वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४३. आदित्यहृदय उपदेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088112 · अभंग क्र. ४३

43.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय त्रेचाळिसावा ॥
लक्ष्मणाकडून रावणशक्तीचा भेद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाने क्रोधाने बिभीषणावर शक्ती सोडली :

लक्ष्मणे रणाआंत । ध्वज सारथी छेदून रथ ।
रावण केला हताहत । संग्रामांत साटोपे ॥१॥
रणी लक्ष्मणे केला विरथ । तो राग न मानी लंकानाथ ।
बिभीषणें केला अश्वघात । त्यासी टपत मारावया ॥२॥
लक्ष्मण झालिया परता । करीन बिभीषणाच्या घाता ।
तो सोडीना शरणागता । क्षणार्धता न विंसबे ॥३॥
धीर न धरीच रावण । परता नव्हेचि लक्ष्मण ।
बिभीषणावरी आपण । अति निर्वाण मांडिले ॥४॥
घोडे मारिता । वेगी रथ सांडूनि जाण ।
मारावया बिभीषण । करुनि उड्डाण धांविन्नला ॥५॥
बिभीषण देखोनिया दृष्टी । दांत खाय सकट ओंठीं ।
त्याचे नळीचें रक्त घोटीं । ऐसा दशकंठी क्षोभला ॥६॥
एके घाये होय शांती । ऐसी अभिमंत्रून शक्ती ।
सोडिली बिभीषणाप्रती । लंकापतीं साटोपे ॥७॥
रावणे सोडिता शक्ती । लक्ष्मणे बाणावर्तीं ।
त्रिधा छेदून पाडिली क्षिती । निजशरणार्थीं रक्षिला ॥८॥
राखावया बिभीषण । पाठीराखा लक्ष्मण ।
पाहो न शके रावण । शक्ति छेदून सांडिली ॥९॥
शक्ति छेदिली लक्ष्मणे । ऐसे देखोनि रावणे ।
दुसरी शक्ति सज्जिली तेणे । बिभीषण प्राणें घ्यावया ॥१०॥
बिभीषणाचा घ्यावया प्राण । दुजी शक्ति सज्जी रावण ।
निवारुं जाता लक्ष्मण । दोघे जण मरतील ॥११॥
शक्ति अनिवार्य दारुण । स्वये तोलोनि रावण ।
अनुलक्षोनि बिभीषण । सोडी आपण अति कोपे ॥१२॥
करावया बंधूची समाप्ती । घाव हाणी विसा हाती ।
प्रळयविजुतुल्य दिप्ती । गगनी शक्ती कडाडी ॥१३॥
शक्ति अनिवार्य दारुण । जाणोनिया बिभीषण ।
म्हणे माझे न वांचती प्राण । अचुक मरण मज आले ॥१४॥
बिभीषण चिंताक्रांत । तंव सौ‍मित्र पावला तेथ ।
पाठीसी घालोनि शरणागत । अभयान्वित स्थापिला ॥१५॥
बिभीषणा शरणागता । स्वये स्मरें रघुनाथा ।
नामी नाही मरणावस्था । निर्भयता श्रीरामे ॥१६॥
रामनामाच्या अनुवृत्ती । दोघे स्वानंदे नाचती ।
ते देखोनि लंकापती । विस्मित चित्ती पै झाला ॥१७॥
मी सोडिली दुर्धर शक्ती । ते मरणभय नाही चित्ती ।
दोघे स्वानंदे नाचती । निर्भयास्थिती सौ‍मित्र ॥१८॥
नर वानर नामांकित । मरणभया नाही भीत ।
ते देखोनि लंकानाथ । अति विस्मित पै झाला ॥१९॥

दोन वेळा रावणाने सोडलेल्या शक्ती लक्ष्मणाने निवारिल्या :

