॥ श्रीएकनाथमहाराजकृत
5.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय पाचवा ॥
अगस्ती ऋषींकडून श्रीरामास अस्त्रप्राप्ती
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
ताबडतोब आजच जाण्याचा उपदेश :
श्रीराम म्हणे महामती । तुझ्या जेष्ठ बंधु अगस्ती ।
तयाचिया दर्शनार्थी । तुम्हांप्रती मी आलो ॥१॥
करावया ज्येष्ठाचें दर्शन । अति उदति माझे मन ।
कोणे मार्गे करावे गमन । कृपा करोनि सांगावे ॥२॥
यदि बुद्धिः कृता राम द्रष्टुं तं मुनिपुंगवम् ।
अद्यैव गमने बुद्धिं रोचयस्व महामते॥१॥
जरी अगस्तीचें दर्शन । करावया वांछी तुझे मन ।
तरी आजचि करावे गमन । विलंबव्यवधान न करावे ॥३॥
आश्रमातील देवस्थाने :
जे मार्गी करिता गमन । सर्वथा न चुकिजे आपण ।
तैसे सांगेन मार्गचिन्ह । सावधान अवधारा ॥४॥
जे चालता निजपंथ । सीता श्रीराम सुखी होत ।
सौमित्राचें सुखावें चित्त । तो पंथ संकेतें अवधारा ॥५॥
अगस्त्याश्रम अति पावन । शिवादि देवीं निर्मूनि भुवन ।
करिताती अनुष्ठान । नित्य श्रवण श्रीरामकथा ॥६॥
देवांचे भूमीं न लागती पाये । अगस्त्याश्रमी तेही पाहे ।
बैसोनियां देवसमुदाये । श्रवण होताहे श्रीरामकथा ॥७॥
पावन श्रीरामायणी कथा । श्रीअगस्ति अति रसाळ वक्ता ।
देव बैसोनि तत्वता । श्रीरामकथा परिसती ॥८॥
अगस्त्याश्रमी देवस्थानें । उभविली आहेति कोण कोणे ।
तेही ऐका सावधाने । मार्गचिन्ह लक्षावया ॥९॥
स तत्र ब्राह्मणः स्थानं शिवस्थानं तथैव च ।
अग्नेः स्थानं महेन्द्रस्य स्थानं चैव विवस्वतः ॥२॥
स्थानं धातुर्विधातुश्च वायुस्थानं तथैव च ।
कार्तिकेयस्य च स्थानं धर्मस्थानं तथैव च ॥३॥
मार्ग सुचिन्ह नित्य निर्विघ्न । त्या मार्गाची ऐका खूण ।
सौब्रह्मण्य ब्रह्मस्थान । शिवस्थान शिवशक्ति ॥१०॥
इंद्रचंद्रकुबेरस्थान । अग्निस्थान भृगुस्थान ।
यमस्थान धर्मस्थान । नित्य सावधान श्रवणार्थीं ॥११॥
धाता विधाता आपण । रामायण सुखसंपन्न ।
वायु सांडोनि चंचळपण । अति तल्लीन श्रवणार्थीं ॥१२॥
स्वामिकार्तिक शिवसुत । तोही तेथे नित्य वसत ।
ऋषीस परमार्थ पुसत । ऋषि सांगत स्वानंदे ॥१३॥
कासीखंड केदारखंड । सांगितले श्रीशैलखंड ।
श्रीरामायणकथा अति गोड । सुख सुरवाड सर्वांसी ॥१४॥
अनागतभाष्य रामायण । ते कथेचे करावे श्रवण ।
आश्रमी वसती देवब्राह्मण । रम्य रामायण परिसावया ॥१५॥
