॥ श्रीएकनाथमहाराजकृत
21.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय एकविसावा ॥
जटायूचा उद्धार
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सीतेच्या शोधासाठी मार्गक्रमण चालू असता अद्भुत राक्षसाचा पाय आढळतो :
उमा गेली महेशापाशीं । श्रीराम लक्ष्मण वनवासी ।
निघाले सीतागवेषणासी । मार्गचिन्हांसी पहाताचि ॥१॥
ददर्श भूमौ निष्क्रातं राक्षसस्य पदं महत् ।
स समीक्ष्य परिक्रान्तं सीताया राक्षसस्य च ॥१॥
संभ्रान्तहृदयो रामः शशंस भ्रातरं प्रियम् ।
इह लक्ष्मण पश्य त्वं राक्षसस्य महत्पदम् ॥२॥
मिथ्यामे तर्जितःशैलो न सीता गिरिगह्नरे ।
तदद्दष्टवा लक्ष्मणो भितःपदं विकृतमद्भुतम्॥३॥
मार्गी माग पहात जात । तंव राक्षसपद अत्यद्भुत ।
देखोनि श्रीरामा आनंद । मार्गी माग शुद्ध लागला ॥३॥
लक्ष्मणा धांव धांव आता । राक्षस घेवोनि जातो सीता ।
मार्ग ओळख तू तत्वता । झणी दुश्चित होशील ॥४॥
राक्षसपद अति विक्रांत । देखोनि लक्ष्मण विस्मित ।
सवेंचि जाहला भयभीत । सीता भक्ष्यार्थ न वधावी ॥५॥
मार्गी देखिला जो माग । त्याचा दोघीं धरोनिया लाग ।
धांवणे धांवतां सवेग । जटायु भग्नांग देखिला ॥६॥
अथ पर्वतसंकाशं छिन्नपक्ष व्दिजोत्तमम् ।
ददर्श पतितं भूमौ क्षतजार्द्रं जटायुषम् ॥४॥
तं द्दष्टवा गिरिशृंगाभं रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
अनेन सीता वैदेही भक्षिता नात्र संशयः ॥५॥
अधिक पुढे गेल्यावर रक्ताने माखलेला असा एक अति भव्य देह आढळलाः
जैसा का महापर्वत । शेंदूरें न्हाणिला धगधगित ।
तैसा जटायु भासत । रक्तें आरक्त सर्वांगें ॥७॥
त्यासी देखोनि श्रीरघुनाथ । सौमित्रासी स्वये सांगत ।
सीता भक्षोनि पाशिलें रक्त । दिसे आरक राक्षस ॥८॥
त्याचा करीन मी घात । बाण सज्जोनि रघुनाथ ।
कोपे चालिला कृतांत । सीतासाह्यार्थ प्रतापी ॥९॥
माझी भक्षोनियां कांता । तू कोण रे वनी वसता ।
तुझ्या मी करीन निजघाता । होय गर्जता श्रीराम ॥१०॥
ऐकोनि श्रीरामाची वाणी । जटायु घायवट धरधीं ।
काय बोले दीनवचनीं । सावधानीं अवधारा ॥११॥
स दिनो दीनया वाचा सफेनं रुधिरं वमन् ।
अभ्यभाषत पक्षीशो राम रामेति राघव ॥६॥
यामोषधिमिवायुष्मन्नन्वेषसि महावने ।
सा देवी मम च प्राणा रावणेनोभयं हृतम् ॥७॥
जटायूने स्वतःची ओळख देऊन वृत्तांत निवेदन केला :
ऐकोनि श्रीरामांचे वचन । जटायु म्हणे मी धन्य धन्य ।
करावया माझे दीनोद्धरण । स्वये आपण श्रीराम आला ॥१२॥
श्रीरामाचे आगमन । सीताशुद्ध्यर्थ नव्हे जाण ।
करावया दीनोद्धरण । वनाभिगमन श्रीरामा ॥१३॥
सफेन रुधिर वमून । जटायु सांडीत होता प्राण ।
ऐकोनिया श्रीरामवचन । जाला सावधान भावार्थे ॥१४॥
श्रीराम जय राम जयजय राम । जटायु स्मरे रामनाम ।
माझा छेदावया देहभ्रम । अंतीं श्रीराम पावला ॥१५॥
धन्य धन्य वृक्षवल्ली औषधी । श्रीराम विचरे ज्यांसन्निधीं ।
ते पावन गा त्रिशुद्धी । कृपानिधि श्रीराम ॥१६॥
ऐके श्रीराम रघुपती । वनी विचरसी जीचे अर्थीं ।
ते म्या देखिली सीता सती । नेली निश्चतीं रावणे ॥१७॥
सीता मज पूज्य गुरुपत्नी । गुरुत्वे प्रिय प्राणांहूनी ।
तुम्ही आश्रमी नव्हतां कोणी । नेली चोरोनी रावणे ॥१८॥
त्वया विरहिता देवी लक्ष्मणेन च राघव ।
हियमाणा मया दृष्टा रावणेन बलीयसा ॥८॥
आश्रमातून रावणाने सीतेला पळविलीः
तुज गेलिया मृगापाठी । लक्ष्मणे सांडिली पर्णकुटी ।
वेगे येवोनि रावण कपटी । सीता गोरटी नेली तेणे ॥१९॥
सीता बळे हरिली रावणे । तुचचें नव्हेचि धांवणे ।
आक्रंदत नेली तेणे । ते म्या देखणे देखिली ॥२०॥
ऐसे ऐकोनि श्रीरघुनाथा । मज मानिसी नपुंसकता ।
तरी सीतेनिमित्त लंकानाथा । केले ते आता ऐका स्वामी ॥२१॥
सीतामभ्यवपन्नोऽहं रावणश्च रणे प्रभो ।
विध्वंसितरथच्छत्रः पातितो धरणीतले ॥९॥
एतदस्य धनुर्मघ्नमेते चास्य शरास्तथा ।
अयमस्य रणे राम भग्नः सांग्रमिको रथः ॥१०॥
अत्र युद्धं मया दत्तं रावणस्य पुनःपुनः ।
पक्षपातैर्नखैर्घौरेर्गात्राण्यारुह्य वैरिणः ॥११॥
ते मी प्रत्यक्ष पाहिल्याने त्याच्याशी युद्ध केले :
रावणे हरिता सीतेसी । मी गेलों होतो वनक्रीडेसी ।
तंव सीता आक्रंदत आक्रोशी । मी वेगेंशी पावलों ॥२२॥
घोर युद्ध केले रणी । पैल पाहे रक्तांकित धरणी ।
रावणातें म्या जाचूनीं । छत्र भंगोनी पाडिलें ॥२३॥
त्याचे जे का धनुष्यबाण । नखे म्या केले चूर्ण ।
रथींचे खर पिशाचवदन । तेही सप्राण निर्दाळिले ॥२४॥
युद्ध जाले कडकडाट । ध्वज भंगिला अति उद्भट ।
रथ सारथि करोनि पीठ । शिरीचा मुकुट पाडिला ॥२५॥
जटायूसमोर रावणाचे सामर्थ्य निष्फळ ठरते :
युद्धों भंगिला रावण । मजसी न चाले आंगवण ।
मग मज ठकवोनि जाण । सीता घेवोनि निगाला ॥२६॥
राक्षसमावा गुप्तत्वेंसीं । सीता घेवोनि काखेसीं ।
कळो न देता पशुपक्ष्यांसी । निघे आकाशी अति गुप्त ॥२७॥
मजही हडबड जाली मोठी । हातींची नेली सीता गोरटी ।
काय श्रीरामा सांगूं गोष्टी । लाज पोटी सलज्ज ॥२८॥
मग पाहता खुंटल्या दृष्टी । रावणे सीता नभाचे पोटी ।
देखोनि धांविनलों उठाउठी । झडपेसाठी सांडविली ॥२९॥
वेगी धांवोनि सत्वर । घायीं घायवट केले शरीर ।
नखे विदारितां दशशिर । वाहे पूर रुधिराचा ॥३०॥
रावणाने घाबरुन सीतेला मुक्त केली :
मुखी नखी पाखी झडपित । रावण केला अस्ताव्यस्त ।
सीता सांडोनि त्वरित । पळे लंकनाथ अति धाके ॥३१॥
पक्षें सांडविली सीता । हे मज लाज लंकानाथा ।
मग युद्धा प्रवर्तला मागुता । सलज्जता अभिमाने ॥३२॥
तो मज रागे हाणी लाता । म्या चुकविल्या तळपतां ।
तेणे मज हाणिता मुष्टिघाता । अति झडपितां झडपिला ॥३३॥
ऐसा पक्षवातावर्त । त्यामाजी नखमुखांचे आघात ।
रावणा करोनि अस्ताव्यस्त । रणी मूर्च्छित पाडीला ॥३४॥
उभय पांखांच्या अति वाता । गगनी उडविलें लंकानाथा ।
तेथोनि तळी पडतपडतां । उडोनि मागुता झडपिला ॥३५॥
देखोनि माझी आंगवण । रावणे दांतीं धरिले तृण ।
येथोनि पुरे पुरे रण । दीनवदन अति दुःखी ॥३६॥
रावणाची मानहानी, त्यामुळे युद्धासाठी त्याचे पुनरागमन :
पक्षी नावरे रणांगणी । रावणा जाली मानहानी ।
मुख दाखविता लाज जनी । आला परतोनि रणासी ॥३७॥
मज छळावया पाही । रावण आला लवलाही ।
दोघे झुंजूं उसण्या घायी । ते म्या पाही मानिलें ॥३८॥
रावणाचे कपटाचरण :
मज तुझी घालोनि आण । रावण पुसे माझे मरण ।
असत्य न वदे गेलिया प्राण । तुझी आण नुल्लंघी ॥३९॥
रावणाचे निजमरण । म्यांही पुसिले आपण ।
मिथ्यावादी पापी पूर्ण । प्रतारोन बोलिला ॥४०॥
तुझेनि भजनें सत्यसात्विकी । मृत्यु सांगितला दोही पाखी ।
रावण सांगे वामांगुष्ठनखी । महापातकीं अनृतवादी ॥४१॥
खग खेचर अति आवेशी । दोघे मिनलों संग्रामासी ।
लक्ष ठेवोनिया वर्मासी । युद्ध आकाशी । निराधारीं ॥४२॥
पांखीं झडपोनि दशानन । वामांगुष्ठा केले छेदन ।
तेणे न मरेचि रावण । कपटी पूर्ण अनृतवादी ॥४३॥
रावण बोलिला भावार्थ । ऐसा माझे मनी मनोरथ ।
यालागी करोनि पुरुषार्थ । अंगुष्ठ तरित छेदिला ॥४४॥
छेदिता वामांगुष्ठनख । हातातळी आले पांख ।
रावणे उपडिले देख । परम दुःख मज जाले ॥४५॥
डोळ्यांसमोर सीता पळविल्यामुळे जटायूला दुःख :
उपडिलें तेणे निजपांख । त्याचे मज नाही असुख ।
सीता नेली मज प्रत्यक्ष । परम दुःख श्रीरामा ॥४६॥
ऐशी रावणा लाविली ख्याती । तू न पावसीच रघुपती ।
यश न ये माझ्या हाती । सीता सती नेली तेणे ॥४७॥
पांख छेदिल्याचें दुःख कोण । वेगी न येसीच तू आपण ।
सीता घेवोनि गेला रावण । दुःख दारुण मज जाहलें ॥४८॥
मजचि देखतदेखतां । रडत रावणे नेली सीता ।
थोर दुःख हे रघुनाथा । किती आता मी सांगूं ॥४९॥
रामस्तस्य तु विज्ञान सीतासक्तां प्रियां कथाम् ।
गृधराजं परिष्वज्य रुरोद सहलक्ष्मणः ॥१२॥
जटायूचे वृत्त ऐकून रामलक्ष्मणास दुःख :
ऐसे ऐकोनि जटायुवचन । अत्यंत कृपें रघुनंदन ।
त्यासी देता आलिंगन । आले रुदन श्रीरामा ॥५०॥
सखा बंधु पुत्र आप्त । घायीं पडलिया रणांत ।
तैसियापरी श्रीरघुनाथ । असे स्फुंदत कृपाळु ॥५१॥
युद्धी गांजोनि रावण । सीता सोडविली जाण ।
तो जटायु मारिला छळून । दुःखे लक्ष्मण विलपत ॥५२॥
जरी हा युद्धसमयी येता । तरी कैसैनि रावण सीता नेता ।
माझा जटायु वांचता । अतिदुःखिता सौमित्रा ॥५३॥
कोणी न सांगेचि धडपुढे । यालागी हिंडों मागे पुढे ।