अगाध नामाचे महिमान । पुढील कथानुसंधान ।
श्रोती द्यावे अवधान । शक्तिनिवारण सौ‍मित्रे ॥२०॥
बिभीषणाच्या निजघातीं । रावणे सोडिली जे शक्ति ।
सौ‍मित्रे नेली भस्मांतीं । तेही युक्ती अवधारा ॥२१॥
यक्षिणीवटींची मुख्य शक्ती । ते लक्ष्मणा वशवर्ती ।
शक्तीने निवारिली शक्ती । पाडिली क्षिती दुखंडें ॥२२॥
राखावया शरणागत । सौ‍मित्र सदा सावचित्त ।
तेणे क्षोभला लंकानाथ । येणे भ्रातृघात चुकविला ॥२३॥
येणे शक्तिपातें जाण । निःशेष मरावा बीभीण ।
आडवा येवोनि लक्ष्मण । शक्तिच्छेदन तेणे केले ॥२४॥
आधी मारीन लक्ष्मण । मग मारीन बिभीषण ।
ऐसे आक्रोशे रावण । शक्ति निर्वाण काढिली ॥२५॥
जिचें नांव ब्रह्म्शक्ती । जे निवारेना रघुपती ।
सौ‍मित्राच्या निजघातीं । निर्वाणार्थी सोडित ॥२६॥
विमुख करोनि माझी ख्याती । भस्म केल्या दोन्ही शक्ती ।
तेणे क्षोभला लंकापती । ब्रह्मशक्ती सोडित ॥२७॥
नानापरींच्या दुर्धरा युक्ती । मयें केली मायिक शक्ती ।
ते न चले श्रेष्ठ सुरवरांप्रती । लंकापति सचिंत ॥२८॥
तेणे प्रार्थिला प्रजापती । मागितली ब्रह्मशक्ती ।
अनिवार्य त्रिजगती । ब्रह्मवरदोक्ती दुर्धर ॥२९॥

रावणाने ब्रह्मशक्ती लक्ष्मणावर सोडिली :

ब्रह्मा म्हणे रावणा । शक्ति सर्वांच्या घेईल प्राणा ।
अवतारपुरुषीं जाणा । बाधकपणा चालेना ॥३०॥
अवतारपुरुषाप्रती । माझी बाधेना ब्रह्मशक्ती ।
प्राण न घेववे तिचेनि निश्चिती । त्याचेनि शक्ति संपेल ॥३१॥
ज्यावरी शक्ति प्रेरणे । तेणे जीवे नाही वांचणें ।
ऐसी ब्रह्मशक्ती रावणे । लक्ष्मणाकारणें सज्जिली ॥३२॥
शक्तीने मारावा बिभीषण । तो सौ‍मित्रे वांचविला आपण ।
संमुख लक्षोनि लक्ष्मण । काय रावण बोलत ॥३३॥
शक्ति निवारुन जाण । त्वा वांचविला बिभीषण ।
आता तुझा घेईन प्राण । शक्ति दारुण सोडूनी ॥३४॥
शक्ति सोडीन दारुण । तिसी न चले निवारण ।
हृदय भेडुन संपूर्ण । घेवोनि प्राण येईल ॥३५॥
माझे शक्तीचा आघात । चुकविल्या कळेल पुरुषार्थ ।
ऐसे बोलोनि लंकानाथ । शक्ति सोडित साटोपे ॥३६॥
शक्तितेजाच्या कडाडीं । उभय सैन्या पडे झांपडी ।
प्रळयविजूच्या पडिपांडीं । गगन गडाडी गडगर्जे ॥३७॥
सौ‍मित्र आणि रघुनाथ । तिसरा वीर हनुमम्त ।
यांचीचि नेत्रें सावचित्त । येर मूर्च्छित शक्तितेजें ॥३८॥
शक्ति देखोनि दुर्धर । लक्ष्मणयोद्धा वीर धीर ।
डंडळीना अणुमात्र । सज्जोनि शर छेदित ॥३९॥
शक्ति कडाडितां गगनी । लक्ष्मणे विधोंनि बाणी ।
शतधा सांडिली छेदूनी । घातली पिटोनि निरालंबी ॥४०॥
ब्रह्मशक्ती अति निर्वाणीं । गगनी येता कडाडूनी ।
लक्ष्मणाच्या संरक्षणीं । कृपावचनी वदे राम ॥४१॥

