वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४९. देवांची स्तुती

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088135 · अभंग क्र. ४९

49.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय एकूणपन्नासावा ॥
लक्ष्मण शुद्धीवर आला

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम शांत होतात :

श्रीराम प्रार्थिता वानरगण । शरणागत बिभीषण ।
सृष्टिघाता कळवळोन । केले उपशमन क्रोधाचें ॥१॥
शांत करोनि कोपासी । आविष्टोनि मोहावेशीं ।
काय बोलत सुग्रीवासी । सावकाशी परियेसा ॥२॥

प्रशांतिमगमत्कोपो राघवस्य महात्मनः ।
भूयः शोकसमाविष्टो रामो दशरथात्मजः ॥१॥
अब्रवीद्राघवो दीनः सुग्रीवं वानरेश्वरम् ।
सुग्रीव गच्छ किष्किंधां सहवानरसेनया ॥२॥
कृतं मित्रसहायं तु यदन्यैर्भुवि दुष्करम् ।
अहं चाद्य महाबाहो यत्करिष्यामि तच्छृणु ॥३॥

श्रीरामांची सुग्रीवाकडे निर्वाणीची भाषा :

पुढे घेवोनि लक्ष्मण । सुग्रीवातें बोलावोन ।
अदीन परी दीनवचन । दशरथनंदन बोलत ॥३॥
सुग्रीवा परीस विनंती । तू अवंचक मित्रकार्यार्थी ।
तुझे उपकार किती । म्या वचनोक्तीं बोलावे ॥४॥
मज न बोलावे सर्वथा । काय तोंड दावूं समस्ता ।
कुढावीन शरणागता । वचन वृथा वल्गलों ॥५॥
माझे अंतकाळीचें वचन । तुवा नुल्लंघावे आपण ।
सवे घेवोन वानरगण । किष्किंधे गमन करावे ॥६॥
बिभीषणही सवे न्यावा । सर्व प्रकारें संरक्षावा ।
रावण करोनिया मावा । घेईल जीवा याचिया ॥७॥
वृथा जल्पलों यासी । संहारीन रावणासी ।
अभीषेकीन बिभीषणासी । निजगजरेंसी अति वोजा ॥८॥
वृथा गेला तो पण । न मारवेचि रावण ।
न कुढाविता बिभीषण । प्राणें लक्ष्मण वेंचला ॥९॥
सौ‍मित्राचें निजबळे । छेदीन रावणाचे शिसाळें ।
ते अवघेंची वृथा गेले । रणी मोकलिले सौ‍मित्रे ॥१०॥
रावण बापुडे किती । सौ‍मित्रबळें त्रिजगती ।
नागवें मी रघुपती । ते शक्ति प्रतिहत झाली माझी ॥११॥
सौ‍मित्र माझा निजप्राण । सौ‍मित्रे मी सबळ जाण ।
त्रिभुवन आक्रमी ॥१२॥
सौ‍मित्र माझी स्थिति गती । सौ‍मित्र माझी धृति विरक्ती ।
सौ‍मित्र माझी अढळ शांती । त्रिजगती माझारी ॥१३॥
सौ‍मित्र माझा निजावा । सौ‍मित्र माझा विसावां ।
सौ‍मित्र माझा वोलावा । सौ‍मित्रेंवीण जीवा जीवपण कैंचें ॥१४॥
सौ‍मित्रे मोकलितां येथ । कांही नाही मी रघुनाथ ।
जळो जळो हे जीवित अति निंदित लौकिकी ॥१५॥
बिभीषणाचा ऋणी । मी झालों सकळ जनी ।
उत्तर बोलवे वचनी । लाज मनी वाटत ॥१६॥
तुज असेल सामर्थ्य । तरी निवटोनि लंकानाथ ।
अभिषकीं शरणागत । मज ऋणमुक्त तू करी ॥१७॥
इतुकेनि मी तुमचा । कृतोपकारी जन्माचा ।
ऋणी आहे सकळांचा । बहुत वाचा काय बोलू ॥१८॥
म्हणोनि घातले लोटांगण । सुग्रीवा तुझे धरिले चरण ।
करावे किष्किंधागमन । बिभीषणसमवेत ॥१९॥
कृपा करावी वानरांसी । सुख द्यावे प्रजेसी ।
भोगी स्त्रीपुत्रराज्यासी । शरणगतासी कुढावीं ॥२०॥
सौ‍मित्रावाचून जाण । माझे न वांचती प्राण ।
सौ‍मित्र गेला मोकलून । उभ्यां प्राण सांडीन ॥२१॥
चेतवूनि योगाग्नी । देह जाळीन तत्क्षणीं ।
लोकालोकीं झाडा घेऊनी । सौ‍मित्रासी भेटेन ॥२२॥
जेथे गेला लक्ष्मण । तेथे स्वये जाईन ।
प्राण न राहती अर्ध क्षण । करीन गमन सांगतें ॥२३॥
जेंवी शुष्क काष्ठ जळे । सर्वांग माझे तेवी होरपळे ।
गात्रें विकळ झाली सकळे । शरीर चळचळें कांपत ॥२४॥

