दुःशासन द्रौपदीसी ।
92.
दुःशासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥1॥
दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥2॥
आता उपाय कृष्णा काय । धावे माझे विठ्ठल माय ॥3॥
निरी ओढिता दुर्जन । झाले आणिक निर्माण ॥4॥
ऐसी असंख्य फेडिली । देवी तितुकी पुरविली ॥5॥
तया संता राखिले कैसे । जनी मनी प्रेमे हांसे ॥6॥
