चतुःश्लोकी भागवत – भ
चतुःश्लोकी भागवत – भागवताची दहा लक्षणें
भागवताची दहा लक्षणे सांगून ब्रह्मदेवाने नारदाला ज्ञानी केले
निजपुत्रालागी श्रीनारायण । कळवळोनी सांगे गुह्यज्ञान । तेचि स्वपुत्रालागी जाण । ब्रह्मा आपण मथितार्थ बोधी ॥१॥
ज्ञान विज्ञान भगवद्भक्ती । नारायणाची पूर्णस्थिती । कळवळोनी प्रजापती । निजपुत्राहाती ओपिता झाला ॥२॥
ते दशलक्षण भागवत । विष्णुविरिंचीज्ञानमथित । तो ऐकता ज्ञानमथितार्थ । ओपिला समस्त नारदोदरी ॥३॥
ते न देखता नयन । न माखता निजकान । नातळता अंतः करणमन । ओपिले गुह्यज्ञान नारदहदयी ॥४॥
सोडूनिया निज सुरबुद्धी । नातळता आदिमध्यअवधी । परिपूर्णत्वे करुनि बोधी । ज्ञानार्थसिद्धि वोपिली तया ॥५॥
जेवी शिष्या विद्यातत्त्व देता । गुरुसी ज्ञान वाढे अर्था । न्यूनत्व न घडे प्रबोधिता । पूर्ण चढे माथा सच्छिष्याचिया ॥६॥
तैसा उपदेश अलोलिक । उपदेशमात्रे तिन्हीलोक देख । गुरुशिष्यही होती एक । तेथे न्यूनाधिक कोणाचे कोणा ॥७॥
राया यापरी चतुरानन । उपदेशुनी गुह्यज्ञान । नारद केला ब्रम्हपूर्ण । चैतन्यघन समसाम्यरुप ॥८॥
जेणे होइजे ब्रम्हपूर्ण । ते भागवत दशलक्षण । त्या लक्षणांचे निजलक्षण । होउनी सावधान अवधारी तू ॥९॥
चतुःश्लोकी भागवत – भागवताची दहा लक्षणें
इतर पुराणे जी असती । त्यांची पांचलक्षण व्युत्पत्ति । श्रीमहाभागवताची स्थिती । जाण निश्चिती दशलक्षणे ॥८१०॥
मुख्य भागवताची व्युत्पत्ति । दशलक्षण त्याची स्थिती । ते मी सांगेन तुजप्रती । ऐके परीक्षिती नृपवर्या ॥११॥
सर्ग, विसर्गं, स्थान, पोषण, । ऊती, मन्वंतरें, ईशानुकथन । निरोध, मुक्ती, आश्रय पूर्ण । एवं दशलक्षण भागवत ॥१२॥
दशलक्षणांचे लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । ऐक राया सावधान । लक्षणचिन्ह यथार्थ आता ॥१३॥
प्रत्येक लक्षणाची व्याख्या
सर्ग बोलिजे संसाराते । विसर्गं म्हणिजे संहाराते । स्थान म्हणिजे वैकुंठाते । पोषण तेथे भगवद्भजन ॥१४॥
कर्म त्यानांव ऊती । चौदामनूंची व्यवस्थिती । यानांव मन्वंतरे म्हणती । दशावतारकीर्ती ईशचरित ॥१५॥
सकळ इंद्रियांच्या वृत्ती । एकाग्र यानांव निरोधस्थिती । निःशेष जेथे विरे वृत्ती । त्यानांव मुक्ती महाराया ॥१६॥
उत्पत्तिस्थितिप्रळ्यात । ज्या स्वरुपावरी होतजात । स्वरुप अविकारी यथास्थित । त्यानांव निश्चित आश्रय राया ॥१७॥
दोराअंगी सर्प उपजला । दोरावरी सर्प नांदला । दोरावरी सर्प निजला । तरी दोर स्पर्शला नाही सर्पा ॥१८॥
तेवी वस्तूच्या ठायी । प्रपंचाची वार्ता नाही । तो झाला गेला घडे काही । आश्रय पाही यानांव बापा ॥१९॥
पावावया आश्रयप्राप्ती । भावे करावी भगवदभक्ती । ते भक्तीची निजस्थिती । श्रीव्यासे भागवती विशद केली ॥८२०॥
ते भावे करिता भगवदभक्ती । त्या भक्तीची निजस्थिती । भक्ता परमानंदप्राप्ती । परिपूर्णस्थिती ठसावे येथे ॥२१॥
ठसावली जी ब्रह्मस्थिती । ते पालटों नेणे कल्पांती । कर्मी अकर्तृत्वाची प्रतीती । नारद निश्चिती उपदेशिला ॥२२॥
चतुःश्लोकी भागवत – ब्रह्मज्ञानी
नारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळे ब्रह्मदेवाने आनंदाने त्याला आपली ब्रह्मवीणा दिली
तेणे उपदेशे श्रीनारद । पावला तो परमानंद । निर्दळूनिया भेदाभेद । यापरी बोध प्रबोधिला तेणे ॥२३॥
ऐसे उपदेशिता प्रजापती । श्रीभगवंताची मुख्यभक्ति । आतुडली नारदाचिये हाती । अव्ययस्थिती परमानंद होत ॥२४॥
यापरी उपदेशिला नारद । यालागी सर्वकर्मी ब्रह्मानंद । कोंदाटला स्वानंदकंद । परमानंद परिपूर्णपणे ॥२५॥
बोध देखोनी चतुरानना । आल्हाद जाहला चौगुणा । तेणे आल्हादेंकरुनी जाणा । आपुला ब्रह्मवीणा वोपिला तया ॥२६॥
नारदे करुनि प्रदक्षिणा । स्वानंदे लागलासे चरणा । मग वाहूनिया ब्रम्हवीणा । ब्रह्मानंदे जाणा निघाला तेसमयी ॥२७॥
तो ब्रम्हवीणा वाजवीत । ब्रह्मपदे गीती गात । ब्रह्मपदी डुल्लत डुल्लत । ब्रह्मसृष्टी विचरत ब्रह्मबोधे ॥२८॥
ब्रह्मचर्याते पाळित । ब्रह्मबोध तिपाळित । ब्रह्मानंदे उन्मत्त । मही विचरत ब्रह्मत्वे तो ॥२९॥
तो ब्रह्मयासी संवादत । अधिकारियासी ब्रह्म देत । जग ब्रह्मरुपे देखत । यापरी विचरत त्रैलोक्य स्वये ॥८३०॥
अठरा पुराणे व वेदविभागांचे कर्ते असूनहि आत्मसमाधान न लाभलेले व्यासमूनि सरस्वती तीरावर नारदांना भेटले
ऐसा विचरत स्वइच्छेंसी । आला सरस्वतीतीरासी । तेथे देखिले श्रीव्यासासी । निजमानसी व्याकुळ असे ॥३१॥
ब्रह्मप्राप्तीलागी जाण । घालूनि बैसला तो आसन । दृढ करिताही ध्यान । निजसमाधान न पावेची ॥३२॥
श्रीव्यासे स्वर्ये आपण । केले वेदविभागविवेचन । भारतादिअठरापुराण । इतिहास सुलक्षण व्यासे केली ॥३३॥
स्वधर्मकर्माचे लागवेग । व्यासे विभागिले सांग । स्वर्गनरकादिभोगभाग । देहविभाग विभागले व्यासे ॥३४॥
जन्ममरणादिअवस्था । व्यासे वर्णिल्या यथार्थता । ज्ञातेपणाची समर्थता । परी अंगी सर्वथा असेना त्याचे ॥३५॥
वेदविभागी मी सज्ञान । ऐसा रावणासी अभिमान । यासी दिधले निग्रहस्थान । श्रीव्यासे आपण ॐकारमात्रे ॥३६॥
ज्याचेनी दृष्टिस्पर्शे जाण । कौरवपांडववंशवर्धन । तो श्रीव्यासही आपण । आत्मसमाधान नपवेची ॥३७॥
ज्याचे करिता ग्रंथ पठण । ब्रह्महत्यादिदोषनिर्दळण । करिता भारतकथाकथन । निमाले ब्राह्मण उठविले अठरा ॥३८॥
सदगुरुकृपेविण सूक्ष्म अहंकार न गेलेले व्यास आत्मज्ञानी कसे होणार ?