एवमुत्कस्तु रामेण सुग्रीवो वाक्यमब्रवीत् ।
किमर्थ मुह्यसे देव त्वादृशो नैव मुह्यति ॥४॥

सुग्रीव म्हणे रघुनाथा । हे बोलणें न घडे सर्वथा ।
तुजवीण राज्य भोगितां । महादोष माथा वाजती ॥२५॥
तुजवीण जे राज्य भोगणें । ते जेंवी अभक्ष्य भक्षणें ।
तुजवीण स्त्री सेंवणें । मातृगमन तो दोष ॥२६॥
तुजवीण जो विषयभोग । तो जाणावा क्षयरोग ।
कैंचा संसारस्वर्ग । नरकभोग भोगावा ॥२७॥
तुजवीण भोगणें सुख । त्याहून मरण भलें देख ।
सांडून जाता रघुकुळटिळक । आकल्प नरक भोगावा ॥२८॥
तुज सांडितां रघुपती । तेव्हांचि आम्हा क्षीण शक्ती ।
रावण येवोनि शीघ्रगती । घात निश्चिती करील ॥२९॥
मरावे जै रावणहस्तें । तै येथेंचि सांडू देहाते ।
अनुसरल्या श्रीरामाते । केंवी मागुतें परतावें ॥३०॥
श्रीरामा ऐक सावधान । एकाएकी निर्वाण ।
करू नये गा आपण । तू रघुनंदन विवेकी ॥३१॥
दृढ न विचारिता चित्ती । निर्वाण न करावे निश्चिती ।
गेला आहे मारुती । तो कार्य सिद्धीप्रती साधील ॥३२॥
संधी लोतली तीन प्रहर । रात्र उरली एक प्रहर ।
आता येईल कपींद्र । ओषधिभार घेऊनी ॥३३॥
हनुमान येथोनि गेला । समाचार देखोनि राहिला ।
तेणे विलंब लाविला । तो रिता वहिला परतेना ॥ अ३४ ॥
कांही पडली असेल गुंती । क्षणे उठवी मारुती ।
अतुळ तयाची शक्ती । त्रिजगती नाटोपे ॥३५॥
अदट दाटुगा महावीर । मुखी रामनाम निरंतर ।
त्या कोण अर्थ दुस्तर । कार्य सत्वर साधील ॥३६॥
ब्रह्मादिका दुर्धर शक्ती । तो रिता परतेल मारुती ।
ऐसे न मानावे रघुपती । शिघ्रगतीं येईल ॥३७॥

इति तेषां बुवाणानां हनूमान्मारुतात्मजः ।
प्रदिप्त इ शैलेंद्रो गगने समदृश्यत ॥५॥
किमेतदिति संभ्रांताः कपयो जातविस्मयाः॥६॥

उत्तर दिशेकडून हनुमंताची चाहूल :

