॥ श्रीएकनाथमहाराजकृत
3.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
किष्किंधाकांड
॥ अध्याय तिसरा ॥
सुग्रीवाशी सख्य
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सुग्रीवाला स्नेहसंबंध जोडण्यासाठी श्रीराम पाचारण करितात :
वालिसुग्रीवजन्मकथा । ऐकोनि सुख श्रीरघुनाथा ।
संतोषोनियां हनुमंता । होये बोलता श्रीराम ॥१॥
सख्य करावे सुग्रीवासी । हे मुख्य कर्तव्य आम्हांसी ।
तूंही सख्यार्थ आलासी । अतिशयेंसी सुख जाले ॥२॥
कबंधे सांगीतले मजपासीं । हृतदारदुःख सुग्रीवासी ।
सुखी करावया तयासी । ऋष्यमूकासी मी आलो ॥३॥
जो मज होय अनन्य शरण । त्याचे दुःख निर्दाळून ।
सुखी करावे संपूर्ण । ब्रीर्द जाण हे माझे ॥४॥
दुःख निरसूनि सुख द्यावयासी । मी आलो वनवासासी ।
वेगी बोलावी सुग्रीवासी । सुखी त्यासी मी करीन ॥५॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । हनुमंत जाला सुखसंपन्न ।
वंदोनि श्रीरामाचे चरण । केले उड्डाण उल्हासें ॥६॥
ऋष्यमूकात्स हनुमान्गवा मलयपर्वतम् ।
आचचक्षे तदा वीरः सुग्रीवाय महात्मने ॥१॥
अयं रामो महाप्राज्ञः संप्राप्तो दृढविक्रमः ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा संख्यार्थं त्वामुपागतः ॥२॥
हनुमंत सुग्रीवाला श्रीरामांचा वृत्तांत सांगतो :
हनुमंते करोनि उड्डाण । सुग्रीवापासी आला आपण ।
म्हणे तू भाग्ये सभाग्य पूर्ण । श्रीरघुनंदन तुष्टला ॥७॥
राम लक्ष्मण महावीर । निःशंक निधडे धनुर्धर ।
तुजसी करावया मित्राचार । आले साचार ऋष्यमूका ॥८॥
कोठील कोणाचे हे कोण । येथे यावया काय कारण ।
समूळ शोधिले म्या जाण । सावधान अवधारी ॥९॥
श्रीराम दाशरथी महावीर । बंधु लक्ष्मण धनुर्धर ।
श्रीरामकांता सीता सुंदर । वनी विहार पित्राज्ञा ॥१०॥
पित्याचे मानोनि आज्ञेसी । दंडकारण्य वनवासी ।
तेंही रहावे चौदा वर्षीं । फळमूळांसी सेवोनि ॥११॥
शून्याश्रमीं पंचवटीं । रावणे हरिली सीता गोरटी ।
तिची शुद्धि करावयासाठीं । आले जगजेठी ऋष्यमूका ॥१२॥
श्रीरामे उद्धरिले कबंधासी । शापविमुक्त केले त्यासी ।
तेणे सांगितले श्रीरामापासीं । सुग्रीवासी सुखी करी ॥१३॥
सीताहरणदुःख श्रीरामासी । दारहरणदुःख सुग्रीवासी ।
समान दुःख तुम्हा दोघांसी । येरयेरांसी सुखी करा ॥१४॥
निःशेष वदूनि वाळीसी । सदार राज्य सुग्रीवासी ।
देवोनि करावयासी । किष्किंधेसी राम आला ॥१५॥
सांडोनि सीताशुद्ध्यर्थ । साधावया तुझा कार्यार्थ ।
कृपेनें आला श्रीरघुनाथ । भाग्यवंता सुग्रीवा ॥१६॥
