वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ३. अरण्यकाण्ड - अध्याय २३ › ११. खर-दूषण व त्रिशिर यांचा वध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088069 · अभंग क्र. ११

11.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय अकरावा ॥
त्रिशिरा व खर राक्षसांचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दूषणाच्या वधानंतर खर व त्रिशिरा हे पुढे येतात; त्यांच्या वल्गना :

श्रीरामे मारिल्या सैन्य धुरा । तेणे दुर्धर कोप आला खरा ।
त्यासी पुसोनियां त्रिशिरा । श्रीरामचंद्रावरी आला ॥१॥
खर म्हणे त्रिशिर्‍यासी । रणी मर्दिलें दूषणासी ।
म्हणोनि भिवो नको रामासी । तुझे पाठीसी मी आहें ॥२॥
मनुष्य खाजे राक्षसांसी । त्याचे भय काय आम्हांसी ।
काटें देखोनि फणसासी । खाणारासी भय नाही ॥३॥
चिरोनि फणसाचे कांटे । काढोनि अमृताचे सांठे ।
मग सेविती घटघटें । युद्धसंकटें तेंवि श्रीराम ॥४॥
श्रीराम बाणकटकेंसीं । अति दुर्धर राक्षसांसी ।
तो गोड भखितां आम्हांसी । रणी रामासी निर्दाळी ॥५॥
ऐकोनि खराचें वचन । दुसरा खर भुंके जाण ।
तैसा त्रिशिरा आपण । की गर्जन तिही मुखी ॥६॥
वेंगी बैसोनियां रथा । राहे साहें म्हणे रघुनाथा ।
धनुष्य मर्दोनियां हाता । होय वर्षता बहु बाण ॥७॥

ततः प्रहृष्टस्त्रिशिराश्चापमुद्यम्य वीर्यवान् ।
गच्छ युद्ध्येत्यनुज्ञातो राघवाभिमुखो ययौ ॥१॥

त्या दोघांची गर्वोक्ती, श्रीरामांचे प्रत्युत्तर :

खरासी म्हणे त्रिशिरा । कोण पाडू रणी रघुवीरा ।
बाणी खिळोनि करीन पुरा । शस्त्रसंभारा तू पाहे ॥८॥
मग त्रिशिरा म्हणे श्रीरघुनाथा । वधोनि राक्षसा बहूता ।
पळों नको गा मागुता । तुज मी आता वधीन ॥९॥
लहाना मत्स्या मत्स्यु आकळी । तेंवी राक्षसा केली त्वा होळी ।
त्या तुज मी सगळेंचि गिळीं । रामा तुज मी गिळू आलो ॥१०॥
श्रीराम म्हणे त्रिशिराप्रती । खराश्वयोगे जन्मप्राप्ती ।
तो तू खराचा सांगाती । वेसरउत्पत्ती भारवाही ॥११॥
तू भारवाही वेसर खरा । वाहसी त्रिशिरांच्या भारा ।
तिही मुखी जल्पसीं सैरा । नाही विचारा एक मुख ॥१२॥
त्रिजात त्रिशिरांचा तू राक्षस देख । त्रिमुखा युद्धी नव्हे एक मुख ।
पळोनि जासी खराभिमुख । वल्गना भुंकभुंकसी ॥१३॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । त्रिशिरा वर्षे अमित बाण ।
आच्छादोनि श्रीरघुनंदन । बाणी गगन व्यापिले ॥१४॥
देखोनि श्रीराम बाणी आच्छन्न । राक्षसांचें शेष सैन्य ।
अवघे परतले गर्जोन । रघुनंदन निर्दळिला ॥१५॥

श्रीरामबाणांनी रथ, घोडे व सारथी यांचा नाश झाल्यावर त्रिशिरा विरथी होऊन लढतो :

त्रिशिरा तू योद्धा भला भला । रणी श्रीराम निवटिला ।
राक्षसी गजबजु पै केला । तेणे क्षोभला श्रीराम ॥१६॥
श्रीरामे विंधितांचि जाणा । बाण आदळती बाणां ।
भाळीं वाजती खणखणा । ठिणग्या गगना न माती ॥१७॥
श्रीरामबाणांचा कडकडाट । राक्षसबाणांचा अति नेट ।
घायीं उठला हव्यवाट । दोघे सुभट महायोद्धे ॥१८॥
गरुड नखे सर्प चिरी । तेंवी श्रीराम बाणे बाण विदारी ।
तोडोनियां भूमीवरी । भुजंगाकारी पसरिले ॥१९॥
राक्षसांचे बाणजाळ । वायु तोडी जेंवी आभाळ ।
तेंवी श्रीरामे तोडिलें सकळ । त्रिशिरा प्रबळ कोपळा ॥२०॥
त्रिशिरा ती बाणी रघुनाथा । लागवेगीं विंधिले माथा ।
तेणे श्रीरामा नव्हेचि व्याथा । म्हणे गंधाक्षता मज केली ॥२१॥
ती बाणांची मऊ मवाळी । रणी अर्पिली पुष्पांजळी ।
तुज पूजीन बाणजाळी । श्रीराम महाबळी क्षोभला ॥२२॥
तुझे म्या साहिले तीन बान । माझे तू साहें शर दारुण ।
ऐसे बोलोनि श्रीरघुनंदन । चौदा बाण सोडिले ॥२३॥
चौदा विद्यांची अति गती । तैसी बाणांची निजशक्ती ।
निवरणाची न चले युक्ती । धनुष्य हातींचें छेदिलें ॥२४॥