तंव उत्तरेच्या दिशाभागीं । जैसी धगधगीत आगी ।
दिसताहे लागवेगीं । येत स्वमार्गीं देखियेला ॥३८॥
आधीच हनुमान ढिसाळ । पुच्छी पर्वत सबळ ।
देखोनिया वानरपाळ । एक सहेळ पळाले ॥३९॥
एकी लंघिली गिरिकंदरे । एकी पर्वतशिखरें ।
एकी समुद्राची तीरें । वेगवत्तर पळाले ॥४०॥
एक रिघाले कपाटीं । एक रिघाले दिक्पुटीं ।
एकी झाडां घातली मिठी । एक संकटीं पडियेले ॥४१॥
एक भरले दशदिशां । एकांचा दाटला घसा ।
एका बोलवेना सहसा । एकी धिंवसा सांडिला ॥४२॥
एक सरसावले युद्धासीं । एक वृक्षासे हातवसी ।
एक घेवोनि पर्वतासी । संमुख रणांसीं चालिले ॥४३॥
एकी वळियेल्या मुष्टी । दांत खाती करकराटी ।
एकी वळली पुच्छाटी । भ्यासुर दृष्टी देखोनी ॥४४॥

आगच्छंतं प्रधावंति ऊर्ध्वपुच्छा इतस्ततः ।
मायावी राक्षसः कोऽयमस्मान्हंतुसुपागत ॥७॥
इति तत्संभ्रमं दृष्ट्वा रामः सुग्रीवमब्रवीत् ।
वानरधिप मा भैषीरियं रक्षोबिभीषिका ॥८॥
निर्भीर्भव महाबाहो निहन्म्येनं पतत्रिभिः॥९॥

हनुमानाचे आगमन :

वानर महाभयभीत । इतस्ततां पळत ।
अंतरिक्षीं काय दिसत । झाले विस्मित सकळिक ॥४५॥
देखोनि कपींचा आकांत । क्रोधे झाला क्रोधान्वित ।
चाप करोनि सज्जित । काय बोलत रघुवीर ॥४६॥
सुग्रीव आणि बिभीषण । अंगदादि वानरगण ।
स्वस्थ करोनि अंतःकरण । माझे वचन परिसावे ॥४७॥
भेणे पळती वानरगण । त्यासी द्यावे अभयदान ।
मायावी राक्षस दारुण । येतो धांवोन आकाशी ॥४८॥
रुप धरोनि ढिसाळ । जैसा दिसे अग्निकल्लोळ ।
मारुं आला गोळांगूळ । रुपे विशाळ भासत ॥४९॥
भेडसावीतसे सर्वासी । पळवीतसे वानरांसी ।
बाणी निवटीन मी यासी । निमेषार्धेंसीं सत्वर ॥५०॥
क्षोभोनियां श्रीरामचंद्र । करावा जंव संहार ।
चापीं सज्जितां शर । तंव कपींद्र ओळखिला ॥५१॥
सवे बाण पुच्छी डोगर । जैसा दिसे कालाग्निरुद्र ।
रुप धरोनि भयंकर । तेथे सत्वर पावला ॥५२॥

एतस्मिन्नंतरे वीराः सोऽवतीर्य नभस्तलात् ।
निक्षिप्य पर्वत भूमौ नानारत्‍नविभूषितम् ॥१०॥
विनीतः प्रांजलिर्भूत्वा राघवं वाक्यमब्रवीत् ।
विशप्तिः श्रुयतां देव ससुग्रीवबिभीषण ॥११॥
ओषधिं नाधिगच्छामि विदित्वापि नरेश्वर ।
व्यतिक्रमवेहि त्वं क्षंतुमर्हसि सुव्रत ॥१२॥
बहुविघ्नाश्च तत्रासन्येनाहं च विलंबितः ॥१३॥

हनुमंताचे वृत्तांतकथन व क्षमायाचना :

