काय दिवस गेले अवघे च
2623.
काय दिवस गेले अवघे चि वराडे । ते आले साकडे कथेमाजी ॥१॥
क्षण एके ठायी मन स्थिर नाही । अराणूक कइ होईल पुढे ॥धृपद॥
कथेचे विसर दोषामूळे होय । तरणोपाय कैचा मग ॥२॥
काय ते सांचवुनि उरले हे मागे । घटिका एक संगे काय गेले ॥३॥
तेचि वाणी येथे करा उजळणी । काढावी मंथूनि शुद्ध रत्ने ॥४॥
तुका म्हणे हेचि बोलावया चाड । नाम घेता गोड हित असे ॥५॥
अर्थ :
अरे लग्नात व-हाडी म्हणून जाताना तू किती तरी दिवस गेला आहेस परंतू हरीकथेला येतानाच तुला अडचण झाली काय ? अरे तुझे मन एका ठिकाणी देखील स्थिर राहात नाही एक क्षणभर देखील स्थिर होत नाही तर मग तुला पुढे समाधान तरी कसे होईल. अरे हरीकथेचा विसर जर तुझ्या दोषामुळे होऊ लागला तर हा भवसागर मग तू कसा तरशील ? अरे तू कितीही धनद्रव्य जरी साचवून ठेवले तरी मागे तुझे काय उरले एक घटकादेखील तु हरीसंगती केली आहे काय ? संसारामध्ये विविध प्रकारचे शब्द वापरुन मलिन झालेल्या आपल्या वाणीला हरीचे नाम घेऊन उजळणी दया त्या वाणीला शुध्द करा आणि हरीकथेमधून अनेक प्रकारचे चांगल्या प्रकारचे शब्दरत्ने निवडून काढा. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक हो मी तुम्हाला उपदेश करत आहे कारण तुम्ही हरीचे गोड नाम घ्या त्यातच तुमचे हित आहे.