यापरी ज्ञानसंपन्न । श्रीवेदव्यास द्वैपायन । तोही सदगुरुकृपेविण । आत्मसमाधान नपवेची ॥३९॥
मुख्य व्यासाची हे अवस्था । तेथे इतरांची कोण कथा । शाब्दिक ज्ञानाची योग्यता । तेथे अतर्क्य अहंता स्वभावे असे ॥८४०॥
अनागतभाग्यथार्थवक्ता । महाकवित्वे मी कविकर्ता । ऐशी अतिसूक्ष्म अहंता । नकळोनी स्वभावता व्यासासी असे ॥४१॥
चतुःश्लोकी भागवत – गुरुकृपा
गुरुकृपेशिवाय इतर साधने व्यर्थ
सदगुरुकृपा न होता पूर्ण । न तुटे सूक्ष्म ज्ञानाभिमान । नकरिता गुरुसेवा अनन्य । शिष्य समाधान कदा नपवे ॥४२॥
नधरिता सदगुरुचे चरण । नव्हता अनन्यशरण । वृथा ज्ञान वृथा ध्यान । वृथा वाग्विलपन पांडित्य ते ॥४३॥
वृथा स्वधर्मकर्माचार । वृथा विवेक विचार । सदगुरुकृपेविण जो नर । भूमिभार जडमूढ तो ॥४४॥
सदगुरुकृपा न होता । व्यर्थ कविता व्यर्थ कथा । व्यर्थ सज्ञानश्लाघ्यता । देहअहंता तुटेना त्याची ॥४५॥
नकरिता सदगुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान । सदगुरुतोचि ब्रह्मपूर्ण । चैतन्यघन निजात्मा तो ॥४६॥
सदगुरुचे चरणींची माती । अवचटे आतुडल्या स्वहाती । पाया लागती चार्ही मुक्ती । परमात्मप्राप्ती सच्छिष्या ॥४७॥
असो हे व्यासे करिता ध्यान । क्षणभरी स्थिर न राहे मन । अणुमात्र नपवे समाधान । तेणे उद्विग्नपणे अनुतापी ॥४८॥
मग ह्नणे तो कटकटां । जळो जाणीवप्रतिष्ठा । ज्ञातेपणे ठकिलो मोठा । मज मी उफराटा वंचलो की ॥४९॥
जाणपणाचा पहिला भ्रम । ज्ञातेपणे मी मूर्ख परम । निजहिताचे चुकलो वर्म । झाले निंद्यकर्म मज माझे ॥८५०॥
माझे देही देहस्थ मी कोण । त्या मीपणाचे मज नाही ज्ञान । केवी पावेन मी समाधान । यापरी संपूर्ण अनुताप जाहला ॥५१॥
नरदेहीचे निजसाधन । साधावे निजात्मज्ञान । ते मी नसाधिता सज्ञान । अतिअज्ञान ज्ञानांध केवळ ॥५२॥
चतुःश्लोकी भागवत – नारदाचे दर्शन
अशा अनुतापी व्यासांना नारदांचे दर्शन होते
ऐसी व्यासासी अवस्था । ज्ञानार्थी होता अनुतापता । तेथे निजभाग्ये स्वभावता । आला अवचिता ब्रह्मपुत्र ॥५३॥
व्यास जव उघडी नयन । तव पुढे देखे ब्रह्मनंदन । हर्षे निर्भर झाला पूर्ण । धावोनी लोटांगण सदभावे घाली ॥५४॥
उपविष्ट होता वरासन । हर्षे करी चरणवंदन । स्वानंदे चरणक्षालन । केले पूजन ज्ञानोपचारी ॥५५॥
पुष्पांजुळी प्रदक्षिणा । तुळसीपत्रे वाहुनी चरणा । नारदी भगवदभावना । करुनी पूजना प्रार्थितसे ॥५६॥
व्यास ह्नणे अहो स्वामी । जगी परमभाग्याचा मी । स्वये कृपा केली तुह्मी । आजि सुखसंगमी निवालो असे ॥५७॥
ऐशी विनंती प्रीतीकरुनी । धावोनि लागलासे चरणी । त्यासी आदरे नारदमुनी । सन्मानुनी उठवी अत्याल्हादे ॥५८॥
नारदांची पूजा करुन व्यासांनी आपली मनोव्यथा त्यांना सांगितली
मग बैसोनिया सावचित्त । व्यास निवेदी मनोगत । म्या स्वये कथिले ज्ञानमथित । परी समाधान चित्त माझे नपवे ॥५९॥
जो मी लौकिकी अतिसज्ञान । तो मी निजस्वार्था अतिअज्ञान । माझ्या ज्ञातेपणाचे भूषण । तेचि दूषण मज माझे ॥८६०॥
भीतरी मूर्ख बाहेरी ज्ञाता । हे ज्ञातेपण निजघाता । ते मी वेदशास्त्रपुराणकर्ता । निजस्वार्था अतिअंध झालो ॥६१॥
अंतरी नाही सुखसमाधान । जळो जळो ते ज्ञातेपण । ऐसे नारदासी सांगोन पूर्ण । झाला अनन्यशरण श्रीव्यास तो ॥६२॥
” तुझ्या ग्रंथांतून भगवंताचे गुणसंकीर्तन नाही ” – नारद
तव नारद ह्नणे व्यासासी । केले अत्युत्तम ग्रंथासी । जेणे विश्रांति होय वक्तयासी । त्या ग्रंथार्थासी नोळखसी ॥६३॥
स्वधर्मकर्तव्ये व्यवहाररीती । हेचि निरुपिले तुवा ग्रंथी । परी भगवंताची निजस्थिती । ती ग्रंथार्थी प्रतिपादिली नसे ॥६४॥
सच्चिदानंदप्रभावासी । नाही वर्णिले श्रीवासुदेवासी । तव विश्रांति नव्हे वाचेसी । मां वक्तयासी सुख कैचे ॥६५॥
जो जगाचे निजजीवन । जो प्रतिपाद्य श्रीजनार्दन । नाही वर्णिला चैतन्यघन । तव वक्तया संपूर्ण सुख कैचे ॥६६॥
ज्याचेनी जग होय सुखरुप । तो जनार्दन सुखस्वरुप । त्याचे न वर्णिता निजस्वरुप । वक्तयासी अल्प विश्रांती नुपजे ॥६७॥