श्रीराम प्रेमवत्सलू । श्रीराम निरपेक्ष स्नेहाळू ।
श्रीराम भक्तकाजकृपाळू । दीनदयाळू श्रीराम ॥१७॥
श्रत्वा हनूमतो वाक्यं सुग्रीवो हृष्टमानसः ।
दर्शनीयतमो भूत्वा प्रीत्योवाच च राघवम् ॥३॥
सुग्रीवाला आनंद व त्याचे श्रीरामांकडे गमन :
ऐकोनि हनुमंताची गोष्टी । सुग्रीवासी आनंदकोटी ।
हनुमंताची पाठी थापटीं । प्रेमे संतुष्टी आलिंगी ॥१८॥
मेघगर्जनें मयूर नाचे । तैसा सुग्रीव हर्षे सांचे ।
संपूर्ण भाग्य हनुमंताचे । कोणे वाचे मी वानू ॥१९॥
माझा साधिता निजस्वार्थ । जाला श्रीरामाचा आप्त ।
श्रीरामभाग्यें हा समर्थ । कृतकृत्यार्थ मी झालो ॥२०॥
सुमनमाळा सुकलियावरी । स्वये सांडिजे जेवी दुरी ।
तेंवी श्रीरामभय होते भारीं । ते माळेच्या परी त्यागिले ॥२१॥
घ्यावया श्रीरामाची भेटी । सुग्रीव निर्भय जाला पोटी ।
श्रीराम लक्षोनिया दृष्टी । उठाउठी आले दोघे ॥२२॥
धरोनि हनुमंताचा हात । जेथे होता श्रीरघुनाथ ।
सुग्रीव तेथे आला त्वरीत । शरणगत मी तुझा ॥२३॥
श्रीरामांजवळ सुग्रीवाची शरणागती :
तू सत्यप्रतिज्ञ रघुवीर । माझा करावा अंगीकार ।
मी तुझा निजकिंकर । शरण साचार श्रीरामा ॥२४॥
एवं तद्वचनं श्रुत्वा सुग्रीवस्य सुभाषितम् ।
संप्रहृष्टमना हस्तं पीडयामास पाणिना ॥४॥
ततो रामस्य सुग्रीवः पाणिं जग्राह पाणिना ।
हृष्टः सौहृदमालंब्य पर्यष्वजत पीडितम् ॥५॥
ऐसे सुग्रीवसंभाषित । ऐकोनिया श्रीरघुनाथ ।
होवोनियां आनंदभरीत । जाला उदित खेवेंसी ॥२५॥
सुग्रीव घाली लोटांगण । श्रीरामे उचलिला हाती धरुन ।
वानरे करोनि हस्तग्रहण । दिधले आलिंगन हृदयेंसी ॥२६॥
हृदया हृदय लागले । तंव हृदयस्थ एक जाले ।
सहज सुहृदत्व घडले । आलिंगिले एकमेका ॥२७॥
श्रीरामांनी आलिंगन देऊन स्वागत केले :
श्रीरामहृदयस्थ चिद्घन । त्यासी देता आलिंगन ।
सुग्रीवहृदया समाधान । वाळिभवभान निमाले ॥२८॥
नरा वानरा पडली मिठी । आधिव्याधि शमली पोटी ।
सांगणें पुसणे सरल्या गोष्टीं । आनंदकोटी सुग्रीवा ॥२९॥
दोघा सख्य जाले अलौकिक । अग्नीसूर्यप्रमाण साक्ष ।
कांही करणे न लगे देख । दोन्हींचें एक हृदय जाले ॥३०॥
दोहीचें हृदय जाले एक । तेंचि निजसख्याचे सख्य ।
आण प्रमाण देता भाक । तो लौकिक अति अल्प ॥३१॥
श्रीरामसख्यापुढें जाण । बहिर्भूत आणप्रमाण ।
भाक तेथे केवळ तृण । सखा संपूर्ण श्रीराम ॥३२॥
श्रीरामसख्याची थोरी । अति अगाध चराचरी ।
ते सख्य पावोनि वानरी । जयजयकारी गर्जती ॥३३॥
सुग्रीवो राघवश्चैव वयस्यत्वमुपागतौ ।
प्रहृष्टमनसौ प्रीतौ तावुभौ हरिराघवौ ॥६॥
अन्योन्यमभिवीक्षंतौ न तृप्तिमुपजग्मतुः ।
