(वारकऱ्या बरोबर पत्र
3583.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
दोहींमध्ये एक घडेल विश्वासे । भातुके सरिसे मूळ तरी ॥१॥
करिती निरास निःशेष न घडे । काही तरी ओढे चित्त माये ॥धृपद॥
लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणे ॥२॥
अथवा कोणाचे घेणे लागे रीण । नाही तरी हीनकर्मी काही ॥३॥
व्यालीचिये अंगी असती वेधना । तुका म्हणे मना मन साक्ष ॥४॥
अर्थ :
देवाने वारकऱ्यांसोबत एखादया प्रकारचा खाऊ किंवा मला बोलावण्यासाठी मूळ तरी नक्कीच पाठवले असेल. मला निराश करेल असे तरी निश्चिंतच घडणार नाही कारण मातेचे थोडे का होईना चित्त मुलाकडे आपोआप ओढले जातेच. मातेला पुत्राची काळजी घेणे हे स्वाभाविकच आहे त्यामुळे देवाला लौकिकाची थोडी फार तरी लाज वाटेलच आणि मी कसाही वागलो तरी त्याच्याशी देवाला काय कर्तव्य आहे. माझे पालनपोषण करण्यासाठी देवाला एखादे ऋण जरी काढावे लागले तरी ते काढेलच त्यासाठी तो कर्तव्यहीन ठरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जिणे मुलाला जन्म दिला आहे त्या मातेला आपल्या मुलाला जर काही वेदना झाल्या तर तिच्या अंगावर त्या वेदना आपोआप उमटतात याविषयी मुलाचे व आईचे मनच साक्ष आहे.
