निळिये निकरे कामधेनु
886.
निळिये निकरे कामधेनु मोहरे ।
निळेपणे सरे निळे नभी ॥१॥
घुमत घुमत निळेमाजी मातु ।
निळेपणी देतु क्षेम कृष्णी ॥२॥
निळिये सागरी निळे निळेपणे सुंदरी ।
रातलीसे हरि विरहिणी ॥३॥
ज्ञानदेव सांगे निळियेचे बागे ।
निळासंगे वोळले गे निळीमाजी ॥४॥
अर्थ :
ज्याप्रमाणे कोवळे हिरवेगार गवत निळसर रंगाचे दिसते. ते गवत पाहून कामधेनुलाही आनंद होतो. व ते खाण्यांच्या नादांत ती घराची वाट विसरून जाते. कारण तिला तो हिरवागार चारा सर्वत्र म्हणजे क्षितीजापर्यंत दिसतो. त्याप्रमाणे गोपी नीलवर्ण परमात्म्याच्या कथेने व नामोच्चाराने आनंदीत होऊन, श्रीकृष्णविरह असून तो भेटला असे समजून त्याला अलिंगन देतात. त्या विरहिणी गोपी निळ्या रूपाच्या श्रीकृष्णसागरांत आपल्या स्वतःच्या निळेपणाने क्रीडा करीत असता शोभू लागल्या. त्या परमात्न दर्शनाने मी तद्रुप होऊन त्याच्या आधिष्ठांनावर विवर्त रुपाने भासणारे जगत त्याचा बाध झाल्यामुळे ते परमात्नरुपच झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
