गुरुकृपा पूर्ण जयासी
70.
गुरुकृपा पूर्ण जयासी लाधली ।
माया ही निरसली तया मनी ॥१॥
येर ते अज्ञान पडिले भ्रमणी ।
संसार-जाचणी अनिवार ॥२॥
जयांचा विकल्प निरसला निश्चित ।
तोच ब्रह्मभूत होउनी ठेले ॥३॥
जयांची वासना निमाली अंतरी ।
तेचि निर्विकारी सहज जाले ॥४॥
जयांचा हा हेत निरसला देहीचा ।
रावो ब्रह्मांडीचा तोचि एक ॥५॥
बहेणि म्हणे काय सांगावे कवणा ।
मायेचा देखणा विरुळा असे ॥६॥