सैन्याचे मेळीकारी । गिरि ठेवोनि पृथ्वीवरी ।
नमाया कपिकेसरी । वानरभारी चालिला ॥५३॥
क्षेम सांगावे भरतासी । उठवीन या सौ‍मित्रासी ।
निर्दळून रावणासी । अयोध्यासीं शीघ्र येऊ ॥५४॥
आजापित भरतबाण । बाणे करोनिया नमन ।
गगना उसळला जाण । अर्ध क्षण न लागता ॥५५॥
बोळविता भरतबाणासी । बाण उसळला गगनासीं ।
विजु तळपे आकाशी । तेणे वेगेंसीं चालिला ॥५६॥
लखलखीत डोंगर । जैसा दिसे रत्‍नाकर ।
ठेवोनि मेळीकारीं सत्वर । दर्शना कपींद्र चालिला ॥५७॥
लोटांगण श्रीरामचरणा । पुढती पुढती करि नमना ।
नमन सुग्रीवा बिभीषणा । अंगदही जाणा नमियेला ॥५८॥
नळ नीळ जांबवंत । नमिले जुत्पति समस्त ।
होविनि अति विनीत । काय बोलत कपींद्र ॥५९॥
मज विलंब लागला तेथ । विघ्ने उठली बहुत ।
ओषधी आच्छादी पर्वत । वेडा निश्चित लाविले ॥६०॥
शक्ति झाली प्रतिहत । कांहींच नाठवे मत ।
बहुत चुकुर जालो तेथ । मग रघुनाथ स्मरियेला ॥६१॥
अंतरात्मा श्रीरामचंद्र । बुद्धि दिधली खडतर ।
समूळ उपडोनि डोंगर । मग सत्वर चालिलो ॥६२॥
मार्गीं येता सत्वर । आश्चर्य वार्तलें थोर ।
बाण पातला वेगवत्तर । अति सुंदर नामांकित ॥६३॥
बाणी रामनाम देखता । अति विस्मय झाला चित्ता ।
नामी अनुसरोनि तत्वता । गेलो रघुनाथा बाणसंगें ॥६४॥
मी अविवेकी पालेखाइर । कर्कट नेणे विचार ।
भुलविले अंतर । गेलो सत्वर बाणासंगें ॥६५॥
नामी चित्त वेधले पाही । निजकार्याचा आठव नाही ।
पुढे अपूर्व देखिले काही । ते तुझे पायी निवेदूं ॥६६॥
बाणासवे पर्वतासहित । आलो नंदिग्रामा त्वरित ।
देखिला बंधू भरत । जैसा मूर्तिमंत श्रीराम ॥६७॥
रामभ्रमे भ्रमले माझे चित्त । क्रोधावेश झाला तेथ ।
सौ‍मित्र सांडोनि त्वरित । येथे रघुनाथ का आला ॥६८॥
अविचारी मीवानर । बोल बोलिलो खडतर ।
अति तिखट वाग्वज्र । ते रघुवीर क्षमा करु ॥६९॥
भरतप्रेमा अद्‍भुत । तेमें लोभलेंसें चित्त ।
देह गेह न सांभाळित । प्रेमे डुल्लत सर्वदा ॥७०॥
धन्य भरताचे जीवत । धन्य भरताचे आचरित ।
धन्य भरताचे व्रत । राम सेवित सर्वदा ॥७१॥
धन्य भरताचे जीवन । धन्य भरताचे भजन ।
धन्य भरताचे ज्ञान । राम चिद्धन सेवी सर्वदा ॥७२॥
धन्य भरताचा भावार्थ । धन्य भराचा इत्यर्थ ।
धन्य भरताचा सिद्धार्थ । श्रीरघुनाथ सर्व कर्मी ॥७३॥
धन्य भरताचे कुळ । धन्य भरताचे शीळ ।
धन्य सूर्यवंशमाळ । अविकळ रामभजनीं ॥७४॥
भरत रामप्रेमा लोभला । भरत रामे कोंदला ।
भरत श्रीरामे धाला । सबाह्य भरला श्रीराम ॥७५॥
भरत देखोनि राघवा । मन लोभले भरतभावा ।
भरतें गिळिलो आघवा । देहभावा विसरलो ॥७६॥
देखता भरतप्रेम गहन । नेत्रांची वृत्ति झाली क्षीण ।
देखणेपणे भरतें जाण । माझे नयन व्यापिले ॥७७॥
ऐकता भरतताथानिरुपण । श्रवणीं कोंदले श्रवण ।
नभ झाले शब्दायमान । अनाहन गहन लागले ॥७८॥
चाखता भरतप्रेमगोडी । रसना रसातें ओसंडी ।
अद्वैतचवी धडफुडी । सप्रेम आवडी भरतची ॥७९॥
घेता भरतभजनगंध । घ्राण विसरे गंधावबोध ।
घ्राणीं कोंदला परमानंद । प्रेममकरंद भरताचा ॥८०॥
अवचट भरतसंगी । वायु लागता अंगी ।
अंगत्व विसरलो निजांगी । स्पर्शता आंगी प्रेमे वायु ॥८१॥
भरतप्रेम मनी भरले । संकल्पविकल्पा मुकले ।
चंचलत्व हारपलें । निश्चळ झाले प्रेमभावे ॥८२॥
नाठवे देहगेहभान । नाठवे कार्याची आठवण ।
नाठवे भरता भरतपण । मज कपीसी कपिपण नाठवे ॥८३॥
भरतें आकर्षिली वृत्ती । मावळली उभयस्फूर्तीं ।
कैचा राम कैंचा मारुती । ऊर्मिलापति स्मरे कोण ॥८४॥
ऐसा गोविलो सर्वशक्ती । मर्कट नेणे कार्यस्थिती ।
उशीर लागला रघुपती । क्षमा निश्चिती मज करणे ॥८५॥

