पुंडलीक म्हणता वाचे
472.
पुंडलीक म्हणता वाचे । पाप जाते रे जन्माचे । जिही देखिले पद यांचे । धन्य भग्याचे नर ते ॥१॥
जाती पंढरीसी आधी । तुटे तयांची उपाधी । ऋद्धी सिद्धी मांदी । तिष्ठतसे सर्वदा ॥२॥
भुक्ति मुक्ति धांवती मागे । आम्हा अनुसारा वेगे । ऐसे म्हणोनि वेगे । चरणी मिठी घालिती ॥३॥
शरण एका जनार्दनी । विटे उभा मोक्षदानी । लागता तयांचे चरणी । पुनरावृत्ति न येतीं ॥४॥
