घालूनिया मध्यावर्ती
3215.
घालूनिया मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥१॥
ऐसे पोटभरे संत । तया कैचा भगवंत ॥धृपद॥
रांडापोरांते गोविती । वर्षासने ते लाविती ॥२॥
जसे बोलती निरोपणी । तैसी न करिती करणी ॥३॥
तुका म्हणे तया । तमोगुणियांची क्रिया ॥४॥
अर्थ :
शिष्य करण्यासाठी काही लोक मध्यस्थी कोणाला तरी घेतात आणि बळेच त्याला उपदेश करतात. असे हे पोट भरणारे संत आहेत मग त्यांना भगवंत तरी कसा प्राप्त होईल ? असे हे निर्लज्ज लोक भोळया भाबड्या बायका मुलांना आपल्या वचनामध्ये गुंतवून टाकतात आणि प्रतिवर्षी पैसे दयावेत असा करार त्यांच्याकडून करुन घेतात. किर्तनामध्ये जसे बोल हे लोक बोलतात त्याप्रमाणे वागत तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांच्या प्रत्येक क्रिया म्हणजे तमोगुणानेच भरलेल्या आहेत.
