विश्वंभरमूर्ति विश्व
68.
विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक । वैकुंठव्यापक जीवशिव ॥१॥
ते रूप सुंदर नंदघरी वसे । जनीवनी वसे कृष्णरुप ॥२॥
निखळ निघोट नितंब परिपूर्ण । आनंदपूर्णघन गोपवेषे ॥३॥
निवृत्ति परिकर वैकुंठ अपार । भाग्य पारावार यशोदेचे ॥४॥
अर्थ:
विश्वाचे भरणपोषण तो परमात्मा विश्वाचा पालक आहे तो वैकुंठा पा़सुन जीवशिवा पर्यंत सर्वत्र तोच आहे. जनीवनी असलेले ते सर्वव्यापक रुप कृष्णरुपाने गोकुळात नंदाघरी आले. तो नितळ, निघोट परमात्मा कंबरेला पितांबर बांधुन गोपवेशात साकार झाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ज्या सुंदरतेला मर्यादा नाहीत असा तो परमात्मा यशोदेचे मुल होऊन गोकुळात राहतो हे तिचे भाग्य आहे.
