संसार परजनी | दूर दि
283.
संसार परजनी | दूर दिधले मज साजणी |द्वारकापुर पाटणी | माझे माहियेरा ॥१॥
थोर उत्कंठा मनी | वाट पाहे प्रतिदिनी |मज नेतु का कोणी | तया माहियेरा ॥२॥
चित्ती न लगती व्यापार | मनी हेचि वारंवार |आड ठाकले गिरि डोंगर | तया माहियेरा ॥३॥
माझिया सासुरे निष्ठुरे | दुरळ बोलिली उत्तरे |तंव तंव मी स्मरे | विठू बापू माहियेरा ॥४॥
येथे कोणी नाही माझे एक | जे त्यांसी बोलू सुखदु:ख |हे मन उतावेळ देख | तया माहियेरा साठी ॥५॥
कामक्रोध भावे दीर | बोलती अति निष्ठुर |ते वेळी त्यजिजे संसार | ऐसे वाटतसे मना ॥६॥
या वो संसारी नसिजे | संगु अवघ्याचा सांडिजे |नि:संग होऊनि राहिजे | तया माहिरेया ॥७॥
या वो प्राणाचे संकटी | आत्मा ठेऊनिया कंठी |मग चालावी घररहाटी | म्हणिजे काम रात्रंदिवस ॥८॥
याचे क्रूर बोल न होती | तेणे मी असे निर्बुज चित्ती |निरोप धाडू कवणा हाती | तया माहियेरा ॥९॥
तंवचि वो शिणीजे जंव याते न वोलगिंजे |याचे बीज पाविजे | नामे एक विठ्ठले ॥१०॥
आता भू काय बोलिजे | यासि सुवेळा न पुसिजे |पुण्यमार्गे जाईजे | तया माहियेरा ॥११॥
माझी सखी जे का भक्ति | मज तेचि संबोखिती|तिये लाविले शुद्धमति | साह्य ते मज चुको नेदी ॥१२॥
सत्य भावो मज सांगाती | येर लटकिया व्युत्पत्ति |मी वो जाईन हरखेजती | तया माहियेरा ॥१३॥
कृष्ण माऊली भेटेल | शीण अवघाचि हरेल |सुख आनंदू न मायेल | या त्रिभुवनी ॥१४॥
या बहु जन्माचा शीण वो जाईल | विठोदर्शने दु:ख हरेल |नामा सुखिया होईल | केशव चरणी ॥१५॥
