निपुण म्हणती हा आमुच
154.
निपुण म्हणती हा आमुचा गुरु ।
ज्ञानी म्हणति हा परात्परु ।
योगी म्हणती योग साचारु ।
याचिपासुनी जन्मला ॥१॥
याज्ञिक म्हणती भासे कृष्ण ।
यज्ञरुपी हा नारायण ।
वैदिकाही लागले ध्यान ।
म्हणती वेद मूर्तिमत हाचि दिसे ॥२॥
मला भासे वस्ताद जेठी ।
शासन करीतया नृपवर श्रेष्ठी ।
शस्त्रपाणिया उग्रदृष्टी ।
सहारकर्ताचि कृष्ण दिसे ॥३॥
वृध्दां भासे सकुमार बाळ ।
तरुणांगिया मदनमूर्तिचि केवळ ।
ऐसा सर्वी सर्व हा सकळ ।
भासे जैसिया तैसाचि ॥४॥
कृष्णाकृती भुलली लोके ।
जाऊंचि विसरली स्त्रिया बाळके ।
तव ते कुब्जा भरुनी तबके ।
घेऊनि आली सुपरिमळे ॥५॥
उत्तम सुवास चंदनगंध ।
केशर कुंकम कस्तुरी शुध्द ।
सुमनहार गुंफिले विविध ।
सुमनतुरे नानापरी ॥६॥
जात होती राजमंदिरा ।
तव त्या देखिले नंदकुमरा ।
म्हणे आजींचि हे पूजा सुंदरा ।
चर्चूं श्रीकृष्णा निजहस्ते ॥७॥
