सर्वांगमनोहर शृंगारव
सर्वांगमनोहर शृंगारवनांतील लक्ष्मीची हरिसेवा
शृंगारवाटिकेमाजी डोल्हारा । लावूनीया सुवर्णसूत्रा । लक्ष्मी निजभावे निजवरा । नानोपचारा सप्रेम भजे ॥२००॥
शृंगारवाटिकेचे वन । वसंते शृंगारिले संपूर्ण । पराग उधळती पुष्पांतोन । सुवासित पूर्ण वन झाले ॥१॥
मृगमद अत्यंत शीतळ । ढाळी झळके मलयानीळ । पंचम कूजती कोकिळ । झंकारे अळिकुळ भ्रमती तेथें ॥२॥
कुंकुमकेशरकस्तूरीरोळा । एकवटपणे कर्दम केला । सुगंध चंदन उधळला । नाना सुमनमाळा सुवासित ते ॥३॥
चंद्रकांतीचे शीतळ नीर । शुद्ध सुमनांचे विचित्र हार । हंस त्राहाटिले शेजार. । त्यावरी अरुवार शतपत्राचे ॥४॥
ऐसी देखोनी शज मनोहर । संतोषोनी पहुडला श्रीधर तेथे डोल्हारियाचा दोर । अंतः स्थिर हालवी रमा ॥५॥
येथे हरिगुणचरित्र । शुक बोलती विचित्र । हरिखे कूजताती मयूर । जेवी कवीश्वर गर्जती नामे ॥६॥
कोकिळाचे पंचमस्वर । जैसे सामगायन गंभीर । मधुर भ्रमरांचे झणत्कार । सारंगधरगुण वर्णिती पै ॥७॥
चतुःश्लोकी भागवत – हरिगुणसंकीर्तन
ऐसे ऐकता हरिगुण । रमा झाली स्वानंदे पूर्ण । तेही संतोषोनी आपण । अगाध त्याचे गुण गाऊ लागली ॥८॥
ऐकता हरिनामगुणकीर्ति । ज्यासी उल्हास नुपजे चित्ती । तो परम अभाग्य त्रिजगती । जाण परीक्षिती निश्चित तू ॥९॥
मी हरीचे निजअर्धांग । ह्नणे परी नदेखे अंगसंग । सांग नाही ह्नणती श्रीरंग ॥ व्यापुनी सर्वांगे वर्तवीमते ॥१०॥
माझे लावण्यसमर्थपण गुण । रमा आणि रमारमण । अवघे श्रीहरिनारायण । माझे व्रते मीपण तयाचेनी ॥११॥
त्याते मी मानी आपुला कांत । तव मीपण नुरे त्याआंत । मज सबाह्य श्रीभगवंत । असे वर्तत निजानंदे तो ॥१२॥
आता त्याची कीर्ति गावी कैसी । तव वाच्य वाचक हषीकेशी । यास्थिती करिता कीर्तनासी । कीर्तिवंतासी निजलाभ होय ॥१३॥
देवा तू सर्वभूतनिवासी । ह्नणता भूतमात्रा नातळासी । भूते भूतात्मा तूच होसी । नमो हषीकेशी परमात्मया ॥१४॥
चतुःश्लोकी भागवत – श्रीविष्णूची स्तुति
नमो आदिपुरुषा अव्यक्ता । सच्चिदानंदा गुणातीता । विश्वात्मका सदोदिता । नमो अच्युता अव्यया तुज ॥१५॥
तू योगीजना अगोचर । वेदशास्त्रा नकळे पार । भक्तजनासी प्रियकर । दिधला चरणादर निजसेवे त्वां ॥१६॥
हरिचरणसेवेपरता । ठाव नाही परमार्था । मिथ्या मोक्षसायुज्यता । ह्नणती लाता हरिभक्त पै ॥१७॥
हाती जोडल्या हरिचरण । भक्ता नाही जन्ममरण । यापरता परमार्थ कोण । अभाग्य जन नमानिती हे ॥१८॥
थिजले विघरले तूप देख । तैसे सगुणनिर्गुंण दोन्ही एक । हे स्वये जाणती हरिसेवक । नेणती नास्तिक वेदबाह्य जे ॥१९॥
सर्वाभूती वासुदेव । स्वतः सिद्ध असता स्वयमेवः हा भेदवाद्या नुपजे भाव । हदयस्थ देव दुणाविला स्वये ॥२०॥
भेदवादी अभेदवादी । वंदी अथवा जो का निंदी । तो भगवद्रूपचि त्रिशुद्धी । हे सवेचि विधी अनन्यभक्ता ॥२१॥
भावे हरिभक्ति करिता । भेदी प्रकटे अभेदता । भक्तांसी नित्यमुक्तता । भावे भजता हरिचरणी ॥२२॥
ज्ञानाभ्यासी विषय त्यागिती । त्यागिती ते अतिदुःख पावती । भक्त विषय भगवंती अर्पिती । तेव्हाचि ते होती नित्यमुक्त ॥२३॥
ऐसे उल्हासे रमा बोले पूर्ण । माझा सदगुरु स्वये नारायण त्याचे सेविता सदभावे चरण । स्वये ब्रह्मज्ञान पाया लागे ॥२४॥
