मायाविवर्जित जाले वो
748.
मायाविवर्जित जाले वो ।
माझे गोत ते पंढरिये राहिले वो ॥१॥
पतिव्रता मी परद्वारिणी ।
परपुरूसी व्यभिचारिणी ॥२॥
साचारी चौदा जाली वो ।
सेखी अठरा घोकुनी राहिले वो ॥३॥
निवृत्तिप्रसादे मी गोवळी वो ।
माझा भावो तो विठ्ठलु न्याहाळी वो ॥४॥
अर्थ :
एक स्त्री आपल्या मैत्रीणीजवळ म्हणते. हे सखे, माझ्या मागचा मायामोह टाकून मी पंढरपूरास जाऊन राहिले. कारण माझा सर्व गोतावळा तेथे आहे. तसे पाहिले तर 'पर' म्हणजे परमात्मा त्याच्याशी रत झाल्यामुळे परद्वारिणी म्हणजे व्यभिचारीणी आहे. असे असले तरी त्या परमात्म्याला सोडून इतर ठिकाणी माझे मन कोठेही जात नाही. अशी मी एकनिष्ठ आहे. म्हणजे पतिव्रता आहे. सहा शास्त्रे, चार वेद, चौदा विद्या, अठरा पुराणे ही सर्व घोकून शेवटी त्या परमात्म्यालाच चित्तांत धरून मी राहिले. निवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने मी त्या श्रीकृष्णाशी एकरूप झाले. माझ्या मनातील हे सर्व भाव तो परमात्मा श्रीविठ्ठल जाणत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
