मना ।
रावण धाडी अशोकवना । सीतेच्या यत्‍ना करावया ॥१०७॥
इंद्रजित अथवा कुंभकर्ण । मंदोदरी का बिभीषण ।
यांचेनि बोले सीता आपण । सर्वथा जाण न सोडावी ॥१०८॥
अशोकवना निघे राक्षसी । हनुमान लागला तिचे मागेंसीं ।
श्रीरामे कृपा केली कैसी । सीता अनन्यासीं भेटेल ॥१०९॥
सीता देखिलिया दृष्टी । हनुमान घेवो न शके भेटी ।
राक्षसी रक्षण कोट्यनुकोटी । वृक्षसंपुटी राहे गुप्त ॥११०॥
एकांती भेटावया सीतेंसी । हनुमान गुप्त वृक्षवासी ।
तेथे सीतेची स्थिति कैसी । वृक्षवल्लींसीं रामस्मरण ॥१११॥
अशोकवनींचे पाषाण । गुल्मलता पक्षी तृण ।
अवघी करिती श्रीरामस्मरण । प्रभाव पूर्ण सीतेचा ॥११२॥
जागृती स्वप्नीं तुर्यासुषुप्तीं । हनुमान शोधिता सीता सती ।
मीतूंपणाही परती । सहजस्थिती शोधित ॥११३॥

वृत्तांत ऐकून श्रीरामांना आनंद :

परिसोनि सीतास्वरूपस्थिती । ऐकोनि हनुमंतशोधकशक्ती ।
सुखावोनि श्रीरघुपती । नयना स्त्रवती स्वानंदबिंदु ॥११४॥
नव्हेती नयना अश्रुजीवन । पूर्णानंदे अभिषिंचन ।
हनुमंतासी रघुनंदन । संतोषोनि करितसे ॥११५॥
धन्य सीतेचे मनोगत । नित्य श्रीरामी अनुरक्त ।
धन्य हनुमंताचे जीवित । सेवानुरक्त श्रीरामी ॥११६॥
धन्य ब्रह्मयाचे लिक्जित । अर्थी ओसंडे परमार्थ ।
श्रवणमात्रें श्रीरघुनाथ । स्वये डुल्लत स्वानंदे ॥११७॥
परिसोनि सीतास्वरूपस्थिती । ऐकता हनुमंताची ख्याती ।
संतोषोनि श्रीरघुपती । हर्षे मारूती आलिंगी ॥११८॥
दोघा पडिले आलिंगन । खुंटला बोल तुटले मौन ।
एकाजनार्दना शरण । रामायण रम्य रामे ॥११९॥
श्रीरामा विश्रांति हनुमंती । हनुमंता श्रीरामी विश्रांती ।
एकी पडाती अनन्य प्रीती । अगम्यस्थिती श्रुतिशास्त्रां ॥१२०॥
भक्तभावार्थाचें प्रेम । स्वये जाणे पै श्रीराम ।
भजनव्युत्पत्तीचें वर्म । प्लवंगम स्वये जाणे ॥१२१॥
करिता बहुसाल व्युत्पत्तीं । भक्तभावार्थ प्रेमप्रीती ।
सहसा नये अभिव्यक्ती । कथासंगती अवधारा ॥१२२॥
एकाजनार्दना शरण । हनुमान पावला अशोकवन ।
पुढील ब्रह्मपत्रलेखन । आवधान अवधारा ॥१२३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मपत्रहनुमंत्प्रतापवर्णनं नाम षड्विंशतितमोऽध्यायः ॥२६॥
॥ ओव्या १२३ ॥ श्लोक ३ ॥ एवं संख्या १२६ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग