चतुःश्लोकी भागवत – म
चतुःश्लोकी भागवत – मताचे सामर्थ्य
या मताचे सामर्थ्य
अभिनव या मताची थोरी । मी एक विस्तारे नानापरी । परी एकपणाच्या अंगावरी । नाही दुसरी चीर गेली ॥४२॥
या मताचेनि महायोगे । निजले ठायी मी जागे । जागाही निजें, निजोनि जागे । यापरी दाटुगे मत हे माझे ॥४३॥
हे मत कशानेहि प्राप्त होत नाही.
हे मत नातुडे अष्टांग योगे । हे मत नातुडे महायोगे । हे मत नातुडे स्वर्गभोगे । शिखात्यागे नातुडे मत ॥४४॥
हे मत नातुडे तपे । हे मत नातुडे मंत्रजपे । हे मत नातुडे दिगंबररुपे । शास्त्रपाठे आटोपे नव्हे तैसे ॥४५॥
हे मत नाटोपे वेदाध्ययने । हे मत नाटोपे महाव्याख्याने । हे मत नाटोपे महादाने । बैसता धरणे नाटोपे मत ॥४६॥
हे मत नाटोपे स्वधर्माचारे । हे मत नाटोपे बहुधा विचारे । हे नाटोपे तीर्थसंभारे । मतमतांतरे नाटोपे हे ॥४७॥
हे मत नाटोपे पढणी पढता । हे मत नाटोपे त्रिवेणी बुडता । हे मत नाटोपे थोरे रडता । जाणिवा चरफडिता नाटोपे हे ॥४८॥
हे मत नाटोपे वेदविधी । हे मत नाटोपे अष्टमहासिद्धी । हे मत नातुडे नानाछंदी । हे जीवबुद्धीसी नाटोपे ॥४९॥
हे मत नाटोपे ध्येयध्याने । हे नाटोपे दृढमौने । हे मत नातुडे अनुष्ठाने । ज्याचे देखणे तोचि जाणे ॥६५०॥
हे मत नातुडे घराचारी । हे नातुडे आश्रमांतरी । हे नातुडे गिरिगव्हरी । रिघता कंदरी नातुडे मत हे ॥५१॥
हे मत नातुडे सिद्धीसाठी । हे मत नातुडे करिता गोष्टी । हे मत नातुडे कपिलपीठी । भेददृष्टी नाटोपे ॥५२॥
हे मत नातुडे तीर्थवासी । हे नातुडे क्षेत्रसंन्यासी । हे नातुडे वैराग्यासी । कामक्रोधासी न जिंकिता ॥५३॥
हे मत नातुडे प्रयाग स्नानी । हे नातुडे महास्मशानी । हे नातुडे गयावर्जनी । कष्टता त्रिभुवनी नातुडे मत ॥५४॥
हे नातुडे पृथिवी फिरता । हे नातुडे तीर्थे करिता । हे नातुडे ध्यान धरिता । साधनी सर्वथा नातुडे हे ॥५५॥
हे मत नातुडे कथा ऐकता । हे नातुडे कथा करिता । हे नातुडे शास्त्रार्था । गुरुकृपेवीण हाता नये हे मत ॥५६॥
गुरुकृपेनेच फक्त हे ‘ मत " लाभते
हे मत नातुडे क्षीरसागरी । हे मत नातुडे वैकुंठशिखरी । हे मत नातुडे सगुणसाक्षात्कारी । साम्यसमाधीवरी गुरुकृपे लाभे ॥५७॥
विवेकवैराग्य यथाविधी । विषयविरक्ती निरवधी । सर्वत्र होय समबुद्धी । ते गुरुकृपा प्रबोधी हे मतसिद्धी माझी ॥५८॥
विवेकाचे निजनेटी । धडधडीत वैराग्य उठी । विषयाची काढुनी कांटी । समाधिदृष्टी समसाम्य प्रगटे ॥५९॥
ऐशी सर्वत्र समबुद्धी । या नांव परमसमाधी । ते समाधीवरी त्रिशुद्धी । माझ्या मताची सिद्धी गुरुकृपा लाभे ॥६६०॥
चतुःश्लोकी भागवत – समाधि
समाधि म्हणजे काय ?
सर्वत्र जे समसाम्यता । यानांव समाधी तत्त्वता । परी तटस्यादि काष्ठावस्था । समाधि सर्वथा नव्हे ब्रह्मा ॥६१॥
समाधिमाजी जो तटस्थ । तो जाणावा वृत्तियुक्त । वृत्ति असता समाधिस्थ । ते मी अनंत सत्य नमनी ॥६२॥
मूर्छित वृत्ति असता पोटी । समाधि ह्नणणे गोष्ट खोटी । जेथ अहं सोहं विराल्या गाठी । ते समाधि गोमटी मी मस्तकी वंदी ॥६३॥
ज्वर असता नाडी आत । आरोग्य स्नान तोचि घात । तेवी वृत्ती असता, समाधिस्थ । तो जाण निश्चित आत्मघाती ॥६४॥
सर्वभूती निजात्मता । तिसी पावोनि जाली सर्व समता । ते बोलतीचालती समाधिअवस्था । मजही सर्वथा मानिली ॥६५॥
ऐसी सर्वत्र समताबुद्धी । त्या नांव परसमाधी । ते म्या तुज गुरुकृपे त्रिशुद्धी । यथाविधी प्रबोधिली ॥६६॥
या समाधीच्या समदृष्टी । संकल्पे सृजी ब्रह्मांडकोटी । विकल्पे संहारिता शेवटी । कर्तेपण पोटी उठोंविसरे ॥६७॥
निजसमाधी समसाम्यता । देखोनि पळाली देहअहंता । तेथ मी एक सृष्टीचा कर्ता । या स्फुरणाची वार्ता स्फुते केला हो ? ॥६८॥
सिंधुमाजी पडिले सैधव घन । विरे तव स्फुरे रवेपण । ते विरालिया संपूर्ण । ‘ मी झालो जीवन " हेहि नराहे ॥६९॥
तेवी मज एक होती बद्धता । आता पावलो मुक्तता । येहिविषींची कथावार्ता । तुज सर्वथा स्फुरेना ॥६७०॥
ऐशीया पूर्णसमता । सृष्टी तुज करिता हरिता । आंगी नलागे मोहममता । सत्य सर्वथा स्वयंभू ॥७१॥
देशकालेंस्वभावता कल्पविकल्पमहाकल्पांता । सृष्टिसर्जनाची मोहममता । तुज सर्वथा बाधीना ॥७२॥
हे मी तुज सांगो काये । अनुभव तूचि पाहे । जे तुज पूर्णत्व प्रकाशिले आहे । तेथे होय नव्हे रिघेना ॥७३॥
चतुःश्लोकी भागवत – अहंकारशून्य
ब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला
रोग गेलियाची लक्षणे । रोगी नेणे, वैद्य जाणे । तेवी ब्रह्मा सांडिला अभिमाने । हे नारायणे जाणितले ॥७४॥
लक्ष भेदिता धनुर्धरे । जेवी का निविजे निजकरे । तेवी ब्रह्मा निवटला अहंकारे । हे स्वये श्रीधरे जाणितले ॥७५॥
जे बोधा आले शिष्यासी । ते नसांगता कळे श्रीगुरुसी । तेवी जाणोनिया हषीकेशी । ह्नणे ब्रह्मयासी सावधान ॥७६॥
‘ निजानुभव पाहे पूर्ण । " ऐसे ऐकता सदगुरुवचन । चमत्कारला चतुरानन । देही देहपण विदेहत्वा आले ॥७७॥
जीवदशा वोवांडिता । निजात्मता पावोंजाता । ते संधी सत्वावस्था । अतिसप्रेमता वोसंडे ॥७८॥
निजात्मरुपी पडता दृष्टी । सुखाचा पुर लोटे पोटी । हर्षे बाष्प दाटे कंठी । परेंसी गोष्टी सदगदित वाचा ॥७९॥
नेत्री आनंदाश्रूचिया धारा । सुखोमी कांपे थरथरा । हर्षे उचलल्या रोममुद्रा । स्वेदामृतपुरा सार्द्रत्व ॥६८०॥
अहं सोहं जाले लीन । मने मन झाले उन्मन । चित्त जाले चैतन्यघन । जीव परिपूर्ण ब्रह्म जाला ॥८१॥
जेथे एक ना दुसरे । सन्मुख ना पाठिमोरे । जे जागे ना निदसुरे । जे सहजान्वये खरे सदोदित ॥८२॥
जे केले ना झाले । जे गेले ना आले । जे होते ना हरपले । संपूर्णत्वे संचले परिपूर्ण ॥८३॥
जेथे न साहे रुपनाम । जेथे नसाहे क्रियाकर्म । जेथे न रिघे धर्माधर्म । ते पूर्णब्रह्म परमेष्ठी झाला ॥८४॥
जेथे न रिघे हेतूमातू । जेथे न रिघे दृश्य दृष्टांतु । जिचा नसे आदिअंतू । ते वस्तु सदोदितू विरंची झाला ॥८५॥
ज्याचा न लागे लागमाग । ज्यासि न लगे अवयव अंग । आंगेंवीण अव्यंग । निजवस्तु सांग स्वयंभु झाला ॥८६॥
जेथे दुःखत्वे नरिघे दुःख । सुखत्वे नरिघे सुख । जिचे हरिहरा न करवे तुक । ते वस्तु सम्यक् स्त्रष्टा झाला ॥८७॥
जेणे सुखे आनंदमय शंभू । जेणे सुखे सुखरुप झाला स्वयंभू । ते सुखरुप पावला स्वयंभू । आनंदलाभु सदगुरुकृपा ॥८८॥
भावे सदगुरुते भजता । स्रष्टा पावला स्वस्वरुपता । यालागी गुरुभक्तीपरता । मार्ग परमार्था असेना ॥८९॥
परमार्थ करणार्या सावकाने सकलसाधनश्रेष्ठ गुरुभक्तीच केली पाहिजे
जरी साच चाड परमार्था । तरी भावे भजावे गुरुनाथा । सकल साधनांच्या माथा । जाण तत्त्वता गुरुभक्ति ॥६९०॥
ज्याचे मुखी गुरुचे नाम । ज्यासि गुरुसेवा नित्यकर्म । तो देहासहित परब्रह्म । त्यासि कर्माकर्म बाधीना ॥९१॥
ज्यासि स्वानंदे गुरुभक्ती । त्याच्या चरणतीर्था तीर्थे येती । वेद बंदीजन होती । सुरनर वंदिती पदरज त्याचे ॥९२॥
गुरुभक्ती नांदे ज्याचे घरी । यम त्याची तराळकी करी । काळ आज्ञा वाहे शिरी । तो पूजिजे हरी परमात्मभावे ॥९३॥
गुरुभक्तीचे पवाडे । वर्णिता वेदासि मौन पडे । गुरुभक्तीवरते चढे । ऐसे चोखडे साधन नाही ॥९४॥
चतुःश्लोकी भागवत – गुरुचे लक्षण
गुरुचे लक्षण
शिष्ये करावे माझे भजन । ऐसे वांछी जरी गुरुचे मन । तो गुरुत्वा मुकला जाण । अभिमाने पूर्ण नागवला ॥९५॥
जगी दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान । ते जाण शिश्नोदरपरायण । तेथ अर्धक्षण ज्ञान नथारे ॥९६॥
मुख्यत्वे गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान । सर्वांगी शांतीचे भूषण । तो सदगुरु पूर्ण परब्रह्म ॥९७॥
गुरुभक्तीनेच ब्रह्मदेवास स्वस्वरुपाची ओळख झाली
त्या सदगुरुची निजभक्ती । सद्भावे करुनि प्रजापती । पावला स्वस्वरुपप्राप्ती । स्वानंदस्थिती निजबोधे ॥९८॥
यापरी चतुरानन । नारायणवचने जाण । सांडूनि देहाभिमान । ब्रह्म परिपूर्ण स्वये जाला ॥९९॥
येवढे पद प्राप्त जाले । परी न ह्नणे नवे आजि आले । अनादिसिद्ध आपुले । स्वतः सिद्ध संचले रुप माझे ॥७००॥
ऐसे अनुभावाचे पूर्णोदगार । जाणोनि सुखावे उपेंद्र । जैसा देखोनिया पूर्णचंद्र । भरिते समुद्र उल्हासे ॥१॥
बालका कीजती सोहळे । तेणे माउलीचे निवती डोळे । तेवी शिष्य निजबोध आकळे । तव सुखाचे सोहळे सदगुरुसी ॥२॥
सेवक परचक्र विभांडी । राजा हर्षाची उभवी गुडी । शिष्य स्वानंदी दे बुडी । तेणे सुखोर्मी गाढी सदगुरुसी ॥३॥
तेणे सुखे नारायण । चारी भुजा पसरोन । आलिंगिला चतुरानन । परमानंदे पूर्ण सुखावोनी ॥४॥
आधीच प्रीती पुत्रावरी । तोही जाला ब्रह्माधिकारी । तेणे पूर्णानंदे श्रीहरी । निजहदयावरी आलिंगी ॥५॥
चतुःश्लोकी भागवत – चार श्लोक
चार श्लोकात ब्रह्मदेवाला सुखी केले
साचचि ब्रह्मा जन्मला पोटी । यालागी हरीसी कळवळ मोठो । पूर्णब्रह्म चौश्लोकासाठी । त्यासि उठाउठी वोपिता जाला ॥६॥
न माखता शद्वाचे वदन । नायकता श्रोत्राचे कान । न देखता वृत्तीचे नयन । चौश्लोकी चतुरानन सुखी केला ॥७॥
आतळो न देता गगन । नलगता सूर्यकिरण । प्राणस्पर्श न होता जाण । चतुः श्लोकी चतुरानन सुखी केला ॥८॥
दूरी दुरावोनि अज्ञान । जागे न होता शहाणपण । मौनेचि जिवे जीव मारुन । चौश्लोकी चतुरानन सुखी केला ॥९॥
इशिया युक्ती नारायण । निजपुत्रालागी आपण । थोडे निरुपणॆं जाण । ब्रह्मपरिपूर्ण केला देवे ॥७१०॥
यथा महांति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु ।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥५॥
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः ।
अन्वयव्यतिरेकाभ्या यत्स्यात्सर्वत्र सर्वदा ॥६॥
एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना ।
भवान्कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ॥७॥
येथे नघडे हे निरुपण । शिष्य जालिया ब्रह्मसंपन्न । पुत्रस्नेह बापुडे कोण । त्यासि सदगुरु संपूर्ण पूज्यत्वे मानी ॥११॥
ब्रह्मसंपन्नतेपुढे । पुत्रसुख कायसे बापुडे । हे गुरुकृपा जयासी घडे । त्यासि करी रोकडे ब्रह्मपूर्ण ॥१२॥
जे बोला बुद्धी नातुडे । जे वृत्तीच्या हाता नचढे । ते द्यावया निजनिवाडे । खेवाचे धडफुडे मिस केले ॥१३॥
हदया हदय एक झाले । ये हदयीचे ते हदयी घातले । यापरी न बोलता बोले । पूर्णत्व दिधले प्रजापतीसी ॥१४॥
गुरु – शिष्य एक झाले
जेवी दोन्ही दीप एक होती । प्रबळ चिच्छक्ती कोंदाटे ॥१५॥
ब्रह्मयाचे धन । ब्रह्मा परिपूर्ण ब्रह्म जाला ॥१६॥
तेथे बोध ना अबोध । स्वानंद ना निरानंद । गुरुशिष्य जाले एकवद । पूर्ण परमानंद सदोदित ॥१७॥
गुरुशिष्य जाले अभिन्न । खुंटला बोल पडिले मौन । निः शेष विराले मी तूंपण । अद्वय अलिंगन ऐसे पडिले ॥१८॥
स्वरुपाचे नवलपण । अंगी मुराले ब्रह्मस्फुरण । निः शेष झाले विस्मरण । अव्ययज्ञान पावला विधाता ॥१९॥
