(वारकऱ्या बरोबर पत्र
3584.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
बैसता कोणापे नाही समाधान । विवरे हे मन तेचि सोई ॥१॥
घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥धृपद॥
नो बोलावे ऐसा करितो विचार । प्रसंगी तो फार आठवते ॥२॥
इंद्रियांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली येचि ठायी ॥३॥
एकसरे सोस माहेरासी जावे । तुका म्हणे जीवे घेतलासे ॥४॥
अर्थ :
कोणाच्याही जवळ बसलो तरी माझ्या मनाला काही समाधान मिळत नाही ते नेहमी माझ्या आईबापाकडेच ओढ घेत आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला मला माहेरची आठवण येत आहे एक क्षणभर देखील मला त्याचा विसर पडत नाही. माहेरासंबंधी कोणाजवळ काहीच बोलू नये असा मी निर्धार तर करतो परंतू प्रसंग आला की पुन्हा ते सर्वकाही मी विसरुन जातो. माझ्या इंद्रियांना माहेराकडे जाण्याची ओढ लागली आहे ती सारखी तिकडे चाल घेत आहे ज्यावेळी माझे इंद्रिय माहेराला जातील त्याचवेळी ते विश्रांत होऊन हरीच्या ठिकाणी निवांत होतील. तुकाराम महाराज म्हणतात, एकदाचे माहेराला जावेच असा सोसच माझ्या जीवाने घेतलाय.
