भगवे तरी श्वान सहज व
3012.
भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथे अनुभवाचा काय पंथ ॥१॥
वाढवुनी जटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥धृपद॥
कोरोनिया भूमी करिती मधी वास । तरी उंदिरास काय वाणी ॥२॥
तुका म्हणे ऐसे कासया करावे । देहासी दंडावे वाउगेंचि ॥३॥
अर्थ :
काही मनुष्य अंगावर भगवी वस्त्रे धारण करतात मग त्याचा अर्थ असा थोडा होतो की त्यांना हरीच्या प्राप्तीच्या अनुभव आला किंवा ते हरीपंथाला लागले आहेत असे असले तर मग एखादया कुत्र्याचा रंग सहजच भगवा असतो मग त्या कुत्र्याला देखील हरीच्या प्राप्तीचा अनुभव किंवा हरी प्राप्तीचा मार्ग सापडला असा होतो काय ? अहो एखादा मनुष्य असा असतो की, जटा वाढवून दाही दिशा फिरत असतो परंतू त्याचा काही उपयोग होतो काय आणि तसे पाहिले गेले तर कोल्हयाचा देखील वेश तसाच असतो तोही तसाच सर्वत्र फिरत असतो. अहो काही लोक तर भूमी कोरुन भूमीमध्ये वास करतात मग त्याच्यासारखेच उंदीर देखील भूमी कोरुन भूमीत वास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, पण मी म्हणतो असे का करावे देहाला विनाकारण दंड का दयावा ?
