जन्मा येऊनि तया लाभ
2622.
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥
संसारदुःखे नासिली तेणे । उत्तम हे केणे नामघोष ॥धृपद॥
धन्य तेचि संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव ठाकियेला ॥२॥
प्रेमदाते तेच पतितपावन । धन्य दरुषन होय त्याला ॥३॥
पावटणि पंथे जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥४॥
प्रेम अराणूक नाही भय धाक । मज तेणे सुखे काही चिंता ॥५॥
ते दुर्लभ संसारासी । जडजीव उद्धारलोकासी ॥६॥
तुका म्हणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणे ॥७॥
अर्थ :
जन्माला येऊन त्यांनाच लाभ झाला ज्यांना भवसागरातून तारणारा पाडूरंग भेटला. संसारच्या दु:खाचा त्यांनी नाश केला ज्यांच्याजवळ हरीच्या नामघोषाचा उत्तम माल आहे ज्यांनी पंढरीच्या ठिकाणी आपला थारा धरला आहे ते संत सिध्द महानुभाव धन्य आहेत. ते संत सिध्द महानुभाव जगामध्ये प्रेमाचे दान वाटत असतात आणि पतितांचे पावन देखील ते करतात त्यांचे दर्शन ज्याला होईल त्यालाही धन्य म्हणावे. संत ज्या मार्गाने चालतात त्या मार्गातील पावटणी अष्टमहासिध्दी होतात आणि समाधी व मोक्ष हे तर त्यांची सेवाच करतात. ते साधू संत स्वत:शीच म्हणतात की मला हरीचेच सुख आहे त्यामुळे कशाची चिंता आहे आणि त्यांना हरीचे प्रेम मिळाले त्यामुळे त्यांना कशाचे भय किंवा धाक नसते. असे हे सिध्द संत महानुभाव संसारी लोकांना भेटणे दुलर्भच आहे ते नेहमी जड जीवाचा उध्दार करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या कोणाला असा सिध्द संत महानुभावाचे दर्शन झाले त्यांचे भाग्य धन्य आहे.