त्वं वयस्योऽसि हृद्यो मे एकं दुःखं सुख न चौ ॥७॥
श्रीराम स्वये नरपती । सुग्रीव स्वये वानरपती ।
दोघा सख्यत्वाची स्थिती । अनन्य प्रीती आल्हाद ॥३४॥
जैसी प्रीति सुवाससुमनां । जैसी प्रीति जीवा मना ।
तैसी प्रीति सुग्रीवरघुनंदना । अन्योन्य जाणा अति प्रीति ॥३५॥
जैसी प्रीति गूळगोडीसीं । जैसी दीपकप्रकाशीं ।
नाना रसा आणि उदकासीं । रामा सुग्रीवासी अति प्रीति ॥३६॥
सुग्रीवे पाहता श्रीरामचंद्रा । श्रीरामे पाहता वानरेंद्रा ।
प्रीती पाहता येरयेरा । दोहींच्या नेत्रां नव्हे तृप्ती ॥३७॥
जैसी प्रीति चकोरचंद्रां । तैसी प्रीति सुग्रीवरामचंद्रां ।
जैसी प्रीती जळा जळचरा । तैसी वानरा श्रीरामी ॥३८॥
ऐसी श्रीरामा वानरा प्रीती । श्रीरामी वानरा अनन्य भक्ती ।
ऐशिया ऐशिया प्रेमप्रीतीं । पाहता तृप्ति नव्हे नेत्री ॥३९॥
श्रीराम सुग्रीव मारुती । तिघां झाली अनन्य प्रीती ।
मग बैसोनि सुखसंमतीं । अनुवादती निजगुज ॥४०॥
रावणाने सीतेला पळवून श्रीराम सुग्रीवाला सांगतात :
सुग्रीव म्हणे श्रीरघुपती । तुम्ही आले जीचेनी अर्थी ।
ते म्या देखिली सीता सती । गगनगतीं पै नेतां ॥४१॥
ह्रियमाणा मया द्दष्टा रक्षसा क्रूरकर्मणा ।
क्रोशंती राम रामेति लक्ष्मणेति च विस्वरम् ॥८॥
आत्मना पंचमं मां हि द्रष्ट्वा शैलतले स्थितम् ।
उत्तरीयं तदा त्यक्तं शुभान्याभरणानि च ॥९॥
रावणाचे खांदेवरी । वेगे नेतां गगनांतरी ।
आम्ही देखिली वानरी । श्रीराम गजरीं आक्रंदे ॥४२॥
श्रीरामराया धांव धांव । राघवा तू सवेग पाव ।
घेवोनि लक्ष्मणाचे नांव । दीर्घ स्वरें आक्रंदे ॥४३॥
रामनाम सीतारव । वानरी ऐकिला पै सर्व ।
आणिक जाले जी लाघव । ते अति अपूर्व ऐके स्वामी ॥४४॥
सीतेने खाली टाकलेले अलंकार :
येचि पर्वतशिखरीं । आम्ही असता पंचवानरीं ।
उत्तरीयवास सीतासुंदरी । सालंकारी त्यागिले ॥४५॥
लक्षोनिया हनुमंता । वस्त्र अळकार सांडी सीता ।
ते आले हनुमंताच्या हाता । सभाग्यता म्हणोनिया ॥४६॥
श्रीरामनामाचें उत्तरीयवस्त्र । रामनामांकित अलंकार ।
आम्हा दाखविले समग्र । राखे निरंतर मारुती ॥४७॥
रामनामी ज्या विश्वास । असे भाग्य सभाग्य ज्यांस ।
तेचि पावती श्रीरामवास । भाग्ये बहुवस हनुमंत ॥४८॥
सीतेचे आक्रंदन व मारुतीचे उड्डाण :
रामनामे दीर्घस्वर । सीता आक्रंदे सुंदर ।
आम्ही ऐकता समग्र । हनुमान वीर खवळला ॥४९॥
मारोनि राक्षस दुर्धर । करोनि दीनांचा उद्धार ।
सोडवावया सीता सुंदर । हनुमान सत्वर उसळला ॥५०॥
रागे आपटोनि पुसाटी । वटारोनि आरक्त दृष्टी ।