यापरी श्रीनारायण । आपुले देऊनि पूर्णपण । पुढे करावया सृष्टिस्रजन । अकर्तात्मबोधे पूर्ण प्रबोधिला विरिंची ॥७२०॥
मुख्य बिंबी न होता भिन्न । सूर्यापुढे प्रकाशती किरण । तेवी नदेखोनि वेगळेपण । सुटले अलिंगन हरिब्रह्मयांचे ॥२१॥
जळी जळावरी वसती कल्लोळ । कल्लोळी असे सबाह्य जळ । तैसा अलिंगन मेळ । जाला वेगळ हरिब्रह्मयांचा ॥२२॥
जेवी दीपे दीप लाविला । तेथे नकळे वडील धाकुला । तेवी चिद्रूपे समत्वा आला । हरिरुप जाला प्रजापती ॥२३॥
चतुःश्लोकी भागवत – सृष्टिपूर्व गुह्यज्ञान
ब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला
सृष्टी न करवे सर्वथा । करिता येईल अहंता । ऐसा ब्रह्मा ह्नणत होता । तोचि यापरी तत्त्वत्ता अनुग्रहिला देवे ॥२४॥
जो सृष्टी नकरवे ह्नणत होता । तोचि आपुल्या अकर्तात्मता । सृष्टी करावयाची योग्यता । पावला विधाता पूर्णबोधे ॥२५॥
सृष्टिपूर्व गुह्यज्ञान
पुढीं सांठविले बुद्धिबळ । तेजि खेळता विस्तारिले खेळ । तेवी पूर्वसृष्टी सकळ । ब्रह्मा तत्काळ विस्तारी स्वये ॥२६॥
पूर्ण पावोनि समाधान । श्रीनारायणाचे चरण । वंदिता जाला चतुरानन । उल्हासे पूर्ण पूर्णानंदबोधे ॥२७॥
हे कल्पादीची गुह्यज्ञानकथा । येणे ज्ञानसंपन्न जाला विधाता । तेचि कथा ऐकता आता । साधका तत्त्वता लाभ काय ॥२८॥
सृष्टीपूर्वील कथा जीर्ण । जीर्णपणे वीर्यक्षीण । परीक्षिती तू ऐसे न ह्नण । हे नित्य नूतन टवटवीत ॥२९॥
कल्पादीचा हा दिनकर । वृद्धपणे अतिजर्जर । याचेनी नलोटे अंधकार । ऐसा विचार मूर्खही नकरी ॥७३०॥
बहुकाळ ठेविला पुरोनी । अग्निहोत्रींचा जुना अग्नि । ह्नणोनी ठेवू जाता वळचणी । धडधडी तत्क्षणी नित्य नूतनत्वे ॥३१॥
तेवी कल्पादि हे गुह्यज्ञान । गुरुमुखे ऐकता सावधान । साधक होती ज्ञानसंपन्न । यालागी नित्य नूतन कथा हे ॥३२॥
स्वभूस्वयंभूगुह्यज्ञान । ऐके परिक्षिती सावधान । सुखरुप होईजे आपण । यालागी नित्य नूतन कथा हे ॥३३॥
कथा नित्य नूतन आणि गोड । निर्दळी दैन्य दुःख दुर्वाड । साधका नित्य सुरवाड । पुरवी कोड श्रोतयाचे ॥३४॥
ऐसी नित्य नूतन सुखरुपता । हरिस्रष्टयांची ज्ञानकथा हे सृष्टीपूर्वील व्यवस्था । कैसेनी हाता आली पै ॥३५॥
चतुःश्लोकी भागवत – जनार्दनकृपा
जनार्दनकृपेनेच आपणास ही कथा श्रोत्यांना सांगता आली – एकनाथ
मी नेणे वेदशास्त्रव्यवस्था । वंशी मूर्ख ह्नणती वस्तुता । त्या मज निजभाग्ये अवचिता । अतुडला हाता गुरु लोष्ट परिस ॥३६॥
परिस सर्वथा कोठे नाही । जरी असला येखादे ठायी । तो काष्ठ लोष्ट पाषाण मूर्ख मही । मज जोडला पाही चिद्रत्नाचा ॥३७॥
माझ्या अंगी मूर्खपण । नेणे मी परिसलक्षण । त्या मज ज्ञानदाता परिपूर्ण । श्रीगुरुचरण जनार्दनाचे ॥३८॥
परिस लोहाचे करी सुवर्ण । परी लोहाचा परिस नव्हे जाण । श्रीजनार्दनाचे चरण । मी पाषाणचि पूर्ण तो मज परिस केला ॥३९॥
ऐसा महानिधि श्रीगुरुजनार्दन । तेणे मज देखोनी अतिदीन । कल्पादीचे गुह्यज्ञान । कृपा करोनी वोपिले ॥७४०॥
एक चिन्मात्र एकाक्षर । उमाशिव हे द्वयक्षर । विठ्ठल हा त्र्यक्षर । एक पंचषडक्षर द्वादशाक्ष पै ॥४१॥
माझा मंत्र चतुराक्षर । चतुरचित्तप्रबोधकर । ज्ञानाब्धीचा पूर्णचंद्र । आर्तचकोरअमृतांश ॥४२॥
या मंत्राचे एकाक्षर । क्षराक्षरातीत पर । स्वये क्षरचि अक्षर । तो हा महामंत्र जनार्दन ॥४३॥
स्रष्टया उपदेशी नारायण । तोचि मजलागी झाला जनार्दन । तेणे पूर्ण कृपा करुन । अनादिगुह्यज्ञान वोपिले मज ॥४४॥
मज वोपिले ह्नणो जाता । जनार्दन मजआंतौंता । तोचि ज्ञान तोचि ज्ञाता । यापरी ज्ञानार्था अर्थविले ग्रंथी ॥४५॥
यालागी श्रीजनार्दन । माझेनि नांवे आपण । करिता होय ग्रंथनिरुपण । तेथे झाडा घ्याया मीपण कैचे आणू ॥४६॥
आता तो कर्ता मी अकर्ता । हेही बोलणे मूर्खता । याही बोला बोलता । जाणता तत्त्वता जनार्दन ॥४७॥
जनार्दन स्वये जाण । स्रष्टा अनुग्रहुनी संपूर्ण । अदृष्य होऊ पाहे आपण । तेचि निरुपण श्रीशुक सांगे ॥४८॥
जो गुह्यज्ञानाचा निजसार । जो आनंदाचा अलंकार । जो योगियांचे परात्पर । तो शुकयोगींद्र स्वये बोले ॥४९॥
तो स्वानंदे ह्नणे परिक्षिती । भगवंते आपुली ज्ञानगती । सांगीतली प्रजापती । अन्वयस्थिती निजबोधे ॥७५०॥
सृष्टीची उत्पत्ती स्थिती शांति । ज्ञान विज्ञान अद्वयभक्ती । आपुले मत यथास्थिती । प्रजापती उपदेशिला ॥५१॥
पितामाता भिन्न दोनी । नसोनी जन्मला नाभिस्थानी । पाहे तू तो आत्मयोनी । अजन्म जनी म्हणती ब्रम्हा ॥५२॥
मोह ममता अहंभावो । नसता भूत भौतिक पहाहो । तेव्हा सृष्टि स्रजी निः संदेहो । यालागी पितामहो ब्रम्हयासी म्हणती ॥५३॥
नाभीं जन्मला निजपोटी । त्यासी सृजावया भूतसृष्टी । देऊनिया निजात्मपुष्टी । पूज्य परमेष्ठी सर्वासी केला ॥५४॥
असुरसुरनर आपण । वंदिती स्रष्टयाचे निजचरण । एवढे देऊनी आत्मज्ञान । अहंकृतिपूर्ण प्रतिष्ठिला ब्रह्मा ॥५५॥
जवळुनी दूर नवचता । चतुर्मुखा सन्मुख असता । नारायणाची निजरुपता । पाहता पाहता अदृश्य होय ॥५६॥
जे घृताची पुरुषाकृती । थिजोनी अभासली होती । ते विघरोनी मागुती । राहे घृती घृतरुपे जेवी ॥५७॥
तेवी स्रष्टयावरीची कृपा पूर्ण । स्वलीला सगुणनारायण । तोचि निर्गुणत्वे महाकारण । आपआपण अदृश्य जहाला ॥५८॥
जेवी जळाचिया गार । क्षणएक भासली साकार । तोचि पाहता आकार । विरोनिया नीर स्वभावे होय ॥५९॥
तेवी श्रीनारायणाची मूर्ती । स्वलीला भासली होती । ते निर्गुंणाचेचिये गती । सहजस्थिती अदृश्य झाली ॥७६०॥
ब्रह्मयापुढुनी नाही गेला । तेथेचि असोनी अदृश्य जाहला । आकार लोपोनी असे उरला । स्वये संचला निर्गुणत्वे तो ॥६१॥
यापरी देव अंतर्धान । स्वये पावला नारायण । त्यालागी ब्रह्मा आपण । सद्भावे पूर्ण नमिता होय ॥६२॥
श्रीनारायण साकारला । तव तो इंद्रिया विषय केला । तोचि इंद्रियातीत जाहला । या नांव पावला अंतर्धांना ॥६३॥
वस्तु असुनी परिपूर्णं । इंद्रिया विषय नव्हे जाण । यानांव सत्य अंतर्धान । सत्य सज्ञान बोलती ऋषि ॥६४॥
इंद्रियाते नव्हे दृष्ट । त्याते ह्नणती गा अदृष्ट । याअर्थी ते पुराणश्रेष्ठ । बोलती पाठ अंतर्धान पै ॥६५॥
एवं हरि पावला अंतर्धान । त्यासी स्वये चतुरानन । बद्धांजळी करी नमन । स्वानंदपूर्ण सम्यसाम्य ॥६६॥
पूर्वी सृष्टि नकरवे ह्नणे । ते सगळी सृष्टि स्वये होणे । बाप सदगुरुचे करणे । अगमा दावणे सुगम करुनी ॥६७॥
न माखता हातपावो । सृष्टिसर्जनी ब्रह्मदेवो । सदगुरुचे कृपेचा नवलावो । आलिप्तपणे पहाहो ब्रह्मांड रचवी ॥६८॥
एवं निर्विकल्प कल्पना । ब्रह्मा करी सृष्टिसर्जना । भृतभौतिकादिगुरुरचना । पूर्णस्थिती जाणा जैशीतैशी ॥६९॥
रचिले चतुर्विध भूतग्राम । चारीवर्ण चारीआश्रम । सुरनरादि अधमोत्तम । अखिलस्वधर्मकर्म विधानोक्त ॥७७०॥
स्रष्टा करी सृष्टिसर्जन । ते आपणाहुनी नदेखे भिन्न । आपणामाजी सृष्टि संपूर्ण । आपण परिपूर्ण सृष्टीमाजी ॥७१॥
ब्रम्हा स्वये सृजी निष्काम । तरी लोकहितार्थ यमनियम । आचरोनी स्वधर्मकर्म । दावी सुगम प्रजांसी विधी ॥७२॥
चतुःश्लोकी भागवत – प्रजापति
ब्रह्मदेवाला प्रजापति का म्हणतात ?
जे प्रजांते सृजू शकती । ऐसियांचे करी हा उत्पत्ती । यालागी ब्रह्मयाते ह्नणती । प्रजापति पति पुराणे ती ॥७३॥
लोक ज्याच्या आज्ञें वर्तती । सर्व लोक ज्याते भजती । यालागी लोकपती ह्नणती । जाण निश्चिती ब्रह्मयाते ॥७४॥
लोकहितार्थ आचरण करणारा म्हणून त्याला धर्मपति असे म्हणतात
स्वधर्मकर्माची व्यत्पुत्ती । स्वधर्मकर्माची स्थितिगति । त्याचेनी वर्ते लोकांप्रती । यालागी धर्मपती ब्रह्मयाते ह्नणिजे ॥७५॥
धर्मकर्मआचारस्थिती । प्रजा आचरुं नेणती । त्यासाठी यमनियमांची युक्ती । धाता आचारी निगुती वेदोक्तविधी ॥७६॥
पोटी नाही कर्मावस्था । अथवा कर्मफळाची आस्था । तरी कर्म आचरे विधाता । लोकसंरक्षणार्थी यमनियम ॥७७॥
निजप्रजांचिया निजस्वार्था । कर्मे आचरोनी दावी धाता । स्वये कर्म करोनि अकर्ता । लोकहितार्था यमनियम करी ॥७८॥
जे जे श्रेष्ठ आचरती । ते ते कर्म इतर करिती । यालागी यमनियम प्रजापती । आचरे अनहंकृती लोकसंग्रहार्थ ॥७९॥
कुलालाचे वोसरे कर्म । पूर्वभ्रमे उरे चक्रभ्रम । तेवी जीवन्मुक्तांचे देहकर्म । होतसे परमस्वभावेपै ॥७८०॥
नदेखोनी सकामावस्था । ब्रह्मा केवळ लोकसंग्रहार्था । सकळलोकहितार्था । होय आचरता स्वधर्मकर्म ॥८१॥
सदगुरु श्रीनारायण । त्याची आज्ञा की हे संपूर्ण । करावे लोकसंरक्षण । यालागी ब्रह्मा जाण यमनियम चाळी ॥८२॥
अनहंकृती स्वधर्मकर्म । ब्रह्मा आचरोनी नित्यनेम । येणे नारदाचा मनोधर्म । उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयी ॥८३॥
चतुःश्लोकी भागवत – नारद
पितृसेवेने नारद ज्ञानी झाले
तो नारद महापवित्र । ब्रम्हयाचा मानसपुत्र । परमार्थालागी तत्पर । सर्वस्वे सादर पितृसेवेसी ॥८४॥
तोचि आर्तीचा पूर्णचंद्र । विवेकाचा क्षीरसमुद्र । वैराग्याचा महारुद्र । आचरे नरेंद्र शमदमयुक्त ॥८५॥
पितृसेवा तोचि स्वार्थ । मानुनी सेवेसी नित्यरत । सदा सेवेचे दृढव्रत । निजपरमार्थ साधावया ॥८६॥
शमे ज्ञानेंद्रिया उपशम । दमे कर्मेद्रिया नित्यकर्म । सेवा करोनी उत्तमोत्तम । नारद परमप्रिय जाहला ॥८७॥
ज्ञानार्थी अतिउद्भट । अंतर्निग्रही एकनिष्ठ । आज्ञाधारी अतिश्रेष्ठ । परमवरिष्ठ सुशीलभावे ॥८८॥
मायानिरसनार्थ नारद ब्रह्मदेवाला उपाय विचारतात
मायानियंते ह्नणती राया त्या शिवादिका मोहिले माया । ते निजमाया निरसावया । नारद उपाया पुसोइच्छित ॥८९॥
माया निरसावया आपण । मायानियंता श्रीनारायण । त्यासी जाणावया संपूर्ण । अनन्यशरण निजजनकासी ॥७९०॥
पितामातागुरुत्वेसी । ब्रह्मा पूज्य नारदासी । सद्भावे सेविता अहर्निशी । अतिउल्हासेंसी तुष्टोनिया ॥९१॥
नारद महाभागवत । भगवंती नित्य निरत । त्यासी ब्रह्मा प्रसन्न होत । निजबोधयुक्त स्वानंदे ॥९२॥
देखोनि नारदाची पूर्ण भक्ती । जाणोनी उत्तमोत्तमस्थिती । स्वानंदे तुष्टला प्रजापती । कृपामूर्ति निजबोधे ॥९३॥
नारदासी तुष्टला पिता । जो सकळ जगाचा प्रपिता । पूर्ण देखोनी प्रसन्नता । जाहला विनविता सप्रेमभावे ॥९४॥
तू नातळोनि मायामोहासी । निजात्मबोधे विश्व सृजिसी । तुज प्रसन्न झाला हषीकेशी । तो प्रसाद आह्मासी कृपेने दीजे ॥९५॥
ऐसे बोलता चालिले स्फुंदन । अश्रुपूर्ण झाले नयन । रोमांचित कंपायमान । सर्वांगी स्वेदकपण टवटवविन्नले ॥९६॥
हर्षे बाष्प दाटले कंठी । पुढारी न बोलवे गोष्टी । ते देखोनिया निजदृष्टी । स्रष्टा निजपोटी निवाला थोर ॥९७॥
यासी पूर्णब्रह्म बोधिता । वचने पावेल परमार्था । होय अधिकारी पुरता । ऐसे विधाता जाणो सरला ॥९८॥
मग नारदासी आपण । सद्भावे दिधले आलिंगन । पुत्रसुखे निवाला पूर्ण । अधिकारीरत्न परमार्थी ॥९९॥
ऐक राया परीक्षिती । जे तुवा पुसिले मजप्रती । तेचि नारदे प्रजापती । निजज्ञानार्थी पुसियेले ॥८००॥
