व्यक्ताव्यक्त दिठी घ
722.
व्यक्ताव्यक्त दिठी घालूनि कल्पांता ।
कल्पना नुरेचि तेथे आता ॥१॥
पाहणियाचा प्रपंचु पाहाता ।
निमाला कवणा बोलू ठेऊ आता ॥२॥
दुजे म्हणो जाय तव मी माजी हारपे ।
न वर्णवे तुझी सत्ता रया ।
गोडियेचे गोडपण गोडी केवी मिरवी ।
तुजमाजी आसता ते वेगळीक रया ॥३॥
निशी जागरणी निमाला की तंतुचि तंती आटला ।
रसी रसु दुणावला तुझ्या ठायी ॥४॥
तेथे कल्पनेसी मूळ विरोनिया पाल्हाळ ।
तैसे उभय संधी तू विदेही रया ॥५॥
यालागी बापरखुमादेविवरु विठ्ठलु उदारु ।
दिठीचे दिठीमाजी अंजन ।
सुखी सुख दुणावले चौघा पडिले मौन्य ।
येणे निवृत्तिराये खुणा दाऊनिया सकळ ।
डोळ्यावीण दिठी प्रबळ रया ॥६॥
अर्थ :
व्यक्ताव्यक्त अशा परमात्मस्वरुपावर पुष्कळ वेळ दृष्टि ठेवली असता त्याठिकाणी कल्पनाच उरत नाही? विचार करता करता पाहाणाऱ्याचा प्रपंचच नाहीसा होऊन जातो. आता त्याचा बोल कोणावर ठेवावा. परमात्मा आपल्याहून निराळा आहे. असे म्हणायला जावे तर आपला मीपणाच तेथे हरपून जातो. अशा परमात्म्याची सत्तेच वर्णन करता येत नाही. आनंदरुप असलेल्या परमात्म्याला मी आनंदरुप आहे असे कसे सांगता येईल? अशा परमात्म्यामध्ये मी लय पावलो असल्यामुळे मी तरी त्याचे वर्णन कसा करु शकेल. ज्याप्रमाणे पटांत तंतू आटतात. त्याचप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ति आदि भाव तुझ्यामध्ये आटून गेले. त्यामुळे रसस्वरुप तुझ्या ठिकाणी रसरुप आनंद दुणावला आहे. कल्पनेचे पाल्हाळ तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी समूळ आटून गेले. त्यामुळे जीव परमात्म्याच्या ऐक्य बोधांत तू विदेही आहेस? माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते उदार आहेत. त्यांनी जर आपल्या ज्ञानाचे अंजन भक्ताच्या डोळ्यांत घातले. तर ब्रह्मसुख दुप्पट होऊन जाईल. याचा अर्थ सुखस्वरुप स्थिती होईल. ज्याच्या स्वरुपाविषयी चारी वेदांना मौन धरावे लागते. अशा परमात्मस्वरूपाविषयी निवृत्तिरायांनी सर्व खूण दाखवून चर्मचक्षु वांचून माझी ज्ञानदृष्टि प्रबल केली. असे माऊली सांगतात.