श्रीरामांनी ब्रह्मशक्ती क्षीण करुन परतवून लाविली :

श्रीरामदृष्टी अवलोकन । शक्तीची शक्ति केली क्षीण ।
ब्रह्मशक्तीसी देवोनी मान । राखिली निर्वीर्यत्वें ॥४२॥
श्रीरामे शक्ति केली क्षीण । त्यावरी लक्ष्मणे विंधिता बाण ।
शक्ति पडत पडता जाण । झेली रावण साटोपे ॥४३॥
तू ब्रह्मयाचीं ब्रह्मशक्ती । निष्फळ केंवी पालसी क्षिती ।
रावणे घेवोनि हाती । हाणी पुढती सौ‍मित्रा ॥४४॥
जवळून शक्ति हाणिता जाण । लक्ष्मण विंधील तीव्र बाण ।
येणे भेणे रावण । हाणी आपण दुरोनी ॥४५॥
रावणे शक्ति घेवोनि हाती । आपुलिया सर्वशक्ती ।
सोडिली सौ‍मित्राप्रती । सकोपवृत्ती साटोपे ॥४६॥
अंगबळें जांघबळें । बाहुबळें प्रतापशीळे ।
शक्ति सोडिता रणकल्लोळें । गगना उसळे कडकडित ॥४७॥
लक्ष्मण वीर अति निधडा । कदा न सरे मागांपुढां ।
शक्ति छेदिली तडपडां । निजकुर्‍हाडा विंधोनी ॥४८॥
मयासुरें निर्मिली होती । जे ते छेदिली बाणावर्तीं ।
उरली केवळ ब्रह्मशक्ती । ब्रह्मवरदोक्ती अनिवार्य ॥४९॥
शक्ति येतांच संपूर्ण । लक्ष्मणे विंधोनि बाण ।
सत्यलोकावरती जाण । उडवी आपण साटोपे ॥५०॥
शक्ति निजबळे येऊ पाहे । लक्ष्मण बाणी पिटीत जाये ।
शक्ति उसणे घेवो न लाहे । दुर्धर घाये हाणित ॥५१॥
शक्ति तळपोनि गुप्तगीं । अंगी आदळावया पै टपती ।
लक्ष्मणे खड्ग घेवोनि हाती । उडविली मागुती सत्यलोका ॥५२॥
खड्गघायाच्या खणाणीं । शक्ति छेदिता रणांगणी ।
ठिणग्या उसळल्या गगनी । जेंवी तारागणीं नभशोभा ॥५३॥
लक्ष्मण असता सावचित्त । होऊं न शके शक्तिपात ।
हे जाणोनि लंकानाथ । करी छळणार्थ ते ऐका ॥५४॥
लक्ष्मणवीर अति गाढा । अचुकसंधानीं नित्य निधडा ।
शक्ति येऊ नेदी अंगाकडा लाविले वेडा लंकेशा ॥५५॥

श्रीरामवधाची खोटी बातमी रावण उठवितो :

लक्ष्मण पडावया दुश्चित । छळण करी लंकानाथ ।
रणी मारिला रघुनाथ । राक्षस गर्जत अति गजरें ॥५६॥
रावणाच्या निजबाणीं । राम पडिला रणांगणी ।
लक्ष्मणे ऐकता हे वाणी । काया वाचा मनी विकळ गेला ॥५७॥
मन झाले सचिंत । धनुष्यी विकळ गेला हात ।
रामविरहें अति दुश्चित । तंव शक्तिपात आदळला ॥५८॥

दुश्चित लक्ष्मणावर शक्तीचा प्रहार :