कार्तिकस्वामीच्या वराने प्राप्त झालेली शक्ती हातात घेतोः

चहू बाणी चारी वारु । एके सारथियासी मारु ।
एके ध्वज तोडिला सत्वरु । एके रहंवरु छेदिला ॥२५॥
विरथ त्रिशिरा आणिला भुयीं । श्रीरामावर धांवला पायी ।
त्यासी सामर्थ्य न चले कांही । निर्वाण पाही मांडले ॥२६॥
कुमारवरदाचे निजप्राप्तीं । त्रिशिर्‍यापासीं निर्वाणशक्ती ।
ते तंव सज्जूनियां हाती । श्रीरामप्रति धांविन्नला ॥२७॥

त्यामुळे सर्वजण सचिंत :

कुमारशक्ति त्रिशिर्‍याहातीं । देखोनि सुरवर कांपती ।
भूतळीं ऋषीश्वर धांवती । केंवी रघुपति वांचेल ॥२८॥
कुमारशक्तिमाराभेणें । इंद्र चळीं कांपे आपण ।
धाके कांपती रुद्रगण । यम वरुण कांपती ॥२९॥
धाके कांपती सुरासुर । धाके कांपती यक्ष किन्नर ।
शक्ति अतिशयेसी दुर्धर । केंवी श्रीरघुवीर साहेल ॥३०॥
शस्त्र दुर्धर त्रिजगती । केंवी श्रीरघुवीर साहेल ॥३०॥
शस्त्र दुर्धर त्रिजगती । त्रिशिरा क्षोभोनियां चित्ती ।
श्रीरामाच्या निजघातीं । सक्रोध शक्ती मोकलिली ॥३१॥

त्रिशिर्‍याने सोडलेली शक्ती श्रीरामांना वंदन करुन त्यांच्याच भात्यात जाते :

सर्वशक्तींची श्रीराम शक्ती । त्यावरी न चले शक्तीची गती ।
शक्तीने वंदोनि श्रीराममूर्ती । चरणी विश्रांति पावली ॥३२॥
शस्त्रदेवता म्हणे आपण । होता श्रीराम दर्शन ।
माझे झाले बंदीमोचन । काळे वदन त्रिशिर्‍याचे ॥३३॥
करावया राक्षसघात । शक्ति रिघाली श्रीरामभात्यांत ।
देखोनि त्रिशिर्‍यासी चिंता अद्भुत । विपरीत अवस्था ओढवली ॥३४॥
माझी जे का निजशक्ती । ते वश्य झाली श्रीरामाप्रती ।
आता आमुची खुंटली गती । राक्षसशांति श्रीरामे ॥३५॥

श्रीरामांच्या सुवर्णपखी बाणाने त्रिशिराचा गोंधळ व त्यातच त्याचा अंत :