यापरी रमा आपण । आनंदे गाय हरीचे गुण । हेही करावया गुणवर्णन । तो रमारमण वाचा वदवी ॥२५॥
सांडूनिया अहंमती । रमा करी साकारस्तुती । देव संतोषला निजात्मस्थिती । यालागी श्रीपती बोलिजे त्याते ॥२६॥
श्रियेची जे निजस्थिती । तिसी चाळविता निजात्मशक्ती । यालागी त्याते श्रीपती । वेदशास्त्रार्थी बोलिजे ॥२७॥
न भागता भक्तांची आर्ती । निवारी निजांगे कृपामूर्ती । यालागी त्याते सात्वतपती । सज्ञान बोलती सदभावे पा ॥२८॥
याज्ञिक यागहोम करिता । कल्पनेसारिखे फळदाता । यालागी यज्ञपति तत्त्वता । होय बोलता श्रीव्यास ॥२९॥
जग सृजुनी प्रतिपाळिता । शेखी उदरी सामाविता । एवढी सत्ता श्रीभगवंता । यालागी तत्त्वता जगत्पती होय ॥३०॥
ऐसा भक्तपती श्रीपती । यज्ञपति आणि जगत्पती । भक्तांसमान वैकुंठपती । देखे प्रजापती टवकारला ॥३१॥
मागे बोलिले भगवदभक्त । जे भजनभावे नित्यमुक्त । ते हरिलागी प्रिय सात्वत । ब्रह्मा देखत पार्षदगण ॥३२॥
चतुःश्लोकी भागवत – पार्षदगण
वैकुंठीचे मुख्य पार्षदगण
वैकुंठी हरिभक्त पूर्ण । ब्रह्मा देखताहे आपण । त्यांची नांवे सांगूंशकेकोण । मुख्य पार्षदगण ते ऐका ॥३३॥
नंद सुनंद मुख्यत्वे पूर्ण । बल आणि प्रबलार्हण । धाता विधाता निकटधन जय विजय जाण द्वारपाळ ॥३४॥
चंड प्रचंड सुशीळ । भद्र सुभद्र पुण्यशीळ । कुमुद कुमुदाक्ष सकळ । हा पार्षदमेळ श्रीहरीचा ॥३५॥
इही पार्षदगणांसमवेत । ब्रह्मा देखे श्रीभगवंत । त्याते भजता निजभक्त । स्वानंदयुक्त सर्वदा तो ॥३६॥
सप्रेम सभ्दावी सात्विक । त्यासी सदा हरी सन्मुख । तुष्टला होय प्राङ्मुख । निजानंदे सुख सर्वदा देत ॥३७॥
हरिदर्शनाचा महिमा
ज्याचे दर्शन स्वये गोड । विसरवी अमृताची चाड । पहातयाचे पुरे कोड । दृष्टि होय गोड देखणेपणे ॥३८॥
त्या निजभक्तांचे ठायी । नाममात्र स्मरता देही । मृत्यु रिघो नशकेकाही । अमृतरुप पाही यापरी भक्त ॥३९॥
ज्याचे नाम निवारी जन्ममरण । त्याचे भाग्ये झालिया दर्शन । भक्तांसी तो सुप्रसन्न । प्रसन्नवदन गोविंद पै ॥४०॥
आकर्णविशाळनयन । दोही प्रांती आरक्त पूर्ण । यालागी तो अरुणलोचन । स्वये चतुरानन हरि देखे ॥४१॥
ब्रह्मदेवाला भगवंत कसा दिसला ?
मागुतेनी तो कैसा भगवंत । निजभाग्ये विधाता देखत । माथा मुकुट रत्नखंचित । सुमनी संयुक्त कबरीबंध पै ॥४२॥
चतुर्भुज घनसावळा । मकरकुंडले कौस्तुभ गळा । वैजयंती वक्षः स्थळा । आपाद वनमाळा रुळत ॥४३॥
विजू शरण आली हरीसी । अस्ता जाणे खुंटले तीसी । तैसा पीतांबर कासेसी । दिव्यतेजेसी तळपतसे ॥४४॥
नाभी आवर्तला आनंद । परमानंदे वाढले दोंद । सर्वांगे सच्चिदानंद । स्वानंदकंद शोभतसे ॥४५॥
पाहता हरीची करतळे । संध्याराग लाजिन्नला पळे । अधर आरक्तपोवळे । सुकुमार रातोत्पळे तैसे चरण ॥४६॥
चरणी तोडर गर्जती देखा । ध्वजवज्रामकुशऊर्ध्वरेखा । पाहता पायींच्या सामुद्निका । सनकादिका आनंद बहु ॥४७॥
पडता पायींच्या पायवण्यासी । शंकर वोढवी मस्तकासी । तेणे शिवत्व आले त्यासी । अद्यापि शिरी वाहतसे ॥४८॥
त्याचिये वक्षः स्थळी वामा । वामांगी बैसलीसे रमा । तिच्या भाग्याची थोर सीमा । नवर्णवे महिमा श्रुतिशास्त्रा ॥४९॥