” श्रोता – वक्ता यांना परमशांति देणारा ग्रंथ कोणता तो ऐक ” – नारद
जे वक्तयासी होय निजसुख । त्रिलोकी कोंदे हरिख । ऐसा अत्यंत अलोलिक । तुज मी अवश्यक सांगेन आता ॥६८॥
श्रोते वक्ते सुखरुप होती । जगी प्रगटे परमशांती । ऐसी भगवंताची निजस्थिती । ते मी तुजप्रती सांगेन पा ॥६९॥
ज्याचे स्मरता एक नाम । निर्दाळी सकळ कर्माकर्म । त्या पुरुषोत्तमाचे निजवर्म । गुह्यज्ञान परम सांगेन व्यासा ॥८७०॥
जेथे शब्देंसी वक्ता निवे । श्रवणेंसी श्रोता विसांवे । सुखासही निजसुख फावे । अनुभवा निजानुभवे निघती दोंदे ॥७१॥
जेणे शिवाचे पुरे कोड । जे गोडाचे निजगोड । जेणे वोसरे संसारकाबाड । सुखसुरवाड सांगेन ते ॥७२॥
जेणे तुटे ज्ञानाभिमान । जेणे कोंदाटे चैतन्यघन । ऐसे जे गुह्याचे गुह्यज्ञान । ते तुज सांगेन परात्पर मी ॥७३॥
जे भावार्थे घेता वचन । जन जनार्दना अभिन्न । श्रोता वक्ता होय आपण । ते गुह्यज्ञान अवधारी तू ॥७४॥
कैसे व्यासाचे शुद्धमन । नारद ज्ञाता मी काय अज्ञान । ऐसा नधरीच ज्ञानाभिमान । यालागी तुष्टमन नारद झाला ॥७५॥
जेणे जपतपाची श्रृंखळा तुटे । ध्येयध्यानाचे बिरडे फिटे । कर्माकर्माचे खत फाटे । ते वर्म गोमटे अवधारी पा ॥७६॥
जेणे अहंतेचे मूळ उपडे । अविद्येचे आयुष्य खंडे । अंगे ब्रह्म होइजे रोकडे । ते ज्ञान धडफुडे अवधारी पै ॥७७॥
गुरुकृपेने नारदाला लाभलेली योग्यता
निजकृपे श्रीनारद । परमप्रीती अतिआल्हाद । व्यासासी वचनानुबोध । परमानंदे निववीत असे ॥७८॥
श्रीनारायणे निजानंद । परमेष्ठीसी केला बोध । तेणे ब्रह्मा पावे परमानंद । स्वानंदकंद सदोदित ॥७९॥
ऐसिया निजानुभवासी । ब्रह्मा अर्पी निजपुत्रासी । तेणे तो नारददेवर्षी । सुखस्वानंदेंसी डुल्लत असे ॥८८०॥
भुक्ति मुक्ति भगवद्भक्ती । नित्य नारदाते वोळंगती । येवढी स्वरुपाची प्राप्ती । अगाधस्थिती पावला ॥८१॥
भुक्ति नारदाचे पायी घोळे । मुक्ति त्याचे चरणी लोळे । भक्ति त्याचेनी धाके पळे । करी सोवळे निजशिवाते ॥८२॥
काम नारदापुढे पळे । काळ त्याच्या तोडरी रुळे । हरिहरांचेनी भावबळे । इंद्रादि पादकमळे वंदिती सदा ॥८३॥
सदा देवांचा आवडता । नित्य दैत्यांचा पढियंता । ज्याचे मुखींची स्वभाववार्ता । नुल्लंघ्य सर्वथा हरिहरांसी ॥८४॥
शुक्र लागे ज्याचे चरणी । बृहस्पति त्याते मस्तकी मानी । यापरी गा नारदमुनी । वंद्य त्रिभुवनी सुरा असुरा ॥८५॥
नारदा रावणासी आप्तता । शेखी रामाचा पढियंता । नारद शिवाचा आवडता । तो त्रिपुरासी तत्त्वता एकांत चाळी ॥८६॥
श्रीकृष्णनारद एकांतविधी । त्याते कालयवन पुसे बुद्धी । ज्याते जरासंघ नित्य वंदी । तो कृष्णसभेमधीं आत्मत्वे पूज्य ॥८७॥
जेथे अत्यंत विषमता । तेथे नारदासी नित्य समता । तेथे समसाम्यसमानता । व्यासासी तत्त्वता निजबोधक ॥८८॥
तो पाराशर तपतेजस । सरस्वतीतीरींचा निजहंस । परब्रह्मध्यानी ध्यानस्थ व्यास । त्यासी करी उपदेश श्रीनारद तो ॥८९॥
ध्यानध्यातृत्वभेद । फोडोनी जो सच्चिदानंद । तोचि श्लोकार्थीचा अर्थबोध । व्यासासी श्रीनारद बोध सांगे ॥८९०॥
नारदांच्या उपदेशाने व्यासांना आत्मज्ञान
कानावचना होता भेटी । व्यास स्वबोधेंसी स्वये उठी । श्रीनारदाचे गोष्टीसाठी । पडली मिठी परब्रह्मी ॥९१॥
ज्या दादुल्याचे वचन । निर्दळुनी ध्याते मन । ध्याता केला चैतन्यघन । हा प्रताप पूर्ण सदगुरुवचनी ॥९२॥
तेचि वाक्य इतर सांगती । परी तेथे नव्हे अर्थप्राप्ती । बाप सदगुरुवाक्याची ख्याती । वचनींच प्राप्ती पर ब्रह्माची ॥९३॥
हो का वचनामाजी आईते । ब्रह्म बांधोनी आले होते । हाही अर्थ नघडे येथे । गुरुवाक्यचि निश्चिते परिपूर्ण ब्रम्ह ॥९४॥
वस्तुवेगळे वचन राहे । मां त्यामाजी वस्तु बांधिली जाये । वस्तु वचनासी सबाह्य आहे । एवं गुरुवाक्य होय परिपूर्ण ब्रम्ह ॥९५॥
गुरुवाक्याचे अक्षर । ते क्षराक्षरातीत परमपर । यालागी गा साचार । ब्रम्हपरात्पर सदगुरुवाक्य ॥९६॥
वचन वाक्य आणिक वक्ता । तिहींसी गुरुवाक्ये एकात्मता । यालागी जाण पा तत्त्वता । गुरुवाक्य वस्तुता परिपूर्ण ब्रह्म ॥९७॥