रणी मारणे का मारणें । हा निश्चयो करोनि तेणे ।
खर्ग तुळोनि तळपणे । हाकी सत्राणे श्रीरामा ॥३६॥
श्रीरामे सोडिला त्रिधरा । तेणे तोडिल्या खर्गधारा ।
त्रिशिर्‍यासी लागला पिसारा । तेणे अंबरा उडविला ॥३७॥
पिसार्‍याचे प्रबळ बळ । रविचंद्रादि ऋषिमंडळ ।
दाखविले धुव्रमंडळ । रणकल्लोळ श्रीराम ॥३८॥
घायेंवीण आली भोंवंडी । तळी पडली मुरकुंडी ।
रुधिर वाहे नाकी तोंडी । बाणार्धखंडीं दंडिला ॥३९॥
त्रिशिरा सावध होवोनि पाहे । अंग प्रत्यंगी न देखे घाये ।
म्हणे मजला जाले काये । मिथ्या भय रामाचे ॥४०॥
जाला सर्वांगी सावध । शस्त्रास्त्री सन्नद्ध ।
करावया श्रीरामाचा वध । अति सक्रोध चालिला ॥४१॥
जेंवी पतंग दीपासीं । मागे सरणें नाही त्यासी ।
तेंवी गिळावया श्रीरामासी । अति क्रोधेसी निघाला ॥४२॥
हाक देखोनिया तवके । पसरोनिया तिन्ही मुखें ।
आला श्रीरामासन्मुखें । जेंवी अतंक प्रळयांतीं ॥४३॥
श्रीराम गिळावया एकसरें । काम क्रोध लोभ दरें ।
मुखें पसरिलीं तदाकारें । अति दुर्धरें समसमितें ॥४४॥
नातरी गिळावया निर्गुण । जेंवी खवळती तिन्ही गुण ।
तैशीं तिन्ही मुखें जाण । श्रीरामनिधान गिळावय ॥४५॥
ऐसे देखोनि त्रिशिरा । हासे आले श्रीरघुवीरा ।
धनुष्यी सज्जोनिया शरा । निजनिर्धारा उद्यत ॥४६॥
तीन बाण घेवोनि हाता । त्रिशिरा विंधिलासे माथा ।
तो म्हणे हे पुष्पाक्षता । बाणी रघुनाथा बळ नाही ॥४७॥
बाण रुतले फुला ऐसे । त्रिशिरा खदखदा हांसे ।
श्रीरामबाणीं बळचि नसे । अति आवेशें नाचत ॥४८॥
हांसोनि उपडितां बाण । तंव ते अतिशयेंसी कठिण ।
सरली त्रिशिर्‍याची आंगवण । माथींचे बाण नुपडती ॥४९॥
जंव जंव बाण उपडीत जाये । तंव तंव घाये घुसती पाहे ।
तरी ते विपरीत जाले आहे । म्हणे म्या काय करावे ॥५०॥
पहिले बाण फुलाऐसे । त्रिशिरा खदखदां हांसे ।
श्रीरामबाणां बळचि नसे । अति आवेशें नाचत ॥५१॥
पहिले बाण अहाचगती । आणि उपडूं जाता खडतरती ।
श्रीरामबाणांची हे ख्याती । जीवघाती श्रीराम ॥५२॥
बाण उपडितां दारुण । भेणे पळाली आंगवण ।
सपिच्छ बुडाले संपूर्ण । भेदले पूर्ण ब्रह्मांडी ॥५३॥
लागता वज्राचा पै घात । उलथोनि पडे जेंवी पर्वत ।
तेंवी त्रिशिरा रणांआंत । पाडी रघुनाथ निजबाणीं ॥५४॥
त्रिशिरा पडतांचि भूतळीं । निधा उठिला पाताळी ।
बैसलीं दिग्गजांची टाळी । राक्षसदळीं थरकांप ॥५५॥
श्रीराम आला जीवघाती । एकापुढें एक पळती ।
बाणी लाविली ख्याती । प्रळयप्राप्ती राक्षसा ॥५६॥
चौदा सहस्त्र राक्षससैन्य । उरले शतेक किंचिन्न्यून ।
श्रीरामाबाणांच्या माराभेण । पलायमान सकंप ॥५७॥

हतशेषास्तथा भग्ना राक्षसाः खरसंश्रयाः ।
तान्खरो द्रवतो दृष्ट्वा निवार्य च ततः स्वयम् ॥२॥

श्रीरामे राक्षसा केला नाश । सैन्य निर्दाळिलें निःशेष ।
उरले तिही घेतला त्रास । दशदिशा पळताती ॥५८॥
एक सांगती एकासी । कोण निवारी श्रीरामबाणांसी ।
तरी ठाकोनि जावे खरापाशीं । तो आम्हांसी रक्षील ॥५९॥

खर राक्षस व श्रीरामांचा रणसंग्राम :

धाके पळती निशाचर । देखोनि परतलासे खर ।
सैन्या देऊनि नाभीकर । श्रीरामासमोर तो आला ॥६०॥
श्रीराम देखतांचि दृष्टी । खरासी कांप सुटला पोटी ।
दूषण मारिला जगजेठी । त्रिशिरा हठी निर्दळीला ॥६१॥
एकला पायउतारा रघुवीर । धुरा मारिल्या थोर थोर ।
सेना मारिली चौदा सहस्त्र । श्रीराम दुर्धर धनुर्वाडा ॥६॥
निधडां होय योद्धा श्रीरघुनाथ । युद्ध करिता अति अदभुत ।
म्हणोनि खरें पेलिला रथ । धनुष्य हस्ते सज्ज्जोनि ॥६३॥
धीरा वीरा राहे साहें । बळ तुझे मजसी काये ।
माझे लागलिया घाये । कोण माय राखेल ॥६४॥
अवचटे लागोनियां बाण । मारिला त्रिशिरा आणि दूषण ।
माझे सन्मुख साहसी बाण । तै आंगवण मी मानी ॥६५॥
रणी समोर जाल्या खर । अंतकासी न धरवे धीर ।
म्या मर्दिले सुरासुर । तू रघुवीर तो किती ॥६६॥
माझे सुटल्या शरसंधान । कोदंडा खंडीन सबाण ।
तुझा घेईन मी प्राण । रणांगण पाहे माझे ॥६७॥
तंव हासोनि म्हणे श्रीरामचंद । खराचा पराक्रम थोर ।
मी जाणतो समग्र । ऐक साचार महावीरा ॥६८॥
संवदणीं तिमिले रजकहस्तीं । जगाचीं मळे खर वाहती ।
नातरी कुलाल वाहे माती । हे मुख्य ख्याती खराची ॥६९॥
काळे कोळसे वाहती खाती । कुलालपल्ल्यां लगडा वाहती ।
जगाचे उकिरडे घोळीती । हे एक ख्याती खराची ॥७०॥
खर पालणिती वोड । त्यावरी वाहती स्वेच्छा दगड ।
पाठी खटीं सोलले बूड । थोर सुरवाड माशांचें ॥७१॥
खरी देखोनिया दुरी । खर भुकें दीर्घस्वरीं ।
लाथा हाणिती उरावरी । ते सुख भारी खरासी ॥७२॥
मुख्य खराचें भूषण । थोर करी नित्य लोळण ।
जगाची विष्ठा प्रियभोजन । हे महिमान खराचें ॥७३॥
ऐसी खराची प्रतिष्ठा । प्रिय भोजन जगाची विष्ठा ।
मरमर दुःशीळा पापिष्ठा । ऋषिवरिष्ठां मारिले ॥७४॥
त्यांचा घेवोनि सूड कैवाडें । बाणी फोडिन चांभाडें ।
तू पळसील कोणीकडे । बाणांपुढे पै माझ्या ॥७५॥
खरासी लागता गोमासी । तडफडित पळे चौंपासीं ।
माझे बाण लागता सपिच्छी । तू पळसी खरु जैसा ॥७६॥
ऐसे ऐकोनि श्रीरामाचे वचन । खर जाला कोपायमान ।
धनुष्यी वाहोनिया गुण । अमित बाण वर्षला ॥७७॥
खर वर्षला बहुत बाण । दिशां विदिशां शर संपूर्ण ।
ते देखोनि क्षोभला रघुनंदन । चाप सज्जोन चालिला ॥७८॥
जेंवी गजावरी केसरी । तेंवी श्रीराम राक्षसांवरी ।
प्रळयांबुद धारावर्षभारीं । तेवी शरधारी वर्षत ॥७९॥
बाण वर्षतां श्रीरघुवीरा । बाणपिसारें सुटला वारा ।
तेणे चळकांप निशाचरा । बाणी भेदरा लाविला ॥८०॥
बाणी रणी खिळिला वारा । बाणी खिळिली मुख्य धुरा ।
रणी उठिला धुळोरा । बाणे अंबरा व्यापिले ॥८१॥
खररामबाणीं खणखणाट । घायीं उठिला हव्यावाटे ।
तेणे बाणपिसारा पेटे । धूम्रांकित खरनेत्र ॥८२॥
बाणी कोंद भूतळ । बाणी कोंदलें नभोमंडळ ।
श्रीरामाचे बाणजाळ । रविमंडळ झांकिलें ॥८३॥
बाणी कोंदलें आकाश । तिळभरी नाही अवकाश ।
बाणी राक्षसा लाविला त्रास । कासाविस खर तेणे ॥८४॥
रणी पडली आंधारी । श्रीरामाच्या प्रभेंकरी ।
युद्ध कीजे दोघीं वीरी । महामारीं पेटले ॥८५॥

ततोऽस्य सशरं चाप मुष्टिदेशे महाबलः ।
खरश्चिच्छेद रामस्थ दर्शयन्पाणिलाघवम् ॥३॥

खराने सोडलेल्या वरदबाणांची निष्फळता :

खर कोपोनि निर्वाण । सोडिताहे वरद बाण ।
श्रीराम तुझा घेईन प्राण । हस्तविंदान पाहे माझे ॥८६॥
ऐसे बोलोनि महाहठी । बाणवरदाचिया निजनेटीं ।
श्रीरामधनुष्य छेदिलें मुष्टी । पाडिलें सृष्टी लघुहस्तें ॥८७॥
निजनिर्वाणाचे पूर्ण । सवेंच घेवोनि सात बाण ।
श्रीरामहृदय लक्षोन । वेगी गर्जोन विंधिले ॥८८॥
श्रीरामकवच अभेद्य पूर्ण । अभेद्यकवचीं न रुते बाण ।
वरदे केले निजनिर्वाण । सावधान अवधारा ॥८९॥

रामकवचबंधनाचा खराने केलेला छेद :

कवच न भेदे बाणांसी । वरदशक्तीची क्रिया कैसी ।
छेदोनि बंध बिरड्यासी । कवच भूमीसीं पाडिलें ॥९०॥
चाप कवच छेदिता देख । कांपिन्नले तिन्ही लोक ।
गगनी देवांसी असुख । परम दुःख इंद्रासी ॥९१॥
कवच पडतांचि धरणी । अभ्रांमधून निघे तरणी ।
तैसा श्रीराम शोभे रणी । गिरा गर्जोनी बोलत ॥९२॥

खराचा मुकुट पाडून त्याला बाणांनी घायाळ :

वरद बाण तुझे समस्त । क्रोधे सांडोनि केले व्यर्थ ।
तुझा संपला पुरुषार्थ । आंत घात करीन तुझा ॥९३॥
मग जो चाप अगस्तिदत्त । सज्जोनिया श्रीरघुनाथ ।
रणी चालिला गर्जत । शरसंपात सूटला ॥९४॥
खराचे बाण प्रबळ । श्रीरामे निवटिले सकळ ।
जेंवी गुड पाडी कृषीवल । तेंवी बाणजाळ छेदिलें ॥९५॥
हेमपत्री बाण सबीज । सोडोनि खर केला निर्बुज ।
रथी छेदोनियां ध्वज । रणी रघुराज क्षोभला ॥९६॥
जैसा स्वर्गभोगच्युत । पुण्यक्षयें होय पतित ।
तैसा ध्वज लखलखित । पताकायुक्त पाडिला ॥९७॥
बाण सोडोनि वरिष्ठ । पाडिला शिरींचा मुकुट ।
धनुष्य छदिलें उद्भट । रणसंकट खरासी ॥९८॥

तं चतुर्भिः खरः क्रुद्धो रामं गात्रेषु मार्गणैः ।
विव्याध हृदि मर्मज्ञो मातंगमिव तोयदैः ॥४॥

खराने सोडलेली शक्तीही श्रीरामांच्या भात्यांत प्रविष्ट झाली :

खरे देखोनि रणसंकट । श्रीराम वधीन मी वरिष्ठ ।
शक्तिवरदाचे बाणी श्रेष्ठ । वधावया दुष्ट चालिला ॥९९॥
चाप सज्जोनि आकर्ण । शक्तिवरदाचे निर्वाणबाण ।
घाये घेती परांचें प्राण । अति दारुण अनिवार ॥१००॥
तेचि बाण घेवोनि चारी । शक्ती आवाहूनि बीजमंत्रीं ।
खरें मोकलिले श्रीरामावरी । सतजधारी धगधगित ॥१॥
भूतळीं गजबजले ऋषीश्वर । स्वर्गी कांपती सुरवर ।
शक्तिवरद अति दुर्धर । श्रीरामचंद्र केंवी वांचे ॥२॥
बाण सुटतां कडाडी । पडली सुरवरांसी झांपडी ।
दुर्धर तेजाची प्रौढी । बापुडीं मूर्च्छित ॥३॥
बाण लागता हृदयावरी । शस्त्रदेवता श्रीरामोदरीं।
तिणे बाण धरिता चारी । श्रीरामतूणीरी रिघाले ॥४॥
खर म्हणे झाले विपरीत । वरदशक्ति श्रीरामा भजत ।
तितें मांडिला आमचा घात । श्रीरघुनाथ नाटोपे ॥५॥
श्रीरामाची अगाध थोरी । बाण निवारिले वरद चारी ।
जयजयकार ऋषीश्वरी । केला सुरवरी महानाद ॥६॥

श्रीरामांनी निर्वाणीचे बाण खरावर सोडले :

बाण निवारिले चारी । श्रीराम कोपलासे भारी ।
तीन बाण खरावरी । महामारीं मोकलिले ॥६॥
श्रीरामबाण देखोनि दृष्टी । निवारणीं चिंता पोटी ।
तंव एके धनुष्य छेदोनि मुष्टी । पाडिलें सृष्टी दुखंड ॥८॥
ध्वज छेदिला बाणे एके । आंख छेदी एके तवकें ।
दो बाणी छेदिली दोन्ही चाकें । त्रिवेणुं आणिके छेदिले ॥९॥
चहू बाणी चारी वारु । तीन बानीं छेदिला रहंवरुं ।
एके बाणे विधिला खरु । रुधिरोग्दारु प्रवाहे ॥११०॥
हत वारु हत सारथी । खर रणी केला विरथी ।
मग गदा घेवोनि हाती । श्रीरामाप्रति धांविन्नला ॥११॥
गदा घेवोनिया हाती । म्हणे घाये मारीन श्रीरघुपती ।
सरक थरक दावई दिप्ती । गती विगती तळपत ॥१२॥

खराचा धिक्कार :

हतरथ हतसारथी । नष्टलासी सैन्यसंपत्ती ।
श्रीराम म्हणतूं निर्लज्ज चिती । कासया गदागती दाविसी ॥१३॥
तुजपासोनि गेली शक्ती । वृथा वल्गसी गदाहस्ती ।
गदेसहित पाडीन क्षिती । तू पापमूर्ति पापात्मा ॥१४॥
ऋषी मारिले श्रेष्ठ श्रेष्ठ । तापस भक्षिले वरिष्ठ ।
त्याचे फळ भोगिसी स्पष्ट । बाणी यथेष्ट दंडीन ॥१५॥
ब्राह्मण भक्षिले बहुत । ब्रह्महत्येचा दोष अदभुत ।
बाणधारी प्रायश्चित । मी निश्चित तुज देईन ॥१६॥
दंडकारण्यीं तू कंटक । बाणी छेदीन आवश्यक ।
वना करीन निष्कंटक । ऋषी निःशंक विचरावया ॥१७॥
निर्नासिक देखता दृष्टी । तेथे यशाची कायसी गोष्टी ।
ससैन्य धूर मरे शेवटी । भेतल्या नकटी फळ ऐसे ॥१८॥
ते नकटी तुम्हांसांगातें । तुम्हांसी यश कैचें येथे ।
नकातियें निर्दळिलें निश्चिते । हे करातें लक्षेना ॥१९॥
नांवे खर रुपे खर । शस्त्रभार वाहे खर ।
न कळे बुद्धीचा विचार । ऐसा मूर्ख थोर तू होसी ॥१२०॥