वळोनिया वज्रमुष्टी । उठाउठी उडाला ॥५१॥
रावणाचे लंकेत उड्डाण :
हनुमंताचे निजउड्डाण । गेले ग्रहचक्र टाकोन ।
तळी तेणे धाके रावण । गेला लंघोन सागरू ॥५२॥
गेला देखोनि लंकानाथ । हनुमंत क्रोध करी शांत ।
ऐसा ऐकोनि वृत्तांत अति विस्मित श्रीराम ॥५३॥
ते अलंकार पाहून श्रीरामांना परम दुःख :
ऐकोनि वानरांच्या गोष्टी । विस्मयौ सौमित्राच्या पोटी ।
सीतालंकार पहावाया दृष्टी । उठाउठी आणविले ॥५४॥
उत्तरीयं गृहीत्वा तु स तान्याभरणानि च ।
इदं पश्चेति रामाय दर्शयामास वानरः ॥१०॥
ततो गृहीत्वा वासस्तु शुभान्याभरणानि च ।
हा प्रियेति रुदन्धैर्यमुत्सृज्य न्यपतद्भुवि ॥११॥
सीतालंकारवस्रांसी । हनुमंते दाखविले श्रीरामासी ।
तेणे धरोनि हदयासीं । उकासाबुकसी स्फुंदत ॥५५॥
सीते मजसी का रुसलीसी । पुर्व प्रीति का विसरलीसी ।
रागे मजसी का न बोलसी । कोठे गेलीसी प्रिय कांते ॥५६॥
सीतेचे देखोनि अळंकार । श्रीराम करी विलाप थोर ।
मूर्च्छित पडे सत्वर । विसंज्ञ अति विव्हळ ॥५७॥
सुग्रीवाकडून श्रीरामांचे सांत्वन, सीता शोधाचे आश्वासन व प्रतिज्ञा :
श्रीरामाची ऐकोनि व्यथा । सुग्रीवासी परमावस्था ।
सावध करोनि श्रीरघुनाथा । होय बोलता पुरुषार्था ॥५८॥
स्वामी तुज मज सख्य जाले असता । तुझी निवारवेना व्यथा ।
तरी लागली लाज मित्रार्था । आणीन सीता शोधोनी ॥५९॥
कळिकाळाची मर्दिती मान । ऐसे माझे चौघे प्रधान ।
अमित मेळवीन वानरांचे सैन्य । सीता शोधोन आणीन ॥६०॥
स्वर्ग मृत्यु पाताळीं । नेली असता जनकबाळी ।
घेवोनिया जगधांडोळी । सीता वेल्हाळी आणीन ॥६१॥
श्रीरामा वाहतो तुझी आण । सीता आणीन मी शुद्धि करोन ।
पुढती शिवतों तुझे चरण । परम प्रमाण हे माझे ॥६२॥
रूदन करू नको श्रीरामा । ऐक माझी प्रमाणसीमा ।
अधःपतन जाण मज प्लवंगमा । श्रीरामा सीता जरी मी नाणी ॥६३॥
सीताशुद्धि सांडोनि श्रीरामा । जरी गुंतेन आणिके कामा ।
तरी वानर अधमजन्मा । श्रीरामा सीता जरी नाणी ॥६४॥
सांडोनि सीताशुद्धीच्या क्रमा । जरी मी लागेन आणिके कामा ।
तरी धिक्कार माझिया जन्मा । श्रीरामा सीता जरी नाणी ॥६५॥
सीतावियोगविभ्रमा । दुःख न करी श्रीरघूत्तमा ।
निमेषे आणीन श्रीरामरमा । प्रतापगरिमा पाहे माझी ॥६६।
लाजविला पितामह ब्रह्मा । लाजविला पूर्वजमहिमा ।
लाजविलें क्षात्रधर्मा । श्रीरामा सीता जरी नाणी ॥६७॥
श्रीरामांची घोर प्रतिज्ञा :
ऐकोनि सुग्रीवाचे वचन । हास्य करी श्रीरघुनंदन ।
तुज राज्य दारा दिधल्यावीण । सीतास्मरण मज नाही ॥६८॥
मित्रकार्यापुढें जाण । सीताशुद्धि मज तृणासमान ।