गुरुवाक्य चैतन्यघन । सदगुरु तो ब्रम्ह परिपूर्ण । हे श्रीव्यासासी बाणली खूण । आपणा आपण विसरला मग ॥९८॥
विसरला तो ध्येयध्यान । विसरला तो ज्ञेयज्ञान । विसरला तो मी तू पण । देहीचे देहपण देहधर्म विसरे ॥९९॥
विसरला तो कर्मधर्म । विसरला तो नित्यनेम । विसरला तो जपहोम । पूर्ण परब्रम्ह कोंदाटले ॥९००॥
नाठवे सज्ञानमंहती । नाठवे महाकवित्वाची व्युत्पत्ती । नाठवे विदेहदेहस्फूर्ती । चैतन्यस्थिती ठसावली तया ॥१॥
बाप गुरुवाक्याचा निजबोध । निःशेषे निरसला जीवभेद । पूर्ण कोंदला परमानंद । स्वानंदकंद निजबोधेंसी ॥२॥
ऐसा पावता निजबोध । विसरला गुरुशिष्यत्वभेद । श्रीव्यास आणि श्रीनारद । झाले एकचित्तबोध निजात्मरुपे ॥३॥
यापरी श्रीभागवत । दशलक्षण अर्थयुक्त । नारदे व्यासासी यथोक्त । पूर्ण परमार्थ प्रबोधिला ॥४॥
कृपापूर्ण पौर्णिमाद्वारे । सदगुरुप्रबोधबोधचंद्रे । निजानंदे अमृतकरे । निवविले पुरे निजशिष्याते ॥५॥
निरसुनी अविद्याअंधार । दवडुनी अहंसोहविकार । फेडिले मुक्तीचे भुरर । सदगुरुभास्करअरुणोदयी ॥६॥
सूर्यकिरणाचे संघाते । अंधारचि प्रकाशाआते । तेवी गुरुवाक्यभास्वते । संसार सुनिश्चिते परब्रह्म केला ॥७॥
इतर सूर्य अस्तमाना जाय । गुरुसूर्य तैसा नव्हे । जो उगवतांची पाहे । उदयास्त खाय निजांगतेजे ॥८॥
जेवी चंद्रकरअंगसंगे । चकोर निवाला डोलोंलागे । तेवी गुरुवाक्यसंयोगे । श्रीव्यास सर्वांगे सुखरुप जाहला ॥९॥
गुरुवाक्याने ज्ञान प्रबुद्ध झालेल्या व्यासांनी चतुः श्लोकीचे सार दहा लक्षणात वर्णिलें
तेणे सुखाचेनि स्वानंदे । सदगुरुकृपा पूर्ण बोधे । चतुःश्लोकींची अगाध पदे । दशलक्षणशुद्धे वर्णिली व्यासे ॥९१०॥
प्रथमस्कंधीं आरंभभाव । द्वितीयस्कंधी साधिला आव । तृतीयापासूनी नवलाव । लक्षणान्वयभाव लाविला असे ॥११॥
तृतीयस्कंधीं सर्गलक्षण । चतुर्थस्कंधीं विसर्ग जाण । पंचमस्कंधीं बोलिले स्थान । षष्ठी ते पोषण प्रतिपादिले ॥१२॥
सप्तमस्कंधी बोलिली ऊती । अष्टमी मन्वंतरांची गती । ईशानुकथनाची स्थिती । जाण निश्चिती नवमामाजी ॥१३॥
दशमी बोलिला निरोध । एकादशी मोक्षपद । द्वादशी आश्रय अतिशुद्ध । एवं लक्षणे विशद व्यासे केली ॥१४॥
जैसे वटबीज अणुमात्र । त्याचाचि होय वृक्ष थोर । तैसा चतुः श्लोकींचा विचार । श्रीव्यासे साचार विस्तारला ॥१५॥
व्यास कवि हाचि माळी । भूमिका शोधोनि वैराग्यहली । गुरुकृपाजीवनमेळी । विवेकाचे आळी वाढवी वृक्ष ॥१६॥
व्यासविंदानिया बळी । चतुः श्लोकींच्या निजमेळी । वृक्ष वाढवी समूळी । पुष्पपल्लवफळी सफलित ॥१७॥
पदोपदी अतिगोड । मोक्षसुखाचे लागले घड । समूळ सगळे झाड । नित्य नूतनगोड सुस्वाद लागे ॥१८॥
नित्य नूतन याची गोडी । अवीटे विटोंनेणे चोखडी । जे सेवू जाणती आवडी । त्यासी बाधेना वोढी सुधैषणेची ॥१९॥
नवल या फळाची मात । त्वचा वीज नाही त्यात । नमाखता जीवाहात । नलागता दात सेवावे हे ॥९२०॥
हे रसनेविण रसस्वादन । सेविता नव्हे उच्छिष्टवदन । परमानंदे तृप्त पूर्ण । गुरुभक्त सज्ञान पावती सदा ॥२१॥
एवं दशलक्षणविस्तार । द्वादशस्कंधभागवततरुवर । श्रीव्यासऋषि वदला साचार । स्वानंदनिर्भंर रस स्रवत ॥२२॥
समूळफळरुपे सदाफळ । अद्वितीय अतिरसाळ । समसाम्यसदा सरळ । समत्वे निर्मळ शाखोपशाखा ॥२३॥
शाखोपशाखाउत्पत्ति । निगमकोकिळा कूजती । आर्तभ्रमर परिभ्रमती । जिज्ञासु घालिती झेंपा फळी ॥२४॥
चतुःश्लोकी भागवत – शुकयोगींद्र
श्रीव्यासांनी आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेच ‘ ज्ञानी " केले
जव अर्थाअर्थी चोखडी गोडी । तव अतिशये अतिआवडी । श्रीशुकाची पडली उडी । सर्वांगी चोखडी चाखिली चवी ॥२५॥
ऐसा देखोनी अधिकार । श्रीव्यासे निजकुमर । उपदेशिला शुकयोगींद्र । जो ज्ञाननरेंद्र योगियांचा ॥२६॥
जो ब्रह्मचर्यशिरोमणी । जो भक्तांमाजी अग्रगणी । जो योग्यांचा मुकुटमणी । सज्ञान चरणी लागती ज्याचे ॥२७॥
जो सुखरुपे रुपा आला । की शांतिरसाचा ओतिला । निखळ विज्ञानाचा घडला । स्वये साकारला परब्रह्मरुप ॥२८॥