भरतप्रेमामुळे श्रीरामांची तन्मयता :

म्हणोनि घातले लोटांगण । सदृढ माथा धरिले चरण ।
मज क्षमा करे रघुनंदन । अविवेकी हीन मर्कट ॥८६॥
ऐकता कपीचें वचन । तटस्थ झाला रघुनंदन ।
रामी नाठवे रामायण । भरत संपूर्ण कोंदला ॥८७॥
प्रेमे भुलला रघुनाथ । पुढे देखे भरत ।
उठोनि आलिंगूं धांवत । प्रेम अद्‍भुत भरताचे ॥८८॥
मजलागी कष्टलासी । व्रतें तपें सायासी ।
उग्रकर्मे आचरलासी । उपवासी मजलागी ॥८९॥
उठी दोघे करु भोजन । सुंदर षड्रसें राजान्न ।
सांडीं हे वल्कलाभरण । करी परिधान दिव्य वस्त्रे ॥९०॥
करी अभ्यंगमज्जन । सोडी जटांचें बंधन ।
रत्‍नखचित मुकुटाभरण । सुंदर भूषण अंगीकारीं ॥९१॥
भरतभावें कपीसी । राम आलिंगी हृदयेंसीं ।
देखता अंगदसुग्रीवांसी । प्रेम उत्कर्षीं न संटे ॥९२॥
जुत्पति सकळ वानरागण । अवघे झाले मूर्च्छापन्न ।
भरतप्रेम अति गहन । रघुनंदन भुलविला ॥९३॥
सकळा टकमक झाली । शब्दासी कुलुपें पडली ।
भरतप्रेमें उलथलीं । समाधि लागली सर्वांसी ॥९४॥
बिभीषण शरणागत । श्रीरामभजनी सावचित्त ।
सत्त्वावस्था गिळोनि तेथ । काय बोलत रामासी ॥९५॥
श्रीरामा पाहे सावाधान । विसरोनियां रामायण ।
आलिंगिला कपिनंदन । कार्या आठवण तुज नाही ॥९६॥
भरतप्रेमें भुललासी । भरत म्हणोनि कपीसी ।
आलिंगोनि राहिलासी । निजकार्यासी विसरोनी ॥९७॥
बिभीषणाचे वचन । ऐकोनि हनुमान जाण
स्वये झाला सावधान । रघुनंदना विनवितो ॥९८॥
स्वामी ऐके रघुनंदन । भरत नव्हे हनुमान जाण ।
आलो पर्वत घेऊन । ओषधि गहन जेथे असती ॥९९॥
वेडी जाती प्रेमाची । वेळ नेणे कार्याची ।
गोष्टी सांगितली भरताची । तेणे श्रीरामचि भूलला ॥१००॥
शक्तिभेदें सौ‍मित्र जाण । पडिलासे विसज्ञ ।
यासी करावे सावधान । रावणकंदन करावया ॥१॥
मर्कट पालेखाईर । नेणे कार्यकार्यांतर ।
बहुत लाविलासे उशीर । क्षमा रघुवीर मज करो ॥२॥
ऐसे बोलोनि हनुमंत । चरणा लागला त्वरित ।
सावध होवोनी रघुनाथ । काय बोलत कपीसी ॥३॥

हनुमंतो वचः श्रुत्वा रामो वचनमब्रवित् ।
साधु वीर महाबाहो यस्य चेदृक्पराक्रमः ॥१४॥

ऐकता भरतगोष्टी । प्रेम उथळले पोटी ।
कांही न देखो दृष्टी । तुजचि मिठी घातली ॥४॥
हा भरतप्रेमें भुलला । मी म्हणे भरतचि आला ।
म्हणोनि कपि आलिंगिला । भला चेषविला हनुमंते ॥५॥
ब्रह्मादिका न करवती । ऐसी कर्मे निश्चिती ।
तुवा साधिलीं मारुती । निमेषगती न लागता ॥६॥
तुझ्या उपकारा तत्वता । मी ऋणी झालो कपिनाथा ।
वाचा खुंटली सर्वथा । कांही तत्वता न बोलवे ॥७॥
तुझ्या कर्माची कथा । काय सांगों हनुमंता ।
सीताशुद्धीची कथा । ऐकता चित्ता चळकांप ॥८॥
इंद्रजितवधालागीं सांग । तुवा ओढविले सर्वांग ।
ते गोष्टी ऐकता सवेग । होती उद्वेग चित्तासीं ॥९॥
एकएका उपकारा उत्तीर्ण । जीवे न होईजे कपिनंदन ।
सर्वस्वेंसी आपण । ऋणी संपूर्ण मी तुझा ॥११०॥
कांही न बोलवे सर्वथा । म्हणोनि चरणी ठेविला माथा ।
येरें वारोनि तत्वता । चरण रघुनाथाचे वंदिले ॥११॥
राम मारुतिवृत्तांत । देखता झाला विस्मित ।
सुषेण वैद्यराज तेथ । त्यासी बोलत सुग्रीव ॥१२॥

सुषेण औषधी आणतो :

हे दोघेही प्रेम बोधले । निजकार्यातें विसरले ।
आपण जावोनि वहिले । ओषधिभार शोधावे ॥१३॥
विशल्य होय लक्ष्मणा । ते कार्य साधी सुषेणा ।
म्हणोनि लागला चरणा । कार्यसाधना साधावे ॥१४॥
ऐकोनि सुग्रीव‍उत्तर । सुषेण निघाला सत्वर ।
सकळ वानरांचा भार । पर्वतशिखर वळघले ॥१५॥

सुग्रीवस्य वचः श्रुत्वा सुषेणोन्ये च वानराः ।
गिरिमारुह्य तं रम्यं नानाधातुविभूषितम् ॥१५॥

सवे वानरांचा भार । सुषेण वैद्यराज सत्वर ।
वळंघेले पर्वतशिखर । ओषधिभार शोधावया ॥१६॥
अति दीर्घ पर्वतशिखरें । रमणिय गिरिकंदरे ।
जळे पूर्ण सरोवरें । कमळें मनोहर शोभती ॥१७॥
अगराचीं झाडे बहुत । चंदनडोंगर बहकत ।
पुन्नाग चांफे पारिजात । पर्वती बहुत पुष्पजाती ॥१८॥
सरोवरीं कर्णिकारें । सेविती निरंतर चकारें ।
पक्षिकुळें विचित्रें । चौफेर किलकिलती ॥१९॥
अति रम्य पर्वत । वानरे सैरा हिंडत ।
सुषेण वैद्यराज तेथ । ओषधि शोधित अति वेगे ॥२०॥
स्मरोनियां रघुनंदन । पर्वत पाहता सावधान ।
झाले ओषधीचे दर्शन । वैद्य सुषेण हरिखत ॥१२१॥

तामोषिधिं गृहीत्वासौ ह्यवतीर्य महीतले ।
शिलायां पेषयित्वा तु नस्यं तस्मै प्रयोगयत् ॥१६॥
महौषध्याः प्रभावेण लक्ष्मणः परवीरहा ।
विशल्यो नीरुजश्चैव उत्थितः स महीतलात् ॥१७॥

रामनामे सत्वर । उपटोनि ओषधिसंभार ।
करीत नामाचा गजर । वानरभार चालिला ॥२२॥
उतरोनि पृथ्वीतळीं । ओषधि चूर्ण केल्या शिळीं ।
रस घेवोनि तत्काळी । शक्तिबिळीं ओतला ॥२३॥
रस घालिता तस्वर । सावध नव्हेचि सौ‍मित्र ।
सुषेण झाला चिंतातुर । कांही विचार स्फुरेना ॥२४॥
ब्रह्मादिका अनुल्लंघ्य पूर्ण । एवढा प्रयत्‍न केला दारुण ।
शेखी सावध लक्ष्मण । अद्यापि जाण होईना ॥२५॥
सुग्रीवादेखतां । स्वामी रघुनाथ ऐकता ।
वल्गलों मी इतस्ततां । सौ‍मित्रातें उठवीन ॥२६॥
ऐसे बोलबोलून । पाठविला वायुनंदन ।
महाविघ्ने जिणोन । पर्वतचि जाण आणिला ॥२७॥
ओषधिसंभार सगळा । अंगे पिळोनियां वाहिला ।
घायीं रस ओतिला । तो वृथा झाला प्रयत्‍न ॥२८॥

औषधीचा प्रभाव न पडल्याने सुषेणाचा गोंधळ :

तरी वैद्यक लटिकें झाले । शास्त्र वृथा रचिले ।
शिष्टाचारा दूषण आले । काय झाले मज न कळे ॥२९॥
नाही रसायन चुकलें । धातूसीं अंतर नाही पडिले ।
नाही अनुपान चुकले । नाही सांडिलें क्रियेसी ॥१३०॥
काय झाले तत्वता । मज न कळे सर्वथा ।
धांव पाव गा रघुनाथा । शास्त्रसंमता संरक्षी ॥३१॥
तव आवेशें वायुनंदनी । जो भक्तांमाजी चूडामणी ।
बोलता जाला हांसोनी । सुषेणा लक्षोनी अनुवादे ॥३२॥
सुषेणा चुकलासी मत्त । ज्याचेनि शास्त्रांसी शास्त्रार्थ ।
जो वेदीं वेदार्थ । शिष्ट सनाथ ज्याचेनि ॥३३॥
जेणे चिकित्सा पाहाळी गेली । जेणे शास्त्रें बुझविली ।
पुराणे वर्तो लागली । ज्याची चाली जाणोनी ॥३४॥
त्या विसरोनी रघुनाथा । स्वबुद्धी वैद्यक करिता ।
शीण पावलासी वृथा । स्वकार्यही न साधेचि ॥३५॥
उगवता दिनमणी । हरपे तत्काळ रजनी ।
नक्षत्रेंसह चंद्र गगनी । ठाकती होवोनी खद्योत ॥३६॥
तेंवी देखता रघुनाथ । ओषधिभार समस्त ।
शक्ति झाली प्रतिहत । तुझे तेथ काय चाले ॥३७॥

श्रीराम – चरणतीर्थ देण्याची हनुमंताची प्रार्थना :