रमा बैसताचि अर्धांगी । तिच्या निजशक्ति अनेगी । उभ्या तिष्ठती निजविभागी । आज्ञाविनियोगी अधिकार त्या ॥५०॥
चतुःश्लोकी भागवत – सृष्टीची निर्मिती
अशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचे कार्य कसे चालते ते ब्रह्मदेवाला दिसले
श्रेष्ठ सिद्धासनी आरोहण । रमासमवेत रमारमण । तेथे सृष्टीचे कार्यकारण । ब्रह्मा आपण स्वये देखे ॥५१॥
करावया सृष्टिसर्जन । ब्रह्मा पुढे देखे नारायण । सृष्टीचे कार्यकारण । आपुले आपण निजशक्ति दावी ॥५२॥
चारी पांच आणि सोळा । ऐसा पंचविसांचा मेळा । आज्ञाधारक हरिजवळा । विधाता डोळा स्वये देखे ॥५३॥
त्यांची शक्ति कोण कोण । कोण कार्य कोण कारण । कैसे कैसे त्यांचे लक्षण । नामाभिधान ते ऐका ॥५४॥
प्रकृति पुरुषमहदहंकार । हा चतुः शक्तींचा प्रकार । पंचशक्तींचाहि विचार । जाण साचार महाभूते ॥५५॥
ज्ञानकर्मेद्रियांचे लक्षण । अकरावे गणिजे पै मन । पंचतन्मात्रा विषय जाण । यापरी संपूर्ण षोडशशक्ती ॥५६॥
या पंचविसांच्या पोटी । ब्रह्मांडेसी उठिजे सृष्टी । त्याहि माजी त्रिगुणत्रिपुटी । अतर्क्य दृष्टी विधाता देखे ॥५७॥
भगवंत हा षडगुणयुक्त असल्याने त्याच्या भक्तांनाहि षड्गुणांची प्राप्ति होते
षड्गुणभाग्ये भाग्यवंत । यालागी बोलिजे भगवंत । ज्ञानवैराग्य ऐश्वर्यवंत । यशश्रीमंत औदार्यैसी ॥५८॥
हे साही गुण भगवंती । सहज स्वाभाविक असती । योगाने करिता भगवदभक्ती । षड्गुणप्राप्ती तत्प्रसादे पै ॥५९॥
सहज षड्गुण भगवंती । योगिया आगंतुक प्राप्ती । भक्तांते भगवंत ह्नणती । जाण निश्चित्ती या हेतू ॥६०॥
पावोनी षड्गुणप्राप्ती । भक्तांते भगवंत ह्नणती । ऐके तयांची नामकीती । संक्षिप्तस्थिती सांगेन तुज ॥६१॥
वसिष्ठ वामदेव नारद । व्यास वाल्मीक प्रल्हाद । शुक षड्गुणी प्रसिद्ध । इत्यादि अनुवाद भगवद्रूप पै ॥६२॥
अगाध हरीचे उदारपण । दासा देऊनिया षड्गुण । भगवद्रूपी परिपूर्ण । त्यासी भिन्नपणे न देखे स्वये ॥६३॥
देउनी षड्गुणसंपत्ती । भक्त भगवद्रूप होती । त्यांची उरोंनेदो भिन्न वृत्ती । चिदात्मस्थिती निजबोधे ॥६४॥
औदार्यसिंधु भगवंत
नवल सामर्थ्यांचे औदार्य । आपणासगटं दे षड्गुणैश्वर्य । अभिन्नज्ञाने तेजवीर्य । परात्परवर्य महामहिमा ॥६५॥
मर्दुंनी भक्तांचा जीवकण । भेद निरसुनी दे षड्गुण । स्वये स्वरुपी रमारमण । स्वानंदमयपूर्ण परमात्मा ॥६६॥
अशा षड्गुणैश्वर्यसंपन्न नारायणाच्या दर्शनाने ब्रह्मदेव आत्मानंदी रममाण झाला
यापरी श्रीनारायण । आनंदविग्रही चिदघन । त्याते देखोनि चतुरानन । विस्मये पूर्ण जाहला असे ॥६७॥
घवकरी देखिला हषीकेशी । घवकरी सत्त्व दाटले त्यासी । प्रेम नसांवरे ब्रह्मयासी । सुखोमींसी विव्हळ होत ॥६८॥
घवघवीत शामसुंदर । देखता मनी मना विसर । चढिला सुखाचा महापूर । त्यामाजी संसार बुडो पाहे ॥६९॥
चित्त चिंतेसी विसरले । अहंसोहं एक जाहले । बुद्धिबोधा खेंव पडिले । भरिते दाटले सत्वाचे त्या ॥७०॥
निजात्मज्योती लखलखिली । तेणे हरिखे जीवदशा लाजिली । देही देहत्वाची स्फूर्ति गेली । विषयाची झाली पाहाट तेथे ॥७१॥
मोडिले त्रिपुटीचे विंदान । मावळोंलागे विकारभगण । जीवाशिवा होऊ पाहे लग्न । मधुपर्क विधान शुद्धसत्वे केले ॥७२॥