त्याच्या देहाची पाहता शोभ । ब्रह्मज्ञानी निघाले कोंब । तो ज्ञानाचा पूर्णबिंब । स्वये स्वयंभ पूर्णब्रह्म ॥२९॥
दशलक्षण श्रीव्यासोक्ती । चतुःश्लोकीचे अर्थप्राप्ती । श्रीशुकाची निजस्थिती । झाली निश्चिती परब्रह्मरुप ॥३०॥
यापरी श्रीशुक्र आपण । स्वये झाला स्वानंदघन । त्या आनंदाचे समाधान । पाहोनि पूर्ण समाधिस्थ झाला ॥३१॥
नाही वृत्तिधैर्यधारणा । आपेआप सहजे जाणा । समाधी आली समाधाना । सुखरुपे पूर्णार्णवबोध झाला ॥३२॥
समाधी आणि उत्थान । दोही अवस्था गिळूनी जाण । शुक्र आपणिया आपण । सुखरुपे पूर्ण प्रबोध पावे ॥३३॥
दहा हजार वर्षे श्रीशुक समाधि अवस्थेंत
ते समाधीचा अवबोध । शुकासी वाटे निमिषार्ध । बाहेर लौकिक प्रसिद्ध । दशसहस्त्राब्द पुराणगणना ॥३४॥
दशसहस्त्रवर्षेपर्यत । श्रीशुक होता समाधिस्थ । ऐसी महापुराणे गर्जत । शुकासी वाटत निमिषार्ध पै ॥३५॥
यालागी स्वरुपी निर्वाही । सर्वथा रीघ मना नाही । मुख्य काळचि जेथे नाही । काळगणना तेठायी । ठसावे कोणा ॥३६॥
लवनिमिषपळेंपळ । साधूनिया समाधि त्रिकाळ । हे मायामय मृगजळ । स्वरुपी अळुमाळ स्पर्शले नाही ॥३७॥
जो सूर्यापासी स्वये राहे । त्यासी उदयास्त भेटो नलाहे । तेवी स्वरुपी जो निमग्न होये । त्यासी काळाची सोये स्वप्नीहि नलगे ॥३८॥
काळगणनाप्रसिद्धी । हे लौकिकी जाण त्रिशुद्धी । स्वस्वरुपींचा संबंधी । काळाची अवधी निः शेष नपवे ॥३९॥
जे जे आकारासी आले । ते ते जाण काळे ग्रासिले । काळासी ज्याने सबाह्य व्यापिले । तेथे काळाचेही गेले काळत्व सगळे ॥९४०॥
ते स्वरुपी निजनिर्वाही । शुक समाधिस्थ जाहला पाही । मां काळगणना तेठायी । कैची काई सांगावी पा ॥४१॥
यालागी समाधि आणि उत्थान । हे अपक्वासीच घडे जाण । पूर्वाच्या अंगा लक्षण । अणुप्रमाण असेचिना ॥४२॥
पूर्णाची लक्षिता लक्षणे । थोटावली अवधी पुराणे । वेद ‘ नेति नेति " म्हणे । तेथे माझे बोलणे सरे केवी ॥४३॥
पूर्णयोगी प्रारब्धवशे । लौकिकी जैसा तैसा दिसे । तेही पूर्णस्थिती तो असे । काही अनारिसे करी ना करवी ॥४४॥
ब्रह्मस्वरुप श्रीशुक व्युत्थानदर्शेत येतांच परीक्षितीच्या घरी आले
यापरी शुकाची समाधि जाणा । स्वये आली समाधाना । तैंच परीक्षितीच्या सदना । विचरता त्रिभुवना अवचट आला ॥४५॥
बाप भाग्य परीक्षिती । ब्रह्मनिधी लागला हाती । ब्रह्मज्ञानाची ऐसी ख्याती । घातली जगती ज्ञानपव्हे ॥४६॥
चतुःश्लोकी भागवत – ब्राह्मणाचे सामर्थ्य
ब्राह्मणाचे सामर्थ्य
सभाग्य कोप ब्राह्मणाच । शापे अधिकार ब्रह्माचा । मिथ्या नव्हे ब्राह्मणवाचा । पूर्ण दैवाचा परीक्षिती ॥४७॥
शमीकाचा ब्रह्मचारी पुत्र । पाठके दिधले शिखासूत्र । त्याचेनि शापे ब्रह्माधिकार । जाण ब्राम्हणमात्र ब्रम्हरुपी ॥४८॥
शाप देतील जरी ब्राह्मण । तरी वंदावे त्यांचे चरण । कोपा चढल्याही ब्राह्मण । पूर्ण तरी आपण वंदावे ते ॥४९॥
ब्राह्मण करु आलिया घाता । त्याचे चरणी ठेवावा माथा । ब्राम्हणापरती पूज्यता । आन दैवता असेनाची ॥९५०॥
ब्रम्ह ब्राम्हण समसमान । हेही वचन दिसे गौण । ब्रम्हदाते स्वये ब्राम्हण । यालागी पूर्ण पूज्यत्वे श्रेष्ठ ॥५१॥
जे वस्तु असे ज्याअधीन । त्या वस्तूचे करिता दान । यालागी ब्रम्हस्वामित्वे ब्राम्हण । पूज्यत्वे पूर्ण तिही लोकी ॥५२॥
ब्राह्मण ब्रम्हाते प्रतिपादिते । ते ब्रह्म होते कोणी नव्हते । ब्रम्ह ब्राह्मणाचेनी हाते । पूर्ण प्रतिष्ठेते पावले पै ॥५३॥
यालागी ब्रम्ह ब्राम्हणाधीन । कदा नुल्लंघी ब्राम्हणवचन । त्यांचे मंत्रमात्रे जाण । पाषाणाही पूर्ण ब्रम्हत्व प्रगटे ॥५४॥
जैसा मातेचा मोहकोप । तैसा ब्राम्हणांचा शाप । शापे फेडूनि पराचे पाप । वस्तू चिद्रूप कोपुनी देती ॥५५॥
ब्राम्हण कोपल्या अतिक्षोभता । एवढा लाभ आतुडे हाता । त्या ब्राह्मणा सुखी करिता । त्या लाभाची वार्ता न बोलवे वेदा ॥५६॥
यालागी भूदेव ब्राह्मण । चालते बोलते ब्रह्म पूर्ण । त्यांची निंदा आवज्ञा हेळण । विरुद्ध आपण नवदावे कदा ॥५७॥
त्या ब्राह्मणांच्या कोपबोला । राजा ब्रह्माधिकारी झाला । भाग्ये श्रीशुक पावला । भाग्ये आथिला परीक्षिती तो ॥५८॥