गदेचा श्रीरामांवर हल्ला, मातंग अस्त्राचा प्रयोग :

वर्मभेदी श्रीरामवचन । खर दुर्धर कोपायमान ।
भूमीस हात पाय घंसोन । गदा घेवोनि धांवला ॥२१॥
किती जल्पसी सैरावैरा । बोलो नको श्रीरामचंद्रा ।
बहु बडबड न साजे वीरा । रणनिर्धारा पाहे पा ॥२२॥
राहे साहे श्रीरघुवीरा । तुवा मरिल्या बहुत धुरा ।
तुझ्या घेवोनिया रुधिरा । मारिल्या धूरा तर्पीन ॥२३॥
तुझिया रुधिराचें तर्पणें । तृप्त होतील राक्षसगण ।
गदाघायें घेईन प्राण । सत्य संपूर्ण पण माझा ॥२४॥
सावध पाहे श्रीरामचंद्रा । एकेंचि घाये करोन पुरा ।
दांत खातसे करकरा । गदा गरगरा भोवंडी ॥२५॥
धुम्र निघे नेत्रद्वारा । रागे कांपत थरथरां ।
डासों धांवे श्रीरामचंद्रा । कंठींच्या रुधिरा प्राशावया ॥२६॥
तुझे नळीचें करीन रक्तपान । तेव्हा मी संतृप्त होईन ।
वटारिले दोनी नयन । श्रीरघुनंदन देखोनी ॥२७॥
निःशेष मारावया रघुवीरा । आव्हानिलें मातंगशस्त्रा ।
बीजे जपोनि घातकमंत्रा । शस्त्री अस्त्रा योजिले ॥२८॥
ऐसे साधोनि निर्वाण । तेणे उन्मूळत वृक्ष तृण ।
पृथ्वी होय कंपायमान । मूर्च्छापन्न पशुपक्षी ॥२९॥

सा क्षिप्ता बहुवेगेन प्रदीप्ता महती गदा ।
भस्म वृक्षांश्च गुल्मांश्च कृत्वागात्तत्वमीपतः ॥५॥

गदा खराची तेजे दारुण । भस्मभूत केले तृण ।
गुल्म पर्वत कंपायमान । वृक्ष उन्मळोन पडताती ॥१३०॥
गदा उसळता अंबरा । विमानी पळणी सुरवरा ।
चळकांप रविनक्षत्रां । अस्त्रमंत्राचेनि धाके ॥३१॥

मातंगशास्त्राचे श्रीरामांनी रुद्रमंत्राने केलेले निवारण :

अस्त्र दुर्धर देखोन । श्रीराम नित्य सावधान ।
अघोर रुद्रमंत्र जपोन । बाण दारुण सोडिले ॥३२॥
बाण देखोनि दारुण । अस्त्रमातंगी आली शरण ।
माझा बांचवावा प्राण । श्रीरामचरण तिये धरिले ॥३३॥
बाण लागता उद्भट । गदा जाली शतकूट ।
घाये दुमदुमिले वैकुंठ । करोनि पीठ पाडिली ॥३४॥
खर जाला रणोन्मत्त । निर्वाणगदा जाली व्यर्थ ।
चिंता विसरले चित्त । श्रीरघुनाथ देखोनी ॥३५॥
बाणे गदेचा जाला निःपात । अशेष सैन्या केला घात ।
शस्त्र सामोग्री करोनि व्यर्थ । श्रीरामभात्यांत बाण आला ॥३६॥
एकला खर उरला रणी । श्रीरामे जर्जर केला बाणी ।
परी खर बाणांते न गणी । श्रीराम लक्षोनी लोतला ॥३७॥
सगळा राम मी खाय घोंटी । हेचि धरोनिया पोटी ।
धांविन्नला महाहट्टी । निर्वाणदृष्टी लक्षोनी ॥३८॥

रणे प्रहरणस्यार्थे सर्वतो ह्यवलोकयन् ।
स ददर्श महाशालमविदूरे निशाचरः ॥६॥
स तमुत्पाटयामास संदष्टदशनच्छदम् ।
राममुद्दिश्य चिक्षेप हतस्त्वमिति चाव्रवीत् ॥७॥

निःशस्त्र होताच खराने वृक्षप्रहार केला, त्याचा बाणाने संहार :