अगस्त्याश्रममहिमान । देव दानव द्विज पावन ।
श्रीरामा शीघ्र करी गमन । मार्ग सुचिन्ह लक्षोनी ॥१६॥
ततस्तव्दचनं श्रुत्वा सह भ्रात्राभिवाद्यच ।
प्रतस्थेऽगस्त्यमुद्दिश्य सानुजःसह सीतया ॥४॥
ऐकोनि ऋषीचें वचन । श्रीराम झाला सुखसंपन्न ।
अगस्त्याश्रम अति पावन । स्वानंदे गमन करु रिघे ॥१७॥
अगस्तींकडून स्वागत :
श्रीराम सीता लक्ष्मण । अगस्त्यानुजा वंदोनि जाण ।
सन्मार्गाचे लक्षोनि चिन्ह । शीघ्र गमन तिही केले ॥१८॥
अगस्ति ज्ञाने अति समर्थ । स्वानंदे शिष्यांसी सांगत ।
आता येईल श्रीरघुनाथ । सीतासहित सौमित्र ॥१९॥
गुढिया मखरे आश्रमांत । ऋषि उभवी आल्हादयुक्त ।
परब्रह्म मूर्तिमंत । आता येथे येईल ॥२०॥
माझ्या भाग्याच्या फळल्या कोडी । आजी श्रीराम देखेन आवडी ।
उभवावया श्रीरामराज्याची गुढी । वना तांतडी आलासे ॥२१॥
मारोनि राक्षसांच्या कोडी । तोडावया नवग्रहांची बेडी ।
फेडावया देवांची बांधवडी । वना तांतडी आलासे ॥२२॥
निजधर्माचे संरक्षण । करावया दुष्टनिर्दळण ।
श्रीराम अवतार परिपूर्ण । कृपेनें आपण येथे आला ॥२३॥
आजि मी सभाग्य त्रिजगती । जो वेदशास्त्रां नव्हे व्यक्ती ।
तो राम केवळ कृपामूर्ती । सीतापति कृपाळु ॥२४॥
माझे भाग्य बापुडे किती । श्रीराम केवळ कृपामूर्ती ।
आश्रमा आला श्रीरघुपती । कृपामूर्ति श्रीराम ॥२५॥
ततःशिष्यैः परिवृतो निश्चक्राम महामुनिः ।
तं ददर्शाग्रतो रामो भ्रातरं चेदमव्रवीत् ॥५॥
बहिर्लक्ष्मण निष्कामत्यगरस्त्यो भगवानृपिः ।
औदार्येणागवच्छामि निधानं तप्सामिदम् ॥६॥
एवमुक्त्वा महाबाहुरगस्त्यं सूर्यवर्चसम् ।
अभिवाद्य तु धर्मात्मा तस्थौ राम कृतांजलिः ॥७॥
श्रीरामांचे साष्टांग वंदन :
ऐसी करोनि रामस्तुती । मेळवोनि ऋषींच्या पक्ती ।
शिष्यसमुदायेसीं अगस्ती । आला अति प्रीती सामोरा ॥२६॥
येता देखोनिया ऋषी । श्रीराम म्हणे लक्ष्मणासी ।
अगस्ति तपस्तेजोराशी । येतो आम्हांसी सामोरा ॥२७॥
समुद्र शोषिला आचमनीं । तो हा जाण अगस्तिमुनी ।
कृपाळु कैसा आम्हांलागोनी । येतो धांवोनी सामोरा ॥२८॥
ऐसे बोलोनि आपण । श्रीरामे घातले लोटांगण ।
मस्तकी धरिले दृढ चरण । दिधले अलिंगन ऋषीनें रामा ॥२९॥
विदेहतनया लक्ष्मण । नमस्कारिती मुमिचरण ।
तिघे जण सावधान । कर जोडोन राहिलीं ॥३०॥
देखोनिया श्रीरामचंद्र । ऋषीस आल्हाद अपार ।
आश्रमा आणिता गजर । जयजयकार ऋषिमंत्रीं ॥३१॥