चतुःश्लोकी भागवत – राजा परीक्षित
राजा परीक्षितीची योग्यता
या परीक्षितीचा अधिकार । पाहता दिसे अतिसुंदर । धर्माहोनी धैर्य थोर । वीर्यशौर्यधर विवेकी पै ॥५९॥
कृष्ण असता धर्म भ्याला । कलीभेणे पाठी पळाला । हा कलीसी ग्रासुनी ठेला । धैर्यै आथिला अधिकारी ॥९६०॥
चक्र घेऊनी निजहस्ती । ज्यासी गर्भी रक्षी श्रीपती । त्याचे अधिकाराची स्थिती । वानावी पा किती वाचाळता ॥६१॥
जेणे गर्भी रक्षिले निजस्थिती । त्याते परीक्षी सर्वाभूती । यालागी नांव परीक्षिती । येथवर प्रीती हरिचरणी ॥६२॥
अर्जुनवीर्य निर्व्यंग । सुभद्रामहीचे गर्भलिंग । तो अधिकाररत्नउपलिंग । उभयपक्षी चांग जन्मला शुद्ध ॥६३॥
राजा आणि सविवेक । सत्त्ववृद्धि आणि सात्त्विक । ब्रह्मज्ञानालागी त्यक्तोदक । असे अतिनेटक परमार्थी ॥६४॥
परमार्थाचा योग्य अधिकारी म्हणून या राजाला श्रीशुकांनी भागवत सांगितले – उपदेशाची परंपरा
ऐसे देखोनी परीक्षितीसी । कृपा उपजली श्रीशुकासी । मग बैसवोनी सावकाशी । श्रीभागवत त्यासी निरोपिले ॥६५॥
दुजे दवडून दृश्य दृष्टी । अति गुप्ततेपरिपाठी । हरिब्रह्मयांची गुह्यगोष्टी । बोले कर्णपुटी अतिएकांती ॥६६॥
तेचि ब्रह्मयाने नारदासी । बैसोनिया एकांतवासी । दुजे नपडता दृष्टीसी । अतिगुप्ततेसी उपदेशिले ॥६७॥
तेचि नारदमहामुनीश्वरी । अतिगुप्त साने कुसरी । एकांती सरस्वतीचे तीरी । व्यासासी करी निजबोध ॥६८॥
तेचि श्रीव्यासे अतिनिगुती । बैसवूनिया एकांती । श्रीभागवत श्रीशुकाप्रती । यथार्थस्थिती उपदेशिले ॥६९॥
एवं परंपरा उपदेशस्थिती । गुप्तरुपे जे आली होती । तेचि प्रगट जगाप्रती । शुक परीक्षिती परमार्थ सांगे ॥९७०॥
हे त्यागाची निजवोज । सप्तरात्रे साधावया काज । ब्रह्मशापे ऋषिसमाज । मेळवूंनिया सहज त्यक्तोदक जाहला ॥७१॥
ब्रह्मशापनियमावधी । अंती संकटविषयसंधी । तेथे पावला ब्रह्मनिधी । ज्ञानक्षीराब्धी शुकयोगींद्र ॥७२॥
श्रीशुकमुखाने भागवत श्रवण करुन परीक्षिति ब्रह्मज्ञानी झाला
मरतया अमृतपान । दुष्काळी जेवी मिष्टान्न । अवर्षणी वर्षे घन । तेवी आगमन श्रीशुकाचे ॥७३॥
भक्तिनवरत्नतारुं बुडता । धर्मधैर्याचा स्तंभ पडता । तो परीक्षिती शापे पीडिता । झाला रक्षिता शुकयोगींद्र ॥७४॥
तेणे बैसवुनी ऋषिवर्यपंक्ती । तारावयाते परीक्षिती । प्रगट परिसता त्रिजगती । श्रीभागवतार्थी शुक वक्ता ॥७५॥
धन्य वक्ता तो श्रीशुक । श्रवणे विसरवी तान्हभूक । त्यक्तोदका झाले पूर्णसुख । कथापीयूष परमामृते ॥७६॥
ब्रह्मशापे सर्प दंशता । मरणभयाची कथावार्ता । विसरवुनिया नरनाथा । पूर्णपरमार्था त्यासी लावी ॥७७॥
ते हे श्रीभागवत संपूर्ण । दशलक्षणी सुलक्षण । श्रीशुके करवुनी श्रवण । परीक्षिती पूर्ण ब्रह्म केला ॥७८॥
जेवी दोराचे सापपण । दोरीच मिथ्या होय जाण । तेवी देहाचे देहपण । देहस्था मीपण जाणता मिथ्या ॥७९॥
देह असो अथवा जावो । आह्मी पूर्णपरब्रह्म आहो । यापरी परीक्षिती पहाहो । केला निः संदेहो श्रवणमात्रे ॥९८०॥
चतुःश्लोकी भागवत – संताकडे क्षमायाचना
श्रीएकनाथ म्हणतात मी गुरुआज्ञेने हा ग्रंथ मराठींत रचिला
श्रीशुकपरीक्षितीसंवाद । तोचि जगाला उदबोध । जो गुरुकृपा पावे प्रबोध । पूर्ण ब्रह्मानंद स्वये होय तो ॥८१॥
ऐसे फावले ज्या श्रीभागवत । ते पावले ज्ञानमथितार्थं । परमानुभवी श्रीमत्संत । संतोषावया ग्रंथ म्या हा केला ॥८२॥
त्यांचिया चरणरजकृपा । हे बोल कळले मज पाहा पा । वाचुनी ज्ञानार्थसंकल्पा । आकळे वाग्जल्पा हे घडे केवी ॥८३॥
माझे वाकुडेतिकुडे आर्षबोल । त्यामाजी ब्रह्मज्ञान सखोल । नित्य नवी प्रेमाची ओल । हे कृपा केवळ त्या संतांची ॥८४॥
या धाडसाबद्दल संताकडे क्षमायाचना
श्रीभागवत आणि भाषे मराठे । हे बोलणे नवल वाटे । पूर्वी नाही ऐकिले कोठे । अभिनव मोठे धिटावा केला ॥८५॥
मुख्य संस्कृतचि मी नेणे । यावर प्राकृत ग्रंथ करणे । जे काही बोलिलो धीटपणे । ते क्षमा करणे जनकत्वे संती ॥८६॥
बालकाची सरे बडबड । तेणे माउलीची निवे चाड । मज आपल्याचे तुम्हा कोड । प्राकृतही गोड मानिला ग्रंथ ॥८७॥