शक्ति भेदतां हृदयासी । रामस्मरण सौ‍मित्रासी ।
शक्तिभेद झाला हृदयासी । वरकांतीसी लागली ॥५९॥
जेथे श्रीरामाचे स्मरण । तेथे सर्वदा न रिघे मरण ।
शक्ति बापुडी ते कोण । वरकांती जाण लागली ॥६०॥
हृदयी लागतांचि शकी । लक्ष्मण विकळ पडला क्षिती ।
ते देखोनि रघुपती । कृपानुवर्तीं गहिंवरला ॥६१॥

क्रोधाविष्ट श्रीरामांचा रावणावर बाणांचा वर्षाव :

आसवें स्रवती लोचन । राम झाला विषण्ण्वदन ।
लक्ष्मणाचा गेला प्राण । काय आपण करावे ॥६३॥
लक्ष्मण रणी पडल्या जाण । श्रीरामासी दुःख दारुण ।
अश्रुधारा स्रवती नयन । सबाष्प वचन बोलत ॥६३॥
तेंचि काळी रघुना । क्षण राहोनिया ध्यानस्थ ।
लक्ष्मणा नाही जीवघात । जाणोनि युद्धार्थ आरंभी ॥६४॥
रणी मारावया रावण । काळकृतांत प्रळयाग्नि पूर्ण ।
तैसा खवळला रघुनंदन । धनुष्यी बाण सज्जूनी ॥६५॥
येता श्रीरामाचे बाण । त्यांसी न चले निवारण ।
तेणे गजबजिला रावण । पळे आपण अति धाके ॥६६॥
लक्ष्मणाचे क्षोंभे जाण । रामे मांडिलें निर्वाण ।
विंधिता बाण घेईन प्राण । धाके रावण पळे दुरी ॥६७॥

रावणाचे पलायन :

पळोनियां उठाउठी । गुप्त राहता सैन्यगोठीं ।
तरी रावण धाके पोटी । रामशरवृष्टी साहवेना ॥६८॥
जैसा का चंडवात । मेघां करीत हताहत ।
तैसा रावण सैन्याआंत । स्वये पळत अति धाके ॥६९॥
श्रीरामवीर जगजेठी । न लागे पळतयापाठीं ।
रावण निजसैन्याचे गोठीं । अति संकटी राहिला ॥७०॥
श्रीरामे नेम केला आपण । रणी मारावा रावण ।
रावण सैन्यीं राहिला लपोन । आपणा आपण वांचविले ॥७१॥
रणी असता लंकानाथ । विषादकाळ नव्हे येथ ।
सौ‍मित्र करावा सावचित्त । हाचि पुरुषार्थ पै आम्हा ॥७२॥

तं ददर्श तदा रामः शक्त्या निर्भिन्नमाहवे ।
लक्ष्मणं रुधिरादिग्धं सपन्नगमिवाचलम् ॥१॥
सौ‍मित्रिं चैव सा भित्वा विवेश धरणीतले ।
तां कराभ्यां परामृश्य रामः शक्तिं भयावहाम् ॥२॥
बभंज समरे क्रुद्धो बलेनापचकर्ष च ।
तस्य चाकर्षतः शक्तिं नाराचान्दीप्ततेजसः ॥३॥
निवखान दशग्रीवः सर्वगात्रेषु वीर्यवान् ।
अचिंतयित्वा तान्बाणान्समुत्थास स लक्ष्मणम् ॥४॥
अब्रवीच्च हनूमन्तं सुग्रीवं चैव वानरम् ।
लक्ष्मणं संपरिष्वज्य नीत्वा चैव स्वमालयम् ॥५॥
अस्मिन्मुहूर्ते न चिरात्सत्यं प्रतिशृणोमि वः ।
अरावणमरामं वा जगद्द्रक्ष्यथ वानराः ॥६॥

लक्ष्मणाच्या देहातील शक्ती उपटून लक्ष्मणाची शिबिरात पाठवणी :

