दर्पणासी बुजे । नखटे
2959.
दर्पणासी बुजे । नखटे तोंड पळवी लाजे ॥१॥
गुण ज्याचे जो अंतरी । तोचि त्यासी पीडा करी ॥धृपद॥
चोरा रुचे निशी । देखोनिया विटे शशी ॥२॥
तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥
अर्थ :
आरशात आपले तोंड एखादया नकट्याने पाहिले तर तो उगाचच बुजतो आणि लाजेने स्वत:चे तोंड लपवतो. ज्याच्या अंत:करणात जो दोष असतो तोच त्याला त्रास देत असतो. चोरांना रात्र खूप आवडत असते परंतू चंद्राला जरी त्यांनी पाहिले तरी त्यांना त्याचा वीट येतो. तुकाराम महाराज म्हणतात. देवा हे असे लोक भाग्यहीन आहेत.
