म्हणती नको नको जाऊ ह
144.
म्हणती नको नको जाऊ हरी ।
सांडोनी आम्हा कोठे दुरी ।
तुजवाचोनिया संसारी ।
कोण आम्हा जिवलग ॥१॥
जातील प्राण तुते जाता ।
वियोग न साहावे ते व्यथा ।
पळमात्रचि वेगळे पडता ।
जेवि का मासोळी जळांतील ॥२॥
नव्हे अक्रूर झाढीवर ।
करु आला येथे संहार ।
जीवन नेलिया यदुवीर ।
आम्हा सहजचि प्राणांतु ॥३॥
इतुक्यांचिही येईल हत्या ।
जरि तू कृष्णा नसील आता ।
ऐसे बोलोनिया समस्ता ।
लोळती कृष्णचरणावरी ॥४॥
वधुनी आम्हा आपुल्या हाते ।
जाई मग तू जाणे तेथे ।
करुनिया दीर्घ् रुदनाते ।
उकसाबुकसी स्फुंदती ॥५॥
आमुचा जीव तूचि प्राण ।
तुजविण न वाचो तुझीचि आण ।
नको आमुचे हे निर्वाण ।
पाहो आपुले निज नेत्री ॥६॥
निळा म्हणे यावरी हरी ।
शांतवी तया निज उत्तरी ।
म्हणे आम्ही वरावरी ।
येऊ भेटोनी मामासी ॥७॥