श्रीरामे छेदिली शस्त्रसामोग्री । हातेर न दिसे चौफेरीं ।
विशाल वृक्ष उपडोनि करी । श्रीरामावरी धांविन्नला ॥३९॥
येणे वृक्षाचेनि घातें । श्रीरामा मारिले जाण म्या तूंते ।
ऐसा गर्जोनि अत्यदभुतें । गीं वृक्षातें सोडिले ॥१४०॥
वृक्ष देखोनि प्रचंड । श्रीरामे बाण सोडिला वितंड ।
दुखंड तिखंड नवखंड । करोनि शतखंड पाडिला ॥४१॥
वृक्ष निवटोनि दुर्धर । अंगप्रत्यंगी खोंचला खर ।
वाहत रुधिराचे पूर । रणी रघुवीर क्षोभला ॥४२॥

अंतकशस्त्राचा प्रयोग करुन खराचा शिरच्छेद :

रणी निर्दळावया खर । वाणी योजिले अंतकशस्त्र ।
प्रळयरुद्र महामंत्र । जपोनि शस्त्र सोडिले ॥४३॥
देहबुद्धीस मुकला खर । झुंजण्या पळण्या पडे विसर ।
धरणे मारणे धैर्यनिर्धार । हाही विचार विसरला ॥४४॥
जेवी का ज्ञाता नित्यात्मसिद्धी । निश्चये राहे रामपदीं ।
तेंवी श्रीराम देखता त्रिशुद्धी । रणसमाधी खरासी ॥४५॥
निरसोनि तत्वांचा विकार । समाधि पावे मुनिश्वर ।
तेंवी लक्षिता श्रीरामचंद्र । निर्विकार खर जाला ॥४६॥
येवोनि श्रीरामाचा बाण । माझा घेईल निजप्राण ।
हेही नाही आठवण । श्रीरामा रणसुखकारी ॥४७॥
श्रीरामबाण अति दुर्धर । खराचें उडविलें शिर ।
रणी पाडिला महावीर । धन्य रघुवीर खर म्हणे ॥४८॥

खराने केलेले श्रीरामस्तोत्र :

देहापासोनी सुतल्या देख । स्तुति वदे खराचें मुख ।
श्रीरामे छेदोनि द्वंद्वदुःख । दिधले निजसुख शरघातें ॥४९॥
छेदोनिया जन्ममरणदुःख । छेदोनिया तहान भूक ।
छेदोनि जीवींची धुकधुक । दिधले निजसुख शरघातें ॥१५०॥
छेदोनिया ज्ञानाज्ञान । सुखसंपन्न शरघात ॥५१॥
श्रीरामबाणाचा प्रताप । छेदिलें माझे पुण्यपाप ।
छेदोनियां संकल्पविकल्प । केले सुखरुप शरघातें ॥५२॥
श्रीरामाचा सतेज बाण । छेदिलें स्थूळ लिंग कारण ।
छेदोनियां मीतूंपण । सुखसंपन्न शरघातें ॥५३॥
छेदोनि माझा राक्षसविधी । छेदोनि माझी आधिव्याधी ।
छेदोनि माझी देहबुद्धी । श्रीरामे त्रिशुद्धी सुखी केले ॥५४॥
श्रीराम रणयोद्धा निकरेंसीं । परी तो सुखरुप घायेंसी ।
ऐसे वदोनिया स्तुतीसी । पायांपासी शिर आले ॥५५॥

खराला उत्तम गतीची प्राप्ती :

जे गति नव्हे तापसांसी । जे गति नव्हे योगिसंन्याशांसी ।
ते गती दीधली खरासी । घायासरसीं श्रीरामे ॥५६॥
जे गति न लभे योगयोगीं । जे गति न लभे सर्वत्यागीं ।
ते गति दिधली खरालागी । रणरंगीं श्रीरामे ॥५७॥
जे गति न लभे वेदविधी । जे गति न लभे शास्त्रसिद्धी ।
ते गति दीधली बाणवेधीं । घाये त्रिशुद्धी खरासी ॥५८॥
जे गति न लभे कर्म करिता । जे गति न लभे ध्यान धरिता ।
ते गति आली खराच्या हाता । बाणाग्रता श्रीरामे ॥५६॥
जो जो श्रीरामदृष्टी रणी पडे । तो तो सायुज्यासी चढे ।
राक्षसांचे भाग्य चोखडे । रणी रोकडें सायुज्य ॥१६०॥

खराचे शौर्याची प्रशंसा :

सुरनरां खर दुर्धर । खरासी शंके दशशिर ।
तो श्रीरामे रणी हाणिला खर । जयजयकार द्विजदेवां ॥६१॥

युद्ध पाहून चकित झालेल्या सुरनरांना आनंद व श्रीरामांची स्तुती :

युद्ध पहावया सुरवरी । गगनी विमानांच्या हारी ।
वर्षती सुमनांच्या संभारीं । जयजयकारीं गर्जती ॥६२॥
युद्ध पाहो आला ब्रह्मदेव । युद्ध पाहो आला सदाशिव ।
जयजयकार करिती सर्व । रणी श्रीराघव निजविजयी ॥६३॥
गगनी वाजे सिद्धांची टाळी । जयजयकार ऋषींचा भूतळीं ।
श्रीरामे मर्दिले राक्षस बळी । भूमंडळी आल्हाद ॥६४॥
श्रीरामप्रतापाचे पूर्ण । स्वर्गी लागले निशाण ।
हरिखे नाचती सुरगण । श्रीराम रावण निर्दाळील ॥६५॥

लक्ष्मण-सीतेचे अभिवादन :

श्रीरामाचे युद्ध देखोन । श्रीरामसेज उतरुन ।
सीतासौमित्र योवोन । लोटांगणे श्रीरामा ॥६६॥
हरिखाचें उल्हासता । सीता आलिंगीं श्रीरघुनाथा ।
श्रीरामे आश्वासोनि सीता । होय आलिंगिता सौमित्रा ॥६७॥

श्रीरामांचा ऋषींना नमस्कार, आशीर्वादमहिमा :

पाचारोनि ऋषिगण । श्रीराम घाली लोटांगण ।
राक्षसी गांजिले ब्राह्मण । ते मी उत्तीर्ण पै जालो ॥६८॥
राक्षयभयाते निवारीं । ते म्या आज्ञा वंदोनि शिरी ।
तुमचिये कृपेकरीं । केली बोहरी राक्षसा ॥६९॥
तुमचिया कृपायुक्ती । मज जाली यशःप्राप्ती ।
राक्षस मारिले जाली कीर्ती । सत्संगतिनिजबळे ॥१७०॥
जयाचे पाठीसी द्विजवर । देवोनि असती नाभीकार ।
एकला जिंके तो चराचर कृपा सधर द्विजांची ॥७१॥

समस्तसंतत्समवाप्तिहेतवः समुत्थितापत्कुलधूमकेतवः ।
अपारसंसारसमुद्रसेतवः पुनन्तु मां ब्राह्मणपादपांसवः ॥८॥

सद्गुण संपत्तीचें कारण । ब्राह्मणांचा चरणरेणुप्रमाण ।
परमापत्तिकुळनिर्दळण । द्विजचरणप्रसादें ॥७२॥
अपार भवसागराआतुं । द्विजपदरजसन्नद्ध सेतु ।
पडणे बुडणें नाही आवर्तु । सुखस्वार्थु द्विजचरणीं ॥७३॥
ब्राह्मणांचे चरणतीर्थी । गंगादि तीर्थे पवित्र होती ।
दास्य करिती चार्‍ही मुक्ती । सभाग्य भगती द्विजचरणीं ॥७४॥
त्या तुमची नित्ससंगती । भाग्ये मज जाली प्राप्ती ।
तेणे पावलों अगाध कीर्ती । वानू किती द्विजमहिमा ॥७५॥
तुम्हांसी कांही द्यावे दान । ब्रह्मार्पण जन्मस्थान ।
करोनि स्वधर्मानुष्ठान । सुखसंपन्न असावे ॥७६॥
अरुणा वारुणा सरस्वती । ब्रह्मगिरी अष्टतीर्थी ।
करिता शंकों नका चित्ती । आज्ञानुवर्ती मी तुमचा ॥७७॥
ऐसे बोलोनि श्रीरघुनंदन । पुढती घाली लोटांगण ।
सुखी जाहले ब्राह्मण । श्रीरामगुण वर्णिती ॥७८॥

ब्राह्मण-ऋषींकडून श्रीरामांचे अभिनंदन :

वानिती श्रीरामाची कीर्ती । वंदिती श्रीरामाची मूर्ती ।
श्रीरामगुण गीती । द्विज गर्जती श्रीरामनामें ॥७९॥
द्विजीं घेतले जनस्थान । राक्षसपल्या पलायमान ।
हिरोनि घेतले धनधान्य । वस्त्रभूषण ते हरिती ॥१८०॥
गंगातीरींचें ब्राह्मण । अतिशयेंसीं महाकठिण ।
आम्हांसी नागविती संपूर्ण । त्यांसी कोण निवारी ॥८१॥
पुरुषांची जातिव्यक्ती । श्रीरामे रणी लाविली ख्याती ।
आम्ही रांडातें द्विज नागविती । धाके मुतती सांगती शूर्पणखे ॥८२॥
राक्षसपत्‍न्या पै विमानी । त्यामाजी नकटी मुखरणी ।
भेडसावितां ब्राह्मणी । जीव घेवोनि पळाल्या ॥८३॥
ऋषी राहिले जनस्थानी । श्रीराम राहिला स्वस्थानीं ।
एका शरण जनार्दनी । रामायणीं सुखस्वादु ॥८४॥
रामायणीं भुक्ति मुक्ती । रामायणीं अगाध कीर्ती ।
रामायणी ब्रह्मप्राप्ती । असे निष्ठत श्रवणार्थे ॥८५॥
एकाजनार्दना शरण । जीवां रमणीय रामायण ।
खरादिराक्षसमर्दन । श्रीरघुनंदन निजविजयी ॥८६॥
इति श्रीभावार्थरामायणे‌ऽरण्यकांडे एकाकारटीकायां
खरमर्दनं नाम एकादशोऽध्यायः ॥११॥
॥ ओंव्या १८६ ॥ श्लोक ८ ॥ एवं १९४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग