धावा धावा नगरवासी ।
316.
धावा धावा नगरवासी । लास भक्षिते लेकुरासी ॥1॥
अवघे होऊनिया गोळा । कोणी न जातो देउळा ॥2॥
जाळ करोनी पाहती । शेण धुळी धोंडे माती ॥3॥
मारोनी बाहेर घातली । केली डोंबाचे हवाली ॥4॥
हिच्या करा शिरच्छेदाला । तव तो आज्ञापी रायाला ॥5॥
राये घेऊनिया तिला । आणियेले ठिकाणाला ॥6॥
म्हणे करी हो स्मरण । तुझे कुळदैवत कोण ॥7॥
खर्ग पुसोनिया धारा । घाव घाली जो शिरा ॥8॥
ऋषि धावला सत्वरी । वरच्यावरी कर धरी ॥9॥
म्हणे माग मी प्रसन्न । येरी बोले हास्यवदन ॥10॥
रोहिदासा ऐसा पुत्र । हरिश्चंद्र राजा भ्रतार ॥11॥
याचक विश्वामित्रा ऐसा । जन्मोजन्मी दे जगदीशा ॥12॥
बापा भली केली सीमा । तप वोपितो मी तुम्हा ॥13॥
गगनी विमाने दाटती । सुमनभार वरुषती ॥14॥
वेगी उतरले विमान । नामयाची जनी म्हण ॥15॥