गुरुकृपा अरुणोदय होत । अज्ञानअंधावर जाय तेथ ॥ इंद्रिये विषयी नियुक्त । ती उठू पाहत निजबोधे ॥७३॥
कंठी अतिबाष्प दाटला । तेणे शब्दव्यवहार खुंटला । गदगदोनीरोमांचीत जाहला । सर्वांगी चालिला स्वेद कंप ॥७४॥
अंतरी हर्ष कोंदाटोनी । आनंदाश्रु लोटले नयनी । स्फुदे सुखोर्मीच्या स्फुंदनी । हर्षे विव्हळोनी विधाता पै ॥७५॥
ते सत्त्वावस्था आवरोन । अंगीचा स्वेद परिमार्जूंन । ब्रह्मा सावधान होऊन । वंदी श्रीचरण नारायणाचे ॥७६॥
चतुःश्लोकी भागवत – नारायणाला नमन
अहंकारशून्य ब्रह्मदेवाचे नारायणाला नमन
जी परहंसप्रांजळे । योगवैराग्यज्ञानबळे । पाविजेती हरीची पादयुगुळे । ती चरणकमळे वंदिली भावे ॥७७॥
जे वेदविवेकव्युत्पत्ती । जाणोनी सदभावे भक्ति करिती । ते भगवच्चरण पावती । ते प्रजापती वंदिता झाला ॥७८॥
हरिचरणद्वंद्वयुगुळे । वंदितांची भावबळे । निर्द्वंद्व करिती तात्काळे । ती चरणकमळे वंदिली ॥७९॥
हरिचरणपदद्वंद्व । वंदिता करी निर्द्वंद्व । यालागी स्रष्टा स्वानंद । भगवत्पद स्वये वंदी ॥८०॥
भावे वंदिता हरिचरण । जगाचा स्रष्टा झाला आपण । नकरवे ह्नणे सृष्टिसर्जंन । त्या जगाचे दर्शन विधाता देखे ॥८१॥
न रचिता भूतभौतिककोटी । स्रष्टा देखे सकळ सृष्टी । यालागी विश्वदृकदृष्टी । ब्रह्मयाची नामाटी सत्यत्वा आली ॥८२॥
करिता हरिचरणी नमन । विश्वद्रष्टा झाला आपण । विश्वदृक नामाभिधान । ब्रह्मयासी जाण याहेतू ॥८३॥
ब्रह्मा सद्भावे आपण । साष्टांग घाली लोटांगण । तो भाव देखोनी नारायण । स्वानंदे पूर्ण संतुष्टला ॥८४॥
ब्रह्मदेवाची पूर्णावस्था पाहून नारायणाचे त्याला आश्वासन
येऊनी ब्रह्मयाजवळी । कृपे अवलोकी वनमाळी । संतुष्ट होउनी त्याकाळी । ह्नणे याची झाली परिपक्वदशा ॥८५॥
एवं करावया सृष्टिसर्जन । स्रष्टयासी स्वाधिकारी पूर्ण । स्थापावया श्रीनारायण । आइका निजाश्वासन बोले ते ॥८६॥
भगवंताची वाणी म्हणजे दिव्यामृतधाराच ती !
ब्रह्मयाच्या प्रीती पावला । प्रियवंतापरिस प्रिय मानला । प्रीतीकरुनि करी धरिला । प्रियकर झाला परमेष्ठी ॥८७॥
जो शब्द बोलिला निःशद्वाचा । वाचिक विश्वतोमुखाचा । ज्याचेनी प्रकाशती चारी वाचा । तो वेदवाचा बोलता झाला ॥८८॥
तो शब्दांचे निजजीवन । ज्याचेनी वाचा दैदीप्यमान । तो स्वये होऊनि भगवान । हास्यवदन करुनि बोलत ॥८९॥
श्रीभगवानुवाच
लहरी लोटली चित्सागरा । आनंदाचा सुटला झरा । सुख मेध गर्जे गंभीरगिरा । ऐशिया वरा रमाधव बोले ॥२९०॥
परमानंदाची आली भरणी । निजसुखाची उघडली खाणी । तेवी मृदुमंजुळमधुरवाणी । सारंगपाणी बोलतसे ॥९१॥
तो स्वमुखे ह्नणे ब्रह्मयासी । सृष्टिसर्जनसामर्थ्यासी । तप केले माझे आज्ञेसी । तेणे मी संतोषी बहुत झालो ॥९२॥
जेवी का निजबाळ तान्हे । नाचोंलागे मातेच्यानी वचने । ते देखोनिया पा नाचणे । सुखावे मने माउली जैशी ॥९३॥
तेवी ‘ तप " माझे वचन । ऐकोनी केले अनुष्ठान । तेणे अनुष्ठाने मी आपण । जाणिजे संपूर्ण संतोषलो ॥९४॥
जो मी तुझेनी तर्पे संतोषलो । प्रत्यक्ष तुजसी भेटलो । तो मी हदयस्थ दूर केलो । दुः प्राप्य जाहलो कूटयोगिया ॥९५॥
माझी प्राप्ति कोणाला होत नाही ?