माझे आरुषवाणे बोलणे । कळाकुसरी कौतुक नेणे । जे बोलविले जनार्दने । तेचि ग्रंथकथने कथिले म्या ॥८८॥
जे बळे ओढून नेइजे तैसे । तेचि चालुनी आले आपैसे । तेवी मन हिरोन हषीकेशें । बळात्कारे ऐसे बोलविले पै ॥८९॥
मी निमित्तमात्र आहे
येथे पराक्रम नाही माझा । हा ग्रंथ आवडला अधोक्षजा । तेणे बोलविले ज्या निजगुजा । त्या ग्रंथार्थवोजा वोडवला ग्रंथ ॥९९०॥
तो करवी तैसा मी कर्ता । हे बोलणे अतिमुर्खता । वाच्यवाचक जनार्दन वक्ता । ग्रंथग्रंथार्था निजरुप दावी ॥९१॥
यालागी पदपदार्थखोडी । प्रेमरहस्य ज्ञानगोडी । हे माझ्या अंगी नलगे वोढी । ग्रंथार्थधडगोडी जनार्दन जाणे ॥९२॥
घाणा उस गाळिल्या जाणा । गुळाचा स्वामी नव्हे घाणा । तेवी मज मुखी गुह्यज्ञाना । वदला ज्ञातेपणा मीपण नलगे ॥९३॥
ऐसे सदगुरुनी नवल केले । माझे मीपण निः शेष नेले । शेखी माझे नांवे ग्रंथ बोलिले । प्रेम आथिले ज्ञानार्थरसे ॥९४॥
म्हणावे सदगुरु तू माझा । की पूर्णब्रम्हसहजनिजा । तेथे मीपणाचा उपजे फुंजा । तुजमाजी तुझा निजवास पै ॥९५॥
वस्त्र आणि घडीपालव । स्वरुप एक वेगळे नांव । परी घडी पालव अपूर्व । वस्त्रगौरव शोभेसि आणि ॥९६॥
तेवी गुरुब्रम्हही एकचि घडे । परी गुरुदास्ये ब्रम्ह आतुडे । गुरुवाक्ये निजनिवाडे । ब्रम्हासी जोडे प्रतिष्ठा पै ॥९७॥
गुरु ब्रह्म अभिन्नत्वे पूर्ण । तेथे शिष्यासी नुरे भिन्नपण । तेव्हा जन तोचि जनार्दन । जनार्दनी जन अभिन्नत्वे नांदे ॥९८॥
ऐसा निजात्मा श्रीजनार्दन । अनुभविता नहोय आन । कायावाचामनबुद्धिप्राण । इंद्रियेहि जाण जनार्दन झाला ॥९९॥
यालागी माझे जे का मीपण । ते माझे अंगी नलगे जाण । माझे वाचे जे वचन । ते श्रीजन्जार्दन स्वये झाला ॥१०००॥
यालागी वाचा जे वावडे । ते जनार्दना अंगी जडे । सैर करतांही बडबडे । समाधीची नमोडे मौन मुद्रा ॥१॥
जनार्दन माउलीची अकारण करुणा, तिचाच हा महिमा
सैराट धावता पाय । श्रीजनार्दन निजमाय । पदोंपदी कडिये घेत जाय । रिते पाऊल पाहे पडोंनेदी ॥२॥
झणी कोणाची दृष्टि लागे । यालागी मज पुढे मागे । सर्वदा तिष्ठे सर्वांगे । मीचि आचार्यसगे निर्भय सदा ॥३॥
जनार्दनजननीअंगसंगे । भय तोचि निर्भय होऊ लागे । कळिकाळ नित्य निजांगे । येउनी पाया लागे अहर्निशी ॥४॥
जनार्दनजननीचा स्नेह मोठा । चित्प्रकाश केला दिवटा । मोडेल अविद्येचा काटा । ह्नणुनी बोधखराटा भूमिका झाडी ॥५॥
ऋद्धिसिद्धीची कुरवंडी । वोवाळुनी दुरी सांडी । निजानुभवाचे ताट मांडी । स्वानंदाचे तोंडी ग्रास देत ॥६॥
समाधीचे पालखी सुये । अनुहुताचा हल्लर गाये । यापरी जनार्दन निजमाये । निजी निजविती होये निजदासा ॥७॥
पुत्र शिष्य आणि सेवक । जनार्दनासी समान देख । परी पुत्रापरिस विशेष देख शिष्यासी निजमुख स्वानंदा दिला ॥८॥
तेथे जनार्दनी एक । रंकाचेही निजरंक । त्यांही माजी कृपापूर्वक । निजात्ममुख सुखे दिधले ॥९॥
त्या सुखाची निजगोडी । चतुः श्लोकींच्या पदमोडी । श्रीसंतांलागी घोंगडी । मराठी परवडी भावे केली ॥१०१०॥
जेवी सकळा लहाने । मिळोनी कणकीचे चाखणी करणे । तेवी श्रीभागवत मूळ केणे । म्या वाखाणणे महाराष्ट्री ॥११॥
नवल माउलीचे कोड । बाळक नासी ते लागे गोड । तेवी मी संतांचे लडिवाळ बोबड । माझे मराठीचे कोड चौगुण करिती ॥१२॥
बाळक स्वये खेळगेपणे । मातेसी लावी आंवतणे । त्याचे परवडी पडिले चणे । तरी माता तृप्त होणे चौगुणे प्रीती ॥१३॥
तेवी माझिया बोला प्राकृता । ग्रंथार्थ परिसता साधुसंता । सुख उपजेल सर्वथा । निजस्वभावता निजबोध ॥१४॥
जेवी बाळक बापाजवळी । त्याचेच ग्रास त्यासी घाली । की तो बाळकाच्या करतळी । सुखावला तळी मिटक्या देत ॥१५॥
तेवी चतुः श्लोकी भागवता । व्यासे काढिले मथितार्था । तो शोधुनी म्या आईता । वोपिला संता निजबाळकभावे ॥१६॥
या चतुः श्लोकीची रचना कोठे व कशी झाली
तेवी चतुः श्लोकीभागवता । कैसेनी झाले हस्तगत । प्रवर्तावया कारण येथ । ऐका सुनिश्चित सांगेन मी ॥१७॥
गोदावरीउत्तरतीरी । चौ योजनी चंद्रगिरी । श्रीजनार्दन तेथवरी । दैवयोगे फेरी स्वभावे गेलो ॥१८॥
तो अतिदीर्घ चंद्रगिरी । तळी चंद्रावती नगरी । स्वये चंद्रनाम द्विजवरी । वस्ती त्याचे घरी सहज घडली ॥१९॥
तेणे चतुः श्लोकीभागवत । वाखणिले यथार्थ युक्त । तेणे श्रीजनार्दन अदभुत । झाला उत्पुलित स्वानंदे पै ॥१०२०॥
तेणे स्वानंदे गर्जोन । श्रीमुखे स्वये जनार्दन । बोलिला अतिसुखावून । हे वर्णी गुह्यज्ञान देशभाषा ॥२१॥
तै माझी मध्यम अवस्था । नेणे संस्कृत पदपदार्था । बाप आज्ञेची सामर्थ्यता । वचने यथार्था प्रबोध झाला ॥२२॥
वसिष्ठाचे वचनासाठी । सूर्यमंडळी तपे छाटी । शिळा तरती सागरपोटी । श्रीरामदृष्टिप्रतापे ॥२३॥
विश्वामित्रवाक्ये जाण । कौलिका स्वतंत्र स्वर्गस्थान । तेवी मी एकाजनार्दन । गुरुकृपा पूर्ण ज्ञानार्थकरिता ॥२४॥
गुरु आज्ञेमुळे ग्रंथार्थ स्वयमेवच प्रकट झाला
नवल आज्ञेची सामर्थ्यता । मी करु नरिघें जरी ग्रंथा । तो ग्रंथार्थ मज आंतौता । बळेचि ज्ञानार्था दाटोनी दावी ॥२५॥
हे सांडूनिया ग्रंथकथनं । मज कर्मातरी रिघता जाण । त्या कर्मामाजी गुह्यज्ञान । ग्रंथार्थ पूर्ण प्रकटे स्वये ॥२६॥
गुरुआज्ञा अत्यंत लाठी । ग्रंथार्थ खेळे माझे दृष्टी । आज्ञेने पुरविली पाठी । फाकटगोष्टीमाजीही ज्ञान ॥२७॥
नित्यकर्म करिता जाण । ग्रंथीचे दिसे गुह्यज्ञान । मागे घालूनिया संध्यास्नान । ग्रंथार्थ पूर्ण प्रकटे पुढा ॥२८॥
जागृती दिसे ग्रथार्थज्ञान । ग्रंथार्थमय जाहले स्वप्न । सुषुप्तीमाजी दुर्जेनवीण । हे गुह्यज्ञान कोंदाटे पै ॥२९॥
शब्दापुढे ज्ञान धावे । ओवीपुढे अर्थ पावे । जे जे जीवी विवंचावे । ते ते आघवे ग्रंथार्थ होय ॥१०३०॥
सदगुरुआज्ञा अतिशयगाढी । रिते अर्धक्षण नसोडी । ते आज्ञा गौरव परवडी । ग्रंथार्थ जोडीजोडिला ऐसा ॥३१॥
यापरी श्रीभागवत । चतुःश्लोकी ज्ञानमथित । तो हा रचिता प्राकृत ग्रंथ । गुरुआज्ञा समर्थ प्रतापतेजे ॥३२॥
एका जनार्दना शरण । भावे वंदिता सदगुरुचरण । स्वप्नी नदिसे जन्ममरण । ब्रम्ह परिपूर्ण होइजे स्वये ॥३३॥
स्वये महाभागवत । चतुःश्लोक गुह्यज्ञानार्थं । परमार्थे आथिला ग्रंथ । हा निश्चितार्थं निजबोधे ॥३४॥
एवं भागवतींच्या मंथितार्था । एकला एका नव्हे कर्ता । ग्रंथग्रंथार्थ अर्थविता । अंगे तत्त्वता जनार्दन झाला ॥३५॥
एका आणि जनार्दन । नांवे भिन्न स्वरुपे अभिन्न । यालागी ग्रंथाचे निरुपण । पूर्णत्वे पूर्ण संपूर्ण झाले ॥१०३६॥ श्लोक ॥४५॥
इतिश्रीभागवते द्वितीयस्कंधे श्रीशुकपरीक्षितिसंवादे एकाकारटीकाया नवमोऽध्यायः । श्रीकृष्णार्पणमस्तु
श्लोक ॥४५॥ ओवीसंख्या ॥१०३६॥
श्रीशुकउवाच ।
संप्रदिश्यैवमजनो जनाना परमेष्ठिनम् ।
पश्यतस्तस्य तद्रूपमात्मनो न्यरुणद्धरिः ॥३८॥
अंतर्हितेंद्रियार्थाय हरये विहितांजलिः ।
सर्वभूतमयो विश्वं ससर्जेदं स पूर्ववत् ॥३९॥
प्रजापतीधर्मपतिरेकदानियमान्यमान् ।
भद्रं प्रजानामन्विछन्नातिष्ठत्स्वार्थकाम्यया ॥४०॥
तं नारदः प्रियतमो रिक्थादानामनुव्रतः ।
शुश्रूषमाणः शीलेन प्रश्रयेन दमेन च ॥४१॥
माया विविदिषन्विष्णोर्मायेशस्य महामुनिः ।
महाभागवतो राजन्पितरं पर्यतोषयत् ॥४२॥
तुष्टं निशाम्य पितरं लोकाना प्रपितामहम् ।
देवर्षिः परिपप्रच्छ भवान्यन्माऽनुपृच्छति ॥४३॥
तस्मादिदं भागवतं पुराणं दशलक्षणम् ।
प्रोक्तं भगवता प्राह प्रीतः पुत्राय भूतकृत् ॥४४॥
नारदः प्राह मुनये सरस्वत्यास्तटे नृप ।
ध्यायते ब्रह्म परमं व्यासायामिततेजसे ॥४५॥
श्रीएकनाथमहाराजकृत चतुःश्लोकी भागवत
समाप्त.
चतुःश्लोकी भागवत – भागवत सार
करी जो सृष्टीची रचना । तया न कळे ब्रह्मज्ञाना ।
तो श्रीनारायणा । शरण रिघे ॥१॥
न कळे ब्रह्मज्ञान । म्हणोनी धरितसे चरण ।
नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥धृ. ॥२॥
ब्रह्मा अत्रीते सांगत । ब्रह्मज्ञान हदयी भरित ।
अत्रि पूर्ण कृपे स्थित । दत्तात्रया सांगतसे ॥३॥
दत्तात्रय कृपे पूर्ण । जनार्दनी पूर्ण ज्ञान ।
जगचि संपूर्ण । एकरुप तयासी ॥४॥
एकाजनार्दनी पूर्ण । ब्रह्मज्ञानाची खूण ।
बोधोनिया संपूर्ण । मिळविले आपणीया ॥५॥
समाप्त
