कृष्ण परमात्मा श्रीह
153.
कृष्ण परमात्मा श्रीहरी ।
बळिराम शेषअवतार निर्धारी ।
कैसे शोभले अलंकारी ।
निजांगाचिये निज प्रभे ॥१॥
मुगुट कुंडले विशाळ डोळे ।
जैसी विकासली सूर्यकमळे ।
अंगकांती रुप सांवळे ।
पीतांबराची परिधाने ॥२॥
कंठी पदके सुमनकळा ।
कौस्तुभ एकावळी रुळती गळा ।
बाहुभूषणे मुद्रिका सकळा ।
कांडोवाडी सुशोभित ॥३॥
सुकुमार नागर अंगकांती ।
ज्याचिया तेजे रविशशी दीप्ती ।
हुताशनी रत्नी प्रकाशे फांकती ।
ज्याचेनिया झगमगती तारांगणे ॥४॥
सुवर्ण म्हणती जे उत्तम ।
ते याचिये अंगकांती सुमहिम ।
ऐसे सौंदर्य निरुपम ।
कृष्णाकृती वोसंडले ॥५॥
जैसिया परी तैसा भासे ।
हेहि अपूर्वचि एक असे ।
कृष्णरुपे लाविले पिसे ।
न स्मरती पहाता देहगेहा ॥६॥
निळा म्हणे बैसली दृष्टी ।
कृष्णारुपी ते सहसा नुठी ।
नरनारी विस्मित पोटी ।
अवलोकिती श्रीकृष्णा ॥७॥
