आकार स्थूल नाशिवंत ।
809.
आकार स्थूल नाशिवंत ।
हे तरी जाईल भूमि आत ।
तयावरी हरि चालत ।
तेणे होईल कृतकृत्य ॥१॥
देहो जावो अथवा राहो ।
पांडुरंगी दृढ भावो ॥२॥
दुजा गुण आपी मिळे ।
तरी मी होईन गंगाजळे ।
हरि अभिषेक अनुदिनी ।
सुखे सर्वांगावरी खेळे ॥३॥
तिजा गुण तेजरुप ।
तरी मी होईन महादीप ।
हरि रंगणी दीपमाळा ।
दीप उजळीन समीप ॥४॥
वायु व्यापक चौथा गुण ।
तरी मी विंजणा होईन ।
हरि अष्टांगे निववीन मना ।
ऐशा दृढ धरीन खुणा ॥५॥
आकाश पाचवा गुण ।
तरी मी प्रासादी राहेन ।
बापरखुमादेविवरा ।
अखंड तुझे अनुसंधान ॥६॥
अर्थ :
उपासकाची देहत्यागानंतरही भगवत्व उपासनेविषयी किती निष्ठा असते ते या अभंगांत सांगतात. स्थूल शरीराचा आकार नाशिवंत असल्यामुळे तो केव्हा तरी भूमीत जाणार तो अशा भूमीत मी घालीन की त्यावरुन भगवान श्रीहरि चालतील. त्यामुळे मी कृतकृत्य होईन. हा माझा देह जावो किंवा राहो पांडुरंगाच्या ठिकाणी माझा अत्यंत दृढभाव आहे. शरीरांतील दुसरा गुण जो पाण्याचा भाग आहे. तो मी गंगेमध्ये नेऊन मिळवीन, म्हणजे श्रीहरिला अभिषेक चालला असता त्या गंगाजळाच्या निमित्ताने श्रीहरिच्या सर्वांगावर मी खेळेन. शरीरातील जो तेजोरुप भाग तो मी श्रीहरिच्या पुढे लावलेल्या निरांजनांमध्ये नेऊन मेळवीन. किंवा श्रीहरिच्या अंगणांत ज्या दीपमाळा लावल्या जातील. त्यामध्येही माझ्या शरीरातील तेजोभाग नेऊन मेळवीन. शरीरातील चवथा गुण जो वायु तो श्रीहरिच्या अंगावर पंख्याने घातला जाणारा जो वारा त्या वाऱ्यामध्ये नेऊन मेळवीन. व त्यामध्ये श्रीहरिच्या आठही अंगांना शीतलता देऊन श्रीहरिला संतोषीत करीन. असा हा माझा दृढ निश्चय आहे. त्याप्रमाणे माझ्या शरीरातील पाचवा जो आकाश गुण तो श्रीहरिच्या मंदिरांत आकाश होऊन राहिन. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला यांचे अखंड अनुसंधान लागावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. असे माऊली सांगतात.