रावण लपोनि रणमेळीं । राम येवोनि सौ‍मित्राजवळी ।
शक्ती भेदूनि हृदयकमळीं । धरातळी प्रवेशली ॥७३॥
जैसा सर्पप्रवेशे वारुळीं । तैसी शक्ति भेदली हृदयकमळीं ।
ते देखोनि तये वेळीं । राम कळवळी बंधुस्नेहें ॥७४॥
राम कृपाळु संपूर्ण । शक्ति उपडावया जाण ।
वांचवावया लक्ष्मण । करी स्पर्शन अमृतहस्तें ॥७५॥
शक्ति भेदली हृदयांत । तिसी श्रीरामे लावोनि हात ।
स्वये उपडूं पाहत । बहुत वर्जित नाना युक्ती ॥७६॥
शक्ति उपडितांचि जाण । लक्ष्मणाचा जाईल प्राण ।
एक म्हणती ऐसे आपण । सर्वथा जाण न करावे ॥७७॥
बाप कृपाळु रघुपती । त्यांच्या उपेक्षोनि नाना युक्ती ।
शक्ति उपडी निजहस्तीं । कृपामूर्ति कृपाळु ॥७८॥
श्रीरामे लावितांचि हात । शक्ति झाली वीर्यहत ।
लक्ष्मण मारावयाचें सामर्थ्य । हताहत होवोनि गेले ॥७९॥
ब्रह्मवरदोक्ती पुरती । हृदयी रुतली ब्रह्मशक्ती ।
ते श्रीरामे धरोनि हाती । स्वलीला युक्ती छेदिली ॥८०॥
शक्ति उपडितां रघुनंदन । ते संधि साधोनि रावण ।
श्रीरामावरी वर्षे बाण । अति दारुण साटोपे ॥८१॥
रावणाचे येता बाण । राम मानी तृणासमान ।
स्वहस्तें उठवोनि लक्ष्मण । दे आलिंगन अति प्रीती ॥८२॥
हनुमान सुग्रीवादि जाण । पाचारोनि वानरगण ।
श्रीराम सांगे आपण । न्यावा लक्ष्मण स्वस्थाना ॥८३॥
ग्रीष्मांतीं चातकासी । मेघ निववी जीवनेंसीं ।
तेंवी निववावें लक्ष्मणासी । तंव रावणासी मी वधीन ॥८४॥

राम-रावण युद्ध :

आजी प्रतिज्ञेचें माझे रण । पृथ्वी देखाल अरावण ।
की अराममय जाण । जग संपूर्ण देखाल ॥८५॥
रामनामी न ये मरण । तो राम केंवी मरे आपण ।
रणी निमाला रावण । अवघे जण देखाल ॥८६॥
राम जगाचा आत्माराम । जेथे न रिघे जन्ममरण ।
रावणासीं मरणधर्म । अलोट मरण पै आले ॥८७॥
राम चैतन्यविग्रही । राम देहीच विदेही ।
राम द्वंद्वातीत पाही । राम ठायींच्या ठायी परब्रह्म ॥८८॥
रामेंवीण सर्वथा । तिळभरी ठाव नाही रिता ।
मिथ्या जन्ममरणवार्ता । पुढील कथा अवधारा ॥८९॥
शिबिरा धाडो लक्ष्मण । बानें विंधिता रावण ।
त्यावरी श्रीराम आपण । क्षोभला दारुण शरवृष्टीं ॥९०॥
ज्यालागीं सुग्रीवा राज्यदान । ज्यालागीं आणिले वानरगण ।
तो मारीन आजि रावण । निर्वाणबाण विंधोनी ॥९१॥
ज्या लागीं आणोनि पाषाण । समुद्री केले सेतुबंधन ।
तो मारीन रावण । निर्वाणबाण विंधोनी ॥९२॥
माझिया युद्धाचा चमत्कार । देखोत सुर नर किन्नर ।
सिद्ध चारण विद्याधर । देखोत समग्र सुर सिद्ध ॥९३॥
रामे करोनि दुर्धर रण । मारिला अति गवी रावण ।
पुढे पृथ्वीवरी जाण । हे पढती पुराण सुरसिद्ध ॥९४॥
ऐसे बोलोनी रघुपती । सुवर्णपुंखी भल्ल हाती ।
सतेज घेवोनि धगधगती । लंकापती विंधिला ॥९५॥
रावणे सज्जोनि बाण । रणी विंधिला रघुनंदन ।
समूळ नाराच शर दारुण । विंधी आपण लघुवेगें ॥९६॥
सुटलें दोहींचें शरजाळ । भूतळा आणि अंतराळ ।
बाणी कोंदलें दिग्मंडळ । कुळाचळ कोंदले ॥९७॥
दोघे वीर अति उद्‌भट । वारया वाहों न देती वाट ।
शस्त्रे हाणिता खणखणाट । हव्यवाट ऊठिला ॥९८॥
शस्त्रे हाणिता बळोन्मेंळीं । ठिणग्या उठती अग्निकल्लोळीं ।
बाण जळती अंतराळीं । आतुर्बळी रणयोद्धे ॥९९॥
श्रीरामाचे दुर्धर बाण । निवारुं न शके रावण ।
भेदोनिया अंगत्राण । अंगी संपूर्ण आदळती ॥१००॥

श्रीरामांनी रावणाचे धनुष्य, कवच, रथ, व अश्व यांचा छेद केला :

धनुष्य छेदिलें हातींचे हाती । रथींचा मारिला सारथी ।
रथीचें वारु पाडिले क्षिती । केला विरथी लंकेश ॥१॥
छत्रपात मुकुटपात । ध्वजपात रथपात ।
पांचवा झाला कळापात । रणी रघुनाथ खवळला ॥२॥
छेदावया दशकंठी । रामे शर सज्जिले नेटीं ।
तंव रावणे देवोनि पाठी । उठाउठी पळाला ॥३॥
रणी मारावा लंकानाथ । निर्वाण नेमे आला रघुनाथ ।
रावण पळोनि बुद्धिवंत । जीवघात चुकविला ॥४॥

संकीर्यमाणः शरजालवृष्टिभिर्महात्मना दीप्तधनुष्मता रणे ।
भयात्प्रदुद्राव समेत्य रावणोयथानिलेनाभिहतो बलाहकः ॥७॥

रावणाचे लंकेमध्ये पलायन :

रामे मारावें रावणासी । रावणाची बुद्धि कैसी ।
पळोनिया रणभूमींसीं । आपअपणासी वांचविले ॥५॥
राम न मारी पळत्यासी । हे कळलें आहे रावणासी ।
पळोनियां लागवेगेंसीं । आपआपणासी वांचवी ॥६॥
रामबाणी जर्जरीभूत । रावण झाला हताहत ।
काही न चले पुरुषार्थ । मागे पळत अति धाके ॥७॥
लंकेचा जो लंकानाथ । अपमानला रणाआंत ।
मोकळ्या केशीं पायी पळत । घायीं कुंथत अति दुःखी ॥८॥
मेघ उडती चंडवातें । गज पळती सिंहाभिघाते ।
गरुड पळवी सर्पांतें । तेंवी रावणातें श्रीराम ॥९॥
यापरी स्वये रावण । सांडून गेला रणांगण ।
पुढील कथानुसंधान । सावधान अवधारा ॥१०॥
एका जनार्दना शरण । रणी पळवोन रावण ।
उठवावया लक्ष्मण । कृपाळु पूर्ण परतला ॥११॥
राम स्वानंद कृपाळु । राम सप्रेम स्नेहाळु ।
राम स्वये दीनदयाळु । प्रणतपाळु श्रीराम ॥११२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणशक्तिभेदो नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥४३॥
ओंव्या ॥११२॥ श्लोक ॥७॥ एवं ॥११९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग