उदकी कालवी शेण मलमूत
1480.
उदकी कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयाने ॥१॥
उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना । विन्मुख चरणा संताचिया ॥धृपद॥
दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाचीच मूर्ती ॥२॥
तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥३॥
अर्थ :
स्वच्छ पाण्यामध्ये शेण, मलमूत्र टाकून मनुष्य कसा पवित्र होईल ? त्याप्रमाणे जो मनुष्य संतचरण सेवेला विन्मुख होतो त्याचा उद्धाराला कोठेही जागा राहत नाही. जो मनुष्य जहाजाची सांगड तोडतो तो बुडल्या शिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे आताताई मनुष्य आहेत ते संतांना दुःख देतात, असे मनुष्य पापाचीच मूर्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळी प्रारब्ध फिरते त्यावेळी संतांना त्रास देण्याची, त्यांना दुखावण्याची अशा मनुष्यांना आपोआप बुद्धी येते.