जे विषय कल्पूनि चित्ती । नाना तपे आचरती । त्यासी नव्हे माझी प्राप्ती । जाण निश्चिती कूटयोगी ते ॥९६॥
ज्या कनककांता आवडे चित्ती । ज्यांसी लोकेषणेची आसक्ती । त्यासी नव्हे माझी प्राप्ती । ते जाण निश्चिती कूटयोगी ॥९७॥
जो जग मानी अज्ञान । तेथे मी एकचि सज्ञान । तो कूट योगी संपूर्ण । कल्पांताही जाण नपवे माते ॥९८॥
कूटऐसे देहाते ह्नणती । त्या देहाची ज्या आसक्ती । त्यासी कदा नव्हे माझी प्राप्ती । ते जाण निश्चिती कूटयोगी ॥९९॥
चतुःश्लोकी भागवत – ब्रह्मदेवाला वर
नारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त
ऐसी कूटयोगियांची स्थिती । देव सांगतसे प्रजापती । तपे तुष्टला लक्ष्मीपती । होत वरदमूर्ती विधातया ॥३००॥
संतोषे श्रीनारायण । ब्रह्मयासी ह्नने आपण । जे अभीष्ट वांछी तुझे मन । तो वर संपूर्ण माग वेगी ॥१॥
वरांमाजी वरिष्ठ । तुज जो वाटेल श्रेष्ठ । मागता अतिउत्कृष्ट । तोही उदभट वर देईन मी ॥२॥
नाममहिमा
तवचि प्राणी पावती श्रम । तवचि देखती द्वंद्वविषम । तवचि भोगिती मरणजन्म । जव श्रद्धे हरिनाम नये वाचे ॥३॥
तवचि द्वंद्वद्वेषखोडी । तवचि विषयाची गोडी । तवचि पापाची तया कोडी । जव नाम अवघडी नये वाचे ॥४॥
तवचि भवभय लागे पाठी । तवचि मदमोह महाहटी । तवचि अविद्या हे लाठी । जव माते निजदृष्टि देखिले नाही ॥५॥
तवचि कामक्रोधाची गोष्टी । तवचि कल्पना नांदे पोटी । तवचि अहंतेची दृढ गाठी । जव माते दृष्टी देखिले नाही ॥६॥
सकळ आश्रमांची अवधी । प्राणियास दर्शनसिद्धि । मज देखिलिया त्रिशुद्धी । आ धव्याधि बांधू नशके॥७॥
माझे नाम नाशी दुःखकोटी । त्या मज देखिलिया निजदृष्टी । संसार पळे उठाउठी । आश्रमाची गोष्ट उरे कोठे ॥८॥
नारायण उवाच
तुझिया परमहिताकारणे । माझी इच्छा वैकुंठ दावणे । यालागी म्या तुजकारणे । एकांती सांगे जाणे तई दीक्षा ॥९॥
परी त्या तपाचे तपासधन । भले केले तुवा अनुष्ठान । यालाग्री मी जाहलो प्रसन्न । वैकुंठदर्शन तुज देऊनी ॥३१०॥
कर्तव्याचे निजःकारण । तुज नकरवे सृष्टिसर्जन । त्या काळी म्या आपण । तप तप जाण उपदेशिले ॥११॥
नकरवे सृष्टिसर्जन । कर्मनोहे तू अतिअज्ञान । तेव्हाचि म्या कृपपेने तप तप संपूर्ण उपदेशिले ॥१२॥
चतुःश्लोकी भागवत – तपस्सामर्थ्य
तपस्सामर्थ्य
त्या तपाची जाण महादीप्ती । तपामाजी परमशक्ती । तपे उपजे ज्ञानस्थिती । जाण निश्चिती विधात्या ॥१३॥
साधुनी अंतरंग तप । तपे पूर्णज्ञानस्वरुप । तपे होइजे सद्रूप । तपे निष्पाप झालासी तू ॥१४॥
अस्तित्व निश्चये पूर्ण । नित्य वाहे अंतः करण । यानांव गा तप जाण । शरीरशोषण नव्हे तप ॥१५॥
यापरी तप ज्ञानस्वरुप । ऐके त्या तपाचा प्रताप । तपोबळे मी चिद्रुप । सृष्टी अमूप घडी मोडी ॥१६॥
ज्ञानतपाची पाहा थोरी । तेणे तपेम मी श्रीहरी । सृष्टि सृजी पाळी संहारी । अंगींच्या अंगावरी अलिप्तणे ॥१७॥
ऐसे तपाचे वीर्य पूर्ण । नेणती देहाभिमान । यालागी त्यासी तपाचरण । दुस्तर जाण परमेष्ठी ॥१८॥
ज्यासी विषयवासना संताप । त्यानी नकळे तपाचे निजरुप । ते तू आचरोनिया तप । होऊनि माते आप पावलासी पै ॥१९॥
ऐसे बोलिला नारायण । तेणे हरिखला चतुरानन । पाहोनिया हरीचे वंदन । काय आपण बोलत ॥३२०॥
ब्रह्मोवाच
ब्रह्मदेवाकडून नारायणस्तुति व निजज्ञानप्राप्तीची अपेक्षा
तू सर्वभूता अधिष्ठान् । भूतहदयस्थ सज्ञान । तुझेंनि बुद्धीसी जाणपण । तुझेंनि चेतन इंद्रियवर्ग ॥२१॥
तू कर्माक्षक्ष तत्त्वता । तेथे तूचि कर्ता करविता । तरी ऐके माझी अवस्था । तुज मी अच्युता सांगेन ॥२२॥
ऐसा स्वामी विश्वनाथ । तू अनाथांचा निजनाथ । मज करावे जी सनाथ । ऐसे प्रार्थित उचपतप्यमान ॥२३॥
