त्रिभंगी त्रिभंग जया
69.
त्रिभंगी त्रिभंग जया अंगसंग । एकरूप सांग वोघवतसे ॥१॥
ते रूप सावळे भाग्ययोगे वोळे । नंदाचे सोहळे पाळियेले ॥२॥
श्रुतिप्रतिपाद्य शास्त्रांसि जे वंद्य । निर्गुणाचे आद्य भाग्यनिधी ॥३॥
निवृत्ति नितंब रूपस स्वयंभ । कृष्णनामे बिंब बिंबलेसे ॥४॥
अर्थ:
जरी कृष्ण रुपात तिन ठिकाणी वाकडा देहुडा असलेला परमात्मा मात्र एकात्मरुपाने जगात आहे. ते सावळे सुंदर कृष्ण रुप दैवयोगाने नंदाला प्राप्त झाले आहे. व ते नंदाचा आनंद द्विगुणित करत आहे. ज्याचे वर्णन करायचा प्रयत्न वेद व शास्त्र करतात जो वेदांना वंद्य आहे. ते निर्गुण गणातीत स्वरुप आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्या पितांबरधारी सुंदर रुपाने माझा अंतःकरणाला व्यापले आहे.
