अव्यक्त परब्रह्म कैस
282.
अव्यक्त परब्रह्म कैसे आले वो व्यक्ती |अकळू न कळचि तो हा अमूर्ती |
पुंडलिकाचे भक्ती येऊनिया वाळवंटी |उभा राहे विटेवरी कर ठेवुनी कटी ॥१॥
जिवाचा जीवनु वो मज भेटवा हरी |लागले प्रेमपिसे होईन दासी कामारी ॥धृ.॥
कासे कसिला पितांबर तयावरी मेखळा |अंगी उटी चंदनाची शोभती वनमाळा |
बाहू बाहूवाटे ते रूप गुंतले डोळा |मन माझे मोहिले दृष्टी देखता घननिळा ॥२॥
अधर जे पोवळियाचे दंत हिरिया ज्योति |विशाल नयन वो भोवया व्यंकटा अति |
टिळक जो रेखियेला मृगनाभी लल्लाटी |उपमा नये व्यक्ती चंद्रा पडियेली तुटी ॥३॥
माथा मुगुट जो रत्ने जडियेला वरी |त्याखाली मयुरपत्री वेटी साजे मुरारी |
माथा त्या विरंगुठी पुष्पे तुरविली वरी |तेणे भाळलिये भेटवावो झडकरी ॥४॥
इंद्रनीळ कीळ उभा घनश्यामु हा दिसे |पाहातो एक दृष्टी चकित केले वो हासे |
तेचि ते कामबाण जिवा लागले पिसे |नामया विष्णुदासा व्यापिले हृषीकेशे ॥५॥