का ह्नणसी उपतप्यमान । मी केवळ जाहलो अज्ञान । त्या मजवरी कृपा करुन । निजगुहयज्ञान सांगावे पै ॥२४॥
कोणते ह्नणसी गुहयज्ञान । तुझे सूक्ष्मस्वरुप निर्गुंण । आणि स्थूल तेही तूचि आपण । हे अभेद निजज्ञान सांगिजे मज ॥२५॥
मी जडमूढ अतिदिन । तुझे नाम हे दीनोद्धरण । माझे समूळ निरसे अज्ञान । ऐसे गुहयज्ञान उपदेशी ॥२६॥
स्थूलसूक्ष्म तुझेचि रुप । रुपी वतोंनी तू अरुप । हे तुझे ज्ञान निर्विकल्प । कृपानुरुप मज सांगे ॥२७॥
तू चिन्मात्र मायायोगे । नहोऊनि जग होसी अंगे । ब्रह्मा विष्णु रुद्रादि वेगे । रुपे अनेगे तू धरिसी ॥२८॥
नमोडता सोनेपण । जेवी लेणे होय सुवर्ण । तेवी सोडुनी पूर्णपण । जग संपूर्ण तू होसी ॥२९॥
आपआपणावरी पाहे । उत्पत्ति स्थिती दाविसी लय । हे नानाशक्तिसमृदाय । सद्रॄपे स्वये तूचि होसी ॥३३०॥
ऐसे अलिप्तपणे क्रीडन । स्वये क्रीडसी तू आपण । त्या क्रीडनाचे लक्षण । ऐक सावधान दृष्टांते येणे ॥३१॥
सकळसंकल्प तुझ्या पोटी । तुज जव सृष्टीची इच्छा उठी । तव ब्रह्मांडांचिया कोटी । चराचर दाटी स्वेच्छें दाटे ॥३२॥
ऐसे संकल्पितसृष्टीसी । भूतभौतिके तूचि होसी । नानाअवताचरित्रेंसी । तुजमाजी क्रीडसी तूचि देवा ॥३३॥
जैसी कांतणी स्वेच्छेकरी । तंतु काढी मुखाबाहेरी । त्यावरीच स्वये क्रीडा करी । परतोनी निजउदरी सामावी ते ॥३४॥
तये कांतणीपरी ऐसी । तुझी क्रिया हषीकेशी । कल्पादि खेळ हा मांडिसी । खेळोनी ग्रासिसी कल्पांती तू ॥३५॥
हात नमाखोनी विश्व रचिसी । अमायिकत्वे विश्व पाळिसी । ना नासिता हे सहारिसी । ऐसा होसी सत्संकल्प तू ॥३६॥
ऐसा गुह्यज्ञाननिजठेवा । कृपा करुनिया मज द्यावा । येच विषयी हो माधवा । मज करावा पूर्णानुग्रह ॥३७॥
वर मागावया आज्ञा दिधली । यालागी हे सलगी केली । सत्य करावी ते वरदबोली । सांभाळी आपुली भाक स्वामी ॥३८॥
मूळी वरं वरय भद्रं ते । ऐसे बोलिले वर दहस्ते । ते सत्य करावे श्रीअनंते । गौरवी माते निजगुह्यज्ञाते ॥३९॥
वरदेश वदोनी जरी नदेसी । तरी काय करावे हषीकेशी । समर्थी वळावे निजभाकेसी । हेचि आह्मांसी भांडवल पा ॥३४०॥
तू सत्यसंकल्प भगवंत । तुझे वाक्य मिथ्या नव्हे येथ । येणे गुणे भावार्थ निश्चित । गुह्यज्ञानार्थ आह्मा सांगे ॥४१॥
भगवंता तू ऐसे ह्नणसी । म्या सृजू सांगितले सृष्टीसी । ते करु काय भ्यालासी । यालागी पुससी तत्त्वज्ञान ॥४२॥
किंवा सृष्टी सृजू उद्वेगला । यालागी गुह्यज्ञान पुसोंलागला । ह्नणसि आज्ञाउल्लंघू केला । येणे नसांडिला सृष्टिक्रम पै ॥४३॥
तुवा सृष्टी सृजू सांगीतली । ते अनालस्ये मी रचियेली । परी निर्विघ्न पाहिजे निपजली । यालागी वांछिली ज्ञानकृपा तुझी ॥४४॥
की देवा तू ऐसे मानिसी । सृष्टी करीन ते ह्नणसी । आणि पुनः पुन्हा का पुससी । गुह्यज्ञानांसी अत्यादर ॥४५॥
निजज्ञानामुळे देहाभिमान होणार नाही.
तुझे पावोनी गुह्यज्ञान । सृष्टी रचीन मी निर्विघ्न । नपावता तुझे ज्ञान पूर्ण । मानाभिमान मज बाधी ॥४६॥
तू जवळी असता नारायण । बाधू नशकेमानाभिमान । सृष्टी सृजता तुज विसरेन । तेव्हा मानाभिमान बाधी की ॥४७॥
ह्नणसि का होईल विस्मरण । अतर्क्य तुझे मायाविंदान । ते वाढवील देहाभिमान । तुझी आठवण नुरवुनी पै ॥४८॥
जैसी दीपासी काजळी । तैसी तुझी माया तुजजवळी देहाभिमाने सदा सकळी । मजही झाकोळी विषयासक्ती ॥४९॥
जे विषयाची अतिआसक्ती । तेचि मायेची दृढप्राप्ती । ते समूळ निरसे विषयासक्ती । ऐसी ज्ञानस्थिती उपदेशी ॥३५०॥
काजळी आली दीपापासी । तेचि आलेपन दीपप्रकाशी । तेवी त्वन्माया तुजपासी । बांधी जगासी विषयासक्ती ॥५१॥
आताचि मी स्वये आपण । झालो होतो जडमूढदीन । तुवा उपदेशिले तपसाधन । तेव्हा तुझे दर्शन मज जाहले ॥५२॥
