वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079494 · अभंग क्र. ३८९७

3897.
(बाळक्रीडा अभंग)
वास नारायणे केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायी ॥१॥
ठायी पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोका ॥२॥
लोका दुःख नाही मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणी ॥३॥
देखोनिया देवा विसरली कंसा । ठावा नाही ऐसा होता येथे ॥४॥
येथे दुजा कोणी नाही कृष्णाविणे । ऐसे वाटे मने काया वाचा ॥५॥
काया वाचा मने कृष्णी रत झाले । सकळा लागले कृष्णध्यान ॥६॥
ध्यान गोविंदाचे लागलेसे या लोका । निर्भर हे तुका म्हणे चित्ती ॥७॥

अर्थ :
नारायणाने दुष्ट असुरांचा, दुष्ट लोकांचा नाश करुन मथुरेत वास केला. कृष्णाने उग्रसेनाला पित्याच्या ठिकाणी मानून सर्व लोकांचे पालनपोषण केले. ज्या लोकांनी प्रत्यक्ष आपल्या डोळयांनी कृष्णाला पाहिले त्यांना, कंसाने मागे जो काही दुराचार केला, त्रास दिला त्याची काहीच आठवण राहिली नाही. देवाला पाहून सर्वजण कंसाला विसरुन गेले कंस या राज्यात पूर्वी होता की, नव्हता हे देखील लोकांना आठवत नव्हते. लोकांना काया वाचा मनाने मथुरेमध्ये कृष्णावाचून दुसरे कोणीही नाही असेच वाटत होते. कायावाचामनाने सर्व कृष्णाशी रत झाले होते, एकरुप झाले होते सर्वांना कृष्णाचेच ध्यान लागले होते. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या चित्ताला गोविंदाचे ध्यान लागले होते त्यामुळे सर्व लोक आनंदीत झाले होते त्यांचे चित्त आनंदाने भरुन गेले होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग