प्रकरण :- जोहार
343.
प्रकरण :- जोहार
कोपटी तळपती गाई । हाडाची बेडी पडेल पायी ।
तोंड चुक विता इज्जत जाई । मनग वाचोनिया ।
काय कीजे मायबाप ॥१॥
जोहार पाटील बाजी । चावडी चलाना का जी ।
ऐसे सांगत आलो आजी । बहुत बाकी थकली की मायबाप ॥२॥
हिमायत येथे न चले कांही । दुस्तर वार्ता पुढे भाई ।
वरते पाय खाली डोई । नव महिने होईल की जी मायबाप ॥३॥
उगली का कोंडिता गुरे । गांवीची का बुजविता द्वारे ।
फेडा झाला बरोबर । नका उणे पुरे की मायबाप ॥४॥
यंदा आली देवाची पाळी । तोंडे का जी करिता काळी।
चावडी चला वेळी । शिव्या गाळी घेऊ नका की मायबाप ॥५॥
कुळकर्णी आपुल्या स्वाधी करा । आडखर्चाचा ताळा धरा ।
दयाळु मायाळु बाप करा । येईल मुजरा निजसत्वे की मायबाप ॥६॥
विठु पाटलाचा महार । चोखामेळ्याचा जोहार । सकळ संतांचा कारभार ।
मज नफराचे शिरी की जी मायबाप ॥७॥