वाहतो दशरथाची आण । सत्य जाण सुग्रीवा ॥६९॥
जे तू बोलिलासी निर्वान । ते मज मानले प्रमाण ।
तुझे कार्य न होता पूर्ण । सीता आगमन मज निंद्य ॥७०॥
वैश्वदेव बळिविधान । न करिता भोजन निंद्य जाण ।
तेंवी तुझे कार्य करिता पूर्ण । सीताआगमन मज निंद्य ॥७१॥
न करिता औपासन । स्वदारगमन वेश्येसमान ।
तेंवी तुझेंं कार्य न होता पूर्ण । सीताआगमन मज निंद्य ॥७२॥
अतिथि दवडोनियां निराशन । जेंवी निंद्य होय निजभोजन ।
तेंवी तुझे कार्य न होता पूर्ण । सीताआगमन मज निंद्य ॥७३॥
न करिता संध्यास्नान । यज्ञादि कर्मे निंद्य जाण ।
तेंवी तुझे कार्य न होता पूर्ण । सीताआगमन मज निंद्य ॥७४॥
जरी तुवा येथे आणिली सीता । तुजें कृतकार्य न होता ।
तिसी मी न पाहे सर्वथा । मज आण दशरथाची ॥७५॥
सीतेचे आधी कोठे गमन । शुद्धि केल्या मग आगमन ।
वाळिवधालागीं जाण । हे व्यवधान तंव नाही ॥७६॥
आधी साधीन मित्रकार्यार्था । मग शोधोनि आणीन सीता ।
धनुष्यबाण घेवोनि हाता । वाळिवधार्था निघाला ॥७७॥
अद्यैव तं हनिष्यामि तव भार्यापहारिणम् ।
इमे हि मे महाभाग पत्रिणस्तिग्मतेजसः ॥१२॥
वालिसंज्ञममित्रं ते भ्रातरं कृतकिल्बिषम् ।
शरैर्विनिहत पश्य विकीर्णमिव पर्वतम् ॥१३॥
सुग्रीवा ऐक सावधान । जेणे केले तुझे दारहरण ।
त्या वाळीचा घेईन प्राण । तीक्ष्ण बाण सोडोनी ॥७८॥
माझे बाण अति तिखट । मंत्रोनि मारीन सदट ।
तेणे वाळीचा छेदोन कंठ । करीन सपाट बाण एके ॥७९॥
वज्रें हाणीतला पर्वत । जैसा विखुरें पृथ्वीआंत ।
तैसा वाळी वधीन येथ । रूधिरोक्षत देखसी ॥८०॥
वालीचा पराक्रम व सुग्रीवाचे वर्णन :
क्षोभला देखोनि श्रीरघुनाथा । सुग्रीवे चरणी ठेविला माथा ।
वाळीचिया अति पुरुषार्था । सावधानता अवधारी ॥८१॥
अरुणोदयापूर्वी जाण । अविश्रमें श्रमेंवीण ।
सप्तसमुद्री करी स्नान । अर्ध क्षण न लागता ॥८२॥
वाळी सव्यहस्तें पर्वत । सवेग टाकी गगनाआंत ।
वामहस्तें स्वये झेलित । शतानुशत गिरिवर ॥८३॥
दुंदुभी दैत्याचा वध :
महिषासुराचा जेष्ठ सुत । दुंदुभी नाम महिष अति विख्यात ।
युद्धालागीं परम उदित । विचरत तिही लोकी ॥८४॥
दुंदुभी जावोनि पाताळासीं । युद्ध मागे वरुणापासीं ।
तेणे धाडीलें हेमद्रीपासीं । जाय त्यासी युद्ध करी ॥८५॥
दुंदुभी येवोनि युद्धार्थ । हेमाद्रीतें पाचारित ।
तो म्हणे मी यदर्थ अशक्त । जाय युद्धार्थ तू यमापासीं ॥८६॥
दुंदुभी पाचारी यमासी । यम विचारी मानसी ।
वाळिहस्तें मृत्यु यासी । तेणे त्यापासी धाडिलें ॥८७॥
दुंदभे युद्धदानाय नाहं प्रतिबलस्तव ।