‘ तपतप " ह्नणतांही मजपासी । त्या तुज न देखे मी हषीकेशी । अभिमाने भुलविली ऐसी । तुज हदयस्थासी न देखती ॥५३॥
ऐसा बाधक देहाभिमान । तो मायायोगे सबळ पूर्ण । ते मायेचे होय निर्दाळण । तैसे गुह्यज्ञान मज सांगे ॥५४॥
कर्माकर्मी तुझे स्मरण । असावे गा समसमान । करिता सृष्टिसर्जन । नबाधी अभिमान तेचि सांगे ॥५५॥
अहंमद का होईल म्हणसी । तुवा मज अहंकारियासी । सखा मानोनि सख्यासी । ऐसिये स्थितीसी आणिले त्वां ॥५६॥
म्या प्रजासृष्टि करावी । तेथे माझी श्रद्धा रिघावी । यालागी केली स्वभावी । निजगौरवी मानेल पै ॥५७॥
ऐसियावरी सृष्टि करिता । अहं स्वतंत्र प्रजा करिता । ऐसी माझे उत्कट अहंता । अंगी तत्त्वता वाढेल की ॥५८॥
श्रेष्ठापासुनी सन्मान । तोचि इतरासी हदयाभिमान । तेणे धाके कांपले मन । तुज गुह्यज्ञान यालागींख पुसे ॥५९॥
तुझे आज्ञे उल्लंध नघडावा । यालागी सृष्टिक्रम म्या सृजावा । तोचि मानिता तुझी सेवा । अभिमान नीचनवा मजमाजी उठी ॥३६०॥
अभिमान यावयाचे काय कारण । सृजिता अधमोत्तमयोनीजन । मी सृष्टिकरिता तुजसमानं । अवश्य अभिमान येईल स्वामी ॥६१॥
वृत्ति करुनिया अविकळ । सृजिता भूतजात सकळ । तोचि अभिमानाचा जन्मकाळ । हे मज समूळ कळे देवा ॥६२॥
तो अभिमान मज न यावा । यालागी प्रार्थितसे तुज देवा । आश्वासी पा ज्ञानगौरवा । श्रीवासुदेवा निजजनका ॥६३॥
स्तुतीने नारायण संतुष्ट झाला
ऐकोनी ब्रह्मयाची विनवण । परम संतोषला नारायण । त्यासी द्यावया निजज्ञान । स्वानंदपूर्ण तुष्टला असे ॥६४॥
कोण्हाचे न लागता मन । अनुष्ठित गुह्यज्ञान । ते द्यावया श्रीनारायण । स्वानंदे पूर्ण संतुष्टला ॥६५॥
करिता नानाकर्माचरण । निजांगी नलागे कर्तेपण । ऐसे अलिप्तनिजज्ञान । द्यावया श्रीनारायण संतुष्टला ॥६६॥
देखोनी तेव्हा ब्रह्मयासी । अतिस्नेह भगवंतासी । निजज्ञानधन देतसे त्यासी । जन्मला कुशी ह्नणवूनिया ॥६७॥
जैसा दिपला हरिणा पुढे । पाहोंविसरला आणिकेकडे । तैसा आवडीच्यानि पडिपाडे । ब्रह्मयाकडे हरि पाहे ॥६८॥
का चुंबकांचिया वाटा । लोह भंवे न लागता झटा । तैसे झाले हो वैकुंठा । जिकडे पाहे स्रष्टा तिकडे देव ॥६९॥
जेवी आदित्याची फुलझाडे । नित्य सन्मुख सूर्याकडे । तेवी आवडीचेनि पडिपाडे । चतुर्मुखापुढे सन्मुख देखे ॥३७०॥
उफराटी हे चाली कैशी । शौरी भुलला श्रष्टयासी । येणे आवडलेपणे त्यासी । गुह्यज्ञानासी सांगेल पा ॥७१॥
सांगावया त्या गुह्यज्ञानवाव । स्वये तुष्टला श्रीवासुदेव । येणे विरिंचीचा जीवभाव । स्वये स्वयमेव चमत्काराला ॥७२॥
पुढिले निरोपणी आवडी । स्रष्टा उठिला धडफुडी । अवधानाची परवडी । निजनिवाडी थोरावली पै ॥७३॥
देहावेगळे अंतः करण । करुनि निवडिले अवधान । श्रवणी एकाग्रता पूर्ण । स्वये संपूर्ण सरसावला ॥७४॥
अष्ठदळे जैसी कमळे । तैसे टवकारिले आठही डोळे । चारीमुखे एकेवेळे । सप्रेममेळे लांचावली ॥७५॥
श्रीगुरुश्रीहरी तुष्टमान । देखोनि उठावले ते नयन । श्रवणापूर्वी आपण । दृश्यभेदाविण निजज्ञान सेवू ॥७६॥
श्रवणी ऐसे ते शुभाक्षर । आह्मीच सेऊ साचार । ऐसा दृष्टीचा चमत्कार । देखणेपणे द्वार श्रवणाचे व्यापी ॥७७॥
घ्राण म्हणे मी सवेगे । सुगंधवृत्तीसी धावेन वेगे । श्रवणनयनांपुढे लगबगे । उभे स्वानंदयोगे सुखेसी पै ॥७८॥
ऐकोनी सदगुरुच्या गुह्यज्ञाना । रसना विसरे विषयवासना । न चाखता सदगुरुह्यज्ञाना । ब्रह्मरस रसना सेवं द्यावे ॥७९॥
स्पर्श पांगला शरीरपांगे । देहबुद्धीसी घालूनि मागे । स्पर्शावया लागवेगे । मी रिघेन सर्वांगे श्रीरंगसंगी ॥३८०॥
धन्य धन्य श्रीगुरुसप्रेमज्ञान । बाहयांसी येतसे स्फुरण । खेंव द्यावया आपण । भुजाहि सच्चिद्धन आलिंगू पाहती ॥८१॥
