देह अवसानी काळाची तो
3109.
देह अवसानी काळाची तो संधी । पोहोंचली आधी येवोनियां ॥१॥
कोण सोडवील तुजलागीं बापा । श्रीराम जपा लवलाही ॥२॥
छाया जैशी हाले नाशिवंत खरी । तैशीच ही परी देहाचिया ॥३॥
एका जनार्दनी भुलूं नको माया । काळ तो लवलाह्मा नेईल बापा ॥४॥
३११०
आळस करसी नाम घेता । जासी यमाचिया पंथा । कोण ती सर्वथा । सोडवील तुजलागी ॥१॥
बंधु बहिणी न ये कामा । काय सांगावे तुज अधमा । गुंतलासी स्त्रीभोग कामा । तेव्हा दूर पळती ते ॥२॥
कोण्ही न होती कोणाचे । तू म्हणसी मामे भाचे । एका जनार्दनी साचे । कोणी नाही पामरा ॥३॥