युद्धं समबलेनैव कर्तव्यं च जयैषिणा ॥१४॥
किष्किंधां गच्छ रे तत्र वालिनामा हरीश्वरः ।
स युद्धतृष्णामाधूर्य मदं ते नाशयिष्यति ॥१५॥
यम म्हणे दुंदुभीसी । मज युद्ध न करवे तुजसी ।
तू युद्ध करी वाळीसी । तो समबळेंसीं बळिष्ठ ॥८८॥
वानर वाळी महाबळी । सबळ योद्धा आतुर्बळी ।
पाहता ये भूमंडळी । रणरवंदळी करील ॥८९॥
वाळी युद्धतृष्णातृषित । तूंही युद्धासी अति उद्यत ।
वाळीपासी जावोनि त्वरित । युद्ध पुरुषार्थ करी त्यांसी ॥९०॥
तू म्हणसीं वाळी कोण । किष्किंधेचा राजा जाण ।
त्यासी करावे युद्ध दारुण । आंगवण पाहो तुझी ॥९१॥
ऐसे ऐकातां वचन । दुंदुभी सवेग आला जाण ।
ठाकोनि पावला किष्किंधाभुवन । करी गर्जन युद्धार्थ ॥९२॥
येथे कोण सबळ वाळी । तेणे बाहेर निघावे याचिकाळी ।
युद्धा यावे मजजवळी । रणरांगोळी मी करीन ॥९३॥
ऐकोनि दुंदुभियुद्धवादन । वाळी करोनि उड्डाण ।
सन्मुख आला पै आपण । रागे गर्जोन भुभुःकारें ॥९४॥
ऐकातां भुभुःकार आरोळी । दुंदुभीची बैसली कानटाळी ।
म्हणे वानर हा महाबळी । केंवी आकळीं संग्रामी ॥९५॥
वाळीसी हाणिता मुष्टिघात - दुंदुभीचा उखळला हात ।
तेणे धाके पळे वनांत । अति गुप्त निजगावा ॥९६॥
प्रवेशता निजबिळीं । थापें हाणितला तया वेळीं ।
अशुद्ध वमूनी भूतळीं । प्राण तत्काळी सांडिला ॥९७॥
कायं कैलाससंकाशमेतदस्ति प्रकाशते ।
उद्धर्तुमेको वाली वा शक्तोऽहं रघुसत्तम ॥१६॥
सर्वप्राणभृतां लोके तृतीयं नोपलक्षये ।
ईद्दशो विक्रमो यस्य जवे चानुत्तमा गतिः ॥१७॥
दुंदुभीचा अतिप्रचंड देह :
त्या दुंदुभीचे कलेवर । कैलासप्राय महाथोर ।
श्रीरामा पाहे पा साचार । अति दुर्धर सुरनरा ॥९८॥
ते उचलावया कलेवर । स्वये शक्त वाळी वीर ।
दुसरा सुग्रीव वानर । तिसरा शुर असेना ॥९९॥
दुंदुभिदेहउद्धारार्थीं । धांडोळिता त्रिजगती ।
तिसरियाची न चले शक्ती । हे उचलिती दोघे बंधू ॥१००॥
रावणाची दुर्दशा :
तिजा जो उचली अंगभारे । त्याचेनि हस्ते वाळी मरे ।
भाकिलें मातंगऋषीश्वरे । निजनिर्धारे श्रीरामा ॥१०१॥
ऐसा वाळी बळी विख्यात । आणिक त्याचा पुरुषार्थ ।
तुज मी सांगेन इत्थंभूत । ऐक निश्चित श्रीरामा ॥१०२॥
वाळी करिता अनुष्ठान । त्यासी धरूं आला रावण ।
वीस भुजा पसरोन । बळे करून कवळूं गेला ॥१०३॥
तंव येरे पसरोनिया वामहस्त । विसां भुजासमवेत ।
आकळोनि लंकानाथ । काखेंआंत चेपिला ॥१०४॥
विक्षेप जाला अनुष्ठाना । वाळी सवेग उठिला स्नाना ।
काखे असोनि दशानना । तत्क्षणीं निघाला ॥१०५॥
रावण असोनि काखेतळीं । सप्तसागरीं करी आंघोलीं ।
