ओवाळु आरती पंढरीनाथ
23.
ओवाळु आरती पंढरीनाथ देवा सदगुरुनाथा ।
भावे शरण आलो भक्ती शरण आलो चरणी ठेविला माथा ॥
पाहता तुझे रुप दिसे सर्वा ठायी, देवा सर्वा ठायी ।
सर्वाहुन वेगळा आम्हा जवळच पाही ॥
सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी ।
ही खुण दाविली आम्हा जवळच पाही ॥
संत साधुजन अवघे विश्वरुप देवा विश्वरुप ।
पाहु गेलो महिमा महिमा तुझे न कळे स्वरुप ॥
पंच प्राणांची उजळोनी आरती देवा उजळोनी आरती ।
भावे ओवाळिता राही रुक्मिणीचा पती ॥
सत्याची आरती सत्य भावे ओवाळू देवा सत्यभावे ओवाळू ।
बोधला उभा दास तुझा उभा, आपल्या चरणाजवळी ॥
