कंसराया पूजिते नित्य
155.
कंसराया पूजिते नित्य ।
परि तो असुरचि उन्मत ।
काय पुरवील मनींचा हेत ।
दासी किंकर मी त्याची ॥१॥
परमात्मा हा सर्वेश्रवर ।
कृष्ण सुंदरा अतिसुंदर ।
चर्चनमिसे लावीन कर ।
अति मनोहर करीन पूजा ॥२॥
मग येऊनिया ते निकट जवळी ।
मस्तक ठेवी चरणकमळी ।
म्हणे चर्चीन हा करतळी ।
जरी तू आज्ञा देशील ॥३॥
नित्य रायाते चर्चिता ।
चातुर्य आले माझिया हाता ।
आतांही तेथेंहि जात जाता ।
तूते देखिले निज दृष्टी ॥४॥
मग तैसीची मी येथे आले ।
तुझिया चरणाते पावले ।
दासी विद्रूपचि परी मज ठेविले ।
राये याचि कार्यावरी ॥५॥
जणोनी तिचा अंतर्भावो ।
प्रसन्न झाले देवाधिदेवो ।
म्हणती तरी तू अवश्यमेवो ।
चची चंदन निज हस्ते ॥६॥
निळा म्हणे आली पूजा ।
नाहीचि त्यागणे गरुडध्वजा ।
जैसिया तैसे मग हा वोजा ।
करी देणे यथोचित्त ॥७॥