मार्ग लागता निवाडे । तरी कैवाडें धांवतो ॥५४॥
देखोनि जटायूच्या घाता । लक्ष्मणासी परम व्यथा ।
सखा निमाला सर्वथा । दुःखावस्था विलपत ॥५५॥
जटायोयदि शक्रोषि वाक्यं व्याहरितुं पुनः ।
सीतामाख्याहि भद्रं ते वधमाख्याहि चात्मनः॥१३॥
जटायू बेशुद्ध असल्यामुळे सीतेला कोठे नेली हे माहीत नव्हते :
श्रीराम पुसे जटायूसी । जरी शक्ति असेल बोलावयासी ।
तरी सीतासुद्धि ये वेळेसीं । पुसेन तैसी मज सांगे ॥५६॥
सीता हरुनी रावण । कोणे दिसे केले गमन ।
कोण त्याचे स्थान भुवन । हे संपूर्ण मज सांग ॥५७॥
ऐसी श्रीराम पुसतां गोष्टी । जटायूसी आनंद पोटी ।
धन्य धन्य आजी मी सृष्टी । श्रीराम दृष्टी देखिला ॥५८॥
रावणे नेली सीता गोरटी । हे समूळ सांगावया गोष्टी ।
आत्मा म्या धरिला कंठी । तुझे चरण दृष्टी देखावया ॥५९॥
मी पडलो मूर्च्छापन्न । केउते रावणे केले गमन ।
तेणे त्याचे स्थान आणि भुवन । सांगता नयन लाविले ॥६०॥
सत्य जाण श्रीरघुनाथा । येथोनि न बोलवे आता ।
तुझे चरणी ठेवोनि माथा । मी निजजीविता त्यागितों ॥६१॥
रामाची त्यास बरा करण्याची इच्छा व तसे आश्वासन :
सीताहरणाचें असुख । तैसे मज नाही आत्यंतिक ।
जटायुमरणाचें दुःख । परम शोक सौमित्रा ॥६२॥
मदर्थे येणे वेंचिला प्राण । याचे व्हावया उत्तीर्ण ।
जटायूस आश्वासून । श्रीराघुनंदन अनुवादे ॥६३॥
कृपा उपजली श्रीरघुनाथा । नाभीं म्हणोनि जाला बोलता ।
तुज मी वांचवीन गा आता । झणी जीविता सांडिसी ॥६४॥
तुझे निवारीन दुःख । तुज मी देईन दोनी पांख ।
वांचवीन वर्षे असंख्य । मरनोन्मुख का होसी ॥६५॥
आम्ही तुम्ही तिघे जण । शोधून मारुं वैरी रावण ।
तू युद्धा साह्यकारी संपूर्ण । झाणीं प्राण सोडिसी ॥६६॥
स्वर्गी नमुचीच्या युद्धार्था । साह्य जालासी दशरथा ।
तैसा साह्य होई आता । लंकानाथा वधावया ॥६७॥
जटायूने हास्य करुन मुक्तीची इच्छा व्यक्त केली :
ऐकोनि श्रीरामाचे वचन । जटायु जाला हास्यवदन ।
वांचविसी हे नवल कोण । तू स्रष्टा संपूर्ण सृष्टीचा ॥६८॥
तुझिया संकल्पसत्ते आंत । जगा उत्पत्ति स्थिति अंत ।
ब्रह्मा विष्णु शिव आज्ञा वंदित । ऐसा तू समर्थ श्रीरामा ॥६९॥
तुज मारिता रावण । निमेषार्ध न लागे जाण ।
तेथे मशक मी साह्य कोण । विज्ञापन अवधारी ॥७०॥
मज आयुष्य आकल्प पूर्ण । परि हेंचि नित्य चिंतन ।
जे ठाकोनियां श्रीरामचरण । माझे जन्ममरण छेदावे ॥७१॥
श्रीराम भेटावा अंतगतीं । योगी संन्यासी चिंतिती ।
तो तू भेटलासी कृपामूर्ती । देहलोभे चित्ती मज नाही ॥७२॥
असे तुझ्या सान्निध मरण येणे फार दुर्लभ :
ऐके श्रीरामा सावधान । आतांच्या ऐसे मज मरण ।
पुढे सर्वथा न लाभे जाण । हेंही लक्षण अवधारी ॥७३॥
वाचे श्रीरामनामस्मरण । दृष्टी श्रीरामदर्शन ।
हृदयी श्रीरामाचे ध्यान । ऐसे मरण मग कैंचें ॥७४॥
अंतीं तूंते श्रीरामा स्मरतां । चारी मुक्ती देसी भक्ता ।
ते तू पूर्ण ब्रह्म भेटलें असता । देहलोभता मज नाही ॥७५॥
माझ्या पूर्व भाग्याच्या कोटी । तेणे श्रीराम परब्रह्म देखिला दृष्टी ।
माझा देह लोभ निवटी । कृपादृष्टीं मज पाहे ॥७६॥
रावणे केले पक्षच्छेदन । छेदिला उभयपक्षाभिमान ।
तेणे तुष्टला श्रीरघुनंदन । वांचलेपण पुरे श्रीरामा ॥७७॥
माझ्या भाग्याची निजगती । श्रीराम पावला कृपामूर्ती ।
आता नको देह संगती । कृपामूर्ति श्रीरामा ॥७८॥
म्हणोनि धरले दोनी चरण । माझे निवारीं जन्ममरण ।
ऐकोनि जटायूंचे वचन । श्रीरघुनंदन तुष्टला ॥७९॥
या च भूमिप्रदातृणामाहिताग्नेश्च या गतिः ।
गोहिरण्यप्रदातृणां या गतिः शरणार्थिनाम् ॥१४॥
श्रीरामांची त्या जटायूला उत्तम गती दिली :
श्रीरामकाज लक्षून । सीतार्थी वेंचिला प्राण ।
त्यासी श्रीराम संतोषोन । गति संपूर्ण स्वये देत ॥८०॥
सोमयाग श्येनयाग । अश्वमेधादि नाना याग ।
अग्निहोत्राची गति सांग । जटायूस योग्य न मानीच राम ॥८१॥
गोदान भूमिदान तिळदान । हिरण्यादि नाना दान ।
जटायूअर्थी ते गति गौण । रघुनंदन स्वये मानी ॥८२॥
शरणार्थ्याची शरणागती । धर्मशिलाची धर्मगती ।
अपुनरावृत्तियाची गती । तेही रघुपति गौण मानी ॥८३॥
संन्याश्या ब्रह्मसदनप्राप्ती । आणि योग्यांची योगमुक्ती ।
जटायूप्राप्त्यर्थ निश्चिती । श्रीरघुपति स्वये गौण मानी ॥८४॥
या अवघिया गतींवरती । उत्तमोत्तम उत्तम स्थिती ।
परात्पर परम गती । ममाज्ञाशक्ती जाय वेगी ॥८५॥
तुझे आज्ञेची निजशक्ती । तुझी आहे तुजप्रती ।
म्या तेथे जावे कैशा रीती । विकल्प चित्ती धरुं नको ॥८६॥
योगयाग धर्मस्थितीं । धार्मिक जे गति पावती ।
ते भोगक्षयें क्षया जाती । पुनरावृत्ति सर्वांसी ॥८७॥
माझिया दर्शनाचे पुण्य । कल्प गेलिया नव्हे क्षईण ।
ते तू पावसी शाश्वत स्थान । सत्य वचन हे माझे ॥८८॥
जटायु ऐके सावधान । जैसे बोलती साधारण ।
तैसे नव्हे माझे वचन । त्वरित गमन तू करी ॥८९॥
ऐसे बोलता श्रीरामचंद्र । वैकुंठवासी चतुर्भुज नर ।
पीतांबरधारी शंखचक्रधर । आले सत्वर विमानस्थ ॥९०॥
विमानस्थ चतुर्भुज नर । शंखचक्र गदाधर ।
सांष्टांगी वंदिला श्रीरामचंद्र । जोडोनि कर उभे ठेले ॥९१॥
श्रीराम म्हणे त्या पुरुषांसी । जटायु माझा पुण्यराशी ।
त्यासी न्यावे वैकुंठासी । अक्षयवासीं स्थापावा ॥९२॥
विमान देखतांची पाही । जटायू जाला दिव्यदेही ।
लागला श्रीरामाच्या पायी । म्हणे मी कायी वंदूं आता ॥९३॥
तुझे करितांचि स्तवन । वेदशास्त्रां पडले मौन ।
तेथे मी पक्षी अति दीन । गुणवर्णन काय वदूं ॥९४॥
कांही न वदणें हेंचि स्तवन । कांही न करणे हेंचि भजन ।
कांही न होणें हे प्राप्ति पूर्ण । परिपूर्णे श्रीराम ॥९५॥
जटायूने श्रीरामांना तीन वेळा प्रदक्षिणा करुन विमानारोहण केले :
त्रिवार करोनि प्रदक्षिणा । लागोनि श्रीरामाच्या चरणा ।
जटायू आरुढोनि विमाना । वैकुंठभुवना निघाला ॥९६॥
वैकुंठवासिये पुरुषासी । स्वामित्व आहे रामापासी ।
जटायु विस्तिम मानसी । निघे उल्लासीं वैकुंठा ॥९७॥
पुढतापुढतीं प्रदक्षिणा । पुढतपुढतीं लागे चरणा ।
मग आरुढोनि विमाना । वैकुंठभुवना निघाला ॥९८॥
तात त्वं निजतेजसैव गमितः स्वर्गं व्रज स्वस्ति ते ।
ब्रूमस्त्वेकमिमां वधूहृतकथां तातांतिके मा कृथाः ।
रामोऽहं यदि तद्दिनैः कतिपयैर्बीजानि सत्कंधरा ।
सार्द्धं बंधुजनेन सेंद्रविजयी वक्ता स्वयं राघवः ॥१५॥
निजतेजें विराजमान । तेजस्वी देदीप्यमान ।
क्षणे पावसी वैकुंठभुवन । कृतकल्याण जतायु ॥९९॥
स्वर्गात राजे दशरथाची भेट झाल्यावर त्यांना
सीताहरणाचे वृत्त न सांगण्याची श्रीरामांची जटायूला विनंती :
श्रीरामे जटायु पुनीत । वैकुंठा धाडी श्रीरघुनाथ ।
अगाध कथा वैकुंठांत । होईल ख्यात तिही लोकी ॥१००॥
तुज भेटेल माझा पिता । माझी पुसेल वनवार्ता ।
तरी रावणे हरोनि केली सीता । हे सर्वथा नको सांगू ॥१॥
श्रीरामे उद्धरिले जटायूसी । परम आल्हाद दशरथासी ।
परी हारविली वनवासी । ऐकता त्यासी अति दुःख ॥२॥
जन्मोनियां सूर्यवंशी । सीता हारविली वनवासी ।
लाज लाविली सूर्यवंशासी । अति आवेशी क्षोभेल ॥३॥
मग वधावया लंकानाथ । येथे येईल दशरथ ।
एवढा होईल अनर्थ । सीताहरणार्थ नको सांगू ॥४॥
तंव जटायु म्हणे श्रीरघुनाथा । भली हे सांगितली व्यवस्था ।
येर्हवीं मी सांगतो दशरथा । या गुह्यार्था न कळोनि ॥५॥
एवढे चरित्रकथन । कैसेनि पितयास होईल ज्ञान ।
तरी मागून येवोनि रावण । स्वमुखें आपण सांगेल ॥६॥
ते वृत्त स्वतः रावण मागाहून सांगेल :
ज्याचे मी करीन उद्धरण । तोचि येवोनि आपण ।
सांगेल सीतेचे हरण । कुळनिर्दळणप्रसंगें ॥७॥
सपुत्रबंधुप्रधान । ससैन्येंसीं दशानन ।
रामे वधिला विंधोनि बाण । सीताहरण करितांचि ॥८॥
ऐसी ऐकतांचि वार्ता । सुख होईल श्रीदशरथा ।
आनंद पूर्वजां समस्ता । माझ्या पुरुषार्था देखोनि ॥९॥
श्रीराम ज्ञानविज्ञापघन । ब्रह्मलिखित तुझे वचन ।
जटायु घालोनि लोटांगण । केले गमन वैकुंठा ॥१०॥
श्रीराम स्वये ब्रह्म पूर्ण । जटायू भक्त संपूर्ण ।
करोनि पितर सनातन । जटायु सुखसंपन्न पै केला ॥११॥
एकाजनार्दना शरण । जाले जटायुउद्धरण ।
पुढे निर्दाळावया रावण । रघुनंदन चालिला ॥१२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
जटायद्धरणं नामैकविंशतितमोऽध्यायः ॥२१॥
॥ ओंव्या ११२ ॥ श्लोक १५ ॥ एवं १२७ ॥
