(ज्ञानेश्वर महाराजां
3398.
(ज्ञानेश्वर महाराजांना उद्देशून महाराज म्हणतात)
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायींची वाहाण पायी बरी ॥धृपद॥
ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे । इतर तुळणे काय पुढे ॥२॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥३॥
अर्थ :
हे श्रीज्ञानेदव माऊली तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात नव्हे नव्हे त्यांचे गुरु आहात असे सर्वजण म्हणत असतात. मग तुम्ही धरणेकरी ब्राम्हणास माझ्याकडे उपदेश घेण्यास पाठविले माझा पामराचा एवढा मोठेपणा तरी आहे काय पायाची वहाण कधीही पायातच चांगली. अहो ब्रम्हादिक देव तुम्हाला शरण येतात तुमच्यापुढे नम्र होतात मग तेथे तुमच्याशी बरोबरी करण्याकरता इतर कोण पुरे पडणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा ज्ञानेश्वरा तुमचे वर्णन कसे करावे तुमच्या थोरवीचे गुणगान कसे गावे कोणती युक्ती चालवावी कोणते शब्द वापरावेत तुमचे वर्णन करण्यास खोल युक्ती कशी करावी हे मला समजत नाही त्यामुळे मी तुमच्या पायावर डोके ठेवले आहे.