अगस्ति ऋषि स्वये सज्ञान । ब्रह्ममूर्ति श्रीरघुनंदन ।
केले मधुपर्कें पूजन । दिधली गोदानें शतसंख्य ॥३२॥
श्रीराम म्हणे मी नीच सेवक । तुझ्या शिष्याचे रंकाचा रंक ।
येवढी पूजा अलोलिक । योग्य् देख मज नोहे ॥३३॥
अगस्त्य उवाच –
राजा सर्वस्य लोकस्य धर्मचारी दृढव्रतः ।
पूजनीयश्च मान्यश्च भवान्प्राप्तः प्रियातिथिः ॥८॥
ऋषींकडून रामस्तुती व महिमावर्णन :
ऐकोनि श्रीरामाचे वचन । अगस्ति बोले उल्हासोन ।
श्रीराघवा तुझे निजमहिमान । अगम्य जाण वेदशास्त्रां ॥३४॥
वेदशास्त्रांच्या निजयुक्ती । त्या परतल्या नेति नेति ।
श्रीराम केवळ ब्रह्ममूर्ती । त्रिजगती निजपूज्य ॥३५॥
जे का परब्रह्म अक्षर । ते तू श्रीराम साचार ।
भक्तकृपाळू होसी साकार । भाग्य थोर आजि माझे ॥३६॥
वरकड राजे ते भूपती । श्रीरामराजा त्रिजगती ।
तुझेनि भूते वाहे क्षिती । शशिसूर्यां गति तुझेनि ॥३७॥
तुझी आज्ञा अति दुर्धर । मर्यादा नुल्लंघीच सागर ।
इंद्रादिक तुझे किंकर । तुझेनि भूभार शेष वाहे ॥३८॥
काळ आज्ञा वंदी शिसी । प्रळयो करी मर्यादेसीं ।
भूते भूतात्मा तू होसी । पूज्य सर्वांसी श्रीरामा ॥३९॥
अवतार जाले उत्तमोत्तम । त्यांमाजी तू आत्माराम ।
तू तंव केवळ परब्रह्म । पूज्य परम परमार्थी ॥४०॥
ऐसी निजस्थिति तुजपासी । तो तू धर्मव्रत चालविसी ।
पित्राज्ञा प्रतिपाळिसी । निर्दाळिसी दृष्टातें ॥४१॥
माता पिता गुरु देवता । त्यांहूनि पूज्य तू श्रीरघुनाथा ।
ब्रह्मादि देवांहीवरता । परम पूज्यता श्रीरामा ॥४२॥
चारी देव तुज वर्णिती । शास्त्रें चरण येती ।
शिव विरिंचि पाया लागती । पूज्य परमार्थी श्रीरामा ॥४३॥
तुज द्यावा जो जो मान । तो तो तुजलांगीं होय न्यून ।
तुझे अगाध महिमान । मानापमान तुजं नाही ॥४४॥
श्रीरामा तुझे निजमहिमान । वानितां वेदा पडिले मौन ।
तो तू आलासी कृपा करुन । आजि मी धन्य स्वाश्रमेंसीं ॥४५॥
कांहीएक तुझी पूजा । मी करीन रघुराजा ।
ते अंगीकारीं अधोक्षजा । राक्षससमाजवधार्थीं ॥४६॥
तू आत्माराम प्रिय अतिथी । आश्रमा आलासी कृपामूर्ती ।
तुझी पूजा जे न करिती । ते अधःपाती अभाग्य ॥४७॥
विमुख होतांचि अतिथी । गृहस्था कोटिपापप्राप्ती ।
अतिथी ने पुण्यसंपत्ती । उरे अधोगति यजमाना ॥४८॥
यालांगीं श्रीरघुराजा । करावी अतिथीची पूजा ।
तू केवळ आत्मा माझा । माझी निजपूजा अंगीकारी ॥४९॥
अमृतोपम फळमूळें । पुष्पें आणोनि सुपरिमळें ।
मधुपर्कविधान – बळे । श्रीराम सुखमेळें पूजिला ॥५०॥
जयजयकाराच्या गजरीं । वेदोक्त महामंत्रीं ।
श्रीराम पूजिला ऋषीश्वरी चराचरी परमात्मा ॥५१॥
अगस्ति म्हणे श्रीरघुराजा । पुढतीं करीन तुझी पूजा ।
दिव्यायुधी अधोक्षजा । शत्रुसमाजा निवटावया ॥५२॥
इदं दिव्यं मह्च्चापं तृणी चाक्षय्यसायकौ ।
इदं च मे तनुत्राणमभेद्यं भगवान्ददौ ॥९॥
अमोघः सूर्यसंकाशो ब्रह्मदत्तः शरौ मम ।
महाराजतकोशोऽयमसिर्हेमविभूषितः ॥१०॥
अनेन धनुपा राम हत्वा संख्ये महासुरान् ।
आजहार श्रियं दिप्तां पुरा विष्णूर्दिवौकसाम् ॥११॥
एवमुवत्वा महातेजाः समस्तं तव्दरायुधम् ।
दत्वा रामाय भगवानगस्त्यःपुनरव्रवीत् ॥१२॥
रामप्रीतोऽस्मि भद्रं ते परितुष्टोऽस्मि लक्ष्मण ।
अभिवादयितुं यन्मां प्राप्तौ स्थःसह सीतया ॥१३॥
दिव्य, अक्षर असे धनुष्य, भाते, कवच अर्पण :
दिव्य चाप अक्षयी भाते । अनिवार शर पूर्ण तेथे ।
सुवर्णसंनाह खङगातें । रणी शत्रूंतें निवटावया ॥५३॥
शस्त्रास्त्रीं अभेद्य पूर्ण । सूर्यतेजे विराजमान ।
ते घेई गा अंगत्राण । देदीप्यमान तेजस्वी ॥५४॥
कवच लेल्यासी हे विश्रांती । शत्रुसंतापी निजतेजोदीप्ती ।
ऐसी हे कवचाची गती । रिपुदळणार्थीं अंगीकारीं ॥५५॥
रणी मर्दावया लंकानाथ । रथापेक्षा करील चित्त ।
ते काळी इंद्राचा रथ । मातलि त्वरित आणील ॥५६॥
ऋषीचें ऐकोनि वचन । श्रीरामे सौमित्रे केले नमन ।
ऋषीनें दिधले आलिंगन । सुप्रसन्न ऋषि जाला ॥५७॥
संतोषोनि श्रीरामासी । रणी निर्दाळावया राक्षसांसी ।
उल्हासोनि अगस्ति ऋषी । दिव्यायुधांसी अर्पीलें ॥५८॥
देवोनियां दिव्यायुधें । ऋषि म्हणे अति आल्हादे ।
रणी राक्षसांची कबंधें । शत्रसंबंधें नाचविसी ॥५९॥
ऐकोनि ऋषीच्या वरदासी । श्रीराम संतोषला मानसी ।
तव लोपामुद्रेने सीतेसी । अति उल्हासीं पूजिले ॥६०॥
लोपामुद्रेकडून सीतेचे कौतुक :
लक्षोनिया श्रीरघुनंदन । चरणचाली वनाभिगमन ।
तू पतिव्रता धन्य धन्य । आम्ही पावन तुझेनि ॥६१॥
तंव श्रीराम म्हणे अगस्तीसी । दंडकारण्य या वनासी ।
का म्हणताती महाऋषी । ते मजपासी सांगावे ॥६२॥
मग अगस्ति म्हणे श्रीरामासी । दंडक राजा या प्रदेशीं ।
अति गर्विष्ठ अहर्निशी । राज्यमदेंशीं उन्मत्त ॥६३॥
पारधी करिता दंडकासी । भृगुवंशींचा च्यवन ऋषी ।
अपमानिला अतिशयेंसीं । तेणे त्यासी शापिलें ॥६४॥
दण्डकेन परित्यक्तःस्वयं देशो महात्मना ।
भार्गवस्य तु शापेन निर्मुनुष्यो मृगोऽभवत्॥१४॥
योजनानांसहस्त्रे तु विन्ध्यपादप्रदक्षिणम् ।
नाति वर्शति पर्जन्यो न च वाति सुखोऽनिलः॥१५॥
दंडकारण्य कथा :
शाप दिधला कोपेंसी । भस्म होय स्वराज्येसीं ।
ऐसे बोलतांची ऋषी । स्वदशेंसीं भस्म जाला ॥६५॥
विंध्याद्रिदक्षिणभागेंसीं । जंव पाविजे सेतुबंधासी ।
तंव दंडकारन्य नाम यासी । ऋषिशापेंसीं भस्म जाले ॥६६॥
राजा भस्म जाला ससैन्य । भस्म जाले मनुष्यगण ।
भस्म जाले वृक्ष तृण । पशु पक्षी पूर्ण भस्म जाले ॥६७॥
भस्म जालीं सरितातडांग । भस्म जाले मृग पन्नग ।
भस्म जाले तद्देशी जग । दुर्धर राग ऋषीचा ॥६८॥
शापवाणीने प्रदेश ओसाड :
दंडकाचेनि शापे जाण । असंख्य अब्दें ओस वन ।
यालागी म्हणती दंडकारण्य । नामाभिधान राजशापे ॥६९॥
भार्गवाच्या शापभयेंसी । पर्जन्य वर्षेना तया देशी ।
प्रकाशे ना सूर्य शशी । अहर्निशी अंधकार ॥७०॥
ऐसेनि अंधकारेंसीं । लोतल्या वर्षानुवर्षी ।
पुढती वस्ती झाली कैसी । श्रीराम ऋषीसी पूसत ॥७१॥
अगस्ति सांगे श्रीरामासी । वसावया दंडकारण्यासी ।
नारदे विंध्याद्रीपासीं । महामेरुसी विनविले ॥७२॥
चराचरासी आधारु । स्वये जाला महामेरु ।
मेरुहूनि सधरु । पर्वत थोरुं असेना ॥७३॥
मेरु व विध्याद्री यांची स्पर्धा :
ऐकोनिया नारदोक्ती । मेरुचिया स्पर्धास्थितीं ।
खुंटली शशिसूर्याची गती । विंध्याद्रि ऊर्ध्वपंथीं वाढला ॥७४॥
राहिले स्वाहास्वधाकार । राहिले स्वधर्मकर्माचार ।
राहिले जपतपोविचार । रविचंद्र नुगवती ॥७५॥
लोपले स्वाहास्वधाकार । मरों टेकले देव पितर ।
भुकें तळमळती ऋषीश्वर । संध्येवीण आहार सेवूं नये ॥७६॥
विंध्याद्री उंच उंच वाढल्यामुळे सूर्यचंद्राची गती बंद, म्हणून सर्व कर्मे थंडावली :
गोधने राना न वचती । वत्से हंबरडा हाणिती ।
आकांत मांडला त्रिजगती । विंध्याद्रि गभस्ती उगवों नेदी ॥७७॥
मग ऋषीश्वर ब्रह्मयाप्रती । अवघे गार्हाणे सांगती ।
तेव्हा तिन्ही देव विचारिती । जे दक्षिणे अगस्ती धाडवा ॥७८॥
अगस्तींना देवांची विनंती :
देव सांगती अगस्तीसी । त्यजोनियां वाराणसीसी ।
नेमावया विंध्याद्रीसी । शीघ्र दक्षिणेसी तुम्ही जावे ॥७९॥
नेमोनियां विंध्याद्री । तो निजवावा पृथ्वीवरी ।
अहोरात्रें वाहतीं करी । शशिसूर्यां करी मोकळा मार्ग ॥८०॥
थोर पुण्य होईल ऋषी । देव पितर पावती तृप्तीसी ।
ब्राह्मण चालविती स्वधर्मासी । हे तुजपासी सामर्थ्य ॥८१॥
तुझे सामर्थ्य वानावें किती । आचमनें प्राशिला अपांपती ।
विंध्याद्रि बापुडे ते किती । परोपकारार्थी तवां जावे ॥८२॥
पुढतीं न करी उत्थान । तैसा विंध्याद्रि नेमून ।
संस्थापावया देवब्राह्मण । दक्षिणे गमन तुवा कीजे ॥८३॥
अगस्तीचे दक्षिणेला प्रयाण :
ऐकोनि देवांचे वचन । म्या जाणोनि नारदाचे मन ।
वसवावया दंडकारण्य । माझे आगमन दक्षिणेसी ॥८४॥
ऐके बापा श्रीरघुपती । माझे आगमन या रीती ।
आलो कोणकोण्या स्थिती । तेही तुजप्रती सांगेन ॥८५॥
कस्यचित्वथ कालस्य दैवयोगादहं नृप ।
वाराणसीं परित्यज्य इह प्राप्तोऽस्मि मानद ॥१६॥
मी पर्जन्योदकेंशीं मेघ । आलो घेवोनि अमोघ ।
सुरकार्य साधावया चांग । आलो सवेग विंध्याद्री ॥८६॥
विंध्याद्रीचे वंदन व त्याला आज्ञा :
ऐके राजचूडामणी । मज येता तेणे देखोनी ।
विंध्याद्रि आला लोटांगणी । यथोक्तपूजनीं पुसता होय ॥८७॥
कोण पा वार्ता उत्तरेसी । ते मज सांगा जी महाऋषी ।
तू येथोनि केउतां जासी । तेंही मजपासीं सांगावे ॥८८॥
कोणते धरोनि अपेक्षेसी । तू आलासी मजपासीं ।
ते म्या दिधले निश्चयेंसी । भाक मजपासीं दिधली ॥८९॥
त्यासी उत्तरेची वार्ता । म्या सांगितली श्रीरघुनाथा ।
तेही तुज मी सांगेन आता । यथार्थता अनुवादु ॥९०॥
विंध्याद्रि तुझा प्रताप । देखोनी मेरुसी महाकंप ।
सुरासुरा महासंताप । तुझे स्वरुप अति श्रेष्ठ ॥९१॥
पाहता या पृथ्वीमाझारीं। विंध्याद्रि तुझी थोरी ।
वानिजै गा सुरासुरी । तुझी सरी मेरु न पवे ॥९२॥
ऐसे ऐकोनिया वचन । विंध्याद्रि उल्लासला आपण ।
पुढतीं घालोनि लोटांगण । मस्तकी चरण दृढ वंदिले ॥९३॥
तू आलासी भाग्येकरीं । तुझे गमन कोठवरी ।
ते मज सांगावे जी निर्धारी । तेणे अत्यादरीं पूसिलें ॥९४॥
दक्षिणतीर्थयात्राविधान । करावया करितो गमन।
मज द्यावे मार्गदान । अधरशयन करोनिया ॥९५॥
तुझी निर्धारिता थोरी । वाढी चंद्रसूर्यांउपरी ।
मज वेंघवेना तेथवेना तेथवरी । शयन करी गमनार्थ ॥९६॥
माझे ऐकोनिया वचन । विंध्याद्रीनें केले शयन ।
म्या केलिया दक्षिणे गमन । तुवा उत्थान न करावे ॥९७॥
तिर्थे करोनी मम ये मागुता । तंववरी त्वा नुठावें पर्वता ।
भाष्यबंधे नियामकता । करोनि रघुनाथा मी आलो ॥९८॥
विंध्याद्रीला नमविल्यामुळे मार्ग मोकळा :
रविचंद्रां मोकळी वाट । द्विजदेवांचे चुकले कष्ट ।
दिनमान वाहे स्पष्ट । दिधली वाट विंध्याद्री ॥९९॥
माझे होतांचि आगमन । भृगुशाप गेला पळून ।
देशी वर्षला पर्जन्य । तृण वृक्ष धान्य वाढलें ॥१००॥
महामेरुच्या वृक्षांसी । म्या चिंतितां निजमानसीं ।
तेही वाढले ये देशी । फळभारेंसीं सफळित ॥१॥
वाहती सरितांचे ओघ । पद्मपुष्पीं पूर्ण तडाग ।
नाना पक्षिगण अनेग । गज सिंह मृग क्रीडती ॥२॥
मजसवें येवोनियां ऋषी । जाहले दंडकारण्यवासी ।
कोणी राजा नाही या देशी । म्हणोनि राक्षसी व्यापिले ॥३॥
दंडकशापे दंडकारण्य । ते करावया अति पावन ।
तू आलासी श्रीरघुनंदन । राक्षसघ्न प्रतापी ॥४॥
तुझे जालिया आगमन । राक्षस निर्दाळसी संपूर्ण ।
येथोनि आता वस्ती जाण । वचन पावन श्रीरामे ॥५॥
श्रीरामक्षेत्र दंडकारण्य । ऐसे गर्जेल पुराण ।
हाचि प्रयोग ब्राह्मण । अति सज्ञान पढतील ॥६॥
राक्षसनिर्दळणीं विचित्र । श्रीराम करील दुर्धर क्षेत्र ।
यालागी म्हणती श्रीरामक्षेत्र । पुराणवित्र श्रीरामे ॥७॥
ऐसी ऐकतांचि कथा । परमाश्चर्य श्रीरघुनाथा ।
ऋषिचरणीं ठेविला माथा । होय पुसता वनस्पती ॥८॥
अगस्तींच्या सूचनेवरुन दंडकारण्यात पंचवटीत आश्रमाची स्थापना :
दंडकारण्यवनीं वसतां । सौमित्रासहित सीता ।
म्या वसावे कोठे आता । तेंही तत्वता मज सांगे ॥९॥
तुझे वचन ब्रह्मलिखित । ते म्या करणे निश्चित ।
ऐसे पुसतां श्रीरघुनाथ । कृपायुक्त ऋषि बोले ॥११०॥
गंगातीराचे निकटीं । अति पावन पंचवटी ।
तेथे बांधोनि पर्णकुटी । सुखसंतुष्टी वसावें ॥११॥
पंचवटी गंगातटीं । ऐकता उल्हास सीतेच्या पोटी ।
श्रीरामासी सुखसंतुष्टी । पंचवटी ऐकोनी ॥१२॥
पंचवटीं करिता वस्ती । त्रैलोक्यपावन निजकीर्ती ।
तू पावसी गा रघुपती । जाणे निश्चिती मद्वाक्ये ॥१३॥
ऐकोनि अगस्तीची गोष्टी । श्रीरामे बांधिली शकुनगाठी ।
लक्षोनिया पंचवटी । उठाउठी निघाले ॥१४॥
श्रीरामे केले नमन । ऋषीने दिधले आलिंगन ।
सीतासहित लक्ष्मण । अगस्ति वंदोन निगाले ॥१५॥
आश्रम करावया पंचवटीं । उल्लास लक्ष्मणाचे पोटी ।
वेगी निघाला जगजेठी । श्रीराम दृष्टी लक्षोनी ॥१६॥
एकाजनार्दना शरण । अगस्तीपासोनि शस्त्रास्त्रग्रहण ।
श्रीरामे केले आपण । वनी निर्दळण राक्षसा ॥१७॥
इति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
अगस्तिश्रीरामदर्शनं अस्त्रग्रहणं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥
॥ ओंव्या ११७ ॥ श्लोक १६ ॥ एवं १३३ ॥