ऐसे न करावे आपण । प्रार्थोनिया रघुनंदन ।
घ्यावें चरणतीर्थ मागोन । वाचेल लक्ष्मण ते करी ॥३८॥
ओषधिरसामाजी देख । वेगी घालोनि चरणतीर्थ मागोन ।
वाचेल लक्ष्मण ते करी ॥३८॥
ओषधिरसामाजी देख । वेगी घालोनि चरणोदक ।
रस देता एकाएक । सकळ दुःख निरसेल ॥३९॥
कोणासी न कळे जनी । नाम अमृतसंजीवनी ।
तो प्रत्यक्ष असता अनुदिनी । निजाभिमानीं कष्टती ॥१४०॥
आम्ही वैद्य चिकित्सक । क्षणमात्रें प्रतीति ते देख ।
दावूं लागतांचि निमेख । तेणेंचि देख नाडिले ॥४१॥
सिद्धासीं सिद्धिलाभ होता । अभिमान उठला अवचितां ।
तरी अवघेंचि गेले तत्वता । कष्ट वृथाचि सोसिले ॥४२॥
सर्व दुःखांच्या आपदा । प्राप्त झाल्या प्रल्हादा ।
नाम स्मरतां सर्वदा । दुःखबाधा छेदिली ॥४३॥
तो श्रीराम प्रत्यक्ष असता । तुझा अभिमान झाला वृथा ।
चरणी ठेवोनिया माथा । चरणतीर्था मागावें ॥४४॥
तीर्थासमवेत ओषधी । घायीं घालिता त्रिशुद्धी ।
सौ‍मित्र उठेल सत्वबुद्धी । युक्ति साधी हे माझी ॥४५॥

श्रीरामचरणतीर्थाने लक्ष्मण सावध झाला :

ऐकोन कपीचें वचन । संतोषला सुषेण ।
म्या केला जो अभिमान । तो रघुनंदन क्षमा करो ॥४६॥
मर्कट नेणे मी सर्वथा । क्षमा करणे रघुनाथा ।
चरणी ठेवोनिया माथा । चरणतीर्था घेतले ॥४७॥
ओषधी तीर्थासमवेत । घायीं पिळितां समस्त ।
सौ‍मित्र झाला सावचित्त । श्रीरघुनाथप्रसादें ॥४८॥
तीर्थे प्रोक्षितां शरीर । सत्वर उठिला सौ‍मित्र ।
बाप कृपाळु रघुवीर । वानरभार हरिखला ॥४९॥
रामनामे भुभुःकार । करीत उठिले वानर ।
नादें कोंदलें अंबर । चराचर दुमदुमिले ॥१५०॥
नामे कोंदला भूगोळ । नामे व्यापिले अंतराळ ।
नामे भेदलें पाताळ । ब्रह्मांडगोळ कोंदला ॥५१॥
नामे हर्षित झाले चित्त । स्वशरीर न सांभाळित ।
एक लोटांगण घालित । एक झेलित द्रुमवल्ली ॥५२॥
एक पर्वत झेलित । एक पर्वती वळंघत ।
येर येरा धके देत । येर टाकित येआवरी ॥५३॥
रामसंमुख बैसती एके । तोंड करिती रडकें ।
सौ‍मित्रे केले नाही निके । मज सांडून देखे निगाला ॥५४॥
म्हणवोनि करीत रुदन । उपहासिती रघुनंदन ।
हरिखें नाचती वानरगण । विस्मित मन रामाचे ॥५५॥
स्वये उठोनी आपण । आलिंगिला लक्ष्मण ।
सुग्रीव अंगद बिभीषण । आनंदें पूर्ण कोंदले ॥५६॥
नवा लक्ष्मण उपजला । येणे माने सुखावला ।
उत्साह ऐसा कोंदला । विसरला राम आपणा ॥५७॥
उचलोनियां लक्ष्मण । नाचो लागला रघुनंदन ।
एका जनार्दना शरण । निजजनकृपाळू ॥१५८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें युद्धकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणोत्थापनंनाम एकोनपंचाशत्त-मो‍ध्यायः ॥४९॥
ओंव्या ॥१५८॥ श्लोक ॥१७॥ एवं ॥१७५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग