मी माझे अद्वैत द्वैत
731.
मी माझे अद्वैत द्वैत होउनी ठेले ।
सद्गुरू एका बोले ठेविले ठायी ॥१॥
द्वैत गिळी अद्वैत मेळी ।
चित्ताची काजळी तोडी वेगी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति उदार ।
दीपी दीप स्थिर केला सोयी ॥३॥
अर्थ :
एका सद्गुरूच्या महावाक्यउपदेशाने माझ्या ठिकाणचे मी व माझे द्वैत नाहीसे होऊन मला अद्वैत स्थिति प्राप्त झाली. माझ्या चित्तातील ही द्वैताचे अज्ञान त्या गुरुवचनाने तोडून टाकले. असे माझे श्रीगुरू निवृत्तिराय फार उदार आहेत. त्यांनी माझ्या ठिकाणची आत्मज्योति परमात्मरूप ज्योतिमध्ये एकरूप केली. माऊली ज्ञानदेव सांगतात.