ऐसा इंद्रियाचा विवाद । ऐकोनि शब्द जाहला निःशब्द । मौने सेवावया परमानंद । हरिनामाचा छंद सर्वांगी गर्जे ॥८२॥
ऐसा सर्वांगी परिपुरता । सर्वांगे जाहला धडौता । यापरी देखोनि विधाता । कळले भगवंता परमार्थी ॥८३॥
श्रवणी जे पडेल वचन । ते तत्काळचि होईल आपण । यालागी निजगुह्यज्ञान । श्रीनारायण उपदेशी ॥८४॥
चतुःश्लोकी भागवत – ज्ञानाची व्याख्या
ज्ञान देण्याला अधिकारी कोण
ऐसा पुरता जो असेल । त्यासि सदगुरुज्ञान गवसेल । येर्हवी आहाच बोलता बोल । वाचेचे फोल करावे नलगे ॥८५॥
यालागी श्रद्धाळू सात्विक । गुरुसेवेचा नीच सेवक । गुरु आज्ञेचा पाइक । तोचि निष्टंक ज्ञानार्थी ॥८६॥
जो वीतरागी सविवेक । जो सद्भावे विश्वासिक । जो लोकेषणे रहित रंक । तो निष्टंक ज्ञानार्थी ॥८७॥
विकल्पशून्य ज्यांचे मन । वासनारहित निजभजन । तो मुमुक्षांमाजी चिद्रत्न । अधिकारी पूर्ण ब्रह्मज्ञाना ॥८८॥
ऐशी विवात्याची पूर्ण लक्षणे । निर्धारुनि श्रीनारायणे । त्यासि पूर्णब्रह्मनिरुपणे । ज्ञानार्थ परिसणे सावधान श्रोती ॥८९॥
हे कल्पादीचे जुनाट ज्ञान । वक्ता स्वये श्रीनारायण । एका विनवी जनार्दन । श्रोती अवधान मज दीजे ॥३९०॥
जो ॐकाराचा तरुवरु । स्वानंद सुखाचा सागरु । सत्यसंकल्प सर्वेश्वरु । तो परात्परु स्वमुखे बोले ॥९१॥
ज्ञानाची व्याख्या
शास्त्रव्युत्पत्ती व्याख्यान । जालिया वेदात श्रवण । त्यावरी उठी जे जाणपण । त्यानांव ज्ञान शास्त्रोक्त ॥९२॥
विषयवासनेविण । वृत्तीसी जे विवेकस्फुरण । त्यानांव बोलिजे ज्ञान । सत्य जाण स्वयंभू ॥९३॥
चिद्रूपे वृत्तीचे स्फुरण । ते जाणिवे नाकळे ज्ञान । तेचि स्वये होइजे आपण । त्यानांव विज्ञान विधातया ॥९४॥
हदयी जे आत्मपण । ते स्वये होईजे आपण । जेथे हारपे देहाचे स्फुरण । ते सत्य विज्ञान विधातया ॥९५॥
जळी मीनलिया लवण । सर्वांगे विरे संपूर्ण । जळीचे हारपे क्षारपण । यापरी विज्ञान वस्तुत्वाचे ॥९६॥
देहीचे जाऊनि अहंपण । ‘ ब्रह्माहमस्मि स्फुरे स्फुरण । ते स्फूर्तिही विरे संपूर्ण । त्यानांव विज्ञान पूर्णत्वाचे ॥९७॥
ज्ञानप्राप्तीसाठी अत्यावश्यक असणार्या भक्तीची लक्षणे
हे पावावया पूर्णप्राप्ती । भावे करावी भगवद्भक्ती । ते भक्तीची निजस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥९८॥
भगवद्भाव सर्वाभूती । यानांव मुख्य माझी भक्ती । हेचि भजन ज्यासि अनहंकृती । विज्ञानप्राप्ती ते त्यासी ॥९९॥
हे भक्ती करी जो निजांगे । विज्ञान त्याच्या पाया लागे । ते भक्ती उपजे नेणे योगे । ते भक्तिचि अंगे हरी सांगे ॥४००॥
माझे नाम माझे स्मरण । माझी कथा माझे कीर्तन । माझ्या चरित्रांचे पठण । गुणवर्णन नित्य माझे ॥१॥
माझा जप माझे ध्यान । माझी पूजा माझे स्तवन । नित्य करिता माझे चिंतन । विषयध्यान विसरले ॥२॥
भक्तांचे विषयसेवन । तेही करिती मदर्पण । यानांव भक्तीची अंगे जाण । स्वये नारायण विधीसी सांगे ॥३॥
ज्ञान विज्ञान उत्तमभक्ती । सांग सांगेन तुजप्रती । कृपेने तुष्टला कृपामूर्ती । धन्य प्रजापती निजभाग्ये ॥४॥
जगाचे गुह्य मी आपण । त्या गुह्याचे गुह्य संपूर्ण । पूर्ण गौप्याचे गुप्तघन । तुज मी सांगेन स्वयंभू ॥५॥
ऐसे गोप्याचे जे अति गोप्य । कोणा नाही सांगितले अद्याप । माझे निजानंदनिजरुप । तुज मी सुखरुप सांगेन ॥६॥
कृपेने तुष्टला जनार्दन । जीवी जीव घालू पाहे आपण । आकळावया ज्ञान विज्ञान । अनुग्रहपूर्ण आवडी करी ॥७॥
आवडी सदगुरुनाथू । जव मस्तकी न ठेवी हातू । तोवरी शिष्याचा निजस्वार्थू । पूर्ण परमार्थू सिद्धी नपवे ॥८॥
यालागी श्रीनारायण । वरदहस्ते संपूर्ण । अनुग्रही चतुरानन । तेचि निरुपण श्रीशुक सांगे ॥९॥