नाकीं तोंडीं भरे जळी । तेणे तळमळी रावण ॥१०६॥
काखेहूनि निसटावयासी । सामर्थ्य नव्हे रावणासी ।
कळ लागली दाही शिसी । कासाविस लंकानाथ ॥१०७॥
काखे सुदला रावण । हे वाळी गेला विसरोन ।
घरा आला स्नान करुन । अति विंदान तेथे जाले ॥१०८॥
आवडी अंगद उचलिला वाळीं । तंव रावण पडीला भूतळीं ।
देखता वानरी सकळीं । भूतावळीं मिळाली ॥१०९॥
रावणाला खेळणे म्हणून अंगदाच्या पाळण्यावर बांधला :
दहा मुकुट मुखें शिरी । तयासी धरोनि वानरी ।
अंगदाच्या पाळण्यावरी । खेळण्यावरी बांधिलें ॥११०॥
अंगदाचे धारोष्ण मूत । रिचवे रावणाच्या मुखाआंत ।
मुखावरी हाणी लात । मुले चिमटीत सर्वांगें ॥१११॥
कश्यपमाळेमुळे वाली अजिंक्य :
एक मसी लाविती मुकासी । एकी हिरतिले मुकुटासी ।
काळे तोंड मोकळे केंसीं । रावण लंकेसी धाडीला ॥११३॥
ऐशा वाळीचिया पुरुषार्था विचारोनिया श्रीरघुनाथा ।
विक्रमें करवेल घाला । तरी त्या कार्यार्था अंगीकारीं ॥११४॥
वाळी सुग्रीव आम्ही समबळी । कश्यपमाळा वाळीजवळी ।
तेणे त्यासी ख्याती आगळी । युद्धकाळीं मज जिंके ॥११५॥
कश्यपमाळा वरद देख । युद्धी जो जो सन्मुख ।
तो होईल विमुख । आपण विजयी निजवरदें ॥११६॥
कश्यपाच्या मानासाठी वालीला लपून मारणे :
श्रीराम स्वये विचारी देख । वाळीस होऊं नये सन्मुख ।
आपण राहोनि विमुख । वाळी अवश्य वधावा ॥११७॥
कश्यपाचिया वरदार्था । अवतार न करवे अन्यथा ।
वाळीस वधावें विमुखता । मित्रकार्यार्था साधावें ॥११८॥
श्रीरामांचे आश्वासन, सुग्रीवाला आनंद :
सुग्रीव बोलिला जे आपण । सप्तताड विषम जाण ।
एके बाणे करी छेदन । वालिर्निदळण त्याचेनि ॥११९॥
वाळी सुग्रीव महावीरां । यांहोनि वेगळा जो आपण तिसरा ।
उचलील दुंदभीच्या कलेवरा । वाळिवानरा तो वधील ॥१२०॥
ऐसे बोलता सुग्रीवासी । श्रीरामे आश्वासिलें त्यासी ।
दाखवी दुंदुभिकलेवरासी । आणि सप्ततालांसी छेदावया ॥१२१॥
दुंदुभिकलेवर मज तृण । वामांगुष्ठें उचलीन जाण ।
सप्ततालांचे छेदन । करीन संपूर्ण बाणे एके ॥१२२॥
ऐसे बोलतांचि जाण । श्रीरामे धनुष्या वाहोनि गुण ।
म्हणे मज दावी तालवन । सीतीं बाळ लावोनी ॥२२३॥
करावया वाळीचा घात । श्रीरामे धनुष्या घातला हात ।
सुग्रीव आनंदे नाचत । कृपा श्रीरघुनाथ तुष्टला ॥१२४॥
एकाजनार्दना शरण । सुग्रीवाशीं सख्य जाले पूर्ण ।
पुढे वाळीचे निर्दळण । स्वये श्रीरघुनंदन करील ॥१२५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
सुग्रीवसख्यनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥
॥ ओंव्या १२५ ॥ श्लोक १७ ॥ एवं १४२ ॥
